कृतज्ञता, परतफेड आणि उज्ज्वल भविष्याची नांदी

विवेक मराठी    29-Jan-2018
Total Views |

 

 

 इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा 15 ते 19 जानेवारी 2018 असा तब्बल सहा दिवसांचा भारत दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. दौऱ्यांमुळे इस्रायलबद्दल आपल्या मनात असलेली अपराधीपणाची जाणीव तसेच कुतूहल संपायला मदत झाली असून भविष्यात हे संबंध अधिक वास्तववादी आणि बहुआयामी होतील अशी अपेक्षा आहे. नेतान्याहूंसोबत 130 इस्रायली उद्योगपतींचे आजवरचे सगळयात मोठे शिष्टमंडळ प्रवास करत होते. नेतान्याहूंच्या सहा दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाचे एका ओळीत वर्णन करायचे तर कृतज्ञता, परतफेड आणि उज्ज्वल भविष्याची नांदी हे तीन शब्द सुचतात. 

 इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा 15 ते 19 जानेवारी 2018 असा तब्बल सहा दिवसांचा भारत दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. इस्रायल आणि भारताच्या स्वातंत्र्योत्तर 70 वर्षांच्या आणि पूर्ण राजनैतिक संबंधांच्या 26 वर्षांच्या काळात केवळ दुसऱ्यांदा इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली. आजच्या घडीला सर्वाधिक संख्येने ज्यू समुदायाचे वास्तव्य असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला भेट देणारे नेतान्याहू पहिलेच पंतप्रधान. सप्टेंबर 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान अरिएल शारोन यांना तेल-अवीवमधील दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबईची आपली प्रस्तावित भेट रद्द करावी लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यानंतर केवळ 6 महिन्यांच्या आणि भारताने संयुक्त राष्ट्रांत जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याच्या डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाबद्दल त्यांची निंदा करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मत दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये होत असलेल्या या दौऱ्याकडे म्हणूनच अनेक देशांचे लक्ष लागले होते. नेतान्याहूंसोबत 130 इस्रायली उद्योगपतींचे आजवरचे सगळयात मोठे शिष्टमंडळ प्रवास करत होते. नेतान्याहूंच्या सहा दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाचे एका ओळीत वर्णन करायचे तर कृतज्ञता, परतफेड आणि उज्ज्वल भविष्याची नांदी हे तीन शब्द सुचतात.

नेतान्याहूंचे विमान दिल्लीत उतरल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजशिष्टाचाराला छेद देऊन विमानतळावर त्यांचे स्वागत केले. हैफा येथे 23 सप्टेंबर 1918 रोजी झालेली लढाई घोडदळाचा वापर झालेली किंबहुना शेवटची मोठी लढाई. हैफाच्या लढाईला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होतील. ओटोमन तुर्की साम्राज्यापासून हैफा स्वतंत्र करताना हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय सैनिकांचे तिथे स्मारक आहे. दर वर्षी 23 सप्टेंबरला इस्रायल हैफा मुक्तिदिन साजरा करतो. दिल्लीतील तीन मूर्ती चौकातला स्तंभही पहिल्या महायुध्दात इजिप्त, गाझा पट्टी, सीरिया आणि हैफा येथे झालेल्या लढायांत मोठे शौर्य गाजवणाऱ्या ब्रिटिश सैन्यातील भारतीय तीन तुकडयांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. नेतान्याहूंच्या भेटीदरम्यान भारताने तीन मूर्ती चौकाचे आणि रस्त्याचे 'तीन मूर्ती हैफा चौक आणि मार्ग' असे नामांतर करून इस्रायलने गेली 100 वर्षे भारतीय सैनिकांबद्दल दाखवलेल्या कृतज्ञतेची परतफेड केली.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्रिपदही भूषवणाऱ्या नेतान्याहूंनी पहिल्याच दिवशी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्या रात्री नेतान्याहूंच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदींनी 7, लोककल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी एका विशेष भोजनाचे आयोजन केले होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नेतान्याहूंचे औपचारिकरित्या स्वागत करण्यात आले. त्या वेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांशी भेट घेतली. राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान उपस्थितांना देण्यात आलेला ऑॅलिव चहा हा इस्रायलच्या सहकार्याने राजस्थानातील बिकानेर येथे लागवड करण्यात आलेल्या ऑॅलिवच्या फळांपासून बनवण्यात आला होता. त्याच दिवशी नेतान्याहू आणि मोदीं यांनी संयुक्त निवेदन प्रसारित केले, भारत-इस्रायल संयुक्त सीईओ फोरमला संबोधित केले आणि सायबर सुरक्षा, खनिज तेल आणि वायूचे उत्खनन, थेट हवाई वाहतूक, संयुक्त सिनेनिर्मिती, होमिओपथी आणि आयुष तसेच गुंतवणुकीसंबंधी 9 वेगवेगळया सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

