केशवसुतांच्या मनातले शारदापीठ!

विवेक मराठी    22-Oct-2018
Total Views |

 शारदादेवी म्हणजे कल्पकता. सर्जकता.जी कलावंतच काय, शास्त्रज्ञ, निर्माते, अभियंते, स्थपती अशा सर्वच कुशल हातांच्या बोटांत, हृदयात वसत असते आणि ते सारे हात मिळूनच या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतात! हेच केशवसुतांच्या या कवितेतून प्रकट होताना दिसत आहे.

 केशवसुत! मराठी कवितेस आधुनिक वस्त्रं, नवी झळाळी प्रदान करणारा कवी. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात 139 कवितांची तुतारी त्यांनी अशी काही स्वप्राणाने फुंकली की मराठी कवितेने जणू कातच टाकली! अंधारलेल्या काव्यक्षितिजावर केशवसुतांचा उदय झाला नि मराठी कविता शुक्राच्या चांदणीसारखी लखलखू लागली!

इंग्लिशमधला लोकप्रिय 'सॉनेट' हा 14 ओळींचा रचनाप्रकार 'सुनीत' बनून मराठीत स्थिरावला तो केशवसुतांमुळेच. समस्त कवीमंडळींना अभिमानाने 'आम्ही असू लाडके' असं म्हणायला त्यांनीच शिकवलं! 'जुने जाऊ द्या मरणालगुनि' म्हणत पुढल्या हाका ऐकायला प्रवृत्त करणारे तेच होते. अंत्यजांच्या पोरांसाठी वा दिवसभर श्रमूनही उपासमारीची वेळ येणाऱ्या मजुरासाठी त्यांचं आतडं तुटत होतं. 'हृदयी भरल्या होत्या खंती' असं म्हणत उदास होणारे तेच अन 'जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे' असं म्हणून शेवटी हर्षखेदही जिथे मावळतात अशा 'झपूर्झा गडे झपूर्झा' या अवस्थेप्रत पोहोचलेले केशवसुतच! कवीने कसे लिहावे हे सांगणारे तुम्ही कोण? असं ठणकावून विचारणारा हा कवी शब्दशारदेच्या देव्हाऱ्यापुढे अगदी नम्र होऊन 'शब्दांनो मागुते या' असं विनवत होता! तेजाचे पंख लावलेल्या शब्दपंक्ती श्रीशारदेचा देव्हारा नेत आहेत, आपल्या हृदयातदेखील देवी शारदेचं एक पीठ आहे, अशा कल्पना या कवितेत केशवसुत करतात. आणि कधी त्यांना तीच शारदा, तीच शब्दशक्ती, तीच सर्जकता आपल्या कुशल कल्पक बोटांनी वस्त्र विणत बसलेली दिसते .....

कल्पकता

सारं जग खाणं-पिणं-उठणं-बसणं-वावरणं-निजणं या ठरावीक चक्रात रांगत-सरपटत असताना एक देवी मात्र त्यांना या साऱ्यापासून दूर एकटीच एका दुर्गम कडयावर बसलेली दिसते.

हसतमुख, हलके हलके गुणगुणत असलेली ती, प्रसन्न चित्ताने काहीतरी वस्त्र विणत होती.  तिच्या पायाशी तेच ते करत लडबडत असलेल्या जगातही, तिचे शोधक नेत्र काहीतरी शोधत होते. तिचे तीक्ष्ण कान काहीतरी वेगळं ऐकायला आतुर होते. तिचा भालप्रदेश इतका विशाल की साक्षात देवगुरूंनी, म्हणजे बृहस्पतींनी तेथे पूजा मांडावी!

सूर्याचे तेजस्वी सुवर्णकिरण अन चंद्रम्याचे शीतळ चंदेरी किरण याचे धागे घेऊन ती ते दिव्य वस्त्र विणत बसली होती. मधूनच त्या वस्त्रात रंगत यावी, यासाठी ती इंद्रधनूचे धागे त्यात हलकेच मिसळत होती.

मध्ये मध्ये मेघांच्या गडद निळसर-काळसर छटा तिने पेरल्या अन मग वेडीवाकडी धावणारी लखलखीत वीजही त्यातून तिने फिरवली!

या वस्त्रात केवळ रंगसंगतीच अद्भुत होती असं नव्हे, तर वेगवेगळया नादांचे नूपुर तिने ठायी ठायी लटकवले होते. त्यातून कुठे मेघगर्जना ऐकू येई, कुठे पक्षांचं कूजन, तर कुठे विविध निर्मळ जलस्वर... बरसत्या धारांचा नाद, लाटांचा आवर्ती स्वर अन धबधब्याचे गंभीर बोल या वस्त्रातून ऐकू येत! नक्षत्रगणांचं भव्य सुंदर जगही तिने या वस्त्रावर चितारलं. बुट्टे असावेत तसे तारकांचे वर्षाव यावर आहेत, कुठेतरी भटक्या केतूसारखी फिरती छाया दिसते आहे!

तिच्या शोधक नजरेला जे जे भव्य दिसलं, तिच्या तीक्ष्ण श्रवणाला जे जे सुंदर नाद ऐकू आले, ते ते वापरून तिने अतिशय मोहक, अद्वितीय सुंदर असं वस्त्र तयार केलं.

अनेक युगं चालून थकलेली, जराजर्जर झालेली वृध्द पृथ्वी ते सारं लांबून पाहत होती. ती न राहवून कुतूहलाने जवळ आली व ते वस्त्र निरखून पाहू लागली. इतकी सुंदर कलाकुसर पाहून तिचे डोळे चमकले. देवीच्या ते लक्षात आलं. तिने तिला प्रेमाने जवळ ओढलं आणि तिला ते वस्त्र पांघरलं. अन ते पांघरताक्षणीच चमत्कार झाला! ती वृध्दा एकदम सुकुमार तरुणी दिसू लागली! त्या शारदीय वस्त्राची ती किमया होती. त्या कल्पक रचनांनी, त्या शब्दालंकारांनी तिला एकदम नवेपण, सौंदर्य, टवटवी प्रदान केली! तारुण्याचं तेज तिच्यावरून निथळू लागलं ! ती रुष्ट होऊन बसलेली भूदेवी आपल्या या बदललेल्या रूपावर स्वत:च इतकी खूश झाली की ती आनंदाने नाचू लागली! गिरक्या घेऊ  लागली! आता तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं. इतक्या दिवसांची निराशा, उदासीनता पळून गेली होती.

तिने ज्याचा ध्यास घेतला होता, तो तिच्याहून सुंदर होता. सुकुमार होता. ऐश्वर्यवंत होता. परिपूर्ण सुखाचं निधान होता. तो तिचा स्वप्नातला सखा 'स्वर्ग', आता तिचं हे बदललेलं रूप पाहून स्वत:च तिला मागणी घालेल याची तिला खात्री होती!

'आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, देवाचे...' असं म्हणतानाही केशवसुतांचा हा कवी असल्याबद्दलचा अभिमान दिसतो . 'पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते?' असं विचारताना ते हेच म्हणतात की कवी नसेल तर ही धरा, हे गगन हतप्रभ होऊन जातील! सत्त्व निवडणारे आमचे हात कुठल्याही निष्प्रभ वस्तूलाही आपल्या स्पर्शाने सौंदर्य प्रदान करू शकतात!

प्रत्येक कलाकाराच्या मनात एक सुप्त शारदापीठ वसत असतं. त्या शारदेची आराधना तो करत असतो. ती जे विविध कल्पनांचं धन त्याच्या ओटीत घालते, त्याने तो त्याचा भवताल सुंदर करून ठेवतो.

'प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा...' ही केशवसुतांच्या तोंडून प्रत्यक्ष शारदेनेच लेखक-कवींना व समस्त 'क्रिएटिव्ह' मंडळींना दिलेली जबाबदारी! आपापल्या काळाच्या तुकडयाला आपल्या कलेने या लोकांनी जर सजवलं नसतं, त्यांचं साहित्य, त्यांनी निर्मिलेली शिल्पं, वास्तू यांचे जरतारी काठ, त्यांच्या कविता, गीतं, त्यांनी लावलेले लहानमोठे शोध यांचे जडावाचे बुट्टे जर या काळाच्या वस्त्राला त्यांनी जडवले नसते, तर आपलाही प्रवास किती नीरस, रंगहीन झाला असता!

ही देवी म्हणजे कल्पकता. सर्जकता.

जी कलावंतच काय, शास्त्रज्ञ, निर्माते, अभियंते, स्थपती अशा सर्वच कुशल हातांच्या बोटांत, हृदयात वसत असते आणि ते सारे हात मिळूनच या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करतात!

 कल्पकता

खा, पी, नीज, तसा उठूनि फिरुनी

तें तेंच जा चिन्तित---

आवर्ती जग या ठरीव अपुल्या

होतें हळू रांगत;

एका दुर्गम भूशिरावरि

परी देवी कुणी बैसली,

होती वस्त्र विणीत अद्भुत असें

ती गात गीतें भलीं.

होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे

ते तीक्ष्ण भारी तसे,

होतें भाल विशाल देवगुरूनें

पूजा करावी असें.

सूर्याचीं शशिचीं सुरम्य किरणें

घेऊनि देवी सुधी

होती गोवित इंद्रचापहि तसें,

त्या दिव्य वस्त्रामधी;

मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला

विद्युत, तसे ते ध्वनी

लाटा, पाउस, पक्षि ते धबधबे---

या तें पटीं ती विणी;

तारांचें पडणें, तसें भटकणें

केतुग्रहांचें, पहा

सारे सुन्दर, भव्य घेउनि तिनें

तें वस्त्र केलें अहा !

 

आली भू कुतुलें तिथें तिस तिनें

तें वस्त्र लेविवलें;

तों त्या वृध्द वसुंधरेवरि पहा !

तारुण्य ओथंबलें;

भूदेवी, मग हृष्ट होउनि मनीं,

नाचावया लागली,

'आतां स्वर्ग मला स्वयेंच वरण्या येईल!' हें बोलली

17.2. 1891

काव्यसंग्रह : हरपले श्रेय