जेव्हा नदी-ओढे जिवंत होतात...

विवेक मराठी    08-Oct-2018
Total Views |

 एकेकाळी इथे एक नदी-ओढा वाहत होता. उन्हाळयात पात्राच्या डोहात पाणी असायचे. तहानलेल्या पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळायचे. हे चित्र कधीकाळापर्यंत दिसायचे. कालांतराने पर्जन्यमान कमी कमी होत गेले. नदीचे पात्र नाहीसे झाले. ओढयाला गटारीचे रूप आले. ही जलवाहिनी जिवंत करण्यासाठी ना सरकार पुढे येत होते, ना स्थानिक लोकप्रतिनिधी. पण हा बदल घडवून दाखविला आहे बीड व धाराशिव जिल्ह्यातील गावांनी. लोकसहभागातून जलसमृध्दी घडवून आणणाऱ्या घळाटवाडी व खेड गावांची ही कहाणी.

मराठवाडयातील काही गावे दुष्काळामुळे तहानलेली आहेत. शेती पिकांवर जगणाऱ्या

लोकांचे दुःख डोंगराएवढे अाहे. डोंगराएवढया दुःखाला कवटाळून न बसता पाण्याची कमाई करणाऱ्या गावाची कहाणी मागच्या अंकात प्रसिध्द झाली होती. अशीच कहाणी या अंकात वाचायला मिळणार आहे. गावाच्या पाण्यासंदर्भात लोक जागृत होत आहेत. सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसमृध्दी घडवून आणता येते, याचे उत्तम उदाहरण खानदेशात व मराठवाडयात पाहावयास मिळाले आहे. गावे कात टाकत आहेत, लोक जोडले जात आहेत, उत्साही तरुण हिरिरीने सहभागी होत आहेत. गाव बदलू पाहत आहेत. मराठवाडयात ही सकारात्मक बदलाची नांदी पाहावयास मिळत आहे.

अन घळाटी नदीचे रूप पालटले


माजलगाव शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर घळाटवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. गावातून घळाटी नदी वाहते. तिचे अंतर 20 किलोमीटर आहे. घळाटी नदीवरून गावाला घळाटवाडी हे नाव पडले, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तुळजाभवानी मातेचे उपपीठ म्हणून घळाटवाडीकडे पाहिले जाते.

दूध हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. घरटी दोन दुभती जनावरे पाहावयास मिळतात. सकाळी सकाळी माजलगाव शहराला दूध पुरवणारे महत्त्वाचे गाव म्हणून घळाटवाडीची नवीन ओळख बनत आहे. या गावात 75 टक्के शेतकरी जिरायती शेती करतात. गावाला नदी असून नसल्यासारखी आहे. उन्हाळयात ती कोरडी असते. कमी पावसामुळे नदीत पाणी राहत नाही. एकेकाळी ह्या नदीचे पात्र मोठे होते. दिवसेंदिवस पाऊसमान आणखीनच कमी-कमी होत गेल्याने नदीचे पात्र नाहीसे झाले. काटेरी झाडाझुडपांनी नदीला विळखा घातला. गाळ साचला होता. हा गाळ तसाच वर्षानुवर्षे साचून राहिला, त्यामुळे नदीचा मोठा भाग सपाट झाला आहे. हा सपाट भाग वहिवाटीचा रस्ता झाला आहे. कधीकाळी इथे नदी होती. आज तिचे अस्तित्व लोप पावत आहे. उन्हाळयात गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. गावाला टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत असे. गाव टँकरमुक्त करायचे असेल तर नदीचे स्रोत जिवंत केले पाहिजेत, तिला प्रवाहित केले पाहिजे असे काही सुजाण तरुणांना वाटू लागले.

नदी हे जिवंतपणाचे रूप असते. नदीच्या खळाळत्या प्रवाहात चैतन्याचा झरा वाहत असतो. भौतिक विकासाच्या रेटयात नद्यांचा जिवंतपणा हरवत चालला आहे. नद्या जपल्या पाहिजेत,  तिचे संवर्धन केले पाहिजे. हरवलेल्या नदीचे संवर्धन झाले पाहिजे, असे गावातील तरुण एकमेकांना बोलू लागले. इथूनच खऱ्या अर्थाने नदी संवर्धनाला सुरुवात झाली.

