टील्ला जोगिया

विवेक मराठी    02-Oct-2018
Total Views |

भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूर दूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे पाकिस्तानमधील टील्ला जोगिया किंवा गोरख टिल्ला.

टील्ला जोगिया हे एका उंच टेकडीवर दाट झाडींनी घेरलेले सूर्य मंदिर. या मंदिराला बाजूने भक्कम तटबंदी होती. तटबंदीच्या आतील आवारात इतरही 10-12 मंदिरे होती. दहाव्या-अकराव्या शतकात गोरखनाथांनी इथे एक मठ स्थापन केला होता. अनेक नाथपंथी साधू, नागा साधू, हटयोगी, जोगी, शीख धर्मगुरू यांच्या तपश्चर्येने ही भूमी पावन झाली. साधूंच्या वास्तव्यामुळे या मठाला 'टील्ला जोगिया' असे म्हणत.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी https://www.facebook.com/VivekSaptahik/
 like करावे करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.

मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ यांच्यासारखे महान संत नाथ परंपरेत होऊन गेले. भारताच्या जडणघडणीवर नाथ संप्रदायाचा फार मोठा प्रभाव आहे. आद्य शंकराचार्यांनंतर जर कुणाचा ठसा भारतावर उमटला असेल तर तो गोरखनाथांचा!

पश्चिम भारतातील उज्जैयिनीपासून पूर्वेला आसामपर्यंत आणि उत्तरेत पंजाबपासून दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत गोरखनाथांचा शिष्य संप्रदाय होता. नेपाळमधील एक पंथ स्वत:ला गोरखनाथांचा अनुयायी म्हणून 'गोरखा' म्हणवून घेतो. गोरखनाथ त्यांचे आराध्य दैवत आहेत. उत्तर प्रदेशात गोरखपूर या गावाला गोरखनाथांचे नाव आहे, तर तामिळनाडूमध्ये गोरखनाथांना कोरक्कर सिध्द म्हणून ओळखले जाते.

गोरखनाथांच्या शिष्यपरंपरेत एक आहे भर्तृहरी. उज्जैयिनीचा राजा भर्तृहरीला काही कारणाने घोर वैराग्य आले. त्याने धाकटया भावावर राज्य सोपविले. भर्तृहरीची मोठी बहीण मैनावती, ही बंगालजवळील एका प्रांताची राणी होती. ती स्वत: एक थोर साध्वी होती. तिचा मुलगा गोपीचंद हासुध्दा संसाराच्या फोलपणाने उद्विग्न झाला होता. विश्वामित्र, गौतम बुध्द व वर्धमान महावीर आदी अनेक राजपुत्रांनी राज्यत्याग केला व ते राजर्षी झाले! त्याच परंपरेतले हे मामा-भाचे भर्तृहरी व गोपीचंद. हे दोघे पंजाबातील टील्ला जोगिया येथे दाखल झाले. त्यांनी गोरखनाथांकडून दीक्षा घेतली आणि दोघेही मोठे साधू झाले. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही सामान्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.

महाराष्ट्रात, गोरखनाथांच्या परंपरेतील गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांचे शिष्य विसोबा खेचर. आणि विसोबांचे शिष्य संत नामदेव. या गुरु-शिष्य परंपरेतील ज्ञानेश्वर-नामदेव जोडीने धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य केले. एक म्हणजे, चौरंगीनाथांच्या उपासनेने पावन झालेल्या नेवासे या गावी ज्ञानेश्वरांनी गीतार्थ मराठीत सांगितला. आणि दोन - ज्ञानेश्वर, नामदेव व इतर मराठी संत मंडळी तेराव्या शतकाच्या शेवटी उत्तर भारताच्या यात्रेला गेले होते. या यात्रेत त्यांनी निश्चितच गोरखनाथांच्या मठाला भेट दिली असेल. या यात्रेहून परत आल्यावर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. कदाचित त्यांच्याच आज्ञेने, साठीतले नामदेव पंजाबला परत गेले. गोरख मठापासून जवळ असलेल्या घुमान या गावी संत नामदेव जवळजवळ 20 वर्षे राहिले. त्यांचे पुष्कळ अभंग नंतर गुरुग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट केले गेले.

