इम्रान खानांची आत्मघातकी खेळी

विवेक मराठी    02-Oct-2018
Total Views |

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हायची शक्यता निर्माण झाली की, पाकिस्तानच्या 'आयएसआय'च्या अंगात येते हा आजवरचा अनुभव आहे. तसेच आताही घडले. त्याच वेळी नेमके तिघा भारतीय पोलिसांना शोपियाँ भागामध्ये दहशतवाद्यांनी ठार केले आणि एका सीमा सुरक्षा रक्षकास पळवून नेऊन त्याच्या देहाचे तुकडे केले. त्यातच पाकिस्तानने बुऱ्हान वणीसह काही काश्मिरी दहशतवाद्यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटे काढून त्यांना गौरवले. हे सर्व पाहता भारताने या चर्चेला नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध हवे असतील तर त्यास आपले आजवरचे डावपेच थांबवावे लागतील, अन्यथा पाकिस्तानला जगापासून कायमच अंतर ठेवून चालावे लागेल.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी भारताने जशा अपेक्षा ठेवल्या होत्या, त्याबरहुकूम ते वागत आहेत. जेव्हा ते निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा त्यांनी भारताविषयी आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जेवढी म्हणून टीका करता येईल तेवढी केली होती. जेव्हा ते विजयी झाले आणि सत्ता आपल्या आवाक्यात आहे असे दिसले, तेव्हा त्यांना भारतात आपले अधिक मित्र आहेत हे उमजले. इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यालेखी मोदी हे एकेरीत होते. मग पंतप्रधानपदाची शपथ घेताना आपल्या काही क्रिकेटमित्रांना त्या सोहळयास पाचारण करावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिध्दू आणि कपिलदेव यांना पाचारण केले. सिध्दू यांनी आपले दोन परिपक्व जुने सहकारी त्या यादीत आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तो न साधताच त्यांनी निमंत्रण स्वीकारले आणि प्रत्यक्ष सोहळयात पाकिस्तानचे लष्करप्रमुख ख्वाजा कंवर बाज्वा यांना आलिंगन दिले. इम्रान खान यांनी आपल्या देशासमोर 'नया पाकिस्तान'चे ध्येय ठेवले आणि त्यासाठी सरकारी साधेपणाच्या कृतीला प्राधान्य दिले. ते देताना त्यांनी आपण सदर ए पाकिस्तान या सरकारी निवासस्थानात न राहता साध्या निवासस्थानात राहणार आहोत, असे जाहीर केले. ते ज्या भागात राहायला गेले, तो भाग हाच मुळात इस्लामाबादमधला लष्करी अधिकाऱ्यांच्या वसाहतीचा आहे. एका अर्थाने लष्कर आणि लष्कराची 'आयएसआय' ही गुप्तचर संघटना यांच्याशी कायमची जवळीक त्यांनी मान्य केली. त्यांनी प्रारंभीचे काही दिवस गप्प बसून राहण्यात शहाणपणा मानला, पण त्यांनी सिध्दूच्या त्या आलिंगनावर टीका करणाऱ्यांच्या वृत्तीवर टीका केली. जरा स्थिरस्थावर होताच त्यांनी 14 ऑॅगस्टला - म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीदिनी मोदींना 'प्रिय मोदीसाहेब' असे संबोधून पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी डिसेंबर 2015नंतर थांबलेली भारत-पाकिस्तान चर्चा सुरू होण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले. त्यानंतर पाच दिवसांनी सौदी अरेबियाला जाऊन जेद्दाहमध्ये ते धार्मिक विधी उमराहमध्ये सहभागी झाले. सौदी अरेबियामध्ये सौदी नेत्यांसमवेत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधांवर चर्चा झाली असणार हे उघड आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. चीनने ज्या अटींवर पाकिस्तानच्या गळयात 'एक टापू, एक मार्ग' (वन बेल्ट, वन रोड) ही योजना बांधली आहे, ती पाकिस्तानला दिवाळखोरीकडे नेणारी ठरते आहे. आताच ग्वदार बंदरापर्यंतचा रस्ता आणि ग्वदार बंदराचा विकास यासाठी 65 अब्ज डॉलर्स एवढी मदत चीनकडून पाकिस्तानला देऊन झाली आहे. ती यथावकाश फेडायची असली, तरी त्या बदल्यात चीनला पाकिस्तानकडून जे दिले जाणार आहे, ते पाकिस्तानला खड्डयात घालणार आहे.

इम्रान खान यांच्या पत्राला भारताने सकारात्मक उत्तर दिले आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी, तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने चर्चा होईल असे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हायची शक्यता निर्माण झाली की, पाकिस्तानच्या 'आयएसआय'च्या अंगात येते हा आजवरचा अनुभव आहे. तसेच आताही घडले. चर्चा व्हायची असते त्या त्या वेळी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय एकदम जागे होतात आणि आपल्या कारवायांची सिध्दता करतात. हे माहीत असूनही भारताकडून इम्रान खान यांच्या निमंत्रणाला होकार दिला गेला. ही घाई करायचे कारण नव्हते. कोणत्या तत्त्वांच्या आधारे ही चर्चा होईल आणि ती होईल तेव्हा सरहद्दीवर कोणते वातावरण राहील, त्याबद्दलची हमी पाकिस्तानकडून घेऊन मगच आपण इम्रान खानांच्या निमंत्रणाला होकार द्यायला हवा होता. त्याच वेळी नेमके तिघा भारतीय पोलिसांना शोपियाँ भागामध्ये दहशतवाद्यांनी ठार केले आणि एका सीमा सुरक्षा रक्षकास पळवून नेऊन त्याच्या देहाचे तुकडे केले. ज्या व्यक्तीला भारताशी चर्चा करायची आहे, त्याने सरहद्दीवर शांतता राहील, हे लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्चित करायला हरकत नव्हती. पण तसे न केल्याने किंवा पाकिस्तानमधल्या वस्तुस्थितीवर पकड नसल्याने इम्रान खान तोंडघशी पडले. त्यातच पाकिस्तानने बुऱ्हान वणीसह काही काश्मिरी दहशतवाद्यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटे काढून त्यांना गौरवले. आजपर्यंत असा आचरटपणा अन्य कोणत्याही सत्तेने केलेला नव्हता. गंमत अशी की, भारताने ही चर्चा रद्द केल्यानंतर इम्रान खान यांच्याप्रमाणेच शाह मेहमूद कुरेशी यांनी थयथयाट केला. कुरेशी यांनी तर त्याही पुढे जाऊन म्हटले की, टपाल तिकिटावरचे बुऱ्हान वणी वगळता अन्य कोणी दहशतवादी नाही. बुऱ्हान वणी दहशतवादी होता हे कुरेशी यांना मान्य आहे, असाच याचा अर्थ होतो.

इम्रान खान यांनी आणखी एक घोळ घातला. त्यांनी ही चर्चा रद्द झाल्याचे समजताच आणखी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटले की, 'छोटी माणसे मोठया जागेवर बसली की हे असेच होणार.' आता गंमत आहे की कंवर बाज्वा असोत की आयएसआयचे प्रमुख नाविद मुख्तार, हे दोघेही इम्रान खानांची निवड नाहीत; स्वाभाविकच हे वाक्य त्यांना उद्देशून तर नाही ना, अशी शंका कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. ज्या टपाल तिकिटांच्या संदर्भात कुरेशी यांनी वक्तव्य केले आहे ती टपाल तिकिटे केवळ नव्हेत, तर त्यात पाकिस्तानचा दुष्ट हेतू दडला आहे. या तिकिटांवर खालच्या बाजूला काय काय लिहिले आहे, ते पाहिल्यावर आपल्या तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल. त्यावर 'भारताकडून रासायनिक अस्त्रांचा आणि पेलेट गन्सचा वापर', 'सामुदायिक कबरस्तान', 'महिलांचे केशवपन', 'एक लाख काश्मिरींचे हौतात्म्य', 'स्वातंत्र्यलढा', 'बनावट चकमकी', 'काश्मीरचा रक्तपात' वगैरे त्या तिकिटांवर असलेल्या ओळी आहेत. आणि तरीही कुरेशी म्हणतात म्हणून तसा एकच दहशतवादी त्यात आहे, म्हणून त्या तिकिटांच्या मालिकेकडे दुर्लक्ष करायचे?

भारत-पाकिस्तान चर्चेच्या आजवरच्या इतिहासात फक्त एकदाच पाकिस्तानने शहाणपणा केला होता. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोरला जाण्याचा आणि लाहोरपर्यंतची बस सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पाकिस्तानने गडबड केली नव्हती. मात्र जेव्हा लाहोरनाम्याच्या संहितेवर स्वाक्षऱ्या केल्या जात होत्या, तेव्हा तिकडे कारगिल घडवले जात होते. कारगिलचा हल्ला हा तेव्हाचाच. नवाझ शरीफ तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होते आणि जनरल परवेझ मुशर्रफ हे त्यांचे लष्करप्रमुख होते. मुशर्रफ यांनी तेव्हा आणखीही एक खेळी केली होती, ती म्हणजे लष्करप्रमुख या नात्याने अधिकृत भेटीवर आलेल्या दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना सलाम करायचा जो रिवाज असतो, तो त्यांनी पाळला नव्हता. अर्थात वाजपेयींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो काही प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला नाही. त्यानंतर 12 ऑॅक्टोबर 1999 रोजी मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली. भारताबरोबर आपल्याला संबंध चांगले हवे आहेत, असे मुशर्रफ यांनीही सांगितले आणि आग्रा येथे वाजपेयी-मुशर्रफ यांच्यात शिखर परिषद आयोजित करण्यात आली. 14 ते 16 जुलै 2001 रोजी ही शिखर परिषद ठरली. त्यासाठी मुशर्रफ भारतात आले असताना तेव्हाचे हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस यांनी मुशर्रफ यांना सलाम ठोकला नाही आणि मुशर्रफ यांना त्यांनी दाखवलेल्या उर्मटपणाची परतफेड केली. हे सर्व अशासाठी लिहिले की, परराष्ट्र संबंध राजकारणात या गोष्टींना नाही म्हटले तरी खूपच महत्त्व आहे, हे स्पष्ट व्हावे.

आग्रा शिखर परिषद उधळली गेली आणि मुशर्रफ यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर त्याचे खापर फोडले, तसे ते आता कोणावर फोडायचे ते पाकिस्तानात निश्चित केले जात आहे. राजनाथ सिंह, की सुषमा स्वराज, की अरुण जेटली, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. इम्रान खानांनी दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांची होऊ घातलेली बैठक रद्द होताच जे ट्वीट केले आहे, ते त्यांनाच अडचणीत आणणारे आहे. इम्रान खानांनी भारताच्या प्रतिसादाचे वर्णन 'उध्दट आणि नकारात्मक' या शब्दांमध्ये केले आहे. गंमत अशी आहे की, भारताने पाकिस्तानची आधीची सर्व पापे डोळयांआड करून न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होऊ  द्यायला हरकत नसल्याचे म्हटले आणि लगेचच पाकिस्तानने काश्मीरमध्ये आपल्या कारवाया वाढवल्या. एकतर हे इम्रान खानांच्या आदेशाने घडवण्यात आले असावे किंवा ते त्यांना ताकास तूर लागू न देता घडवले गेले असावे. याचाच अर्थ पाकिस्तानचे पंतप्रधान हे एखाद्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणेच आहेत. अर्थातच त्यांच्याआधीचे काही वेगळे होते असे नाही. त्या देशात या निवडून आलेल्या पंतप्रधानांना कस्पटाप्रमाणे वागणूक कशी मिळते, त्याचेच हे उदाहरण आहे. लष्कराच्या लेखी त्यांना शून्य किंमत आहे. इम्रान खानांनी जरा आरशात पाहून चेहरा साफसूफ केला, तर त्यांना कळेल की त्यांच्यापेक्षा त्यांचे लष्कर अधिक मग्रूर आहे. तुम्ही निश्चित केलेल्या बैठकीवर पाणी कसे ओतायचे, हे त्यांना अधिक चांगले कळते. तिकडे कुरेशी यांनी न्यूयॉर्कमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, 'दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी आणि स्थैर्यासाठी चर्चा होण्याची आवश्यकता असताना भारताने त्यास नकार दिला, याचा अर्थ भारत सरकारवर कोणतेतरी अंतर्गत दडपण आहे.' म्हणजे पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून मुडदे पाडावेत आणि तरीही भारताने त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ दवडावा, असे म्हणण्यासारखेच हे आहे.

आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत काय होईल, तर पाकिस्तान पुन्हा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करील आणि भारताकडून मानवाधिकाराचे कसे हनन होते आहे त्याचे रडगाणे गाईल. भारत त्याला उत्तर देण्याच्या फंदात पडेल की आपले वेगळेच मुद्दे पुढे करील, याविषयी माझ्या मनात शंका आहे. दर वेळेला पाकिस्तानने तीच ती झिजलेली रेकॉर्ड वाजवायची आणि आपण त्यास उत्तर द्याायच्या फंदात आंतरराष्ट्रीय स्तरांवरले अनेक प्रश्न दुर्लक्षित करायचे हे बरोबर नाही. त्यामुळे भारत आपला पवित्रा बदलून पाकिस्तानच्या कांगावखोरीला ओलांडून पुढे जाईल, अशी शक्यता आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायम प्रतिनिधी सैद अकबरुद्दिन यांनी 'भारताची भूमिका जागतिक भागीदारीतून विकास' या तत्त्वावर आधारलेली असेल, असे म्हटले आहे. त्यांचे हे मत त्याचीच साक्ष देणारे आहे. 2017च्या आमसभेत पाकिस्तानच्या कायम प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी भारतीय सैन्याकडून काश्मिरी जनतेवर होत असलेल्या तथाकथित 'अत्याचारां'विषयीचे चित्र म्हणून पॅलेस्टाइनमधल्या अत्याचारांचे चित्र दाखवून स्वत:चे हसे करून घेतले होते.

इम्रान खान यांनी भारताशी चर्चेची तयारी दाखवली आणि त्यात दहशतवादासह सर्व प्रश्नांवर बोलायची तयारी असल्याचे जाहीर करून ही पाकिस्तानची लंगडी बाजू जगासमोर आणली, याबद्दल इम्रान खानांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. भारताने पाकिस्तानबरोबरची ही चर्चा रद्द करून पाकिस्तानला आणखी उघडे पाडले आहे, असे या विरोधकांचे मत आहे. हे विरोधक जरी या भाषेत बोलले नसले, तरी त्यांच्या संघटित विरोधाचा अर्थ तोच आहे. विशेषत: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांच्या भारतभेटीत पाकिस्तानवर दहशतवादाबद्दल कडाडून टीका करण्यात आलेली असताना इम्रान खान यांनी त्याकडे दुर्लक्ष करून भारताशी चर्चेचा हात पुढे करणे शोभणारे नाही, असाही त्यांच्या या टीकेचा सूर आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये शाह मेहमूद कुरेशी यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांची भेट घेऊन आणखी एक रडगाणे गाईले. त्या वेळी त्यांनी भारताकडून सातत्याने 1960च्या सिंधू पाणीवाटप कराराचा भंग करून नवनवी धरणे बांधली जात आहेत, अशी तक्रार केली. ती त्यांनी ऐकून घेतली, पण त्याकडे फार गांभीर्याने पाहिले असावे असे वाटत नाही. भारताला त्यांनी कोणतीच सूचना केली नाही, हे पाहून पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय दबावगटावर त्याचे खापर फोडले. विशेष महत्त्वाचा भाग असा की काही दिवसांपूर्वी भारतीय शिष्टमंडळाने लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानच्या तक्रारीची दखल घेतली आणि पाकिस्तानी धरणविषयक तज्ज्ञांच्या भारतभेटीला हरकत नसल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे एक हजार मेगावॅटच्या पकल दल धरण योजना आणि चिनाब नदीच्या मरूसदा नदीवर उभारल्या जाणाऱ्या 48 मेगावॅटच्या लोअर कलनाई या प्रकल्पास ही भेट निश्चित केलेली होती, पण पाकिस्तानचा आगाऊपणा लक्षात घेऊन भारताने ही भेट रद्द केली. तुम्ही जर भारताविरुध्दच्या दहशतवादी कारवाया चालू ठेवणार आणि भारताविरुध्द जागतिक पातळीवर तक्रारही करणार, तर मग आम्ही तुमच्या मागणीला होकार देऊन पाकिस्तानी तज्ज्ञांना भारतात येण्याचे निमंत्रण तरी का द्यावे, असे म्हणून भारताने ही भेटही रद्द केली आहे. आता पाकिस्तानला हात चोळत बसण्यावाचून गत्यंतर नाही हे निश्चित. पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध हवे असतील तर त्यास आपले आजवरचे डावपेच थांबवावे लागतील, अन्यथा त्यास जगापासून कायमच अंतर ठेवून चालावे लागेल. तशी वेळ आली तर त्याचा सार्वकालिक तथाकथित
मित्र चीनसुध्दा त्यास जवळ करणार नाही.

अरविंद व्यं. गोखले

9822553076