तिसऱ्या दिवशी नेतान्याहूंनी आग्रा येथील ताज महालला सपत्नीक भेट दिली. या भेटीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेतान्याहूंचे आदरातिथ्य केले आणि उत्तर प्रदेशबरोबर होत असलेल्या सहकार्याबद्दल चर्चादेखील केली. संध्याकाळी ऑॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित रायसिना डायलॉगमध्ये सहभागी होऊन बेंजामिन नेतान्याहूंनी भविष्यातील आव्हानांची, संधींची आणि त्यात भारत-इस्रायल सहकार्याबद्दल बोलताना आगामी काळात होणाऱ्या सहकार्याची नांदीच दिली. महासत्ता व्हायचे तर आर्थिक शक्ती, सामरिक शक्ती आणि राजकीय शक्ती या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

चौथ्या दिवशी, म्हणजेच 14 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या राजधानीत नेतान्याहूंचे जंगी स्वागत केले. 8 कि.मी. लांबीच्या भव्य रोड शोमध्ये हजारो शाळकरी मुलांनी आणि पारंपरिक वेषातील नागरिकांनी नेतान्याहूंचे स्वागत केले. दिल्लीत राजघाटाला भेट दिल्यानंतर नेतान्याहूंनी मोदींसह साबरमती आश्रमाला भेट देऊन चरख्यावर सूतकताई केली. त्यानंतर साबरमतीच्या सुशोभित किनाऱ्यावर उभे राहून दोन्ही नेत्यांनी पतंग उडवत गुजरातमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असलेल्या उत्तरायण किंवा मकर संक्रांतीचा सण साजरा केला. या स्वागताबद्दल नापसंती व्यक्त करताना काही टीकाकार म्हणाले की, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचे भव्य स्वागत करण्यामागे जपानची भारतात होत असलेली प्रचंड गुंतवणूक आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानचे 88000 कोटींचे जवळपास बिनव्याजी कर्ज अशा अनेक गोष्टी होत्या. भारत-जपान व्यापार आणि गुंतवणुकीच्या तुलनेत इस्रायलशी आपला व्यापार आणि गुंतवणूक किरकोळ आहे. मग एवढे भव्यदिव्य स्वागत करायची काय आवश्यकता होती? मला वाटते की, त्यात एकीकडे इस्रायलबद्दल सामान्य भारतीयांना असलेले प्रेम आणि कौतुक होते, तर दुसरीकडे 1962चे चीनविरुध्द, 1965, 1971 आणि 1998 सालचे पाकविरुध्द युध्द आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी कायमच इस्रायलकडून होत असलेले सहकार्य, 26 जानेवारी 2001मध्ये कच्छमधील भूकंपानंतर इस्रायलने तत्परतेने उभे केलेले फील्ड हॉस्पिटल असो, 2002च्या दंगलींनंतर अमेरिकेत आणि युरोपीय देशांत मोदींची मोठया प्रमाणावर बदनामी करण्यात येऊन त्यांना व्हिसा देण्याविरोधात जोरदार मोहीम चालू असताना 2006 सालच्या कृषी महोत्सवात इस्रायलने त्यांचे केलेले स्वागत आणि इस्रायलमध्ये जन्मलेल्या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने सौराष्ट्र आणि कच्छ भागातील हरित क्रांती या सगळया गोष्टींमधील इस्रायलच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी पंतप्रधान मोदींनी साधली. गुजरातची भेट ही जशी भूतकाळातील ॠणांची उतराई होती, तशीच येणाऱ्या काळातील सहकार्याची नांदी होती. या भेटीत दोघा पंतप्रधानांनी मुख्यमंत्री मोदींच्या स्वप्नातून उभ्या राहिलेल्या आय-क्रिएट या उच्च तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट-अप कंपन्यांसाठी असलेल्या इनक्युबेटरच्या नवीन आणि भव्य कॅम्पसचे लोकार्पण करण्यात आले. मोदींच्या भेटीत जाहीर केलेल्या दोन्ही देशांतील स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्पर्धेतील विजेत्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदी आणि नेतान्याहूंनी साबरकांठा जिल्ह्यातील वदराद येथे भारत-इस्रायल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कृषी गुणवत्ता केंद्राला भेट दिली, तसेच रिमोट कंट्रोलद्वारे भूजजवळील खजुरासाठी असलेल्या कृषी गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारत-इस्रायल सहकार्यातून देशभरात 35हून अधिक कृषी गुणवत्ता केंद्रे उभी राहत असून त्यातील 20 केंद्रे आज पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. मोदींच्या इस्रायल दौऱ्यात दोघा पंतप्रधानांनी समुद्रकिनाऱ्यावर उभे राहून एका वाहनात बसवलेल्या निक्षारीकरण यंत्राने शुध्द केलेले पाणी प्यायले होते. या भेटीनंतर इस्रायलने ही गाडी भारताला भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. नेतान्याहू गुजरातमध्ये असताना इस्रायलच्या दिल्लीतील दूतावासात राजकीय संबंध हाताळणाऱ्या अधिकारी अद्वा विलचिंन्स्की यांच्याकडून ही जीप कच्छच्या रणात तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना भेट म्हणून देण्यात आली.

गुजरातमधील व्यग्र दिवसानंतर, देशाची आर्थिक तसेच मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत नेतान्याहूंचे आगमन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेतान्याहूंचे विमानतळावर स्वागत केले. भारत-इस्रायलच्या मैत्री संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, तसेच स्थानिक ज्यू लोकांनी भारत-इस्रायलच्या झेंडयांसह पंतप्रधानांच्या गाडयांच्या ताफ्याचे विमानतळाबाहेर, मरीन ड्राइव्हवर आणि ते राहत असलेल्या ताज हॉटेलसमोर उभे राहून स्वागत केले. 18 जानेवारी रोजी नेतान्याहूंसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नाश्त्यासाठी नेतान्याहूंनी दिलीप संघवी, आदि गोदरेज, आनंद महिंद्रा आणि राहुल बजाज अशा भारतीय उद्योग जगतातील दिग्गजांना बोलावले होते. त्यानंतर भारत-इस्रायल उद्योग परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणूक तसेच उद्योगांच्या बाबतीत आघाडीचे राज्य असल्याचे प्रतिपादन करत इस्रायली उद्योजकांचे स्वागत केले. नेतान्याहूंनी आपल्या भाषणात 2003 साली डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्यानंतर इस्रायलमध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आपण कशा प्रकारे खाजगीकरणाला आणि सरकारी क्षेत्रातील कार्यक्षमतेला चालना दिली. गेल्या वर्षात स्पर्धात्मकतेच्या निर्देशांकात इस्रायलने 26वरून 15व्या स्थानावर झेप घेतली असली, तरी इस्रायलच्या पुढे असणारे सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड यासारखे देश आपली झोप उडवत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नेतान्याहू यांनी एकांतात जेवण करताना महाराष्ट्र-इस्रायल सहकार्याबद्दल चर्चा केली. ताज हॉटेलवर 26/11च्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर नेतान्याहू त्याच हल्ल्याचे लक्ष्य असलेल्या नरीमन किंवा खबात हाउस येथे गेले. प्रवासी ज्यूंना घरगुती अन्न आणि वातावरण उपलब्ध करणाऱ्या, तसेच अडचणीत सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या खबात हाउसवरील हल्ल्यात तेथे स्थित राबी गॅव्रिएल होल्त्झबर्ग आणि त्यांची पत्नी रिवका यांना अन्य 7 इस्रायली आणि ज्यू नागरिकांसह हौतात्म्य पत्करावे लागले असले, तरी त्यांचा 2 वर्षांचा मुलगा मोशे आश्चर्यकारकरित्या बचावला. त्याला वाचवण्यात त्याचा सांभाळ करणारी आया सँड्राने स्वत:चा जीव धोक्यात घातला. या हल्ल्यानंतर इस्रायलला स्थायिक झालेला मोशे नेतान्याहूंच्या भेटीनिमित्त सहकुटुंब मुंबईत आला होता. खबात हाउसमध्ये नेतान्याहूंनी मोशे, सँड्रा आणि त्याचे कुटुंबीय यांची भेट घेतानाच खबात हाउसच्या स्मारक प्रकल्पाचेही अनावरण केले. त्यानंतर नेतान्याहू यांनी मुंबईत अनेक शतकांपासून राहणाऱ्या व शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोठा वाटा उचलणाऱ्या ज्यू समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. नेतान्याहूंच्या भारत दौऱ्याची सांगता शालोम बॉलिवूड या भव्य सांस्कृतिक सोहळयाने झाली. त्याला सिनेस्टार अमिताभ बच्चन, त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, मुलगी श्वेतासह सुभाष घई, करण जोहर, इम्तियाझ अली, मधुर भांडारकर, सारा अली खान, राज नायक, रॉनी स्क्रूवाला असे सिने जगतातील आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते आणि उद्योजक उपस्थित होते. हिब्रू बायबल आणि संस्कृत ग्रंथ हे जगातील सर्वात जुने आणि श्रेष्ठ ग्रंथ असून ती भारताच्या आणि इस्रायलच्या बौध्दिक सामर्थ्याची प्रतीके आहेत, भारतीय अभिनेत्यांची जागतिक लोकप्रियता आणि इस्रायलचे तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा मेळ घातल्यास संपूर्ण जगाला मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होईल असे सांगताना नेतान्याहूंनी राजशिष्टाचाराला आणि सुरक्षेबद्दलच्या काटेकोर नियमांना फाटा देत उपस्थित सिने कलाकारांना आणि निर्मात्यांना स्टेजवर बोलावून त्यांच्यासह सेल्फी काढला.