 तरुणांचा सामाजिक कार्यात सहभाग

घळाटवाडी गावातील नदी खोलीकरण-रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी गावाशी सतत संपर्क ठेवत होते. काही तरुण संघाशी जोडले गेले. सामाजिक बांधिलकीतून हे तरुण गावाच्या विविध उपक्रमात सहभाग होऊ लागले. ग्रामसमिती घळाटवाडी व अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जलकुंभ उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील महिलांना, शाळेतील विद्यार्थ्यांना गावातल्या गावात पाण्याची पुरेशी उपलब्धता झाली आहे. गावातील मुला-मुलींसाठी जिजाऊ अभ्यासवर्ग सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गामुळे अनेक मुले-मुली एकत्र येऊन अभ्यास करतात.
एका नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे गावात कसा बदल होतो, याचा वस्तुपाठ घळाटवाडी या छोटयाशा गावाने दिला आहे, असे हनुमान नागणे व लालुप्रसाद काशीद यांनी सांगितले.

 

तरुणांमध्ये ही जागृत आली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे. गावात 2012पासून संघाची शाखा सुरू आहे. संघविचारांशी बांधिलकी असणाऱ्या युवकांनी गावातील पाण्यासंदर्भात जलक्रांती  घडवून आणायला सुरुवात केली. प्रारंभी हनुमान नागणे व लालूप्रसाद काशीद या दोन तरुण स्वयंसेवकांनी लोकसहभागातून जलसमृध्दी निर्माण करणाऱ्या घनसांगवी तालुक्यातील दहिगव्हाण गावाला भेट दिली. तिथल्या कामाची अभ्यासपूर्ण पाहणी करून माहिती घेऊन घळाटवाडीत अशाच स्वरूपाचे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. तरुणाच्या मताला गावकऱ्यांनी कुणी मनावर घेतले नाही. जोपर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत गावातील पाणीटंचाई दूर होणार नाही, असे या तरुणांना वाटू लागले. तरुणांच्या या विधायक उपक्रमाला साथ दिली ती संघाच्या जलगतिविधी समितीने व ग्रामसमितीने. लोकसहभागातून नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी प्रारंभी लोकांचा निरुत्साह होता. तरुणांचे प्रयत्न अयशस्वी होऊ नयेत, यासाठी संघाने गावकऱ्यांची मंदिरात बैठक आयोजित केली. या बैठकीला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. संघाचे ज्योतिबा कानडे यांनी नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासंदर्भात सखोल व विस्तृत मार्गदर्शन केल्यामुळे गावकऱ्यांत उत्साह संचारला. तरुणांचे मत गावकऱ्यांना पटले. शिवाजीराव मदनराव काटे या प्रगतिशील शेतकऱ्याची तरुणांना साथ मिळाली.

शिवाजीराव काटे, नवनाथ जाधव, लालूप्रसाद काशीद, शेषराव मैद, हनुमान नागणे, प्रवीण यताळ, सुधाकर पराडे, गणेश काटे, परमेश्वर काशीद, बळीराम दराडे, राजेंद्र भोसले, संतोष राऊत, शहाजी सोनगुडे, दिगंबर गवळी, नाना सुरवसे, दत्ता काटे, पांडुरंग काटे, अभिषेक कदम, गणेश झेंटे आदी लोकांना सहभागी करून जलग्राम समिती स्थापन करण्यात आली. या समितीला महिला सरपंच सुवर्णा घाटगे, ग्रामसेवक पंडित ढगे आणि अनुप घाटगे यांनी मोलाची साथ दिली.

 

लोकसहभागातून निधी संकलनाचा विषय आला, तेव्हा गावात हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सप्ताह निधी संकलनात प्रती व्यक्ती दोनशे रुपयांची भर घालून कमी खर्चात सप्ताह पार पाडून 1 लाख 14 हजाराची बचत करण्यात आली. या बचतीचा निधी लोकवाटा म्हणून वापरण्यात आला. डॉ. हेडगेवार स्मारक समिती (1 लाख रुपये), रमेश पांडव (50 हजार रुपये), प्रकाश साळुंखे (50 हजार रुपये), देवकृपा उद्योग समूह (11 हजार रुपये), कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव (11 हजार रुपये), गणेश कुलकर्णी(3 हजार रुपये), अस्वले सर (1 हजार रुपये) यांनी कामासाठी अर्थसाहाय्य केले. अशा प्रकारे नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. 12 दिवसांत 3 लाख 39 हजार खर्चात घळाटी नदीचे 100 मीटर लांब व 20 मीटर रुंद व 2 मीटर खोल इतके काम करण्यात आले. यातून 15000 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. 2017 साली झालेल्या पावसात घळाटी नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे 2 कोटी 42 हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला. नदीलगत असलेल्या विहिरी व बोअरवेल यांच्यामध्ये पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. टँकरवर विसंबून असलेले गाव आता पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. नदीचे रूप पालटल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे

वातावरण आहे. अशा प्रकारे संपूर्ण नदीवर काम झाल्यास आणखी मोठी

उपलब्धी होणार आहे.

खेड ग्रामस्थांची पाण्यासाठी एकजूट

धारशिवपासून 15 किलोमीटर अंतरावर खेड हे चार ते पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातून तीन ते चार किलोमीटर अंतराचा मोठा ओढा वाहतो. ह्या ओढयाला खेड नदी म्हणून ओळखले जाते. बागायती गाव म्हणून खेड गावाची ओळख आहे. गावात एक साठवण तलाव आहे. उसाचे 350 हेक्टर क्षेत्र आहे. सोयाबीन, हरभरा, तूर ही पिके घेतली जातात. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत गेल्याने गावातील बहुसंख्य विहिरींची व बोअरवेलची पाणी पातळी खालावली होती. उन्हाळयात ओढयातले पाणी नाहीसे झाले. शेतकऱ्यांना ऊस व फळबागा जगवणे मुश्कील बनले होते. उन्हाळयात पाण्याची भीषणता निर्माण झाली.

लोकसहभागातून ओढा खोलीकरण व रुंदीकरण काम झाले पाहिजे, यासाठी गावातील तरुण एकत्र आले. तरुणांची विधायक बाजू बुजुर्ग लोकांनी समजून घेतली. सुनील गरड, बालाजी यावलकर, लहू गव्हाड, सुहास गरड, भैरू गव्हाड, श्रीकांत टकले, अजित गरड, अलोक गरड, भाउसाहेब गरड आदींची जलग्राम समिती स्थापन करण्यात आली.

लोकांनी 3 लाख रुपयांचा निधी जमा केला. या उपक्रमात  पुणे, मुंबई व औरंगाबाद येथे नोकरी करत असलेल्या तरुणांनी सहभाग नोंदवून निधी दिला. धाराशिव येथील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सतीशराव कोळगे यांच्या माध्यमातून संभाजीनगर येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान या संस्थेने 7 लाख रुपये दिले. यातून 10 लाख रुपये जमा झाले आणि 8 एप्रिल 2018 रोजी ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. साडेतीन किलोमीटरपर्यंत ओढयाचे काम करण्यात असून चार नाले मुख्य ओढयास जोडण्यात आले. 8 ठिकाणी मातीचे बंधारे टाकण्यात आले. जून 2018मध्ये झालेल्या मोठया पावसामुळे ओढयात मोठया प्रमाणात पाणी साचले. तब्बल 8 कोटी इतका मोठा पाणीसाठा झाला. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींतील भूजल पातळी वाढली. आज ओढयालगत असलेल्या विहिरी व बोअरवेल तीन ते चार तास चालतात.

नामदेव यावलकर या शेतकऱ्याचा उभा ऊस पाण्याअभावी जळत होता. ओढा खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे यावलकर यांच्या विहिरीतले पाणी वाढले. विहिरीतले वाढलेले पाणी पाहून यावलकर यांना आनंद तर झालाच, शिवाय त्यांनी स्वतःहोऊन या कामात लोकसहभाग नोंदविला.

 

खेडमध्ये जवळपास 400 बोअरवेल व 250 विहिरी आहेत. यातील बहुतांश विहिरींची व बोअरवेलची भूजल पातळी वाढली आहे. ''गावात 350 फूट बोअरवेल घेऊन पाणी लागणे कठीण होते. पण या उन्हाळयापासून फरक पडला आहे. ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे काही विहीर व बोअरवेल यांना तासभर तरी पाणी येत आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीतून हा बदल होऊ शकला'' असे गावातील शेतकरी श्रीमंत गरड यांनी सांगितले. पाण्याची उपलब्धता घेऊन खेड ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेत यश आले नसले, तरी गावांनी वर्षभराचे पाणी बजेट तयार केले आहे. यामध्ये वाहून जाणारे पाणी, गावाला एकूण लागणारे पाणी, किती पाणी बाष्पीभवन होते, भूजल स्थिती, पाझर तलाव, शेततळे, जनावरांची संख्या, पीक पध्दत अशी सर्व माहिती गावातील दर्शनी भागात लावण्यात आली आहे.

कामाची प्रमुख वैशिष्टये

मराठवाडयात नदी-नाले व ओढे खोलीकरणाची जी चळवळ उभी राहिली आहे, त्या कामाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे गावाचे पाणी शिवारात अडवणे, ते पाणी गावात जिरवणे, भूगर्भातील पाणी पातळी कशा पध्दतीने उंचावेल यासाठी विचार करणे, पाण्याची कार्यक्षमता वाढवणे, लोकसहभागातून जलस्रोतातील पाणी काढणे, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे आदी प्रमुख कामांवर लक्ष केंद्रित करून जलसमृध्दी साकारताना दिसत आहेत.

भविष्यात जर तिसरे महायुध्द झाले, तर ते पाण्यासाठी होईल असे काही जगभरातील शास्त्रज्ञ, विचारवंत व संशोधक यांचे म्हणणे आहे. हे मत नाकारता येत नाही. राज्यात दरसाल दुष्काळ असतो. त्यामुळे नुसतीच पाण्याची बचत करून चालणार नाही, तर जलस्रोत जिवंत कसे करता येतील आणि पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब कसा साठवता येईल यासाठी विचार करण्याची गरज आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात तर याची नितांत गरज आहे. छोटया छोटया गावांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे, ती लोकसहभागातून जलसमृध्दी घडवून आणत आहेत. ही चळवळ केवळ गावापुरती मर्यादित असून चालणार नाही, तर आजूबाजूच्या, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, विभागातील आणि राज्यातील गावांनी अशा प्रकारची जलसमृध्दी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


 
माजी सैनिकाने घेतला जलसमृध्दीचा ध्यास

खेड गावातील ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात सिंहाचा वाटा उचलला आहे तो सुनील गरड या 37 वर्षीय माजी सैनिकाने. गावातील सर्व नागरिक त्यांना 'नाना' म्हणून हाक मारतात.

गरड यांनी भारतीय सैन्यदलात 18 वर्षे नोकरी केली. 2016 साली ते सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सर्वांगीण विकास करण्यासाठी युवकांना एकत्रित केले. त्यांची 4 एकर शेती आहे. शेतात मुबलक प्रमाणात पाणी आहे. पण गावातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन गरड यांनी खेड ओढयाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा विडा उचलला. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, 'पाणी' या विषयावर काम करण्यासाठी युवा ग्राम समिती स्थापन केली. या समितीत जवळपास 250हून अधिक युवक जोडले गेले आहेत.

जे काम शासनाचे आहे, ते गावांनी का करावे? ते काम गावकऱ्यांनी का करावे? असे प्रश्न युवक व ग्रामस्थ गरड यांना विचारू लागले. ग्रामस्थांना व युवकांना समज देऊन लोकसहभागातून ओढयाचे काम यशस्वी करून दाखविले.

सुनील गरड यांची गावाविषयी तळमळ पाहून अनेक युवक या कामाकडे वळले. श्रीकांत टकले या युवकाने आपली आई बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानासुध्दा संपूर्ण कामाचे अकाउंट सांभाळले. दोन महिने रात्री आईजवळ, तर दिवसा कामावर हजर राहणाऱ्या श्रीकांत टकले यांनी कामाची ऊर्जा सुनीलनाना गरड यांच्यामुळे मिळाली असे सांगितले, तर आरआरबी कंपनीत चांगल्या पगारावर काम करत असलेल्या भैरू गव्हाड या युवकाने गावाच्या पाण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. ओढयाचे काम उत्कृष्ट व्हावे यासाठी गव्हाड यांनी दोन महिने मेहनत घेतली. युसुफ  शेख या युवकाने तर आपली पानटपरी व मोबाइल रिजार्च दुकान तीन महिने बंद ठेवले. संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी युसुफवर होती. गावाच्या कल्याणासाठी आपणही खारीचा वाटा उचलला. या सर्व युवकांनी गावाच्या विकासासाठी उचलले पाऊल कौतुकास्पद आहे.

माजी सैनिक
सुनील गरड

 

 

लेखक : विकास पांढरे - ९९७०४५२७६७