युवा प्रतिभेचा उत्कट आविष्कार - प्रतिभा संगम

विवेक मराठी    15-Oct-2018
Total Views |

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित 17 वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन लातूरमध्ये 29-30 सप्टेंबरदरम्यान पार पडले. या संमेलनात तरुणाईने अनेक विषयांवरील कविता सादर केल्या. 'प्रतिभा संगम'च्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेऊन एक पायवाट तयार करून ठेवली आहे. आता या पायवाटेचा हमरस्ता बनवण्याची वेळ आली आहे.

गेली दोन दशके प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांसाठीचे असलेले साहित्य संमेलन महाराष्ट्रात विविध गावांमध्ये आयोजित होते आहे. 17वे प्रतिभा संगम लातूरमध्ये नुकतेच (29-30 सप्टेंबर) पार पडले.

या संमेलनात सादर झालेल्या काही कवितांत प्रगल्भ सामाजिक जाणीव दिसून आली. शामल दीपा शंकर ही जळगावची मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी. 'स्वप्नातही आजकाल' या आपल्या कवितेत ती असे लिहिते -

स्वप्नातही आजकाल

दगड उचलले जातात

तेही रंगांवर

क्षितिजावरचा 'निळा' यांना दिसत नाही

मावळतीचा 'भगवा' ते पाहत नाही

माळरानातला 'हिरवा' त्यांना नकोसा वाटतो

आणि आता तर 'पांढऱ्या' रंगावरही आक्षेप

असे दगड खावे लागतील म्हणून

कदाचित सगळीकडे

हवा आणि पाणी

रंगहीन आहेत

अगदी 18-19 वर्षांच्या या मुलीकडे इतकी प्रगल्भता येते, हे फार आशादायक चित्र आहे. याच कवितेला या वर्षी पहिला क्रमांक प्राप्त झाला. कविता आणि गाणे यातील फरक सांगणारी एक गोड कविता गिरीश पाटील या जळगावच्याच तरुणाने सादर केली.

कर्म म्हणून यमक जुळवलं तर गाणं

मर्म म्हणून यमक जुळवलं तर कविता

काहीतरी सुचलं म्हणून लिहिलं तर गाणं

काहीतरी साचलं म्हणून लिहिलं तर कविता

अशी गोड मांडणी करत हा तरुण शेवटी लिहितो -

तळहातांवर घे सप्तरंग

डोळे मिटून उधळून टाक दाही दिशांत

डोळे उघडून न्याहाळ

तळहातांच्या रेषांवर

उरलेल्या रंगांची नक्षी म्हणजे गाणं

दाही दिशांत

उधळलेल्या रंगांचे पक्षी म्हणजे कविता

अतिशय तरल अशी भावना हा तरुण व्यक्त करतो. या कवितेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.

तरुणांनी सामाजिक आशयाच्या किंवा निसर्गाच्याच कविता सादर केल्या असे नाही. निखळ विशुध्द अशी प्रेमाची भावना उत्कटतेने तरुणांच्या कवितेत येणारच. नितीन लोहार या तरुणाला आपली प्रेमभावना व्यक्त करताना असाच शब्दांचा आधार घ्यावासा वाटला. तो उत्कटपणे लिहितो -

अशा पडत्या पाण्यात

धीर जातोय जरासा

तुझ्या भिजल्या केसाला

गंध मातीचा जरासा

तू गवताची पात

तुझ्या ओठात कात

तुझ्या डोळयात जागते

एक ऊबदार रात

तू पावसाची सर

काळजाच्या देशात

अन् मी उगतो मातीत

हिरव्या वेषात

तू गुलाबाची कळी

पावसात चिंब

तुझ्या मोकळया केसात

मी ओघळता थेंब

निखळ प्रेमभावना व्यक्त करणारी ही कविता तिसऱ्या क्रमांकाला पात्र ठरली.

उत्तेजनार्थ बक्षीस मिळवणाऱ्या गणेश गायकवाड या तरुणाने स्त्रीचे सनातन दु:ख आपल्या कवितेत मांडले होते.

दिल्या घरी तू सुखी रहा

असा आईनं शब्द दिला म्हणून ती

गिळत राहिली आयुष्यभर

न पचणारा घासही..

उसासारखं आयुष्य सोलून निघालं तरी

नाही सोडलं तिनं

साखरेसारखं गोडपण

कवितेचा शेवट करताना गणेश लिहितो -

पण आता तिला एल्गार करावाच लागेल

करपून गेलेल्या वावरात

नव्यानं उगवावंच लागेल

मग ते बी आता आपण पेरूयात

त्याला खतपाणी घालूयात

आणि माणूस होऊयात..

या साहित्य संमेलनाचे वैशिष्टय म्हणजे साहित्य प्रकारानुसार गटचर्चा घेतल्या जातात. कविता, कथा, वैचारिक लेख, अनुदिनी (ब्लॉग लेखन) यांच्या गटचर्चा या वेळी घेतल्या गेल्या. ज्या मुलांनी कविता लिहून आणल्या, त्यांचे गट करून मान्यवर लेखकाला या कविता ऐकवल्या जातात. हे मान्यवर त्यांच्याशी त्या कवितांवर चर्चा करतात. त्यातील उणिवा/बलस्थाने दाखवून देतात. या चर्चेतून ज्यांची कविता सादर करण्याजोगी आहे असे निवडक कवी आणि मान्यवर कवी असे एक अतिशय दर्जेदार कविसंमेलन सादर केले जाते.

एकूण प्राप्त कवितांचा सगळा आढावा घेऊन (सादरीकरणाचा विचार न करता) केवळ साहित्यगुणांवर कवितेसाठीचे क्रमांक काढले जातात. याच पध्दतीने इतरही साहित्य प्रकारांबाबत केले जाते.

तरुणांच्या एकूणच सळसळत्या साहित्य-ऊर्जेला इथे मोकळी वाट सापडते. आज विद्यापीठ पातळीवर युवक संमेलने होत आहेत. त्यांच्यामधूनही अशीच ऊर्जा उसळत असलेली दिसते.

एक विचार मोठया गांभीर्याने केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या युवक महोत्सवात असे चांगले वाटणारे लेखक, कवी निवडून त्यांना एकत्र केले गेले पाहिजे. याची एक कार्यशाळा घेतली जावी. त्यासाठी तेथे मान्यवर साहित्यिक निमंत्रित केले जावे. या मुलांमधील प्रतिभा हेरून चांगले साहित्य वाचकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जावे.

महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच, वाङ्मय मंडळे सक्रिय केली गेली पाहिजेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र न करता ज्यांना किमान गोडी आहे असे विद्यार्थी निवडून त्यांचाच समावेश यात केला जावा. सरधोपट सर्वच्या सर्व विद्यार्थी निवडले की त्याचे व्यवस्थापन कठीण जाते. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचायला दिली गेली पाहिजेत. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर त्यांना छोटयाशा गटात बोलते केले पाहिजे. काही जणांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर सविस्तर लिहून आणावे. अशा लेखांचे सर्वांसमोर वाचन व्हावे.

आजघडीला महाराष्ट्रात दहा विद्यापीठे आहेत. शिवाय चार कृषी विद्यापीठे आहेत. तंत्रज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय विद्यापीठ, कायदा विद्यापीठ यांचाही यात समावेश केला गेला पाहिजे. अशा पध्दतीने या विद्यापीठांमधून चांगले लिहिणारे शोधून त्यांना एकत्र केले गेले पाहिजे. साधारणत: प्रत्येक विद्यापीठातील दहा ते वीस विद्यार्थी निवडून अशा दोनशे-तीनशे जणांचे जर काही एक संमेलन आपण घेणार असू, तर तो खरा प्रतिभेचा शोध ठरेल आणि त्यासाठी घेतलेले श्रम कारणी लागतील.

प्रतिभा संगमच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेऊन एक पायवाट तयार करून ठेवली आहे. आता या पायवाटेचा हमरस्ता बनवण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी परिषदेच्या खांद्यावर जास्त काळ हे ओझे न ठेवता स्वतंत्रपणे युवा प्रतिभेचा शोधणे, तिचे संवर्धन होण्यासाठी कष्ट घेणे, या युवा प्रतिभेचा आविष्कार समाजासमोर घडवून आणणे यासाठी दीर्घकालीन धोरण आखावे लागेल.

ज्ञानेश्वरांच्या सप्तशताब्दीचे औचित्य साधून, 'प्रतिभा संगम'ने अंमळनेर या साने गुरुजींच्या भूमीतून तरुणांमधले ज्ञानेश्वर शोधण्याची सुरुवात केली होती. आता याच वाटेवरचा पुढचा मुक्काम म्हणजे सर्व विद्यापीठांमधून युवा प्रतिभा शोधणे आणि तिचे संवर्धन करणे.

प्रतिभा संगममध्ये सादर झालेल्या व क्रमांक मिळवलेल्या कवितांचे एक चांगले पुस्तक तयार होऊ शकते. त्यासाठीसुध्दा प्रयत्न झाले पाहिजेत.     जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद