संघनिष्ठ  बाबूजी

विवेक मराठी    14-Nov-2018
Total Views |

***सुधीर जोगळेकर****

बाबूजी म्हणजेच ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आतापर्यंत त्यांच्याविषयी जे साहित्य प्रकाशित झाले, ते त्यांच्या संगीत आणि चित्रपट कारकिर्दीवरचे होते. बाबूजींच्या जीवनकार्याचे आणखीही काही पैलू होते. त्यात गोवा मुक्तिसंग्राम होता, ग्राहक पंचायत होती, आणि त्या सर्वांपेक्षा ज्या संघटनेशी बाबूजींचा 1936 साली सर्वप्रथम संबंध आला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होता.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 णीबाणीनंतरची ही आठवण असावी. नेमका महिना आणि दिवस आठवत नाही, पण वर्ष बहुधा 78-79 असावं. मी तेव्हा पुण्यात स्टेट बँकेत नोकरी करत होतो. पुण्यातल्या मित्रांच्या अनेक वर्तुळांपैकी एक मित्रवर्तुळ संगीत आणि काव्य क्षेत्राशी संबंधित होतं. त्यात सुधीर गाडगीळ होता, सुधीर मोघे होता, अरुण काकतकर होता, रमेश वैद्य होता, अजित सोमण होता, आनंद मोडक होता, आणि आणखीही बरेच होते. सुधीर मोघे एरंडवण्यात राहायचा आणि माझी स्टेट बँकेची शाखाही तिथून जवळच गणेशनगरात होती. गप्पा मारायची लहर आली की सुधीर त्याच्या ठरलेल्या रिक्षावाल्याला बोलवायचा, बँकेत यायचा आणि कामाचं फारसं प्रेशर नसल्याने आम्ही तिथेच गप्पा मारत बसायचो. बँकेची ती शाखा नव्याने सुरू झाली होती. आणीबाणीत 19 महिने तुरुंगवास भोगताना माझी स्टेट बँकेची नोकरी गेली होती. पण आणीबाणी उठली, सरकार बदललं आणि गेलेली नोकरी मला परत मिळाली, तितक्या महिन्यांचा पगारही मिळाला आणि बँक सोडून पत्रकारिता करायची आहे असं म्हटल्यावर बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी, ''नोकरी सोडू नका, तुम्हाला काम कमी असलेल्या शाखेत बदली देतो'' असं सांगून मला पुण्याला एरंडवणे शाखेत पाठवलं होतं. अगदीच सुरुवातीचे दिवस होते. तो भाग विकसित होत होता, अजून शंभर खातीही उघडली गेली नव्हती. पण मी तिथे रुजू झालो आणि हे मित्रवर्तुळ तिथे यायला लागलं.

सुधीर गाडगीळ तेव्हा किर्लोस्कर प्रकाशनाच्या मनोहरमध्ये नोकरी करायचा. मी, सुधीर मोघे, अरुण काकतकर त्याच रिक्षात बसून किर्लोस्करच्या ऑॅफिसात जायचो. अशाच एका भेटीत सुधीरने किर्लोस्करचा एक ताजा अंक दाखवला. त्या अंकात एक लेखमालिका सुरू होती, 'जगाच्या पाठीवर' नावाची. ते होतं संगीतकार सुधीर फडके यांचं आत्मचरित्रपर लेखन. पंधराएक लेख त्यांनी किर्लोस्करमध्ये त्या काळात लिहिले असावेत. डॉ. वैद्यकुमार रायकर नावाचे सुधीर फडके यांचे एक मित्र होते. त्यांनी केलेल्या आग्रहामुळे ती लेखमालिका खरं तर सुरू झाली होती. पण स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांच्या जीवनकार्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट काढायची कल्पना मनात घोळायला लागल्यानंतर बाबूजींनी लेखन थांबवलं. ती मालिका तिथेच संपली. खरं तर ते लेखन अगदीच प्रारंभीच्या काळातलं होतं. त्या आठवणी होत्या त्यांच्या लहानपणच्या आणि खडतर उमेदवारीच्या काळातल्या. सावरकर चित्रपटाचं काम सुरू झालं आणि पुढील आयुष्यात आलेले विविधांगी अनुभव शब्दबध्द करायचं बाबूजींकडून राहून गेलं. त्यांचं ते आत्मचरित्र अपुरंच राहिलं.

सावरकर चित्रपट हा एका अर्थाने बाबूजींसाठी ध्येययज्ञच होता. तो काढण्याच्या काळात त्यांना अनंत हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, अडीअडचणी आल्या, त्यावर प्रयत्नपूर्वक मात करावी लागली. आजारपण-अपमान-कुचेष्टा वगैरेची यत्किंचितही तमा न बाळगता, एखाद्या तपस्व्याला शोभेल अशा पध्दतीने त्यांनी तो ध्येययज्ञ यशस्वीपणे पुरा केला. बाबूजींच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या वेळी 'स्वरतीर्थ' या गौरवग्रंथाचं संपादन करण्याची संधी समितीने मला दिली. बरोबरीला अर्थातच ब.ना. जोग आणि वामन देशपांडे होते. त्या अंकाच्या निमित्ताने बाबूजींची अनेकदा भेट झाली, गप्पा झाल्या. अंकासाठी कुणाकुणाचे लेख घ्यायचे यावर चर्चा झाली, तेव्हा ''अर्धवट पडलेल्या आत्मचरित्राचा काही पुढचा भाग तुम्ही लिहिणार का?'' असं त्यांना विचारलं. ''लिहायला वेळ कुठे आहे आता?'' हे त्यांचं त्यावरचं टिपिकल उत्तर मिळालं आणि आम्ही लगेच म्हटलं, ''तुम्ही बोलत राहा, आम्ही ध्वनिमुद्रित करून घेतो आणि त्यातला थोडा भाग आपण वापरू या.''

पण ऐकतील तर ते बाबूजी कसले? ते म्हणाले, ''अंकासाठी तुम्ही काय विचार केला आहात तो आधी सांगा, त्यात कुणाकुणाचे लेख घेताहात ते सांगा, ते लेख मिळतील याची व्यवस्था मी करतो. मी बोलतो त्यांच्याशी, आणि मग समजा त्यातले पुरेसे लेख नाहीच आले, तर मी आहेच. मीही बोलेन, ललिताही बोलेल आणि त्यातनं तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ  शकाल.'' पण ती वेळ आलीच नाही, कारण आलेल्या साहित्यातलं वगळायचं काय असाच प्रश्न आम्हाला पडला. आत्मचरित्राच्या उरलेल्या भागाचं घोंगडं मग भिजत पडलं ते पडलंच. पुढे बाबूजी गेल्यावर 2003 साली पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने, ललिताबाईंनी त्याला दिलेल्या पूरक मजकुरासह, ते प्रसिध्द केलं. त्यालाही आता पंधरा वर्षं होत आली.

बाबूजींच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आणि अगदी अलीकडे त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा काही गौरवग्रंथ प्रसिध्द झाले. पुण्याच्या वसंत वाळुंजकरांनी त्यांचं चरित्र लिहिलं. काही वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर विशेषांक काढले. पण या साऱ्या साहित्याचा मुख्य रोख होता तो बाबूजींच्या संगीत आणि चित्रपट कारकिर्दीवर. बाबूजींच्या जीवनकार्याचे आणखीही काही पैलू होते. त्यात गोवा मुक्तिसंग्राम होता, ग्राहक पंचायत होती, आणि त्या सर्वांपेक्षा ज्या संघटनेशी बाबूजींचा 1936 साली सर्वप्रथम संबंध आला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होता.

रेखाचित्र - ज्योत्स्ना फडके

*******

सुधीर फडके मूळचे कोल्हापूरचे. त्यांचं मूळ नाव राम. त्यांचे वडील प्रथितयश वकील होते. घर संपन्न स्थितीत होतं. रामला गाण्याची आवड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना गायनाचार्य वामनराव पाध्येबुवांकडे पाठवलं. संगीताचं शिक्षण तिथे सुरू झालं खरं, परंतु ते वळणं घेत घेत मुंबई-पुणे करत करत परत कोल्हापूरलाच येऊन थडकलं. संगीतविद्येशी रामचा थेट संबंध आला तो वयाच्या सातव्या वर्षी. रामचे मोठे मामा डॉ. भा.चिं. पटवर्धन जमखंडीला चीफ मेडिकल ऑॅफिसर होते. त्यांना जशी गायनाची आवड होती, तशीच ती त्यांच्या धाकटया मामांनाही होती. जमखंडीत संस्थानच्या दरबारात कुणा मोठया गायकाचं गाणं ठरलं की त्या गायकाची एक बैठक मामांच्या घरीही व्हायची. गाण्याचे संस्कार रामवर होत राहिले ते तेव्हापासून.

गायनाचार्य पाध्येबुवा कोल्हापुरात राहत. रामचे वडील त्याला घेऊन पाध्येबुवांकडे गेले. रामचा आवाज ऐकून बुवांनी त्याला गाणं शिकवायचं मान्य केलं. वडिलांनी फीविषयी विचारलं, तेव्हा बुवा म्हणाले, ''फी कसली? माझे वडील तुमच्या वडिलांकडे वेदविद्या शिकले, त्यांनी जशी वेदविद्या विनामूल्य दिली, तसंच हे.'' ही घटना 1928ची. रामची आई त्याच वर्षी गेली आणि घराची परवड सुरू झाली. 1929च्या दिवाळीत जमखंडीला गेले असताना मामांनी रामच्या गाण्याची एक बैठक योजली. त्या बैठकीला डॉ. भाजेकर उपस्थित होते. ते मुंबईत प्रख्यात सर्जन होते. भाजेकरांनी रामचं गाणं ऐकलं आणि ते त्याला घेऊन मुंबईत आले. तीनेक वर्षं राम तिथे राहिला. मुंबईच्या त्या वास्तव्यात गाण्याच्या दृष्टीने तर फारशी प्रगती झाली नाहीच, पण कोल्हापूरला परत आल्यानंतर घरची परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचं रामच्या ध्यानात आलं.

वडिलांची वकिली जवळजवळ थांबली होती. मोठया भावांची शिक्षणं अजून सुरू होती. घरची चूल पेटवायलाही पैसे नाहीत म्हटल्यावर वडिलांनी त्यांची वकिलीची पुस्तकं रद्दीवाल्याकडे विकण्यासाठी रामला पिटाळलं. रद्दीवाल्याला उलटाच संशय आला. रामने चोरी करून पुस्तकं आणली असावीत असं त्याला वाटलं आणि ''पोलिसाकडे तक्रार करू का?'' असं विचारत रामला वाटेला लावलं. त्याने पुस्तकं ठेवून घेतली. ती परत मागायला वकीलसाहेब येतील असं त्याला वाटलं खरं, परंतु रामने चोरी केलेली नव्हती, ती पुस्तकं आपणच विकायला पाठवली हे सांगणं त्यांना प्रशस्त वाटेना. स्वाभाविकच पुस्तकंही गेली आणि पैसेही मिळाले नाहीत.

अवघड आर्थिक परिस्थितीशी दोन हात करण्याचा रामवर बेतलेला कालावधी थोडाथोडका राहणार नव्हता. तब्बल 1942 सालापर्यंत तो तसाच सुरू राहणार होता. याच काळात रामच्या आयुष्यात प्रवेश झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. फडके कुटुंब कोल्हापुरात जिथे राहत असे, तिथेच समोर राजोपाध्यांचा वाडा होता. त्या वाडयात गाडगीळ नावाचं कुटुंब राहत असे. त्यातला बाळ रामचा लहानपणापासूनचा मित्र. हा बाळ म्हणजे पुढल्या काळात रॅडिकल पब्लिसिटी नावाने मुंबईत सुविख्यात झालेल्या जाहिरात संस्थेचा चालक-मालक. काही काळ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उद्योगातही त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने विशेष स्थान प्राप्त केलं. त्याहीपेक्षा त्याची ओळख लोकांना राहिली ती लोकसत्ता या दैनिकाचे एकेकाळचे सहसंपादक म्हणून. पु.वि. गाडगीळ या नावाने लोकांना परिचित झालेले.

हेच गाडगीळ रामला घेऊन एके दिवशी संघशाखेवर गेले. ही जागा तशी रामला परिचित होतीच, कारण त्या काळच्या चित्रपटसृष्टीत वावरणारे राम लक्ष्मेश्वर यांच्याबरोबर राम रोज संध्याकाळी कोल्हापूर सिनेटोनजवळच्या गाडी-ग्राउंडवरील याच उंचवटयावर गप्पा मारत बसत असे. तिथे कवायत करणारी तरुण मुलं रामला रोज दिसत असत. ती मुलं भगवा झेंडा लावत असत आणि प्रार्थना म्हणत. ते काय होतं, ते रामला समजत नव्हतं, समजून घ्यायचा प्रयत्नही गाडगीळने त्याला तिथे नेण्यापर्यंत त्याने केलेला नव्हता.

पण गाडगीळबरोबर राम तिथे गेला आणि गाडगीळने बाळाराव लिमये नावाच्या तिथल्या प्रमुखाची रामशी ओळख करून दिली. पहिल्या दिवशी रामने एका जागी बसून सगळे कार्यक्रम पाहिले. आणि जायच्या वेळी लिमयांना म्हटलं, ''संघ म्हणजे काय, त्याचा हेतू काय, कार्य काय, त्याचं तत्त्वज्ञान काय हे सर्व मला सांगा. मला पटलं तर मी येत जाईन.'' लिमयांनी मग रामला संघाच्या तत्त्वप्रणालीची, ध्येयवादाची आणि दैनंदिन कार्यपध्दतीची विस्ताराने ओळख करून दिली आणि दुसऱ्या दिवसापासून राम संघशाखेत जायला लागला.

