आपत्तीतून नवनिर्मिती - जनकल्याण निवासी विद्यालय, लातूर

विवेक मराठी    13-Oct-2018
Total Views |

लातूरमध्ये 1993 साली झालेल्या भूकंपात अनाथ झालेल्या, शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांसाठी हरंगुळ येथे उभे राहिलेले 'जनकल्याण निवासी विद्यालय'. आज ही शाळा शैक्षणिक क्षेत्रातील पथदर्शक प्रयोगांपैकी एक म्हणून ओळखली जात आहे. या शाळेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त या अनोख्या वाटचालीचे सिंहावलोकन.

जनकल्याण निवासी विद्यालय या प्रकल्पाची जन्मकहाणी व जीवनकहाणी आगळीवेगळी आहे. शिक्षण क्षेत्रात, सामाजिक जीवनात, गरजेनुसार विविध ठिकाणी निवासी विद्यालये उभी राहिली आहेत. त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत; परंतु एका जीवघेण्या नैसर्गिक आपत्तीतून निर्माण झालेले, लातूरच्या हरंगुळ येथील 'जनकल्याण निवासी विद्यालय' हे एकमेव असे म्हणता येईल.

बघता बघता पंचवीस वर्षे झाली. 1993 या वर्षीचा 30 सप्टेंबर हा गणेश विसर्जनाचा दिवस. पाऊसपाणी चांगले झाल्यामुळे त्या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच होता. मध्यरात्रीपर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आनंदाने ओसंडून पार पडल्या आणि पहाटेच निसर्गाने पृथ्वीमातेच्या अंतरीच्या खळबळीचे निमित्त करून किल्लारी भागातील समाजजीवनाला प्राणांतिक झटका दिला. सुमारे दहा हजार मानवी जीव काही क्षणात जग सोडून गेले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील मिळून सुमारे पन्नास गावे पूर्णत: नष्ट झाली. समाजजीवन उद्ध्वस्त झाले. आम्हा जवळपासच्या संबंधितांना तत्काळच या दुर्घटनेच्या व्याप्तीचा प्राथमिक अंदाज आला.

योगायोग असा की, माझ्याकडे त्या वेळेला चार विविध प्रमुख, वेगवेगळया जबाबदाऱ्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या सूचनेवरून सुमारे वर्षभरापूर्वीच माझ्याकडे आली होती. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था (भा.शि.प्र.) या मराठवाडाव्यापी, संघकार्यकर्त्यांनी चालवलेल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. विवेकानंद रुग्णालयात प्रमुख सर्जन व विश्वस्त म्हणून दायित्व तेही होते आणि फार महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्यानेच सुरू झालेल्या प्रांताच्या सेवा विभागाचे दायित्व प्रांत कार्यकारिणीचा सदस्य म्हणून माझ्याकडे होते. स्वाभाविकच भूकंप घटनेच्या 'शून्य' प्रहरापासून मी आपत्तिनिवारणाच्या सर्वंकष कामात गुंतला गेलो. वर उल्लेखलेल्या चारही संस्थांच्या कार्यकर्त्यांची संघटित फौज या आपत्तिनिवारणासाठी एकवटून सेवा कार्यात गुंतली.

पहिले दोन ते तीन दिवस तत्काळ करावयाच्या कामांमध्ये सर्व जण गुंतले. तो या लेखाचा विषय नाही. पण भूकंपक्षेत्रात सेवा कार्य सुरू झाल्या झाल्या तीन-चार दिवसांतच लक्षात आले की, विसकळीत समाजजीवनामुळे शालेय विद्यार्थी असाहाय्यपणे भूकंपक्षेत्रात दिशाहीन भटकत होते. अनेकांनी आपले पालक गमावले होते. या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे आवश्यक होते, त्यासाठी एकत्र करणे आवश्यक होते, साहजिकच अशा एकत्रीकरणात शिक्षण पुन्हा सुरू करणेही जरुरीचे होते. वर उल्लेख केलेल्या संस्थांचे सुमारे 100 कार्यकर्ते रोज रात्री आढावा व नियोजन यासाठी विवेकानंद रुग्णालयात एकत्र जमत असत. तेथील चर्चेतून निर्णय झाला. भाशिप्रच्या लातूर येथील केशवराज विद्यालयाच्या शिक्षकांनी भूकंपक्षेत्रातील या निराधार विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी आणि कार्यवाही तत्काळ सुरू झाली. भूकंपाच्या चौथ्या, पाचव्या दिवशीच या विद्यार्थ्यांसाठी भूकंपक्षेत्रातच 'झाडाखालच्या' शाळा सुरू झाल्या. विविध ठिकाणी गावानुसार छोटे गट तयार करण्यात आले. केशवराज विद्यालयातील शिक्षकांना एकेका गटाची जबाबदारी देण्यात आली. कार्यकर्ते सकाळी भूकंपक्षेत्रात जात. दहा वाजेपर्यंत मुलांचे एकत्रीकरण होत असे, त्यांच्याबरोबर संवाद शिक्षणाचे विषय व दुपारी उशिरापर्यंत सहवास पूर्ण करून, मुक्कामाला सर्व शिक्षक परत येत. दुसऱ्या समांतर व्यवस्था माध्यमातून भोजन पुरवठा व तात्पुरता आसरा यांची योजना केली होती. सर्व प्रकारच्या व्यवस्था परस्पर सहकार्याने हातात हात घालून व सूत्रबध्द चालत होत्या. सुमारे शंभर कार्यकर्त्यांची रोज रात्री चालणारी विवेकानंद रुग्णालयातील बैठक सर्व कारभार नीट चालावा यासाठी उपयुक्त होत होती.

पुढील आठ-दहा दिवसांत या अस्मानी आपत्तीच्या व्याप्तीचे दीर्घकालीन रूप ध्यानी येऊ लागले. येणारी अनेक वर्षे पूर्ण पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने योजना करावी लागणार, याचा अंदाज आला. त्यामुळेच दोन आठवडे पुरे होत असतानाच, शिक्षण क्षेत्रातील या विद्यार्थी समस्येच्या दृष्टीने वेगळा विचार केला. यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले होते. अनेक पालक उद्ध्वस्त झालेले घरदार, व्यवसाय व कौटुंबिक जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यात गुंतले होते. म्हणून अशा पाच-सहाशे विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना लातूरमध्ये एकत्र निवास व शिक्षण व्यवस्था करावी, असा निर्णय झाला.

लातूर शहराच्या टोकाला औसा, किल्लारी रस्त्यावर विवेकानंद रुग्णालयाची मोठी मोकळी जागा होती. त्या जागेत तातडीने पत्र्यांचे आसरे बांधावेत, फरशी अंथरावी आणि स्वच्छतागृहे, बांधकाम कायम स्वरूपाची असतील अशी बांधण्याची योजना केली. युध्दपातळीवर काम करून दोन महिन्यांत ही रचना पूर्ण करण्यात आली. डिसेंबर महिन्यात गीताजयंतीच्या दिवशी भूकंपक्षेत्रातील झाडाखालच्या शाळा बंद करून, निवड केलेल्या सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना लातूरमध्ये आणण्यात आले. निर्माण केलेल्या बांधकामाचे स्वरूप बऱ्यापैकी स्थायी स्वरूपाचे होते. विद्यार्थ्यांना राहणे आणि वर्ग यासाठी एकेक कक्ष इयत्तेनुसार केला होता. काही शिक्षण साहित्य झाडाखाली शाळा असतानाच पुरविले होते. लातूरमध्ये आणल्यानंतर पोषाख, पूर्ण शालेय साहित्य, पेटी व अन्य सर्व नित्योपयोगी साहित्य योजनापूर्वक पुरविण्यात आले. न्याहारी, भोजन व्यवस्था उत्तम रितीने प्रस्थापित करण्यात आली. जवळच असलेल्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या वास्तूमध्ये सुमारे साठ विद्यार्थिनींची व्यवस्था करण्यात आली. आपत्तीनंतर केवळ अडीच महिन्यांत केशवराज शाळेतील शिक्षकांच्या साहाय्याने जवळपास पूर्ण स्थायी व्यवस्था ठीक प्रस्थापित झाली. आपले नित्याचे काम करून हे सर्व शिक्षक जनकल्याण समितीच्या या अभिनव शाळेत स्वत:चा उरलेला सर्व वेळ कार्यरत राहत असत. अनेक जण मुक्कामालाच या विद्यार्थ्यांबरोबर पत्र्यांच्या टपरीत राहत असत. या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांचा सांभाळ ही सोपी गोष्ट नव्हती. व्यवस्थात्मक विषय तर होतेच, आर्थिक साहाय्य मिळत होते, शैक्षणिक साहित्य मिळत होते. पण फार मोठा प्रश्न होता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा! या भीषण संकटाची छाया तेथे सतत जाणवत असे. ही मुले बावरलेली असत. कधीकधी मध्यरात्रीच उठून सामूहिक रडण्याचा कार्यक्रम होत असे. काही जणांचे पालक भेटीला येऊ शकत, त्या वेळचे वातावरण तर हृदयद्रावक असे. पण केशवराज विद्यालयाच्या शिक्षकांनी व जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी अमाप परिश्रम घेऊन फारच लवकर या मुलांची मने जिंकून घेतली. दिवसाच्या चोवीस तासांचे वेळापत्रक उत्तम रितीने बसविले गेले. नित्यशिक्षण, मनोरंजन, नियमित संस्कार, शारीरिक उपक्रम व अनेकांच्या सामाजिक भेटी यामधून प्रकल्प उत्तम रितीने चालू लागला. जोडीला वेगवेगळे सणवार व अन्य कार्यक्रमही व्यवस्थित चालू झाले. समाजाने मुक्तहस्ताने आर्थिक साहाय्य केल्यामुळे सर्व व्यवस्था मोफत होत्या. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण अंतर्भागातले व सामाजिकदृष्टया कनिष्ठ स्तरातले असल्यामुळे वर उल्लेखिलेल्या सर्व रचना व व्यवस्था राबविणे फार कष्टाचे होते. मी आनंदाने व अभिमानाने असे म्हणू शकतो की, केशवराज विद्यालयाचे शिक्षक व अन्य कार्यकर्ते यांनी या उपक्रमाचे स्थायी प्रकल्पात रूपांतर होईपर्यंत सुमारे दोन-अडीच वर्षे समर्थपणे, नि:स्वार्थीपणे प्रचंड परिश्रम करून हे सर्व आव्हान सांभाळले.

शैक्षणिक वर्षाअखेरीस दहावीच्या विद्यार्थ्यांची छोटी तुकडी शालांत परीक्षेला बसविली. प्रकल्प पुढे कसा चालवायचा, याचे चिंतन सुरू झाले. हे जाणवत होते की, हा सगळा विषय किमान पाच-सात वर्षांच्या पुनर्वसनाचा होणार आहे. म्हणून या अस्थायी प्रकल्पाचे स्थायी प्रकल्पात रूपांतर करावे हा विचार पक्का होऊ लागला. प्रकल्पाच्या चाललेल्या अतिशय उत्तम कामामुळे देश-विदेशात व्यापक प्रसिध्दी मिळाली. मोठया प्रमाणावर धन मिळू लागले. ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांची शिक्षण व संस्काराची दुरवस्था स्थायी प्रकल्पाच्या माध्यमातून दूर करता येईल, अशा सर्वंकष विचारातून मोठी जागा घेऊन स्वतंत्र प्रकल्प उभा करण्याची योजना रूप घेऊ लागली.

लातूरपासून जवळच दहा कि.मी. अंतरावर हरंगुळ या गावात पुरेसे पाणी उपलब्ध असलेली सुमारे साडेसात एकर जागा सत्यनारायण कर्वा यांच्याकडून सवलतीने उपलब्ध झाली. श्री. कर्वाजी स्वत:च जनकल्याण समितीचे कार्यकर्ते. त्यामुळे व्यवहार सुलभ झाला. या विषयातील तज्ज्ञ संघकार्यकर्त्यांनी योग्य ते आराखडे व नकाशे बनविले. प्रत्यक्ष बांधकामास 1995च्या मध्यावर सुरुवात झाली. या सर्व कालावधीत आपल्या प्रकल्पाचे स्वरूप, दीर्घकालीन रचना व संचालन यांची निश्चिती करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या अनेक बैठका झाल्या. केशवराज विद्यालयातील मोहनराव कुलकर्णी यांना आग्रहपूर्वक तेथील स्थिर नोकरी सोडून जनकल्याण समितीच्या या निवासी विद्यालयाची जबाबदारी घेण्यास प्रवृत्त केले. अन्यही आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

हरंगुळ येथे संकुलाचे मोठे बांधकाम पुरे होण्यात, भूकंपानंतर सुमारे साडेतीन वर्षे गेली. त्यानंतर भव्य वास्तुसंकुलामध्ये अस्थायी प्रकल्पाचे स्थलांतर करण्यात आले. या अतिशय दिमाखदार कार्यक्रमास रा.स्व. संघाचे तत्कालीन सहसरकार्यवाह सुदर्शनजी व आचार्य किशोरजी व्यास उपस्थित होते.

स्थायी प्रकल्प म्हणून रूपांतरित करताना सर्व सेवा अजून नि:शुल्कच होत्या. शैक्षणिक गुणवत्ता व उत्तम संस्कार यांचा आग्रह धरला गेला. त्यासाठी सुयोग्य कार्यकर्त्यांची निवड केली. विद्यार्थ्यांचे चयन करताना ते लातूर व धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलच असतील, असा प्रमुख निकष ठेवला. प्रथम वर्षाचा दहावीचा निकाल केवळ अठरा टक्के होता. तो प्रतिवर्षी झपाटयाने वाढू लागला. प्रकल्पाच्या आवारात नित्य संघशाखेची रचना झाल्यामुळे आवश्यक त्या संस्कारांची चांगली योजना करता आली. त्याचे सुयोग्य परिणामही दिसू लागले. नुसते एक शिक्षण संस्काराचे केंद्र हे स्वरूप न राहता विविध सामाजिक उपक्रमांचे व चळवळीचे एक सळसळत्या 'चैतन्याचे केंद्र' असे या प्रकल्पाचे रूप झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू सर्व दृष्टींनी उत्तम गुणवत्ता निर्माण करता येऊ लागली.

जनकल्याण समितीचा हा प्रांतभरातला 'विशाल प्रकल्प' अशी प्रसिध्दी व प्रचिती सर्वांच्या अनुभवास येऊ लागली. प्रकल्प संचालनासाठी स्वतंत्र समिती निर्माण करण्यात आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांत कार्यकर्ते बदलत गेले. परंतु मूळ संकल्पना व व्यवहारांची रचना यात तफावत झाली नाही. ही सर्व वाटचाल सोपी नव्हती. संचालन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कधी शासकीय, कधी संघटनात्मक, कधी सामाजिक अशी अनेक आव्हाने इथल्या कार्यकर्त्यांनी समर्थपणे पेलली. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातले परिवार, विद्यार्थी, शैक्षणिक वातावरण व समाजजीवन या सर्वांना उचित आधार देण्याचे व तेथील जीवन पालटविण्याचे सामर्थ्य देण्यात यश आले, असे निश्चितपणे वाटते. या प्रकल्पात सहभागी झालेल्या सर्वच कार्यकर्त्यांना एका आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीतच नव्हे, तर 'समाजनिर्मितीच्या' एका प्रकल्पात करण्यात यश मिळाले, असा सार्थ अभिमान वाटतो. पुढील वाटचालही अशीच समर्थपणे चालू राहील, असा विश्वास वाटतो.

डॉ. अशोक कुकडे

9423775897

(लेखक विवेकानंद रुग्णालय, लातूर येथे मुख्य शल्यचिकित्सक आहेत.)------------------------------------------------------------------

 जनकल्याण निवासी विद्यालय प्रकल्प.... एक दृष्टीकोन 

समाजदातृत्वाच्या आधारावर लातूरजवळच हरंगुळ (बु.) येथे 9.5 एकरच्या परिसरात शाळा-निवास इत्यादी वास्तूंचे निर्माणकार्य प्रारंभ झाले. रा.स्व. संघाचे तत्कालीन पू. सरसंघचालक रज्जूभैय्यांच्या हस्ते या कामाचा शिलान्यास झाला. जानेवारी 1998पासून प्रकल्प हरंगुळ (बु.) येथील वास्तूत स्थलांतरित झाला.

सध्या प्रकल्पात 575 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण-संस्कार-समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर आधारित विद्यालयातील व वसतिगृहातील कार्यक्रमांची, उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. प्रकल्पातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे जीवन घडावे, त्यातून राष्ट्रजीवन विकसित व्हावे यासाठीची मनुष्यनिर्मितीची प्रयोगशाळा म्हणजेच जनकल्याण निवासी विद्यालय प्रकल्प होय.

संत गाडगेबाबा व शालिवाहन या दोन इमारतींमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. शालिवाहन इमारतीचा दुसरा मजला 'भगिनी निवेदिता' ही नव्याने उभी केलेली मुलींच्या वसतिगृहाची योजना असून 'जिजाऊ' या इमारतीत मुलींच्या भोजनाची तसेच अन्य कार्यक्रमासाठीची रचना असते.

संपूर्ण परिसरात शेतीसाठी दीड एकर जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयक उपक्रम घेतले जातात. प्रकल्पाच्या विद्यालय विभागात शहरी भागातील शाळांप्रमाणे सर्व शैक्षणिक सुविधा देण्यात आल्या आहेत. सकाळी 9.15 ते 1.00 व दुपारी 2.30 ते 4.15 या कालावधीत राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमानुसार आनंददायक, कृतियुक्त, अनुभूतिपूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी विद्यालयातील विभागात एकूण 26 कर्मचारी-कार्यकर्ते कार्यरत आहेत.

प्रकल्पाचा वार्षिकोत्सव हा अत्यंत वैविध्यपूर्ण व आनंदाची पर्वणी घेऊन येणारा उपक्रम. या तीन दिवसांच्या कालावधीत वेषभूषेसह उतारे पाठांतर, वर्गश: पद्य पाठांतर, कथाकथन, वक्तृत्व, रंजन, क्रीडा स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांत विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. विविध कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमात नृत्य, अभिनय, नाटय असा कलाविष्कार पाहण्यासाठी पालकांची व परिसरातील मान्यवर-ग्रामस्थांची मोठी गर्दी असते.

विद्यालयात कबड्डी, खो-खो, योगासने, बुध्दिबळ या व मैदानी खेळांची तयारी करून घेतली जाते. या स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांना राज्यपातळीपर्यंत यश मिळवले आहे. पुढे महाविद्यालयीन जीवनातही त्या त्या खेळात उत्तम गती घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उन्हाळी वर्ग, दररोज नियमित जादा तासिका व दैनंदिन अध्ययन अशी रचना आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटींचीही योजना असते. कोणतीही अतिरिक्त शिकवणी न लावता सर्व कार्यक्रम-उपक्रमात सहभागी होऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीचे विद्यार्थी यशस्वी होतात. विद्यालयाचा सन 2000पासून शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 90 ते 100% या दरम्यान असून अधिकतम गुणांची टक्केवारी 96%पेक्षा अधिक आहे.

भारतीय संस्कृतीशी परिचय दृढ व्हावा, म्हणून वसतिगृहात विविध सण-उत्सव अतिशय उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव, शारदोत्सव, राखीबंधन, विजयादशमी उत्सव, होळी, कोजागिरी पौर्णिमा, अखंड भारत संकल्प दिन असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

शाळेच्या मूल्यांकनाप्रमाणे वसतिगृहाचेही मूल्यांकन असते. वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य, कार्यक्रम-उपक्रमातील सहभागातील व संचालनात त्याची सकारात्मकता अशा विविध 22 मुद्दयांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होते.

प्रकल्पातील या सर्व संचालनात विद्यालय विभागात शिक्षक-शिक्षकेतर 26 कर्मचारी कार्यरत आहेत. वसतिगृह विभागात 16 पालक पर्यवेक्षक व अन्य 35 कर्मचारी आहेत. असे एकूण 77 कर्मचारी प्रकल्पात कार्य करत आहेत. प्रकल्प संचालनात स्थानिक 25 समिती सदस्य सहभागी आहेत.

मान्यवरांच्या भेटी 

विद्यार्थ्यांच्या विकासात अनेक मान्यवरांचाही सहभाग असतो. समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवर विद्यार्थ्यांसमोर नियमित येत असतात. मागील 25 वर्षांत अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यात प्रामुख्याने पू. सरसंघचालक मोहनजी भागवत, पू. सुदर्शनजी, आ. किशोरजी व्यास, मा. विजयजी भटकर, डॉ. जयंत नारळीकर, मा. तरुण विजयजी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबानंदन पवार, मा. लातूर शिक्षणाधिकारी, मा. जिल्हा अधिकारी, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक इ. मान्यवरांचा समावेश आहे.



प्रकल्पात 6 वर्षे वास्तव्य करून सुमारे 1280 विद्यार्थी प्रकल्पाच्या बाहेर पडले आहेत. 6 वर्षांपेक्षा कमी कालावधीत वास्तव्यास राहून बाहेर पडलेल्यांची संख्याही जवळपास तितकीच आहे.

मागील 25 वर्षांत अनेकानेक कार्यकर्त्यांचे, समाजातील अनेक घटकांचे या सामाजिक, शैक्षणिक प्रकल्पास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान लाभले आहे. सध्याही लाभते आहे. तसेच भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प समाजातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी पथदर्शक प्रकल्प ठरेल, हा विश्वास आहेच.

ज्ञानेश्वर रा. सोनटक्के
मुख्याध्यापक - ज.नि.वि. हरंगुळ (बु.)