भागवतधर्माच्या मौक्तिकमालेतील रत्न - संत तुकाराम

विवेक मराठी    08-Jan-2018
Total Views |

आज अध्यात्मापासून नेट एडिशनला सुरुवात करत आहोत. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या विचार दर्शनाने शुभारंभ होत आहे. आजच्या काळातही लागू होणाऱ्या या विचारांवर भाष्य केलं आहे नीलिमा देशंपांडे यांनी. 'तुका आकाशाएवढा' याची आम्हांला विनम्र जाणीव आहे आणि म्हणूनच या सदराला तेच शीर्षक दिले आहे. हे लेख म्हणजे तुकोबांच्या विचारांना समजून घेण्याचा एक प्रयत्न, एकमेव नक्कीच नाही.... तुम्हांला तो कसा वाटतोय हे समजून घेण्यास उत्सुक आहोत.

आपल्या रोजच्या जगण्यातही परमार्थ आहे, हे सामान्यजनांना समजावून सांगणारा भागवतधर्म आणि त्या भागवतधर्माच्या मौक्तिकमालेतील एक रत्न संत तुकाराम.

आपल्या अभंगातून आपले विचार, आपली भक्ती व्यक्त करताना - तुका म्हणे या शब्दातून आपला ठसा उमटवणारा 'आकाशाएवढा तुका' !!

अभंग - जे भंग पावत नाही, नश्वर नाही, जो विचार शाश्वत आहे.

आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांचा परिणाम आणि त्यातून जाणवलेलं सत्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं, 'बुडते हे जन न देखवे डोळां । म्हणूनी कळवळा येतसे...'

ज्यांचे अभंग आपल्या रोजच्या बोलण्यातले दाखले होऊन गेले आहेत, काही तर म्हणीच वाटाव्यात इतके भाषामय झाले आहेत.

उदा., जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे;

सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे;

आधि होता वाघ्या... मूळ स्वभाव जाईना..

वृक्षवल्ली आम्हा सोयरे ...

तुकारामांच्या अभंगात केवळ व्यवहारच नाही, तर नातीगोती, निसर्ग आणि अर्थात पांडुरंगाची भक्ती डोकावत राहते.

अत्यंत निरलसपणे जीवन जगताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी भक्ती-मुक्तीचा मार्ग खुला केला.

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा भार माथा ...

असं ठणकावून सांगताना तुकारामांनी हेच स्पष्ट केलं आहे की - वेद म्हणजे नुसती घोकंपट्टी नव्हे. वेद म्हणजे पुस्तकात ठेवायचं ज्ञान नसून, ती जगण्याची एक कला आहे. वेद म्हणायचे किंवा पाठ करायचे नसतात, ते अंगीकारून हा भवसागर पार करायचा असतो. अन्यथा तो व्यर्थ भारच ठरतो.

फक्त परखडच नव्हे, तर पारदर्शकता, निर्भीडपणा, स्वत:बद्दल - समाजाबद्दल बोलताना भीडभाड न बाळगणारा आणि तरीही कोणताही एक शिक्का किंवा अभिनिवेश आपल्या लिखाणामागे न लागू देणारा निर्लेप मनाचा माणूस – तुकाराम.

आपल्या अभंगवाणीतून साक्षात परब्रह्म रेखाटतात, शब्दांच्या साहाय्याने अद्वैताची मांडणी करतात.

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रें यत्न करू।

शब्द म्हणजे ज्ञान, हेच आमच्या जीवीचे जीवन आहे , त्याची पूजा ही शब्दांनीच करू या.

आपल्या मोक्षमार्गातील - खरे तर जगण्यातला मोठा अडथळा कोणता असेल तर अहंभाव - अहंगंड. 

हा अभिमान-अहंकार दूर करायचा तरी कसा? तो केवळ विशुद्ध ज्ञानामुळेच होऊ शकतो.

ज्या दिवशी आपल्याला आपली क्षुद्रता आणि निसर्गाची भव्यता लक्षात येईल, तेव्हा आपल्यातला अहम् आपोआप गळून पडेल. याचा दाखला देताना ते पुराणाची वानगी देतात.

ब्रह्मज्ञान जरी एके दिवसी कळे । तत्काळ हा गळे अभिमान ॥१॥

अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासे उपराटी दृष्टी केली ॥२॥

जनक भेटीसी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥३॥

खोटे करूनिया लाविला अभ्यासी । मेरु शिखरासी शुक गेला ॥४॥

जाऊनिया तेणे साधिली समाधी । तुका म्हणे तधी होतो आम्ही ॥५॥

हा अहंकार शुकमुनींना झाला, त्याची गोष्ट अशी - शुक जन्मजात ज्ञानी होते. त्यांना कोणी गुरू नव्हता. तशी गरजच नव्हती. एकदा विष्णूच्या दर्शनाला म्हणून अचानक उठून ते वैकुंठात गेले. तिथे त्यांना आत सोडेनात. कारण काय? तर ह्यांना 'गुरू' नाही. ते वडिलांकडे 'व्यासांकडे' आले आणि घडलेली गोष्ट सांगितली. व्यासांना वाईट वाटलं, पण गुरूचं महत्त्व त्यांनाही माहीत होतं.

ते म्हणाले, ''एक काम कर. तू जनक राजाकडे जा.'' शुक तिथे पोहोचले. पाहतात तो काय - राजवैभवात लोळणारा 'जनक'! हा इंद्रियासक्त आपल्यासारख्या महान ब्रह्मचाऱ्याला काय ज्ञान देणार? म्हणून परत आले. व्यासांनी त्यांना परत पाठवलं. असं तेरा वेळा झालं. शेवटच्या वेळी जाताना त्यांनी पाहिलं - एक वृद्ध चिखलाचे गोळे नदीत फेकून नदी अडवायचा प्रयत्न करत होता. शुकांना राहवलं नाही. ते म्हणाले, ''काय हा वेडेपणा? असं कधी होऊ  शकेल का ? पाणी अशाने अडणार नाही.'' त्यावर वृद्ध म्हणाला, ''मी काहीच वेडा नाहीये. व्यासपुत्र शुक तर ज्ञानी असून वरच्या रंगावरून परीक्षा करतो, तो किती वेडा असेल बघा?''

अशा प्रकारे नारदांनी शुकांना त्यांची चूक दाखवून दिली आणि जनक राजाचं शिष्यत्व त्यांना मिळालं.

थोडक्यात काय - मोह आणि दिखाव्याची तुलना सत्याशी करत राहतो आणि म्हणून सत्यापासून लांब राहतो, गैरसमजुतींच्या बंधनात अडकून राहतो. ज्या क्षणाला ह्या खोटया कल्पना नाश पावतात, तो क्षण मुक्तीचा.

याही पुढे जात तुकाराम म्हणतात -

हेचि दान देगा देवा ,तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती धन संपदा ,संतसंग देई सदा ..

खरंच, मुक्तीची आसही न उरणं म्हणजेच मोक्ष.