लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख...

विवेक मराठी    31-Jan-2018
Total Views |

व्यवसायातून समृध्दी प्राप्त झाल्यावर काहींच्या वृत्तीत एकदम विचित्र पालट झालेला पाहायला मिळतो. सुरुवातीला नम्र असणारे लोक नंतर एकदम ताठपणाने वागू लागतात. संपत्तीच्या अहंकारामुळे त्यांच्या बोलण्यात जरब येते. ते आपल्याहून छोटया लोकांना तुच्छ लेखून त्यांचा जाहीर अपमान करायला मागे-पुढे बघत नाहीत. आपल्याजवळची संपत्ती जणू चिरकाल टिकणार आहे, अशा भ्रमात ते वावरू लागतात. मी या भोवऱ्यात अडकलो नाही, कारण माझ्या आई-वडिलांचे संस्कार आणि डोळयांनी पाहिलेल्या घटना!

 गरिबीमुळे आयुष्यात आजवर अनेकदा माझे अपमान झाले आहेत. सुरुवातीला मी त्याबद्दल भावनाप्रधान होतो खरा, पण नंतर त्याचे काही वाटेनासे झाले. 'मान सांगावा जना अन अपमान सांगावा मना' अशी म्हण आहे. मी मात्र माझे अपमान विनासंकोच जगापुढे मांडतो, कारण त्यातूनही मला खूप काही शिकायला मिळाले आहे.

माझा आयुष्यातील पहिला अपमान लहानपणी एका लग्नाच्या पंगतीत झाला. मी ताटावर बसलो असताना एक गृहस्थ लगबगीने आले आणि मला म्हणाले, ''अरे बाळा, ही पंगत बडया लोकांसाठी आहे. तू येथून उठ आणि नंतरच्या पंगतीला बस बघू.'' मी आपला निमूटपणे उठलो. नंतर त्या गृहस्थांनी त्यांच्या कुणा परिचिताला हाक मारून बोलावले आणि माझ्या जागेवर बसवले. मी ही गोष्ट आईला सांगितली, तेव्हा तिने शुक्रवारची कहाणी सांगून माझी समजूत काढली. आजच्या जगात मान माणसाला नसून त्याच्याजवळच्या संपत्तीला असतो, हे कठोर वास्तव पहिल्यांदा माझ्यापुढे आले, पण त्याचबरोबर सौजन्याचे महत्त्वही उमगले. शाळकरी वयातच मी समवयीन मुलांपेक्षा विचाराने प्रौढ झालो होतो. पुढेही अपमान निरनिराळया रूपांत घडतच राहिले. मी आमच्याच दुकानात पडेल ते काम करत होतो, पण त्या कष्टाचे कौतुक करण्यापेक्षा कुणीतरी मला हिणवत होते. बाजारपेठेत गेल्यावर 'धंदा करणे तुम्हा लोकांचे काम नाही' अशा शब्दांत कुणी कुत्सितपणे बोलत होते. मी खालमानेने ते शेरे ऐकून घेत होतो, पण कधीही प्रत्युत्तर दिले नाही.

पण मी व्यवसायात स्थिरावल्यावरही हे अपमान होणे बंद झाले नाहीच. वास्तविक मी छोटासा दुकानदार असलो तरी स्वतंत्र होतो, कोणत्याही वाईट वस्तूंची विक्री करत नव्हतो. तरीही माझी प्रतिष्ठेची पातळी इतकी निम्न होती, की सुरुवातीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबीयांना कुणी घरगुती कार्यक्रमांसाठी किंवा अगदी मुलांच्या वाढदिवसालाही बोलवत नसे. मीसुध्दा ती अपेक्षा करणे सोडून दिले. पुढे जेव्हा मला मोठमोठया ऑॅर्डर्स मिळाल्या आणि दर्जेदार पुरवठयासाठी दुबईच्या शासकांकडून पुरस्कार मिळाला, तेव्हा मात्र चमत्कार झाला. अनोळखी लोक, संस्था, संघटना आवर्जून आमंत्रणे पाठवू लागले, रिमाइंडर कॉल किंवा संदेश पाठवून येण्याचा आग्रह करू लागले. मी त्याने हुरळून गेलो नाही. शुक्रवारची कहाणी माझ्या कायम डोळयापुढे राहिली. मला श्रीमंती आल्यावर मी माजलो नाही, याचे कारण माझ्या आई-बाबांनी केलेले संस्कार. संपत्तीचा अहंकार बाळगल्यास काय होते, याची अनेक उदाहरणे मी डोळयाने बघितली आहेत.

एकदा मी दुकानात काम करत असताना एका श्रीमंत व्यापाऱ्याचे आगमन झाले. व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना ओळखत होतो. या माणसातील वाईट गोष्ट म्हणजे श्रीमंतीमुळे याला प्रचंड माज आला होता आणि तो त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसे. साधे संभाषणही नम्र आणि विनयशील नसून बोलण्यात जरब आणि वर्चस्व दिसून येई. तर हा माणूस सकाळी माझ्या दुकानात आला आणि त्याने मला फर्मावले, ''अरे धनंजय! हे बघ. हे एक कागदपत्रांचे पाकीट मी तुझ्याकडे ठेवून जातोय. एक माणूस आज दुपारी येऊन ते घेऊन जाईल. त्याला ते आठवणीने दे.'' साधारणपणे आपण दुसऱ्याला काही काम सांगताना मृदू भाषेचा आणि शिष्टाचाराचा वापर करतो, पण स्वभावानुसार हा माणूस मला आज्ञा सोडत होता. तो बडा व्यापारी आणि मी एक छोटा दुकानदार. मी आपली होकारार्थी मान डोलवली आणि ते पाकीट काउंटरजवळच्या एका कप्प्यात ठेवून दिले. तो निघून गेल्यावर मी माझ्या कामात गुंग झालो. दिवसभर वाट बघूनही त्याचा माणूस काही पाकीट न्यायला आला नाही.

दुसऱ्या दिवशी नेमके मला कामानिमित्त जवळच्या शहरात जावे लागले. नेमके माझ्या अनुपस्थितीत त्या व्यापाऱ्याचा माणूस पाकीट न्यायला आला. मी दुकानात नव्हतो आणि माझ्या कर्मचाऱ्यांना पाकिटाविषयी काहीही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांनी असमर्थता व्यक्त केली. यावर त्या माणसाने त्या व्यापाऱ्याला फोन करून काय सांगितले कुणास ठाऊक, पण हा व्यापारी दुसऱ्या दिवशी आमच्या दुकानात आला तोच संतप्तपणे गदारोळ माजवत. मला म्हणाला, ''स्वत:ला काय समजतोस? तुझा आणि तुझ्या दुकानाचा एवढासा जीव. माझी ताकद काय आहे, याचा तुला अंदाज नाही. मनात आणले तर तुझे दुकान बंद करून दाखवीन.'' मी शांत राहिलो. काय घडले हे आर्जवी भाषेत समजावून सांगितले. दिलगिरी व्यक्त करून स्वत: ते पाकीट संबंधित माणसाकडे नेऊन देण्याची तयारी दाखवली. मी दुरुत्तरे न करता नम्रपणे माफी मागतो आहे, हे बघून त्या व्यापाऱ्याचा अहंकार सुखावला. इकडे त्याचे ते धमकीचे शब्द ऐकून माझे कर्मचारी खवळले. ''क्षुल्लक कारणावरून तुम्ही इतके अपमानास्पद का ऐकून घेतलेत?'' असे मला विचारू लागले. मी त्यांना शांत केले आणि समजावले, ''बाबांनो! आपण येथे परमुलखात व्यवसाय करायला आलो आहोत. भांडणे करायला नाही. शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा वाद मिटवणे केव्हाही चांगले. त्या माणसाने माझा अपमान केला, पण त्यामुळे माझ्या अंगाला भोके पडली का? जाऊ दे. मला सवय आहे अशा बोलण्यांकडे दुर्लक्ष करण्याची. तुम्हीही नका मनावर घेऊ.'' मी नंतर हा घडलेला प्रसंग विसरून गेलो.

त्यानंतर दोन-तीन वर्षे लोटली. माझी कंपनी हळूहळू चांगली जोम धरू लागली. काही बडी हॉटेल्स, हॉस्पिटल्स, विमानतळाचा केटरिंग विभाग यांना मी नियमित मालपुरवठा करू लागलो. माझ्या उत्पादनांच्या उत्तम दर्जामुळे दुबईतील व्यापारी वर्तुळातील अन्य संस्थाही माझ्याकडे विचारणा करू लागल्या. अशाच एका चर्चेसाठी मी एका कंपनीच्या मालकाकडे गेलो होतो. आमची चर्चा संपल्यावर त्या मालकाला कुठेतरी जायचे होते, म्हणून त्याने ड्रायव्हरला गाडी काढण्याची सूचना दिली आणि आम्ही बरोबरच कार्यालयाबाहेर पडलो. गाडीशेजारी ड्रायव्हर उभा होता. त्याने मालकासाठी अदबीने गाडीचे दार उघडले. ड्रायव्हरशी नजरानजर होताच मला आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी माझ्या दुकानात येऊन माझा धंदा संपवण्याची भाषा करणारा तो श्रीमंत माणूस या कंपनीच्या मालकाकडे चक्क ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो माझी नजर टाळून घाई-गडबडीने निघून गेला, पण मी मात्र कुतूहलामुळे अस्वस्थ झालो होतो. हा प्रकार काय आहे, हे शोधून काढण्याचा मी निश्चय केला. चौकशीअंती असे समजले की त्या उर्मट श्रीमंताला व्यापारात इतके प्रचंड नुकसान झाले होते, की त्याच्याकडचे वैभव पार धुऊन निघाले होते. इतरांना दुखावण्याचा त्याचा स्वभाव असल्याने व्यापारी वर्तुळात त्याच्या अडचणीला कुणीही धावून गेले नाही. अखेर कफल्लक होऊन तो चरितार्थासाठी ओळख लपवून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या आवाजातील ती जरब संपून तेथे लाचारी आली होती. कालगती मोठी विचित्र असते, हेच खरे. मला एक सुभाषित आठवते -

तानीन्द्रियाणि सकलानि तदेव कर्म। सा बुध्दिरप्रतिहता वचनं तदेव।

अर्थोष्मणा विरहित: पुरुष: स एव। अन्यक्षणे न भवतीति विचित्रमेतत्॥

(अर्थ - तीच इंद्रिये, तेच कर्म, तीच कुशाग्र बुध्दी, तेच बोलणे, पण एक पैशाचा उबारा नसेल, की तोच माणूस क्षणात वेगळा भासू लागतो.)

मित्रांनो! लक्ष्मीदेवता मोठी चंचल असते. तिचा पाठलाग करणाऱ्यांना ती हुलकावणी देते; पण जे कर्तृत्ववान लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्यामागे ती आपोआप चालत येते. ती पायी चालणाऱ्याला राजमुकुट देऊ  शकते आणि हत्तीवर बसलेल्या मस्तवालालाही खाली ओढून लाचार बनवू शकते. व्यवसायाने आपल्याला समृध्दी दिली म्हणून कधी माजू नये. काळाच्या सामर्थ्यापुढे नेहमी नम्र राहावे. समर्थ रामदास म्हणतात ते अगदी खरे आहे.

लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख...