संघ चालला पुढे

विवेक मराठी    12-Oct-2018
Total Views |

डॉ. हेडगेवार यांनी विजयादशमीला रा.स्व. संघाची सुरुवात केली, या घटनेला आता 93 वर्षे झाली आहेत. आपल्या मूलभूत विचारात कोणताही बदल न करता परंतु बाह्यांगात कालानुरूप बदल करून संघाची वाटचाल चालू आहे. रमेश पतंगे यांनी या लेखात या वाटचालीचा आढावा घेतला आहे.

डॉ. उदय निरगुडकर यांना मुलाखत देताना शरद पवार यांनी संघाविषयी पुढील उद्गार काढले. ते म्हणाले, ''रा.स्व. संघाने दिल्लीत जनसंवादाचे आयोजन केले. आता संघ बदलत असून आतापर्यंत संघाला एक संकुचित, विशिष्ट जातिधर्माची विचारधारा मानणारी संघटना समजले जात होते. पण नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून संघाने आपली जुनी प्रतिमा पुसून अधिक व्यापक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.'' शरद पवार संघाविषयी आणखी चांगले बोलले आहेत. शरद पवार देशातील पहिल्या श्रेणीतील राजनेता असल्याने त्यांचे बोलणे महत्त्वाचे ठरते. एक गोष्ट खरी आहे की, पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा दिल्लीतील कार्यक्रम ऐतिहासिक ठरावा असाच झाला आहे. आजच्या काळातील संघ काय आहे हे त्यांनी स्पष्टपणे सर्वांसमोर मांडले आहे.

संघ समजून घेणे, संघ समजणे आणि संघ समजावून सांगणे फार अवघड काम असते. एकतर संघाशी तुलना करता येईल अशी कोणतीही संघटना नाही. त्यामुळे संघाचा तुलनात्मक अभ्यास शक्य नसतो. अज्ञानामुळे कुणी संघाची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी किंवा इसिसशी करतात. त्यांना मुस्लीम ब्रदरहुड कोणी, का, केव्हा सुरू केली आणि तिचे तत्त्वज्ञान कोणते, याची बाराखडीदेखील माहीत नसते. संघाची तुलना राजकीय पक्षाशी करता येत नाही, कारण संघ निवडणुकांच्या राजकारणात भाग घेत नाही, संघाची तुलना धार्मिक संघटनांशी करता येत नाही, कारण संघाचा मठ नाही, संघाचा संप्रदाय नाही, संघाचा कोणताही सांप्रदायिक ग्रंथ नाही. संघ सर्व हिंदू समाजाचे संघटन करू इच्छितो. म्हणून संघ हिंदू समाजांतर्गत संघटन नाही. संघ व्यायामशाळा नाही, जरी संघात व्यायाम शिकविला जातो. संघ सेवा कार्य करतो, पण संघ सेवाभावी संस्था नाही. मग संघ काय आहे?

संघ, संघ आहे, अन्य काही नाही. संघाची तुलना केवळ संघाशीच होऊ शकते, पण तशी आवश्यकता आहे असेही नाही. संघ अनुभवावा लागतो. संघ कोणत्याही ग्रंथात नाही. संघाची माहिती देणारी असंख्य पुस्तके आहेत. त्यातून संघाची माहिती होते. तांत्रिक ज्ञान होते, पण त्यामुळे संघाचे आकलन होत नाही. अनुभव घेण्यासाठी संघात जावे लागते. संघ कार्यक्रमात भाग घ्यावा लागतो. संघाचा - म्हणजे संघभावनेचा, सामुदायिकतेचा अनुभव घ्यावा लागतो. अनुभूती हीच संघ समजण्याची पहिली आणि शेवटची पायरी आहे.

विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

डॉ. हेडगेवारांनी 1925 साली संघ सुरू केला. तोच संघ आज 2018 साली जसाच्या तसा आहे. त्यात काना-मात्रेचाही बदल झालेला नाही. याचा अर्थ 1925 साली जो गणवेश होता तोच आता आहे, 1925 साली जे प्रातःस्मरण, प्रार्थना होती तीच आता आहे, संघटनात्मक रचना पूर्वी जशी होती तशीच आता आहे, असा नाही. या सर्व गोष्टी आता बदलल्या आहेत. बदलली नाही ती प्रार्थनेची संकल्पना, प्रातःस्मरणाची संकल्पना, गणवेशाची संकल्पना. मूळ संकल्पना कायम ठेवून काळानुसार आवश्यक ते बदल त्यात होत गेले. पूर्वीची प्रार्थना हिंदीत होती, आता ती संस्कृतमध्ये आहे. प्रार्थनेचा आशयही अधिक गहन झाला आहे. 1925 साली एकच विचार मांडला गेला - हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू समाज असंघटित आहे, त्याला संघटित करायचे आहे. हिंदू राष्ट्र हा विचार आणि संघटना, हा कार्यक्रम या एका वाक्यात संघ तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम आलेला आहे.

प्रारंभीच्या काळी एक विषय आग्रहाने मांडला गेला की, संघ फक्त हिंदूंपुरताच मर्यादित राहील. अन्य उपासना पध्दती मानणाऱ्यांना संघात आणण्याचे विशेष प्रयत्न करायचे नाहीत. आपले घर म्हणजे हिंदूंचे घर प्रथम ठीक करू या. त्यानंतर अन्य उपासना पध्दती मानणाऱ्यांचा विषय हातात घेता येईल. हिंदू आग्रहामुळे अन्यांनी संघाला धार्मिक, कट्टरतावादी, संकुचित, पुराणपंथी संघटना ठरवून टाकले. संघाने त्याची चिंता केली नाही. 'आपण हिंदू आहोत, आपली श्रेष्ठ विचारपरंपरा आहे, आपली श्रेष्ठ जीवनमूल्ये आहेत, विश्वगुरू होण्याची आपली क्षमता आहे, सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार आपल्याकडे आहे तो आपण जगायला शिकले पाहिजे..' ही हिंदूपणाची संकल्पना जन्मापासून संघ मांडीत आलेला आहे.

'हे आपले राष्ट्र प्राचीन आहे. आपल्याला राष्ट्र निर्माण करायचे नसून विस्मृतीत गेलेला राष्ट्रभाव आपल्याला जागा करायचा आहे. आपण मुळातच एक आहोत. भारतमातेची संतान आहोत, आम्ही परस्परांचे बांधव आहोत. आपण बंधुभाव जगू या.' हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी या विचारांचा सतत संस्कार मनावर होण्यासाठी संघाची शाखा सुरू झाली. माणूस घडविण्याची जगावेगळी प्रयोगशाळा सुरू झाली. ती यशस्वी झाली. या प्रयोगशाळेतून श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, दीनदयाळजी, अटलजी, नानाजी देशमुख, एकनाथजी रानडे, दत्तोपंत ठेंगडी इत्यादी असंख्य नररत्ने तयार झाली. हिंदूपणाचा वैश्विक आयाम जगणारी, निर्वैर होऊन साऱ्या मानवजातीवर प्रेम करणारी अशी असंख्य माणसे गावपातळीपासून उभी राहत गेली. 'स्वयंसेवक' ही त्यांची संज्ञा आणि स्वयंसेवक हीच त्यांची ओळख.

हिंदू राष्ट्रभाव जागा करायचा आहे ही प्रेरणा घेऊन असंख्य कार्यकर्ते न थकता परिश्रम करीत राहिले. वर्तमानपत्रात नाव नाही, कोठे सत्कार, सन्मान नाही. प्रशंसा नाही, धनाची अपेक्षा नाही, सत्तेच्या पदाची अभिलाषा नाही, तरीही काम करीतच राहायचे. संघ न जाणणाऱ्यांना हे शक्य वाटत नाही. काहीही न मिळविण्यासाठी संघकाम करायचे हे अनेकांना पटत नाही, पटू शकत नाही, पण संघाने ते वास्तवात करून दाखविले. नुकतेच दिवंगत झालेले डॉ. चंद्रशेखर कोल्हटकर यांच्या घरी मी गेलो होतो. फक्त 10 रुपये फी घेऊन रुग्णसेवा कराणारा हा 'जगावेगळा' डॉक्टर होता. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून पायाने

अधू असलेला एक पेशंट त्यांचे अंत्यदर्शन करण्यासाठी रस्त्यावरून फरफटत

येतो आणि डॉक्टरांच्या कलेवराला साष्टांग दंडवत घालतो!

 अशा हजारो डॉक्टरांनी, शिक्षकांनी, मिल मजुरांनी, कारखान्यात काम करणाऱ्या श्रमिकांनी, कारकुनी पेशा करणाऱ्यांनी संघ जगून दाखविला. सामान्य माणसाला यशवंत, तुळसीराम, नारायण, महादेव, गणपत, दामोदर, लक्ष्मण... दिसले. प्रत्यक्ष संघ जगणारे, कोणताही भ्रष्टाचार, व्यभिचार, अनाचार न करणारे, त्यांना संघ समजला अशा असंख्य जीवनांतून लोकांना संघ समजला. पुस्तकात संघ शोधणाऱ्यांना दिसणारा संघ आणि स्वयंसेवकांच्या जीवनातून प्रकट होणारा संघ एक नाही. म्हणून घसा सुकेपर्यंत संघाविरुध्द ओरड करणाऱ्यांचा समाजावर होणारा परिणाम शून्य असतो.

पुस्तकातील संघ स्थितीशील आहे. वास्तवातील संघ नित्यनूतन आहे. संघ ही एक जीवमान (Organic) संघटना आहे. तिची वाढ निरंतर होत असते. जीवशास्त्राच्या नियमानुसार बी उगवली की त्याचे इवलेसे रोपटे होते. त्याच्या रक्षणासाठी त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते. हळूहळू त्याची मुळे खोलवर जातात. खोड धरू लागते. झाडाला फांद्या फुटतात आणि काही वर्षांतच त्याचे वृक्षात रूपांतर होते हा जैविक विकासक्रम आहे. संघाचेही तसेच आहे. 'आधी, बीज एकले । बीज अंकुरले, रोप वाढले,' या प्रकारे त्याची वाढ होत गेली. संघरोपाचे रक्षण करण्यासाठी प्रसिध्दी नको, लेख नको, आंदोलन नको, मोर्चा नाही, वाद-विवाद नाही याचे कुंपण घातले गेले. आज संघ वृक्ष झाला आहे. या कुंपणाची गरज मर्यादित राहिली आहे. आता आवश्यक तेव्हा प्रसिध्दी, आवश्यक तेव्हा वाद-चर्चा आणि आवश्यक तेव्हा पत्रकप्रसिध्दीची गरज निर्माण झाली आहे.


 

संघ म्हणजे भारताचा मूळ स्वभाव, भारताचा मूळ स्वभाव सर्वसमावेशकतेचा, सर्वांना सामावून घेण्याचा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. संघाने ही गोष्ट प्रथम हिंदू समाजात केली. जैन, बौध्द, शीख, आर्य समाज, सनातनी, भक्तिमार्ग, शाक्तमार्गी मठोपासक अशा सर्व पंथांना संघात स्थान मिळाले. कोणताही वाद नाही. कोणतीही चर्चा नाही, मतांचे खंडन नाही. संघाने सर्वांचा सादर स्वीकार केला. 'हिंदू' या एका छत्रीखाली सर्वांना आणता येऊ शकते हे संघाने दाखवून दिले. काही वर्षांपूर्वी मी ग्वाल्हेरला संघकामासाठी गेलो होतो. कार्यकर्त्यांनी दिवसभराचे कार्यक्रम ठरवून ठेवले होते. त्यातील एक कार्यक्रम ग्वाल्हेरमधील विविध धर्माचार्यांबरोबर वार्तालापाचा  होता. माझ्या संघजीवनातील अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव होता. वेळेवर कार्यक्रमस्थानी विविध मठांचे, आखाडयांचे, आश्रमांचे साधू-महंत, धर्माचार्य उपस्थित होते. ते रमेश पतंगेसाठी आलेले नव्हते. ते संघाच्या निमंत्रणामुळे आले होते. संघ सर्वांचा सन्मान करणारे व्यासपीठ आहे, हा सर्वांचा भाव होता.सर्वांच्या सहभागाची संकल्पना संघाने व्यवहारात आणली आहे. प्रारंभी संघात ब्राह्मणांचीच संख्या अधिक असे. पण संघकार्य जसजसे वाढू लागले, तसतशी संघातील ब्राह्मणेतर जातींची संख्याही वाढू लागली. ब्राह्मण, बनिया यांच्या बरोबरीने कुणबी, तेली, चर्मकार, महार, मेहतर, परीट, शिंपी, सोनार, सुतार, लोहार, पारधी, टकारी, गोंधळी, कोकणा, कातकरी, भिल्ल अशा   अठरापगड जाती संघात दिसू लागल्या. जातींची सर्वसमावेशकता संघात अनुभवण्यास येऊ लागली. संघ खऱ्या अर्थाने सगळया हिंदूंचा झाला. संघाने पंथनिरपेक्ष, जातिनिरपेक्ष हिंदू संघटन करून दाखविले. हिंदू समाजात असे काही घडू शकते यावर पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वी कुणाचा विश्वास बसला नसता. अशक्य ते शक्य करितो संघ अशी संघाची प्रतिमा झाली.

सर्वांना बरोबर घेताना मूळ संकल्पनेत मात्र काहीही बदल झालेला नाही. हिंदुराष्ट्राचा विचार प्रदूषित केला गेला नाही. आपण सर्व हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. आपल्या विविधता आणि आपले दर्शन सोडायचे नाही. सब एकाकार करायचे नाही. कुणावर कसलीही लादणूक करायची नाही, पूजा पध्दतीचे स्वातंत्र्य नाकारायचे नाही. माणूस म्हणून सर्व सारखे. अस्पृश्यतेचे कणभरही पालन करायचे नाही. आपण एकत्र राहिलो, एकमेकांचा सन्मान करीत जगायला शिकलो, परस्परांना साहाय्यभूत झालो तरच आपले अस्तित्व टिकेल, नाहीतर आपण संपून जाऊ ही जाणीवही निर्माण होत गेली. संघाने समानतेवर प्रवचने दिली नाहीत. समतेवर प्रबंध लिहिले नाहीत, पण समता जगायची कशी हे शिकविले. संघ स्वयंसेवक जातिमुक्त आणि पंथाभिनिवेशमुक्त असतो. राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याचे कलम कोणते हे स्वयंसेवकाला येणार नाही, पण धर्मस्वातंत्र्य जगायचे कसे हे तो उत्तम जाणतो. राज्यघटनेतील कोणत्या कलमात समतेचा विचार सांगितला गेला आहे हे स्वयंसेवक सांगू शकणार नाही, पण समता जगायची कशी हे त्याच्याकडूनच शिकायला पाहिजे. नित्यनूतन संघ संविधान आचरणात आणणारा संघ झाला आहे.

संघाच्या जैविक विकासक्रमातील पुढची अवस्था सेमेटिक पंथांना सामावून घेण्याची आहे. ही नैसर्गिक अवस्था आहे. भारतातील ख्रिश्चन/मुसलमान हे वंशाने आणि संस्कृतीने हिंदू आहेत. जे राष्ट्रीय रक्त हिंदूंच्या धमन्यांत, तेच रक्त त्यांच्याही धमन्यांत आहे. ते कुणी परके नव्हेत. ते आपलेच आहेत. त्यांना त्यांच्या येशूसहित आणि अल्लासहित आपल्या सर्वसमावेशक घरात स्थान द्यायला पाहिजे. संविधानात ते दिलेलेच आहे. समाजजीवनात ते दिसले पाहिजे. दिल्लीत मोहनजींनी, मुसलमानांना वगळून हिंदू विचार नाही, हे सांगितले ते आपल्याला व्यवहारात आणावे लागेल आणि ते येईलच, कारण विश्वव्यापकता हा हिंदुप्राण आहे, तो त्याचा आत्मा आहे. हे आत्मतत्त्व इतके दिवस क्षीण झालेले होते. थकले होते. आता ते नवतेजाने आणि नवऊर्जेने उभे राहत आहे, ही आहे आपल्या राष्ट्राची नित्यनूतनता. कालबाह्य सोडून द्यायचे, पण सनातनत्व सोडायचे नाही, नावीन्याचा स्वीकार करायचा, पण अंधानुकरण करायचे नाही. सनातनाशी नावीन्याचा मेळ बसवायचा आणि पुढे जायचे. हिंदू समाजाचे हे वैशिष्टय संघ एकांतिक निष्ठेने जगतो आहे 'संघ चालला पुढे, संघ चालला पुढे' ही गीताची ओळ केवळ गीताची ओळ न राहता जगण्याची ओळ झाली आहे.

विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

vivekedit@gmail.com