अकराव्या शतकात इस्लामी आक्रमणांना सुरुवात झाली होती. सिंध आणि पंजाबच्या प्रांतात अरबी राजे आले होते. बाराव्या शतकाच्या अखेरीस महमद घुरीने पृथ्वीराज चौहानला हरवून दिल्ली ताब्यात घेतली. लवकरच उत्तर भारतात इस्लामी राज्य पसरले. या काळापासून मुस्लिमेतर प्रजेला राजाच्या जाचाला तोंड द्यावे लागले. अधिक कर लादणे, मंदिरे तोडणे, बायका पळवणे, धर्मांतरण करणे अशाने जनता बेजार झाली होती. याचे एक उदाहरण आपल्या जवळचे आहे. सोळाव्या शतकातील पैठणमधले. इथे, एकानाथांसारख्या प्रकांडपंडिताच्या अंगावर थुंकण्याची हिम्मत एका य:कश्चित म्लेंच्छात आली होती.

सामान्य जनतेवर होणाऱ्या अत्याचारांना तोंड देण्यासाठी पंजाब प्रांतात दोन शस्त्रधारी पंथ जन्मास आले - शीख पंथ आणि नागा साधू. या दोन्ही पंथांच्या साधूंनी टील्ला जोगिया मठात उपासना केली होती.

पंधराव्या शतकात गुरू नानक टील्ला जोगिया येथे आले होते. त्यांनी या मठात कैक वर्षे तपस्या केली. पुढे त्यांनी शीख धर्माची स्थापना केली. टील्ला जोगियांवर गुरू नानकांचे स्मारक मंदिर आहे. नंतरसुध्दा अनेक शीख धर्मगुरूंनी इथे उपासना केली होती. या पंथाने स्वसंरक्षणासाठी आणि पीडितांच्या रक्षणासाठी प्रत्येकाला शस्त्र धारण करायला सांगितले. या पंथाचे शिखर होते महाराजा रणजीतसिंग यांनी स्थापन केलेले पंजाब व काश्मीरमधील शीख साम्राज्य.

नागा साधूंचा पंथ स्थापन केला गेला तोसुध्दा सामान्य जनतेला परकीयांच्या जाचातून सोडवण्यासाठी. या पंथातील साधू शस्त्रधारी आहेत. ते आपापल्या आखाडयाशी संलग्न असतात. आखाडयाचे प्रमुख महंत इच्छुक साधूची परीक्षा घेतात, आणि जे उत्तीर्ण होतील तेच साधू होतात. दर तीन वर्षांनी भारतात ठरावीक ठिकाणी कुंभमेळयानिमित्त सर्व साधू, महंत एकत्र भेटतात. सगळीकडच्या बातम्यांची देवाणघेवाण हा त्यातील एक भाग होता. आजपर्यंत अनेक लढायांमध्ये हजारो नागा साधूंनी भाग घेतला आहे. रामजन्मभूमीचा खटलादेखील एका आखाडयाने अनेक वर्षे लढला आहे.

भारतभ्रमण करताना रामदास स्वामींची शीख गुरू हरगोविंद यांची भेट झाली. शस्त्रधारी संत ही संकल्पना रामदासांच्या मनात त्यांनी रुजवली. रामदास स्वामींवर औरंगजेबाला तोंड देणाऱ्या साधूंचा प्रभाव होताच. त्याच प्रेरणेने रामदास स्वामींनी भारतभर मारुतीची मंदिरे स्थापन केली. तसेच गोसावींचे जाळे विणले होते. या व्यवस्थेद्वारे कोणत्या मोहिमा फत्ते केल्या असतील ते एक इतिहासालाच ठाऊक!

गोरख टिल्ला हा शस्त्रधारी, रक्षक, संघटित साधूंच्या परंपरेचा एक किल्ला होता. परकीय सत्ता नेस्तनाबूत करणाऱ्या शीख आणि मराठा साम्राज्याला गोरख टिल्लाची पार्श्वभूमी लाभली होती. तसेच या साम्राज्यांच्या यशामागे अनेक साधू-संतांच्या तपस्येचे पुण्य उभे होते.