समाजमाध्यमे : डेटा आणि मानसिकतेची हाताळणी 

विवेक मराठी    15-Oct-2018
Total Views |

समाजमाध्यमांत अनोळखी लोक एकमेकांशी जोडले जातात, त्यामुळे अधिकाधिक इंटरॅक्शन अनोळखी लोकांशीच होत असते. बरे, ज्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्ट करत आहोत, त्या व्यक्ती आपली खरी माहिती पुरवतीलच याची खात्री नसते. आपल्याला ज्या भावना ऑॅनलाइन वाटू शकतात, त्या खऱ्या माहितीवर आधारित असतातच असे नाही. म्हणजे भावना खऱ्या असतात, फक्त त्यांची निर्मिती कृत्रिमरित्या केली जाऊन ती मॅन्युप्युलेट होऊ शकते.

 टि्वटर (100 अब्ज वापरकर्ते व प्रतिदिनी 340 अब्ज ट्वीट्स), फेसबुक (2.23 अब्ज वापरकर्ते) आणि व्हॉट्स ऍप (1.5 अब्ज वापरकर्ते व  प्रतिदिनी 60 अब्ज संदेश) यांसारखी समाजमाध्यमे उदयास आली, त्या वेळी त्यांच्या निर्मात्यांनादेखील अंदाज नसेल की त्यांचा उपयोग समाजाची मानसिकता हाताळण्यासाठी करता येऊ शकतो. याचे जागतिक स्तरावर पहिले दिसलेले ठळक उदाहरण म्हणजे जानेवारी 2011च्या सुरुवातीला आणि शेवटाला झालेली अनुक्रमे टयुनीशियामधील आणि इजिप्तमधील राज्यक्रांती. या दोन्ही आंदोलनांत दिसले की फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जनतेमधील अतिशय सामान्य माणूस अन्यायाविरुध्द उभा ठाकला आणि त्याला प्रतिसाद म्हणून प्रत्यक्ष आंदोलनासाठी लाखो लोक राजधानीत जमून त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा पाडाव केला. अशा नैसर्गिक दिसणाऱ्या क्रांती फार हुशारीने पूर्वनियोजित असतात. भारतात जुलै-ऑॅगस्ट 2011मध्ये फेसबुक, टि्वटर वापरून म्यानमारमधील रोहिंग्या आणि स्थानिक बौध्द यांच्यातील संघर्षाचे फोटो हे आसाममधील बोडो आणि स्थानिक मुसलमान यांच्यातील संघर्षाचे दाखवून व्हायरल केले गेले. रोहिंग्यांना आसाममधील स्थानिक मुसलमान असे संबोधून संपूर्ण ईशान्य भारतातील लोकांचे त्यांच्यावर अत्याचार अशा चुकीच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या जाऊन देशभरात ईशान्य भारतातील लोकांविरुध्द वातावरणनिर्मिती केली. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई यासारख्या मोठमोठया शहरांत सिक्युरिटी क्षेत्रात कामे करणाऱ्या ईशान्य भारतातील हजारो लोकांना स्थानिक मुसलमानांकडून मारहाण झाली आणि भीतीचे वातावरण पसरविले गेले. अशातच 11 ऑॅगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात रझा अकादमीच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी एकत्र येऊन माध्यमांच्या ओबी व्हॅन्स जाळल्या, महिला पोलिसांच्या अब्रूवर हात घातला, राष्ट्रीय स्मारकांना लाथा घातल्या. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणली गेली, पण रोहिंग्यांना भारतात एन्ट्री करण्याचा मार्ग एक प्रकारे खुला झाला. त्यानंतर 2012मध्ये दिल्लीत चालू झालेले लोकपाल आंदोलन फेसबुक-टि्वटरच्या माध्यमातून देशभर पसरले. भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळलेला सामान्य माणू्स या आंदोलनाशी जोडला गेला. डिसेंबर 2012मध्ये दिल्लीत निर्भयाकांड घडल्यावर पुन्हा एक आंदोलन उभे राहिले आणि यातून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेपर्यंत पोहोचविले. त्यानंतरही आपल्याला समाजमाध्यमांचा वापर करून सत्य-असत्य गोष्टी पसरवून समाजाची मानसिकता हाताळण्याच्या घटना घडलेल्या वारंवार दिसून येतात. हे सगळे तपशील पुन्हा सांगण्यामागचे कारण असे की या सगळयात एक समानता आहे. कोणत्यातरी अंत:स्थ हेतूने समाजमाध्यमाचा वापर करून जनतेच्या मानसिकतेची तो हेतू साध्य करण्यासाठी केलेली हाताळणी (मॅन्युप्युलेशन).