 

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात कार्यक्रमाचा भाग नसताना नेतान्याहूंनी आग्रहाने त्यांना आधुनिक इस्रायलच्या संकल्पनेचे जनक आणि 'ज्युइश राष्ट्र' या पुस्तकाचे लेखक थिओडर यांचे स्मृती स्मारक दाखवले. हर्झल यांच्यानंतर काही दशकांनंतर - म्हणजे 1922 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या 'हिंदुत्व' या ग्रंथात इस्रायल स्वतंत्र झाल्यास आपल्याला आनंदच होईल असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. त्यानंतरही सावरकरांनी वेळोवेळी इस्रायलचे जोरदार समर्थन केले असून 1947 साली त्यांनी इस्रायलच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका नेतान्याहूंच्या लिकुड पक्षाच्या भूमिकेशी जुळणारी आहे. असे असूनही इस्रायलमध्ये सावरकरांबद्दल कोणाला फारसे ठाऊक नाही. ज्यांना ठाऊक आहे, त्यांच्या मनात डाव्या पत्रकारांच्या पध्दतशीर दुष्प्रचारामुळे 'सावरकर, संघ आणि शिवसेना हे फॅसिस्ट पक्ष असून हिटलरचे समर्थक होते' असे चित्र उभे होते. मोदींच्या इस्रायल दौऱ्यात नेतान्याहूंनी हर्झलबद्दल जी गोष्ट केली, तिची परतफेड करण्याची उत्तम संधी भाजपा सरकारांनी गमावली असे खेदाने म्हणावेसे वाटते. या एकाच दौऱ्यात हैफाच्या ओटोमन साम्राज्यापासून मुक्तीचा गौरवही करण्यात आला, तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या राजघाट आणि साबरमती येथील स्मारकांनाही भेट देण्यात आली. ज्या भारतीय सैनिकांनी हैफाला पराक्रम गाजवला, त्याच भारतीय सैनिकांनी ओटोमन तुर्कांचे साम्राज्य खालसा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे साम्राज्य पुनःप्रस्थापित करण्याच्या मुस्लीम समाजाच्या खिलाफत चळवळीला महात्मा गांधींनी पाठिंबा दिला. वैचारिक गोंधळाचा एवढा भाग वगळल्यास नेतान्याहूंच्या भारत दौऱ्यामुळे भारत-इस्रायल संबंध एका नव्या उंचीवर गेले आहेत. गेल्या तीन वर्षांतील उभय पंतप्रधानांच्या व राष्ट्रपतींच्या दौऱ्यांमुळे इस्रायलबद्दल आपल्या मनात असलेली अपराधीपणाची जाणीव तसेच कुतूहल संपायला मदत झाली असून भविष्यात हे संबंध अधिक वास्तववादी आणि बहुआयामी होतील अशी अपेक्षा आहे.

9769474645