संघाच्या समन्वयशैलीवरील उत्कृष्ट  भाष्य

विवेक मराठी    04-Oct-2018
Total Views |

 

 

पुस्तकाचे नाव : The RSS - A View to the Inside

लेखक : Walter K. Anderson & Shridhar D. Damle

प्रकाशन : Penguin/Viking Publication, 2018

मूल्य : 699 रुपये  l पृष्ठसंख्या : 405

सध्याच्या देशातील राजकारणावरील संघाचा प्रभाव समजून घ्यायचा असेल, काळानुरूप संघाच्या धोरणात झालेले परिवर्तन समजून घ्यायचे असेल, संघ व संलग्न संस्थांची सेवा कार्ये जाणून घ्यायची असतील तर 'The RSS - A View to the Inside' हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे.

  'Brotherhood in Saffron' ह्या वॉल्टर ऍंडरसन व श्रीधर दामले ह्या लेखकद्वयीच्या संघावरील गाजलेल्या पुस्तकानंतर जवळजवळ 20 वर्षांनी 'The RSS - A View to the Inside' हे त्यांचे संघावरील नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ऍंडरसन हे दक्षिण आशिया विषयातील तज्ज्ञ असून जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर श्रीधर दामले शिकागोस्थित मुक्त पत्रकार व भारतीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

हे पुस्तक म्हणजे काही संघाचा इतिहास नाही. संघ आपले संदेश देण्यासाठी त्यांच्या संलग्न संस्थांवर का अवलंबून आहे? संघ स्वत: व त्यांच्या संलग्न संस्थांमध्ये - विशेषत: भाजपाशी समन्वय कसा राखतो? संघ संलग्न संस्था व संघ यांच्यामध्ये काही धोरणात्मक मतभेद असतानाही संघपरिवार एकत्र कसा आहे? संघपरिवाराचे सामाजिक सर्वसमावेशकतेचे धोरण त्यांच्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता व हिंदुत्व संकल्पनांना कसे वळण देईल? (पृष्ठ XI) ह्या चार प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय. पुस्तक वाचल्यावर वरील चारही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात. संघाचा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर विश्वास आहे, असा एकंदरीत निष्कर्ष लेखकद्वयीने काढला आहे. देशाच्या व भाजपाच्या धोरण प्रणालीतील संघाचा वाढता प्रभाव, संघ संलग्न संस्था, परदेशातील संघ, शिक्षणाचे भारतीयीकरण, हिंदुत्व म्हणजे काय?, मुस्लीम राष्ट्रीय मंच, जम्मू-काश्मीर पेच, स्वयंपूर्णता, चीन, घरवापसी, गो-संरक्षण, राममंदिर, गोव्यातील बंड, बिहार निवडणुका अशा 14 प्रकरणांत नेमक्या शब्दात संघाच्या कार्याचे, संबंधाचे व प्रभावाचे विवेचन केलेले आहे.

संघ समजून घ्यायचा असेल तर संघात या, असे नेहमी स्वयंसेवक म्हणतात व ते खरेही आहे. संघ सांगून समजणार नाही, तर अनुभव घेऊनच समजेल. पण अभ्यासकाला संघात न येता संघ समजून घ्यायचा असेल, सध्याच्या देशातील राजकारणावरील संघाचा प्रभाव समजून घ्यायचा असेल, काळानुरूप संघाच्या धोरणात झालेले परिवर्तन समजून घ्यायचे असेल, संघ व संलग्न संस्थांची सेवा कार्ये जाणून घ्यायची असतील तर हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. संघावरील ग्रंथामध्ये एक तर पूर्वग्रहामुळे, गैरसमजामुळे किंवा मुद्दाम चुकीचे अथवा द्वेषात्मक लिखाण केलेले आढळते, नाहीतर भक्तिमय लिखाण आढळते. पण संशोधन करून संघ व त्यांच्या कार्यप्रणालीचे तटस्थपणे केलेले विश्लेषण अभावानेच आढळते. ती उणीव हे पुस्तक भरून काढते. लेखकद्वयीपैकी मुख्यत: श्रीधर दामलेंनी स्वत: संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, मुलाखती घेऊन, संघाला जवळून न्याहाळल्यामुळे पुस्तकाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सोपी इंग्लिश भाषा, विषय मांडण्याची व समजावून सांगण्याची हातोटी, संशोधनात्मक असूनही कुठेही रटाळ वाटणार नाही अशी मांडणी ह्यामुळे सामान्य वाचकालाही पुस्तक समजण्यास सोपे आहे. लेखकद्वयींना संघ व त्याची कार्यप्रणाली समजली आहे आणि ती त्यांनी संशोधनपध्दतीच्या आधारे नेमक्या शब्दात मांडली आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे गोव्यातील संघामधील सुभाष वेलिंगकरांचे बंड ह्याविषयी कुठेही जास्त वाचायला मिळत नाही. त्याविषयी ह्या पुस्तकात एक वेगळे प्रकरणच दिले असून, त्याची कारणे, परिणाम, गोवा विधानसभेचे निकाल ह्याचे वस्तुस्थितीजन्य वर्णन केले आहे. त्याचबरोबर ह्याआधी संघामध्ये झालेल्या 3-4 लहान बंडांची धावती माहिती देऊन ते बंड व गोव्यामधील बंड ह्यातील फरक, स्थापन केलेला वेगळा संघ व राजकीय पक्ष ह्याची माहिती मिळते. संघाचा स्वदेशीचा आग्रह व भाजपाचे परदेशी कंपन्यांना भारतात रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणूकदारांना आवाहन ही विसंगती, त्यामुळे होणारे वाद, मतभेद, नंतर संघाचे थोडे बदललेले धोरण, लघु व मध्यम उद्योजकांवर परदेशी गुंतवणुकीचा होणारा परिणाम, संघाचा त्याला प्रतिसाद ह्याचीही चर्चा एका प्रकरणात केलेली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंच संघटनेत संघाचे लोक असले, तरी ती संघाची अधिकृत संलग्न संस्था नाही. संघ व मुस्लीम राष्ट्रीय मंच ह्यामधील संबंधावर स्वतंत्र प्रकरणातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चीन संबंधातील संघ व संलग्न संस्थांचे आणि मोदींचे धोरण ह्यावरही स्वतंत्र प्रकरण आहे.

संघाची तत्त्व म्हणून गरज व भाजपाची राजकीय पक्ष म्हणून गरज व मर्यादा ह्यातील द्वंद्व अचूक रेखाटले आहे. हिंदूंची राजकीय उदासीनता घालवून त्यांना राजकीय दृष्टी परत मिळवून देण्यासाठी कधी नव्हे ते 2014च्या लोकसभा निवडणुकीत संघाने सक्रिय सहभाग घेतला. इतकेच नव्हे, तर बिहार निवडणुकीत विरोधकांची एकजूट व मोहनजी भागवतांच्या आरक्षण संबंधित वक्तव्याचा विपर्यास ह्या पार्श्वभूमीवर संघ पुन्हा एकदा भाजपाच्या साहाय्यास आला. कर्नाटक निवडणूक, त्रिपुरा निवडणूक ह्यातही संघस्वयंसेवकांचे बहुमूल्य योगदान होते, ह्याचा विस्तृत आढावा घेण्यात आलेला आहे. भाजपा सत्तेवर असताना वाजपेयी पर्वात सुदर्शनजी सरसंघचालक होते व आता मोदीपर्वात मोहनजी सरसंघचालक आहेत. तेव्हा व आताही भाजपाच्या काही धोरणांबाबत दोन्ही सरसंघचालकांनी मतभेद, नाराजी अथवा विरोध दर्शवला आहे, पण सुदर्शनजी व मोहनजींच्या विरोध व्यक्त करण्याच्या पध्दतीतील मूलभूत फरक व त्याचा झालेला परिणाम पुस्तकात मांडला आहे. संघ संलग्न संस्था - उदा., भारतीय मजदूर संघ व विश्व हिंदू परिषद उघडपणे भाजपाविरोध करायला लागली, तर भाजपामध्ये व त्या संलग्न संस्थांमध्ये मध्यस्थीचे काम करणे ही मोहनजींची शैली आहे. थोडक्यात, अंतर्गत वाद टाळून समन्वयाचे काम मोहनजी उत्तम प्रकारे करतात. अर्थात गोव्यातील वेलिंगकरांच्या बंडामध्ये ही समन्वयशैली अपयशी ठरली, पण प्रवीण तोगडिया-मोदी वाद मोहनजींनी कौशल्याने हाताळला. मोहनजींनी राजकीय सत्तेचे महत्त्व ओळखून ती गांभीर्याने घेतली आहे. तसेच राजकीय पक्षाच्या मर्यादांची व अपरिहार्यतेचीही त्यांना जाणीव आहे.