2010पासूनच गूगलने आपल्याकडे असलेल्या विविध प्रतिमांच्या डेटाबेसमधील मांजराच्या प्रतिमांना ओळखण्यासाठी मशीन लर्निंग अल्गॉरिदम टेस्ट केले आणि उपलब्ध डेटा हाताळणीसाठी मशीन लर्निंगचा उपयोग करण्याचे विविध प्रयोग चालू झाले. हा डेटा हाताळता येतो हे लक्षात आल्यावर उपलब्ध डेटा प्रक्रिया करून जे काही हाती लागेल, त्याचा वापर रेव्हेन्यू निर्मितीसाठी केला. गूगल ही संपूर्ण कंपनी (सर्व जगभरातील शाखांसकट) केवळ या डेटा हाताळणीतून मिळणाऱ्या पैशातून चालविली जाते. या 'डेटा'ची इतकी किंमत का? कारण मार्केटिंग करण्यासाठी, तसेच कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीतील तत्त्वे वापरून लोकांची मानसिकता हाताळण्यासाठी या माहितीचा उपयोग करता येतो. 2011-12मध्ये समाजमाध्यमांच्या क्षेत्रात मशीन लर्निंगचा इतका शिरकाव झालेला असेलही, पण तो ठळकपणे आपल्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. डेटा हाताळणी आणि मशीन लर्निंगचा दुसरा परिणाम म्हणजे केंब्रिज ऍनालॅटिकासारख्या कंपन्या उदयास येणे.

 आपण जेव्हा प्रत्यक्ष एखाद्याशी इंटरॅक्शन करतो, त्या वेळी आपल्या भाव-भावना आणि त्यांवरील प्रतिक्रिया या प्रत्यक्षानुभूतीवर अवलंबून असल्याने विश्वासार्ह असतात. सामान्यत: जनसामान्यांच्या भावना हाताळण्याचे पारंपरिक मार्ग म्हणजे एखादे आवेशपूर्ण भाषण, गीतगायन, नारे देणे इ. पण ऑॅनलाइन जगात हेच व्हिडिओ, छायाचित्रे, मिम्स यांद्वारे घडते. समाजमाध्यमांत अनोळखी लोक एकमेकांशी जोडले जातात, त्यामुळे अधिकाधिक इंटरॅक्शन अनोळखी लोकांशीच होत असते. बरे, ज्या व्यक्तीशी आपण इंटरॅक्ट करत आहोत, त्या व्यक्ती आपली खरी माहिती पुरवतीलच याची खात्री नसते. आपल्याला ज्या भावना ऑॅनलाइन वाटू शकतात, त्या खऱ्या माहितीवर आधारित असतातच असे नाही. म्हणजे भावना खऱ्या असतात, फक्त त्यांची निर्मिती कृत्रिमरित्या केली जाऊन ती मॅन्युप्युलेट होऊ शकते. बाह्य घटकांद्वारे आपल्या भावनांचे उद्दीपन केले जाऊ शकते. यात आपण नक्की कोणत्या पोस्ट्स लाइक करतो, कोणाला फॉलो करतो, किती काळ तिथे रेंगाळतो, कोणत्या वेबसाइट्स पहातो, काय लिहितो या सगळयाचा वापर केला जातो. हे फक्त अल्गॉरिदम वापरून केले जाऊ शकते. यात कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीच्या तत्त्वांचा वापरदेखील करतात. आपला मेंदू जेव्हा कोणतीही माहिती प्रक्रिया करायला घेतो, तेव्हा मानसिक प्रारूपे (मेंटल मॉडेल्स) तयार करत जातो. ही मेंटल मॉडेल्स बदलून नव्यानेदेखील तयार होऊ शकतात/होत असतात. आपल्या मनाचे दोन प्रकार असतात - सिस्टिम 1 आणि सिस्टिम 2. यातील सिस्टिम 1 कायम आपल्या तात्कालिक भावनिक स्थितीवर आधारित चटकन प्रतिक्रिया देते. आपले मूळ व्यक्तिमत्त्व, मूळ स्वभाव, आपल्याला आलेले अनुभव यांवर ही भावनिक स्थिती आधारित असते. सिस्टिम 1मध्ये भासदेखील घडू शकतात. त्यानुसार सिस्टिम 1 आपली पहिली बचावात्मक प्रतिक्रिया देत असते. यात तर्कशुध्द विचार केला जात नाही. सिस्टिम 2मध्ये सगळी मांडणी तर्कशुध्द विचारांवर आधारित असते. त्यामुळे सिस्टिम 2मधून दिले जाणारे प्रतिसाद हे जाणीवपूर्वक विचार करून दिलेले असतात. साधारणपणे ऑॅनलाइन जगात आपल्या सिस्टिम 1मधील प्रतिसादांचाच वापर अधिक असतो. भावना या संसर्गजन्यदेखील असतात. ज्या व्यक्तींच्या सिस्टिम 1मध्ये समान गोष्टी आढळतात, असे लोक त्या प्रकारच्या भावना पटकन पकडतात आणि भावना एखाद्या संसर्गजन्य रोगासारख्या पसरतात. उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍपवरील व्हायरल व्हिडिओमुळे, मुले पळविणारी टोळी अशा गैरसमजुतीतून जमावाने काही लोकांना बदडून मारले. समाजमाध्यमे ही विसंवादी असतात, तशीच अनेक वेळा निर्दयीही बनू शकतात. आपल्या मनात मानसिक (संज्ञात्मक) पक्षपात असू शकतो. म्हणजेच आपण अशाच गोष्टी शोधत असतो, ज्यामुळे आपल्या आधीच्या विश्वासाला पुष्टी मिळते. यालाच पुष्टीकरणाचा पक्षपात असे म्हणतात. यातूनच आपले चुकीचे समज, आपल्या भावनांमध्ये खोल रुतलेले विश्वास, भास यांचादेखील वापर होत असतो. हे सगळे इतके धोकादायक असेल, तर आपण या सगळया इंटरॅक्शन्स, समाजमाध्यमांमधील आपला वावर, बाहेरचा वावर, विविध अनुभव घेणे, विविध धोके पत्करणे, नवनवीन अनुभव घेणे, नवनवीन प्रक्रियांतून जाणे हे सगळे का करतो? तर स्वत:चे अस्तित्व जपणे, टिकविणे ही या सगळयामागची प्रेरणा असते. या सगळयातील महत्त्वाचा घटक म्हणजे अटेन्शन किंवा लक्ष. आपण इतरांना महत्त्व देतो, त्यांचे बोलणे ऐकतो, विचार वाचतो म्हणजे आपण त्यांना आपले अटेन्शन देत असतो. आपल्या अनेक कृतींमधून अटेन्शन म्हणजेच लक्ष वेधून घेत असतो. लक्ष देणे आणि लक्ष वेधून घेणे या अस्तित्व टिकविण्यामागील सामान्य प्रक्रिया आहेत. पण यातच सगळे दडलेले असते. समाजमाध्यमांत आणि त्यातून गोळा केलेल्या माहितीमधूनदेखील आपले अटेन्शन मॅन्युप्युलेट केले जाते.

एक साधे उदाहरण घेऊ. आपल्या मेंदूला निगेटिव्ह (न-कार) म्हणजे काय हे समजत नसते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला करू नको असं सांगितले, तर आपले मन त्याकडेच धाव घेते. कारण आपल्या मेंदूला 'नको' हे समजतच नाही. त्यामुळे मेंदूला माहिती पुरविताना आपल्याला जी पाहिजे तीच माहिती पुरवावी असेही म्हणतात. आपण 'झेरॉक्स काढ' असे सररास म्हणतो, पण झेरॉक्स ही फोटोकॉपी करण्याचे मशीन बनविणारी एक कंपनी आहे. आपल्या मेंदूत झेरॉक्स आणि फोटोकॉपी करणे याचे समीकरण इतके फिट बसले आहे की आपोआप तेच आपल्या तोंडात येते. अशा प्रकारे असोसिएशन करून घेण्याच्या आपल्या मेंदूच्या क्षमतेचादेखील वापर करून घेतला जातो. आता तुम्ही म्हणाल, समाजमाध्यमातून गोळा केलेला डेटा आणि आमच्या मानसिकतेची हाताळणी याचा काय संबंध? तर सांगते. आजकाल प्रतिमांच्या प्रक्रिया (इमेज प्रोसेसिंग), टेक्स्ट प्रोसेसिंग यासाठी अतिशय उत्तम मशीन लर्निंग अल्गॉरिदम्स उपलब्ध आहेत. यांचा वापर करून तुमचे सेंटिमेंट्स (भावना) ओळखता येऊ शकतात. अशा प्रकारे तुमची मानसिकता, भावनिकता, तुमचा सामाजिक-राजकीय कल, तुमचा विश्वास हे सगळे ओळखण्यासाठी तुम्ही लाइक करत असलेल्या प्रतिमा, व्हिडिओज, कार्टून्स, वेबसाइट्स, टेक्स्ट मेसेजेस यांचा वापर केला जातो. तुम्ही समजा एखाद्याविरुध्द प्रचार करण्यासाठी काही निगेटिव्ह बनवत असाल, तर त्याचादेखील उलटा परिणाम होऊ शकतो. एक साधे उदाहरण सांगते. 10 सप्टेंबरला काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. दुसऱ्याच दिवशी मी भाजपा सपोर्टर्सनी शेअर केलेला एक व्हिडिओ पाहिला. काही वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेनेने कशासाठी तरी बंद पुकारला, त्याचा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये 'आम आदमीके हक के लिये आम आदमी ने ही आम आदमी को तकलीफ दी' अशा प्रकारचे टेक्स्ट फिरत होते. हा व्हिडिओ कोणत्यातरी वाहिनीवरील होता, तो बरोब्बर 11 सप्टेंबरपासून समाजमाध्यमांत फिरविला गेला. आता ज्या भाजपा समर्थकाने तो व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्या मानसिक प्रारूपात (मेंटल मॉडेलमध्ये) आत्ता आलेला बंदचा व्हिडिओ - म्हणजे 10 तारखेच्या बंदचा व्हिडिओ असणार आणि त्याला पुष्टी देणारी टेक्स्ट लाइन 'आम आदमी....' त्यावरून त्याच्या सिस्टिम 1ने प्रतिक्रिया दिली आणि तो व्हिडिओ शेअर केला. ज्यांनी कोणी व्हिडिओ नीट पाहिला असेल, त्यांच्या हा विरोधाभास लक्षात आला असेल तर उत्तम. ज्यांच्या लक्षात आला नाही, त्यांनी तो रीशेअर केला (भावनेचे संसर्गजन्य प्रकटीकरण). माझ्या मित्रयादीतील एकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला मी 13 सप्टेंबरला पाहिला आणि माझ्या लक्षात आल्यावर (माझी सिस्टिम 2 काम करत होती) ही बाब त्यांच्या लक्षात आणून देऊन मी तो काढून टाकण्यास सांगितले. बऱ्याच वेळा फेक अकाउंट्सचा वापर करून (अतिशय साधर्म्य दाखविणारी नावे टाकून) खोटी माहिती, स्फोटक माहिती, एखाद्याला बदनाम करणारी माहिती पसरविली जाऊ शकते. अशा गोष्टी आपल्या नजरेतून सुटू शकतात आणि आपली सिस्टिम 1 काम करून पटकन तो मजकूर शेअर केला जाऊ शकतो. आपल्याकडील प्रसारमाध्यमे तर प्रत्यक्ष बोलण्यातील सोयीचा तेवढा भाग दाखवूनदेखील अशाच प्रकारे गैरसमज पसरवीत असतात. खरे व्हिडिओ चुकीच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरले जाऊ शकतात, खोटे व्हिडिओ तयार करून गैरसमज पसरवले जाऊ शकतात. या सगळयात आपले मेंटल मॉडेल अतिशय संभ्रमात पडू शकते. काय योग्य, काय अयोग्य हेच समजणे अवघड होऊ शकते.

केंब्रिज ऍनालॅटिकासारख्या संस्था खोटा मजकूर, संदर्भविरहित मजकूर कशा प्रकारे कधी वापरायचा हेदेखील प्रोग्रॅम्स लिहून मशीनद्वारे ठरवू शकतात. मशीन लर्निंगची ताकद हीच की तुम्ही जेवढी इंटरॅक्शन करून डेटा द्याल, तेवढे ते अधिक पक्के शिकत जाते. मग तुम्ही जितकी आणि ज्या प्रकारची इंटरॅक्शन समाजमाध्यमांमध्ये करता, तेवढा डेटा निर्माण होत जातो. आपल्या भावनांना उद्दीपित करून आपल्या इंटरॅक्शन्स वाढविल्या जातात आणि अधिक डेटा तयार होतो. म्हणजे आपणच आपल्या मॅन्युप्युलेशनसाठी खाद्य पुरवीत असतो आणि आपला प्रवास उपभोक्त्याकडून उपभोग्य याकडे होतो. केंब्रिज ऍनालॅटिकावर जरी निर्बंध असले, तरी अशा आणखीही शेकडो कंपन्या कार्यरत आहेत, ज्यांची माहिती आपल्याला नाही. आपण जेव्हा समाजमाध्यमांचा वापर करतो, तेव्हा अतिशय छोटया फॉन्टमध्ये दिलेल्या टर्म्स आणि कंडीशन्स कधीच वाचत नाही. अधिकाधिक लोक त्यांची दोस्त मंडळी तिथे आहेत म्हणून साइन-अप करतात. म्हणजे सिस्टिम 1चा वापर तिथपासून चालू झालेला असतो. केवळ राजकीय लाभासाठीच या सगळया माहितीचा वापर करून घेतला जाईल असे नाही, तर देशविघातक शक्ती देशात दंगली घडवून आणण्यासाठीदेखील करू शकतात. मी सुरुवातीलाच याची उदाहरणे दिली आहेत. समाजमाध्यमे ही एक निद्रिस्त ज्वालामुखीसारखी किंवा भूसुरुंगासारखी आहेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.  मग आपण काय करायचे? आपण जर चुकीचा, बिना आधार असलेला मजकूर टाकला आणि लोकांच्या लक्षात आले की ही व्यक्ती चुकीची माहिती पसरवीत आहे, तरी आपली विश्वासार्हता संपू शकते. सायबर क्राइमतर्फे कारवाईही होऊ शकते. त्यामुळे आपण कोणतीही माहिती पुरविताना त्याची सत्यासत्यता पडताळावी आणि मूळ स्रोताची माहिती द्यावी. आपल्याच नावाने खोटी अकाउंट्स बनवून चुकीच्या पोस्ट्स तयार केल्या जाऊ शकतात आणि आपल्या मित्रमंडळींना दिसायला लागतात. यासाठी आपण समाजमाध्यमांचा वापर करताना अतिशय सजग राहावयास हवे. समाजमाध्यमे ही झुंडशाहीच्या किंवा मेंढयांच्या कळपाच्या मानसिकतेत जास्त वापरली जातात. या सगळया झुंडशाहीत आपलाच वापर करून घेतला जाणार नाही, याची दक्षता आपणच घ्यावयास नको का?

 aparnalalingkar@gmail.com

लेखिका ट्रिपल आयटी बंगळुरू येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.