समारोप - 1

विवेक मराठी    27-Jan-2018
Total Views |

मधुमेह एकटा-दुकटा आजार नाही. तो आपल्यासोबत कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयरोग असा सगळं लटांबर घेऊन येतो. म्हणजे नुसत्या ग्लुकोजवर नियंत्रण ठेवून आपलं आयुष्य वाढवायचं ईप्सित साध्य होत नाही. इतर प्रश्नांचा नियमित मागोवा घेणंदेखील तितकंच आवश्यक ठरतं. पण बऱ्याचदा होतं काय की कोलेस्टेरॉल अथवा रक्तदाब कमी झालेला दिसला म्हणजे लोक थेट ती ती औषधं बंद करतात. कृपया हे सगळे निर्णय तुमच्या डॉक्टरांवर सोपवायला काय हरकत आहे? त्यांना निदान याचं नीट ज्ञान तरी आहे, हे आपण का विसरावं?

गेलं वर्षभर आपण मधुमेह या विषयावर माहिती घेत आहोत. तसं पाहिलं तर हा विषय आणि त्याचा आवाका इतका मोठा आहे की आणखी बारीकसारीक मुद्दे मांडायचे राहून गेलेत. ते आपण घेतले नाहीत, कारण त्या मुद्दयांवर एक लेख होईल ही शक्यता नव्हती. शिवाय एकंदरीत ते मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत असंही नव्हतं. म्हणून त्यांना बगल देताना आपण फारसं गमावलं आहे असं वाटत नाही. रुखरुख मात्र राहून गेली. यदाकदाचित या लेखमालेचं पुस्तक झालं, तर ते मुद्दे नक्कीच त्यात समाविष्ट करता येतील. आता लेखमालेचा समारोप करताना यातल्या काही गोष्टींवर मंथन व्हावं असं वाटतंय.

मधुमेह हा विषय मोठा आहे हे आपण आधीच कबूल केलंय. त्यावर भरपूर लिहिलं जातंय, बोललं जातंय, जनजागृती व्हावी यासाठी 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातोय. पण तरीही कित्येक - म्हणजे जवळपास 50% मधुमेही लोकांचं ग्लुकोज नियंत्रणात नाही, हे सत्य विदारक आहे. शिवाय आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर मधुमेह तरुण वयात - अगदी विशी-तिशीत माणसांना गाठू लागलाय. जर कमी वयात तो गाठीला आला तर त्यासाठी संपूर्ण आयुष्यात होणारा एकूण खर्च, शरीराची होणारी हानी याचा अंदाज बांधणं कठीण आहे. देशाची लोकसंख्या आणि त्यात असलेले एकंदरीत मधुमेही पाहता सगळं केवळ कल्पनेच्या पलीकडचं वाटतंय, इतकं खरं. मधुमेह रक्तात ग्लुकोज वाढवतो. रक्त शरीरभर सगळीकडे फिरतं. साहजिकच मधुमेहाचे दुष्परिणाम शरीराच्या कुठल्याही भागावर होऊ शकतात. मग त्यासाठी इलाज करणं आलं, होणारं शरीराचं नुकसान सोसणं आलं, अवेळी मृत्यू आला, शरीराचे कापावे लागणारे भाग आले, भरपूर खर्च करूनही हाती काहीच न लागण्याची भीती आली. मनावर प्रचंड दडपण आणतील असेच हे विचार आहेत.

म्हणूनच इथे कोणाच्याही मनात येणाऱ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मधुमेह बरा होत नाही का? आयुष्यभर औषध घ्यावं लागतंच का? एका शब्दात सांगायचं झालं तर ''नाही.'' मधुमेह वयानुसार होणारा आजार आहे. जसं तुमचं वय मागे फिरवणं शक्य नाही, तसंच वयानुसार थकलेल्या, इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशी पुनरुज्जीवित करणं शक्य नाही. म्हणजे एकदा मधुमेह झाल्यावर शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात इन्श्युलीन बनणारच नाही, फार तर बनणारं इन्श्युलीन जपून वापरता येईल, इतकंच. औषधं देऊन, पथ्य पाळून आणि नियमित व्यायाम करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येईल, हे मात्र नक्की.

परंतु प्रत्यक्षात काय होतंय? खरंच लोक मधुमेह मनावर घेतात का? बऱ्याचदा असं होत नाही. कदाचित मधुमेहाने रोज कुठलाच त्रास होत नाही, दुखत खुपत नाही, त्यामुळे हे होत असावं. परंतु कित्येक मंडळी केवळ आळस म्हणून किंवा 'उगाच कशाला जा डॉक्टरांकडे, काही प्रॉब्लेम झाला तर जाऊ ' असं म्हणून गप्प बसतात. एकदा डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन पुन्हा पुन्हा केमिस्टला दाखवतात आणि तीच तीच औषधं घेत बसतात. काहींच्या मनात कदाचित डॉक्टरांची फी वाचवावी हाही हेतू असेल. परंतु जेव्हा खूप दिवस चालणारा, मधुमेहासारखा आजार असतो, तेव्हा नियमितपणा हे सर्वात महत्त्वाचं सूत्र असतं. रुग्ण स्वत: आजारी असतो. त्याला स्वत:च्या आजारासोबत चोवीस तास राहायचं असतं. डॉक्टर जेमतेम पंधरा मिनिटं ते अर्धा तास, तेही दोन-तीन महिन्यांतून एकदा त्याच्याबरोबर असतात. डॉक्टर देव नाहीत, त्यांच्या स्मरणशक्तीला मर्यादा आहेत. नुसते रिपोर्ट पाहून उपचार करणं रुग्णाच्या स्वत:च्याच फायद्याचं नाही. नियमितपणे डॉक्टरांना दाखवल्यावर तुमच्यात झालेला छोटासा बदलदेखील ते सहजी पकडू शकतात. मधुमेह तुमच्या शरीराच्या एखाद्या इंद्रियाला इजा करण्यापूर्वी ते तुम्हाला सावध करू शकतात. म्हणून त्यांच्याशी सतत संपर्क हवा.

आपली ही जबाबदारी टाळून काही जण 'तुमचंच औषध सुरू आहे, मी दुसऱ्या कोणाकडे गेलेलो नाही', 'शुगर नॉर्मल होती' असं मोठया दिमाखात सांगतात. अशा मंडळींची कीव करावीशी वाटते. ग्लुकोज रिपोर्टचे आकडे वाचून जर सगळं समजत असतं, तर मुळात डॉक्टर या संस्थेची गरजच उरली नसती. आज काय होतंय म्हणून मधुमेहासारख्या आजारांचा इलाज केला जात नाही, तर उद्या काही होऊ  नये, पाय कापावे लागू नयेत, मूत्रपिंड निकामी झाल्यावर डायलिसिस करावं लागू नये, डोळयांनी दिसायचं बंद होऊ  नये, कोवळया वयात हृदयरोग होऊ  नये यासाठी, या नात्याने इलाज केला जातो हे लक्षात ठेवायला हवं. डॉक्टरांवर दाखवल्या जाणाऱ्या अविश्वासाच्या सध्याच्या वातावरणात रुग्णाला समजावणं खरंच कठीण झालं आहे. ज्याने त्याने स्वत:च समजून घेणं जास्त आवश्यक आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंधच मुळी विश्वासाचे असायला हवेत. तिथेच शंका आली की प्रश्नांना सुरुवात झाली. ताप, जुलाब अशा काही दिवसांच्या आजारांबाबत फारसं बिघडत नाही. परंतु आयुष्यभर साथसंगत करणाऱ्या मधुमेहासारख्या आजारांच्या बाबतीत मात्र या विश्वासाच्या बंधनाला खूप महत्त्व येतं. सांगायचा मुद्दा हा की ज्यांच्यावर तुम्हाला सर्वात अधिक भरवसा वाटतो, त्या डॉक्टरांना तुम्ही धरून ठेवा, त्यांना वेळोवेळी दाखवा.. तरच तुमचा सर्वाधिक फायदा होईल. मधुमेहाच्या विळख्यातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेण्याचा, उत्तमरित्या बरीच वर्षं जगण्याचा हाच एक राजमार्ग आहे.

तितकीच महत्त्वाची दुसरी एक गोष्ट. मधुमेह एकटा-दुकटा आजार नाही. तो आपल्यासोबत कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयरोग असा सगळं लटांबर घेऊन येतो. म्हणजे नुसत्या ग्लुकोजवर नियंत्रण ठेवून आपलं आयुष्य वाढवायचं ईप्सित साध्य होत नाही. इतर प्रश्नांचा नियमित मागोवा घेणंदेखील तितकंच आवश्यक ठरतं. पण बऱ्याचदा होतं काय की कोलेस्टेरॉल अथवा रक्तदाब कमी झालेला दिसला म्हणजे लोक थेट ती ती औषधं बंद करतात. औषधं घेतल्याने कमी झालेलं कोलेस्टेरॉल व रक्तदाब, ती बंद केल्यावर पुन्हा मूळपदावर येतात हे इथे लक्षात ठेवायला हवं. या औषधांचा जो काही फायदा असतो, तो ती सुरू असेपर्यंतच. आपल्याच मनाने औषधं बंद वा चालू करणं तुम्हालाच पुढे त्रास देईल.

काही जण 'औषधं बंद करून बघू या काय होतंय ते' असाही विचार करतात. कृपया हे सगळे निर्णय तुमच्या डॉक्टरांवर सोपवायला काय हरकत आहे? त्यांना निदान याचं नीट ज्ञान तरी आहे, हे आपण का विसरावं? औषधं घेण्याने काही त्रास होत असेल, औषधं महाग वाटत असतील तर तसं डॉक्टरांना सांगता येईल. औषधं बदलून घेता येतील. पण स्वत:च स्वत:च्या आरोग्याशी खेळ करणं म्हणजे.... बघा बुवा!

काही जण वेगळा आत्मविश्वास दाखवतात. त्यांना औषधं घ्यायचा कंटाळा असतो. आपण जोरदार पथ्य करू, भरपूर व्यायाम करू आणि आपल्या मधुमेहाला काबूत ठेवू असं त्यांना वाटत असतं. त्यांनी तसा प्रयत्न जरूर करावा. औषधांशिवाय एखादा आजार बरा होत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. पण तिथे मृगजळाच्या मागे धावल्यागत करू नये. आता बरा होईल, उद्या कमी होईल असं करत शरीराचं नुकसान होईपर्यंत वेळ काढू नये. जर प्रयत्नच करायचं ठरवलंत तर तीनेक महिने वाट पाहा. त्यात ग्लुकोज पूर्णत: नॉर्मल झालं तर अतिशय छान, नाहीतर औषधं सुरू करणं योग्य. कारण मधुमेहाचा केवळ खाण्यापिण्याशी संबंध असला असता, तर रित्या पोटीचं ग्लुकोज थोडंच वाढलं असतं! आणि व्यायामाने त्यावर विजय मिळवता आला असता, तर उन्हातान्हात खडी फोडण्याचं काम करणाऱ्या मजुरांना तो कधीच झाला नसता. त्यापेक्षा प्रथम औषध चालू करून मधुमेह ताब्यात आणावा आणि मग हळूहळू औषधं कमी करत आणावी, शेवटी बंद करावी हे चांगलं नाही का? मला तरी हा पर्याय जास्त सयुक्तिक वाटतो.

काही जण तपासणी करणाऱ्या लॅबोरेटरीबद्दल शंका व्यक्त करतात. अमुक ठिकाणी तपासलं म्हणजे ग्लुकोज जास्त येतं असा त्यांचा खाक्या असतो. त्यांनी हवं तर दुसऱ्या लॅबोरेटरीत जावं, घरी ग्लुकोज तपासावं. पण जर कुठेही तपासून ते जास्तच दिसत असलं तर इलाज मात्र जरूर करावा. तिथे हयगय करू नये.

9892245272