संघाला स्वत:ची घटना किंवा संविधान (Constitution) नाही, हा काहींचा गैरसमज आहे. बहुतांश स्वयंसेवकांना संघाची घटना आहे हे माहीत असते, पण ती काय आहे हे माहीत नसते व ती कुठे वाचायला मिळेल हेही माहीत नसते. ह्या पुस्तकाचे वैशिष्टय असे की ह्यात संघाचे 21 अनुच्छेदांचे संपूर्ण संविधान दिले आहे. त्यावरून संघातील कार्यप्रणालीची कल्पना येते.

पुस्तकातील सावरकर व हिंदुत्व संबंधातील एका वाक्यावर नम्र मतभेद नोंदवत आहे. ते वाक्य असे - ''RSS relied initially on Savarkar's notions of territorial nationalism in his treatise on the subject in his book Hindutva and combined that with his views on the great cultural tradition of Brahmanical Hinduism to define who a Hindu was. (पृष्ठ 237.)'Great cultural tradition of Brahmanical Hinduism' म्हणजे? हिंदू धर्मातील संस्कृती व परंपरा ह्या ब्राह्मणी आहेत? एकीकडे ब्राह्मणी हिंदू धर्म म्हणताना त्याला 'great cultural'सुध्दा म्हटलेय. म्हणजे लेखकद्वयीला कुत्सितपणे हिंदू धर्माला ब्राह्मणी म्हणायचे नाही हे कळते, पण हिंदू धर्माची संस्कृती ब्राह्मणी आहे हा गैरसमज आहे. सावरकरांनी त्यांच्या 'हिंदुत्व' ह्या बीजग्रंथात फक्त ब्राह्मणी संस्कृती व परंपरांचा उल्लेख केलेले नसताना आणि सावरकरांचे व संघाचे अस्पृश्यता निवारणाचे महान कार्य लेखकद्वयीला माहीत असतानाही कोणताही पुरावा न देता 'वैदिक'ऐवजी 'ब्राह्मणी हिंदू धर्म' असा उल्लेख करणं हे उद्वेगजनक व संशोधन करून प्रबंध लिखाण करणाऱ्या लेखकद्वयीला न शोभणारे आहे.

संघाच्या नेटवर्कमुळे भाजपला साहाय्य होते, तर भाजपाच्या सत्तेवर येण्याने संघस्वयंसेवकांची व सेवा कार्यांची संख्या झपाटयाने देशभर कोनाकोपऱ्यात वाढते. एकमेकांना एकमेकांचा लाभ होत आहे. राजकीय पक्ष सत्तेवर येतील-जातील, पुन्हा येतील व पुन्हा जातील, पण संघ एक संस्था/संघटना म्हणून वाटचाल करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संघाचा दृष्टीकोन हा दूरवरचा आहे, त्यांच्या ध्येयधोरणांची आखणी त्याअन्वये केलेली आहे, तर भाजपा हा राजकीय पक्ष म्हणून त्याच्या काही अपरिहार्यता व मर्यादा असल्या, तरी राजकीय सत्तेमुळे होणारे चांगले व वाईट परिणाम हे दूरगामी असू शकतात, ह्याची जाणीव संघाला आहे. म्हणजे राजकीय पाठबळ हवे, पण त्यावर विसंबून न राहता संघाने व स्वयंसेवकांनी त्याच्या आहारी जाऊ नये, सत्तेची चटक लागता कामा नये हा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोहनजी करत आहेत, ह्याची जाणीव पुस्तक वाचताना होते. भाजपावर संघाचा प्रभाव आहे, पण संघ भाजपाच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे संघ हा भाजपाचा रिमोट कंट्रोल आहे असे म्हणण्यापेक्षा डॅमेज कंट्रोलसाठी संघ भाजपाच्या साहाय्यास धावून येतो हे म्हणणे जास्त उचित ठरेल.

पुस्तक 'Research Methodology'चा - म्हणजे संशोधनाच्या शास्त्रीय पध्दतीचा उपयोग करून लिहिलेले असून 120 पृष्ठांच्या संदर्भटीपांमुळे पुस्तकाला संदर्भमूल्य आले असून संग्राह्य झाले आहे. फक्त सूची व संदर्भटीपांमध्ये उल्लेखिलेल्या संदर्भग्रंथ, लेख, वेबसाइट इत्यादींची स्वतंत्र Bibliography (यादी) द्यायला हवी होती. संघस्वयंसेवक, तटस्थ अभ्यासक, वाचक व विरोधक सर्वांना उपयुक्त असे हे माहितीपूर्ण वाचनीय पुस्तक आहे.

अक्षय जोग


--------------------------------------------------------------

विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे