अवघाचि संसार सुखाचा करीन

विवेक मराठी    31-Oct-2018
Total Views |

'हे जग सुंदर आहे आणि आपल्याला ते आणखी सुंदर बनवायचे आहे' हे वाक्य मला फार आवडते. मी कुणी तत्त्ववेत्ता नाही आणि मला सुखाचा सदरा गवसलाय, असाही माझा दावा नाही. पण आजवर जे जगले-भोगले, त्यावरून निदान इतके सांगू शकतो की पूर्वसंचित आणि पुनर्जन्म यांच्या गोंधळात न अडकता माणसाने आहे ते जीवन सुखाने जगावे आणि इतरांच्या आयुष्यातही आनंदाची कारंजी फुलवावीत.

 साप्ताहिक 'विवेक'च्या सुजाण वाचकवर्गाला सविनय नमस्कार. आतापर्यंत सुरू असलेल्या माझ्या लेखांच्या मालिकेतील हा शेवटचा भाग. माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल संपादकीय मंडळाचा मी अत्यंत आभारी आहे, तसाच तुम्हा सर्व मित्रांचाही. या लेखांमधून मी उद्योजकतेला स्पर्श करणारे विविध विषय हाताळले, तेही मला आलेल्या अनुभवांच्या परिप्रेक्ष्यात. यात कुठेही मीपणाचा लवलेश किंवा अहंकार नव्हता. या लेखांवर आलेल्या तुमच्या प्रतिक्रिया वाचणे हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा ठरला.

हा समारोपाचा भाग मी एखाद्या विशिष्ट विषयाला अनुसरून न लिहिता मुद्दामच हितगुज रूपात मांडतो आहे. मी आजवर ज्या प्रामाणिकपणे जगलो किंवा व्यवसाय केला, तशाच भावनेने जीवनाने मला काय शिकवले किंवा मी काय शिकलो हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मी आजवर चार वेळा मृत्यूच्या दारात जाऊन परतलो आहे. पहिल्या तीन वेळा अनपेक्षित होत्या, परंतु चौथी खेप मात्र मी माझ्याच बेफिकिरीने स्वत:वर ओढवून घेतली होती. यशाचा आणि पैशाचा पाठलाग करताना मी आहार-व्यायाम-निद्रा यांचे वेळापत्रक झुगारून दिले होते. कुटुंबाकडे माझे लक्ष नव्हते. जागरणांतून होणारे अपचन-पित्तप्रकोप-पाठदुखी-नैराश्य अशा दुष्टचक्रात अडकून अखेर मी उदासीनतेच्या इतका टोकाला पोहोचलो की मला जीवन नकोसे झाले होते. त्याच वेळी आपला अकाली मृत्यू झाला, तर पत्नी आणि लहान मुलांचे कसे होईल, या काळजीने मी रोज त्यांना जवळ घेऊन रडत बसायचो. परमेश्वराला विनवायचो की 'देवा, मला जीवन जगण्याची आणखी एक संधी दे, पुन्हा कधीही अगोचरपणे वागणार नाही.' सुदैवाने देवाने मला ती संधी दिली. मी जीवनाचा गांभीर्याने विचार करण्यास प्रवृत्त झालो. त्यातूनच सुख म्हणजे नक्की काय असते, हे माझ्यापुरते मला समजले.

पुष्कळ लोकांसाठी पैसा हेच सर्वस्व किंवा जीवनाचे सर्वोच्च ध्येय असते. 'पैसा खुदा नही लेकिन खुदा से कम भी नही' हे वाक्य घोकत ते पैशाचा पाठलाग करत असतात. पण पैशापेक्षाही आरोग्य, माणुसकी, मैत्री, कुटुंब, नातेसंबंध आणि मनःशांती या फार मौल्यवान गोष्टी आहेत. पैसा हे काही प्रमाणात सुखाचे साधन आहे, पण ते जीवनाचे साध्य होऊ  शकत नाही. गरिबी, मध्यमवर्गीय आणि श्रीमंती अशा तिन्ही अवस्थांमधून संचार केल्यानंतर मला ते पटले आहे. माझ्या मते सर्वसामान्य माणसाने पैशाबाबत विरक्ती आणि आसक्ती ही दोन्ही टोके न गाठता समतोल राखावा. आपल्या अनेक संतांनी धनाबाबत वैराग्याची भूमिका स्वीकारली आणि त्याचा समाजावर प्रभावही पडला, पण त्यातून काही नव्या समस्याही निर्माण झाल्या. अर्थप्राप्तीबाबत समाज उदासीन झाला. कल्पकतेने आणि कष्टाने गरिबी दूर करण्यापेक्षा त्याचा दोष तो प्रारब्धाला देऊ लागला. या पार्श्वभूमीवर 'जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेच करी' असे सांगणारे संत तुकाराम महाराज किंवा 'आधी प्रपंच करावा नेटका' आणि 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' असे बजावणारे समर्थ रामदास विरळाच. संसारी माणसाने पैशाबाबत विरक्ती का बाळगू नये, याचे मला सापडलेले उत्तर म्हणजे 'पैसा अधिक असला तरी काळजी असते, नसला तरी काळजी असते, पण नसतो तेव्हा रडकुंडीला आणतो.' अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नये.

दुसरीकडे अतिआसक्ती बाळगून धनसंग्रह करणारे लोक पैसा मिळवतात, पण त्याचा नुसता संचय करून काय उपयोग? विरजण हलवले नाही, तर त्याला काही काळानंतर कुबट वास येऊ लागतो, तसेच पैसा फिरवला नाही किंवा त्याचा सदुपयोग केला नाही, तर तो अखेर वाया जातो. 'पापाच्या मार्गाने मिळवलेला पैसा फक्त दहा वर्षे टिकतो आणि अकराव्या वर्षी समूळ नष्ट होतो' असे आर्य चाणक्यानेच म्हटले आहे. बरेच लोक वृध्दापकाळाची तरतूद किंवा वारसांची सोय म्हणून पैसा साठवत बसतात, पण योग्य वेळी त्याचा आनंद लुटत नाहीत. त्याचाही उपयोग नसतो. आरोग्य राखले नाही, तर हाच पैसा म्हातारपणी केवळ औषधोपचार आणि रुग्णालयांची धन ठरतो किंवा वारसांना आयता मिळाला, तर त्यांना त्याची किंमत उरत नाही. मला हे थोडे उशिराच समजले, पण वयाच्या चाळिशीत मी शहाणा झालो. पत्नीला, मुलांना त्यांचा हक्काचा वेळ देऊ लागलो, त्यांच्यासमवेत सहलींसाठी वेळ काढू लागलो, गरजूंना मदत करू लागलो आणि आत्मकोषात न राहता सामाजिक समरसतेचा आनंदही लुटू लागलो. 'संसारामधी ऐस आपुला, उगाच भटकत फिरू नको' ही शाहीर अनंत फंदींच्या फटक्यातील ओळ किती विविधार्थांनी सत्य आहे, हेसुध्दा मला उमगले. हे जीवन खूप सुंदर आहे ते खऱ्या अर्थाने एन्जॉय करा, कष्ट व प्रामाणिकपणे भरपूर पैसा मिळवा आणि तो आनंदासाठी खर्च करा, असे मी सर्वांना आग्रहाने सांगू इच्छितो.

ही लेखमाला मुख्यत्वे उद्योजकीय प्रेरणा देण्यासाठी लिहिल्याने मला तरुणाईलाही सारांशाने काही सांगावेसे वाटते. हजारो युवकांच्या डोळयात समृध्दीची स्वप्ने तरळताना मी पाहतो. त्यात मला एकेकाळचा असाच स्वप्नाळू धनंजय दातार दिसतो. या तरुण पिढीला मला सांगावेसे वाटते, की बिनधास्त उद्योगात प्रवेश करा. जितक्या लवकरच्या वयात या क्षेत्रात याल तितका जास्त अनुभव गाठीला राहील. पण माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हे क्षेत्र निवडून यशस्वी होऊ शकतो, हेही तितकेच खरे आहे. धंदा करण्यासाठी पैशापेक्षा कल्पकता, कष्ट आणि गोड बोलणे महत्त्वाचे असते. प्रयत्नाला देव मानले, तर या जगात कुणीही गरीब राहात नाही. त्यातून व्यवसायाच्या क्षेत्रात जात-धर्म-शिक्षण-वशिला-आरक्षण असल्या कुठल्याही पूर्वअटी नसतात. माणसाने केवळ आपल्या कामावर लक्ष दिले तरी तो प्रगती करतो. मराठी-पंजाबी-सिंधी-केरळी-गुजराती-बोहरी अशा अनेक समाजाच्या लोकांना मी परदेशात शांतपणे व्यवसाय करताना बघतो, तेव्हा त्याचे कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

आपला व्यवसाय सेवा देण्याचा असो की वस्तू विकण्याचा, त्यात समर्पितता हवी. व्यापार हा धर्म, ग्राहक हा देव आणि दुकान हे मंदिर, अशा श्रध्देने व्यवसाय करायला हवा. तुम्हाला परदेशात जाऊन यश संपादन करायचे असेल, तर मुळीच घाबरू नका. परदेशात जाऊन प्रथम तेथील स्थानिक भाषा शिकून घ्या, तेथील समाजांशी समरस व्हा, केवळ आपल्या समाजापुरते मर्यादित राहू नका, तेथील कायद्यांचे काटेकोर पालन करा आणि जे विकाल त्यात शुध्दता, स्वच्छता आणि अस्सलता असू द्यात. देव-देश-धर्म-पालक आणि आपल्या ध्येयावर श्रध्दा असू द्यात, परंतु अंधश्रध्दांच्या आहारी जाऊ नका. परदेशात राहताना आपल्या देशाचा, संस्कृतीचा अभिमान बाळगा. त्याला कमीपणा येईल असे वागू नका.

व्यवसाय करताना आपल्याला अडचणी येतात, पण श्रध्दा आणि सबुरीने पाय घट्ट रोवून राहिल्यास संकटातूनही संधी साधता येतात. अशी संधी आल्यास 'मौका देखके चौका मारनेका' तंत्राचा वापर करून लाभ पदरात पाडून घ्या. आपल्यापुढील अडचणींतील केवळ दहा टक्के अडचणी आपोआप निघून जातात. उरलेल्या 90 टक्के अडचणी आपल्यालाच तटवाव्या लागतात. व्यवसायात स्पर्धा असते, पण आपण आक्रमक धोरणापेक्षा बचावात्मक धोरण स्वीकारल्यास प्रतिसर््पध्यांची भीती बाळगण्याचे काहीही कारण नसते. आपल्याला आणि व्यवसायाला यशस्वी करणारा एकमेव घटक म्हणजे आपला ग्राहक असतो. त्याचा चुकूनही अपमान होऊ देऊ नका. दुकानात भांडण म्हणजे मालकाचे नुकसान असते. ग्राहक तक्रार करतो म्हणून त्याच्याशी उर्मट बोलू नका. 'डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर' हा मंत्र जपा.

पुढील काळ तंत्रज्ञानाचा, अभिनवतेचा आणि शुध्दतेचा आहे. काळानुसार स्वत:ला बदला, समाजाला हवे असेल तेच द्या आणि झटपट श्रीमंतीसाठी भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब टाळा. तुमच्या अपेक्षांपेक्षा ग्राहकांच्या गरजांना महत्त्व द्या. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून नियमित बचत करण्याची सवय लावून घ्या. काळ कितीही बदलला तरी जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, माता-पित्याचे संस्कार, ग्राहकसेवा अशा गोष्टी बावन्नकशी सोन्यासारख्या लखलखीतच राहतात.

मित्रांनोऽ, एकेकाळी आपल्या भारताला सुवर्णभूमी म्हणत. भारताची कीर्ती कुशल व्यापाऱ्यांनी सातासमुद्रापार पसरवली होती. आपल्याला पुन्हा तेच करायचे आहे. तो आत्मविश्वास जागवण्यासाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसचे गर्वगीत' या कवितेतील एक प्रेरणादायक ओळ नमूद करून मी तुमचा निरोप घेतो.

अनंत अमुचि ध्येयासक्ती,

अनंत अन् आशा,

किनारा तुला पामराला....

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)