एका बीजापोटी...

विवेक मराठी    30-Jan-2018
Total Views |

 

२००३च्या आसपास खाजगी उद्योग क्षेत्रात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. समाजजीवनात वादळ निर्माण करणारा तो काळ होता. त्याच काळात मिलिंद कांबळे यांनी ‘डिक्की’ची स्थापना केली. दलित समाजात उद्योजकीय प्रेरणा जागवणे आणि उद्योग क्षेत्रात दलित समाजाचे स्थान निर्माण करणे हा डिक्कीचा उद्देश होता. या उद्देशाला प्रत्यक्षात आणण्यासाठी मिलिंद कांबळे अविरतपणे कष्ट करत राहिले. टीका आणि असहकार यांचा सामना करत त्यांनी संघटन बांधले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "नोकऱ्या मागणारे होण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा.” समकालीन संदर्भ लक्षात घेता राष्ट्रपती महोदयांचे उद्गार खूप महत्त्वाचे आणि दिशादर्शक आहेत. वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली आणि मन आठ वर्षे मागे गेले, कारण राष्ट्रपतींनी काढलेले उद्गार मी तेव्हा एका ध्येयनिष्ठ तरुणाकडून ऐकले होते आणि योगायोगाने राष्ट्रपतींनी जेव्हा हे उद्गार काढले, तेव्हा तो तरुण तेथे उपस्थित होता. त्या तरुणाचे नाव पद्मश्री मिलिंद कांबळे. अभाविपचे पूर्ण वेळ काम केलेले मिलिंद कांबळे व्यवसायाने इंजीनिअर आहेत. १९९० साली झालेल्या फुले-आंबेडकर संदेश यात्रेत ते सहभागी होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस अनुभवासाठी नोकरी केल्यावर मिलिंद कांबळे यांनी पुण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि स्थिरताही मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र चरित्र आणि साहित्य संकलित करून एक वेबसाइट तयार करून मिलिंद कांबळे डॉ. बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त झाले. २००३च्या आसपास खाजगी उद्योग क्षेत्रात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. समाजजीवनात वादळ निर्माण करणारा तो काळ होता. त्याच काळात मिलिंद कांबळे यांनी ‘डिक्की’ची स्थापना केली. दलित समाजात उद्योजकीय प्रेरणा जागवणे आणि उद्योग क्षेत्रात दलित समाजाचे स्थान निर्माण करणे हा डिक्कीचा उद्देश होता. या उद्देशाला प्रत्यक्षात आणण्यासाठी मिलिंद कांबळे अविरतपणे कष्ट करत राहिले. टीका आणि असहकार यांचा सामना करत त्यांनी संघटन बांधले.

२०१० सालची गोष्ट. पुण्यात असताना मिलिंद कांबळेंना सहज फोन केला. “भेटू या का?” मिलिंदजी “हो” म्हणाले आणि ताडीवाला रोडवरच्या त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. गप्पांच्या ओघात ”१४ एप्रिलला दलित उद्योजक विशेषांक प्रकाशित करू या” असे ठरले आणि लागलीच हा विषय मी दिलीपजींच्या कानावर घातला. त्यांनीही या विषयाचे स्वागत केले आणि आमची पुढच्या बैठकीची तारीखही निश्चित झाली. प्रभादेवी कार्यालय हे स्थान निश्चित झाले. मिलिंद कांबळे मुंबईत आले, आमची दलित उद्योजक विशेषांकाची चर्चा सुरू झाली आणि नवे नवे पैलू समोर येऊ लागले. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन दलित उद्योजकांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचा विषय पुढे आला. एक दिवसाचे प्रदर्शन आणि त्यात दलित उद्योजक विशेषांकाचे प्रकाशन अशी योजना ठरली आणि आम्ही कामाला लागलो. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. सातत्याने बैठका होत गेल्या आणि कार्यक्रम घडत गेला. एक दिवसाचे दलित उद्योजकांचे उत्पादन प्रदर्शन तीन दिवसांच्या ‘दीप एक्स्पो’मध्ये रूपांतरित झाले. दलित समाजातील उद्योजकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती. सुरुवातीला अंक कसा होईल यांची आम्हाला वाटणारी चिंता आता दीप एस्क्पोमुळे अधिक वाढली होती. कोणताही पूर्वानुभव गाठीशी नसताना मिलिंद कांबळे आणि सा.विवेकच्या टीमने दीप एक्स्पोचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतले होते. 

 कधी दिलीपजींसोबत तर कधी एकटा पुण्यात जाऊ लागलो. हळूहळू दीप एक्स्पो आकाराला येऊ लागले. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हे एक्स्पो करायचे ठरले. उद्घाटनाला रतन टाटा, अनू आगा अशा मान्यवरांनी येण्याचे मान्य केले. आयोजन-नियोजनास गती आली. आधी दलित उद्योजक विशेषांक करायचे ठरले होते, तो विषय बारगळला आणि दलित उद्योजकांच्या जडणघडणीचा मागोवा घेणारे एक पुस्तक करण्याचा निर्णय झाला. ती जबाबदारी माझ्याकडे आली. मिलिंद कांबळेंकडे असणाऱ्या सूचीतून आम्ही पंधरा उद्योजक निवडले. त्यांच्या मुलाखतींच्या आधारे ‘दीपस्तंभ’ हे पुस्तक तयार झाले. जून महिन्यात पुण्यात पहिले दीप एक्स्पो पार पडले. समाजजीवनात, उद्योजकीय जीवनात या घटनेने परिवर्तनाचा मुळारंभ केला. असेही होऊ शकते यावर प्रसारमाध्यमांचाही विश्वास बसला. डिक्कीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात एक नवा प्रवाह प्रवाहित झाला. दलित समाजात तरुण उद्योजक आहेत, उद्योग जगतातील सर्व सेक्टर्समध्ये त्यांचे लक्षणीय प्रतिनिधित्व आहे आणि संधी मिळाली तर हे समाजबांधव आपल्या गुणवत्तेच्या बळावर खूप पुढे जाऊ शकतात, हे डिक्कीने सिद्ध केले. मिलिंद कांबळे यांनी एक ध्येय घेऊन आपली वाटचाल सुरू केली. समाजाची मानसिकता बदलत एका सकारात्मक दिशेला घेऊन जाण्याचे काम मिलिंद कांबळे यांनी केले. पुण्यानंतर मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथे मिलिंद कांबळेंनी दीप एक्स्पोचे आयोजन करून डिक्कीचा विषय देशव्यापी केला. सरकारी धोरणात आवश्यक ते बदल घडवून आणले. डिक्की आणि मिलिंद कांबळे देशाचे झाले. मिलिंद कांबळेंच्या या सुरुवातीच्या काळात सा.विवेकचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची संधी मला लाभली. आपण नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मिलिंद कांबळे मांडत होते. आता आपल्या देशाची तीच भूमिका झाली आहे आणि ती मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुखातून व्यक्त झाली. आता हा विषय देशाचा झाला आहे. मिलिंद कांबळे आणि डिक्की यांनी सुरुवात केली. एका बीजाचे डेरेदार वृक्षात रूपांतर झाले. या वृक्षाच्या छायेत सर्व समाजातील हीनदीन वंचितांनी यावे आणि संपन्न व्हावे, हीच अपेक्षा.

रवींद्र गोळे

०९५९४९६१८६०