खड्डा...

विवेक मराठी    06-Jan-2018
Total Views |

'खड्डयात घालणे' म्हटलं की नुकसान झालं किंवा कुणीतरी केलंय हे कळतं. काही वेळेला ते हेतुपुरस्सर असतं, काही वेळेस घडून जातं. 'आता हा खड्डा कसा भरणार मी?', 'तुम्ही खड्डे करा, मी भरत राहतो आणि मरतो एक दिवस' म्हटलं की त्यात विवंचना आली, उद्वेग आला. नुकसान किंवा अचानक उद्भवलेला खर्च ऐपतीच्या बाहेरचा आहे हे कळतं. 'स्वत:हून खड्डयात पडतोयस, ऐक माझं, पुढे जाऊ  नकोस' यात काळजी आहे, प्रेम आहे, तळमळ आहे. कुणाचंतरी हित चिंतणं आहे.

मराठी भाषेत एक जादू आहे. एकच शब्द परस्परविरोधी अर्थाने वापरता येतो. 'कित्ती शहाणा आहे तो' आणि 'शहाणा आहेस' यात शब्द एकच असला, तरी कौतुक आणि उपहास असे दोन विरुध्द अर्थ आहेत. अर्थात त्यात उच्चारणही महत्त्वाचं आहे. इथे एकाच शब्दाला अर्थाचे अनेक पदर असतात. आपण म्हणतो ना, संगतगुण लागतो त्याप्रमाणे एखादा शब्द एकटा असला की धड असतो, पण संगतीने आला कुणाच्या, तर बिघडतो. मान म्हटलं की मरातब आला, सन्मान आला, पण 'अप'च्या संगतीने आला की सगळं धुळीला मिळतं. वेगवेगळया क्रियेसाठी आपल्याकडे वेगवेगळे शब्द आहेत. अर्थ दोन्हीचा सारखाच, पण तो नेमका योजला की भाषेची गंमत कळते. परवाच हेमा आपटेंनी मला धनश्री लेलेंच्या व्याख्यानात ऐकलेला किस्सा सांगितला. माहीत नसलेलं काहीतरी नव्याने समजलं. 'सांडीसी अवगुणु'मध्ये 'सांडीसी' शब्दाचा वापर शब्द माहितीये म्हणून केलेला नाही. जे सांडतं ते परत उचलता येत नाही. अवगुण सोड असं म्हणता आलं असतं की? पण सांड म्हणजे मातीत मिसळू दे, म्हणजे परत ते उचलता येणार नाहीत. सोडल्यावर परत धरण्याची शक्यता आहे. आपल्याच भाषेतली रत्नं आपल्याला दिसत नाहीत आणि ती टिकावी म्हणून आपण कोरडे उमाळे काढत असतो.

साधा 'खड्डा' हा शब्द घ्या. किती प्रकाराने वापरतो तो आपण. रस्त्यातले खड्डे केवळ हा शब्द विस्मृतीत जाऊ  नये म्हणून ठेवतात की काय, अशी मला शंका आहे. रस्ते तयार करतात त्या कंत्राटदारांची मजा असते. कशी गंमत असते ते माहितीये मला. बिल करताना खड्डे आणखी खोल केले जातात. एकदा तो बुजवला की त्याचं खरं माप कसं शोधणार? मग काम दिलंय ती सरकारी संस्था खड्डयात जाते आणि कंत्राटदार खड्डयातून शिखरावर जातो. बरं, काम असं असतं की वारंवार एकाच रस्त्यावर सतत खड्डे पडतील याची काळजी घेतलेली असते. त्यामुळे एकाच फिल्मवर परत परत शूट करून पैसे तयार होत असतात. रिकरिंग काम आहे ते. तमन्नाच्या पोटासारखा गुळगुळीत रस्ता केला, तर कशाला लोक नाव ठेवतील? पण लोकांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून एवढा खटाटोप असतो त्यांचा. तर अशा रस्त्यांवरच्या खड्डयात पडणं या एकाच वाक्यात शब्दश: अर्थ आहे. बाकी याचा वापर लाक्षणिक अर्थाने जास्त होतो. मुळात मराठी भाषा एकुणातच तिरकस जास्त आहे. त्यात लाक्षणिक अर्थाने जास्त वापर होतो शब्दांचा. नवखा माणूस म्हणून या भाषेची धास्ती घेतो पहिल्यांदा, कारण समोरचा जे बोललाय तेच अभिप्रेत आहे की आत काही दडलंय, याचं त्याला टेन्शन असतं.

बघा ना, 'खड्डयात घालणे' म्हटलं की नुकसान झालं किंवा कुणीतरी केलंय हे कळतं. काही वेळेला ते हेतुपुरस्सर असतं, काही वेळेस घडून जातं. 'आता हा खड्डा कसा भरणार मी?', 'तुम्ही खड्डे करा, मी भरत राहतो आणि मरतो एक दिवस' म्हटलं की त्यात विवंचना आली, उद्वेग आला. नुकसान किंवा अचानक उद्भवलेला खर्च ऐपतीच्या बाहेरचा आहे हे कळतं. 'पोटात खड्डा पडला ना राव' म्हटलं की भीती आली. 'पुढे खड्डा आहे म्हणून सांगितलं, पडायचंच असेल खड्डयात तर जा याच मार्गाने', 'स्वत:हून खड्डयात पडतोयस, ऐक माझं, पुढे जाऊ  नकोस' यात काळजी आहे, प्रेम आहे, तळमळ आहे. कुणाचंतरी हित चिंतणं आहे. पण गंमत अशी असते की तळमळ जेवढी जास्त, तेवढाच समोरचा माणूस हट्टी असतो. त्याला ते पटत असतं, पण तो ऐकेलंच असं नाही. 'तो पांगळा झाला, मी नाही केला' अशा अर्थाचं खानोलकर 'कोंडुरा'तील एका पात्राविषयी म्हणाले होते. तसंच असतं हे. घडतं ते समजत असलं तरीही. 'खड्डयात जा' म्हटलं की राग आला, कुणाचीतरी सहनशक्ती संपलीये आणि काय होईल ते होईल असा विचार आलाय, हे कळतं.

काही समाजात निधन झालं की पुरतात, त्यासाठी खड्डा खोदावा लागतो. माणूस मेला म्हणून किंवा 'गढे मुर्दे बाहर निकालनेके लिये' खड्डा खणावा लागतो. 'दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की माणूस स्वत:च त्यात पडतो' यात मोठा अर्थ आहे. जे आपण करतो तेच आपल्याकडे परत येतं. फटका कदाचित लगेच बसणार नाही, पण आपण जर कुणासाठी खड्डा खोदत असू, तर तेच काम आपल्या बाबतीतही कुणीतरी मन लावून करत असेल एवढं निश्चित.

अर्थात काही खड्डे फायद्याचेही असतात. जुन्या काळी किल्ल्याभोवती रक्षणासाठी मोठाले खड्डे - म्हणजे खंदक खणले जायचे. खेडेगावात नद्यांतून पाऊस सरला की पाणी राहावं पिण्यासाठी तरी, म्हणून मुद्दाम खड्डे केले जातात. पाण्यासाठी विहीर खणतो म्हणजे खड्डाच की तो. हे एवढेच खड्डे असे आहेत की जे फायदेशीर आहेत. अर्थात त्यांचा तळ वर्षानुवर्षं दिसला, तर माणसं त्याच खड्डयात सगळे त्रास मिटवण्यासाठी वरून उडी घेतात.

आपण एखाद्या शब्दाला एक ठरावीक आकारमान देऊन टाकतो स्वत:च. अर्थात आकारमानाप्रमाणे त्याला वेगळी नावंही आहेत. भांडयाला खड्डे पडले म्हणत नाही आपण, त्याला ठोक्याचं पातेलं म्हणतो. एका रांगेत मुद्दाम काढलेले ते पोचे किती सुंदर दिसतात. अर्थात काळाच्या ओघात तो ठेवाही नाहीसा होणार बहुतेक. अशनी येऊन पडल्यावर पडलेल्या खड्डयाला लोणार सरोवर म्हणतात, इतका मोठा खड्डा आहे तो. त्या गोल्फच्या चेंडूवरही असे अनेक छोटे खड्डे असतात, ज्याचा उपयोग तो चेंडू जास्त पुढे जाण्यासाठी होतो. काही वेळेस ना, काही व्यंग असेल ना इतकुसं, तर ते सौंदर्यात भर घालतं. डोळयात किंचित स्क्विन्ट असलेली माणसं किती मोहक दिसतात बघा. भूमिका चावला, शशी कपूर, गौतम राजाध्यक्ष, अमिताभ, हेलन, पॅरिस हिल्टन, ह्यू ग्रांट, मर्लिन मन्रो (अपवाद आशा पारेख). असंच आणखी एक व्यंग आहे. चेहऱ्यावर झिगोमॅटिकस नावाचा स्नायू असतो. तो आखूड असेल, तर तिथे त्वचा आत ओढली जाते आणि एक लोभस खळगा पडतो. खड्डाच तो, पण त्याला तो शब्दं योजणं हे अरसिकतेचं लक्षण आहे. गालफडं आत गेल्यावर पडतो तो खड्डा. आता शस्त्रक्रिया करूनही म्हणे खळया पाडता येतात, पण त्यात काही मजा नाही. शर्मिला टागोर, राहुल गांधी, प्रीती झिंटा, गुल पनाग, आलिया भट्ट, बिपाशा, जॉन अब्राहम, पियुष चावला यांना सुंदर खळी पडते. पण मला आवडलेल्या दोन खळया म्हणजे एक दीपिका आणि दुसऱ्या दुर्गा खोटे. दीपिकाची खळी मध्येच गायब होते आणि अचानक दृश्यमान होते. तिची खळी लपाछपी खेळते आणि प्रसन्न, सात्त्वि, गोड अशी विशेषणं लावावीत असा एक सोज्ज्वळ, खानदानी, खळीदार चेहरा म्हणजे दुर्गा खोटे. त्यांचे फार चित्रपट मी पाहिलेले नाहीत, पण ज्यात होत्या, ते आवडले. 'बॉबी', 'बावर्ची'मध्ये काय प्रेमळ दिसल्या आहेत त्या. मला कायम त्यांच्यात एक प्रेमळ आजी दिसत आली आहे. हेवा वाटावा, मोह व्हावा असे हे खड्डे.

असं कुणी गोड हसताना दिसलं आणि गालाला नैसर्गिक टिचकी मारल्यावर हलकासा पोचा आल्यासारखं झालं की बघत राहायचं फक्त. फक्त ते पहात पहात पुढे जाताना खड्डयात पडलं नाही म्हणजे झालं!

9823318980