'जगाच्या पाठीवर'मध्ये बाबूजींनी या प्रसंगाविषयी लिहिलं आहे, 'ज्या राजकीय तत्त्वज्ञानावर माझी श्रध्दा आहे, तेच तत्त्वज्ञान संघाचंही आहे. हिंदुस्थानला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून या देशाचं संपूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच संघ स्थापन झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं.' कोल्हापुरात संघाच्या शाखा त्या काळात लागत होत्या, पण संघाचं तिथलं नाव होतं 'राजाराम स्वयंसेवक संघ'. कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे नावातला तो बदल करावा लागला होता. इंग्रजांनी प्रत्यक्ष व्यापलेल्या प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव चालत होतं, पण ही संघटना कदाचित इंग्रजांच्या विरोधात असेल या कल्पनेने संस्थानात मात्र नाव बदलून काम करावं लागत होतं. बाबूजींनी पुढे लिहिलं होतं, 'उच्च-नीच, जातपात, लहान-मोठा असे सर्व भेदभाव पूर्णांशाने मिटवून भाषाभेद आणि प्रांतभेद नाहीसे करून सर्व हिंदू समाजाला एका समान पातळीवर आणण्याचं ध्येय असणारी ही संघटना लवकरच माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसली.'

रामची संघनिष्ठा किती विचारी होती, याची चुणूक याच पुस्तकातल्या त्यांनी लिहिलेल्या आणखी एका उल्लेखावरून येते. त्यांनी लिहिलं होतं, 'संघाच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेला कुणीही जातीयवादी, प्रतिगामी, बुरसटलेला, भांडवलशाहीचा पुरस्कर्ता, शोषण करणारा असा असूच शकत नाही. आपल्या हिंदू समाजातली जातीय विषमता सर्वार्थाने नष्ट करण्याचं तत्त्वज्ञान या देशात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कुणी आचरणात आणत असेल, तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघ जातीयता मानणारा आहे, प्रतिगामी विचारसरणीचा आहे असा चुकून जरी वास मला आला असता, तरी मी संघात राहिलो नसतो. गोळवलकर गुरुजी हे चातुरर््वण्य मानतात आणि त्याचा पुरस्कार करतात हे किंचित जरी खरं असतं, तरी ते सरसंघचालक पदावर राहू शकले नसते, आणि त्यांना साधा स्वयंसेवक म्हणून संघात स्थान मिळालं नसतं. संघावर हवे तसे आरोप करणाऱ्या आणि संघद्वेष पसरवण्याचं कंकण बांधलेल्या लोकांची म्हणूनच मला कीव येते. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी एवढंच म्हणू शकतो, की समाजाला आणि पर्यायाने देशाला विनाशाच्या खाईत लोटणाऱ्या या तथाकथित बुध्दिवंतांना आणि नसलेल्या पुरोगाम्यांना परमेश्वराने योग्य दृष्टी द्यावी आणि तिचा भल्यासाठी वापर करण्याची सद्बुध्दी द्यावी.'

पुढेही एका प्रसंगातून बाबूजींचा हा दृष्टीकोन व्यक्त व्हायचा होता. एका दलित स्त्रीच्या विटंबनेची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या बाबूजींनी 1972 साली हुतात्मा चौकात एक दिवसाचा लाक्षणिक उपवास केला होता आणि त्या उपवासात अटलबिहारी बाजपेयी यांच्यासारखे त्यांचे स्नेहीही सहभागी झाले होते. आज बाबूजी नाहीत हेच बरं, कारण दलितच नव्हे, एकूणच लहान मुली, कॉलेज विद्यार्थिनी, नोकरदार तरुणी यांच्यावर आणि गावाकडे राहणाऱ्या आणि शेतावर एकटयादुकटया जाणाऱ्या असंख्य स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करता करता बाबूजींना दिवस दिवस, महिनोन्महिने उपासच करावे लागले असते असं वाटतं. बाबूजींनी ते केलंही असतं, कारण स्त्री शोषण, स्त्री अत्याचार, स्त्री देह ही विकण्याची गोष्ट मानणाऱ्या आणि त्यासाठीच चित्रपट काढणाऱ्या चित्रपट निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या रांगेत बसणारे ते नव्हतेच. 

याच काळात कोल्हापूरला असताना एका एप्रिल-मे महिन्यात बाबूजी संघ शिक्षावर्गासाठी पुण्याला आले होते. त्या काळी वर्ग चाळीस दिवसांचा असे. त्याला 'ओटीसी' असं म्हणत. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार त्या वर्गात वीस दिवस होते. हेडगेवारांशी जवळून परिचय होण्याचा योग जसा त्या काळात जुळून आला, तसाच आणखी एका कार्यकर्त्याचा परिचय तिथे घडला. हा कार्यकर्ता म्हणजे ज्याला संघाचं काम सुरू करण्यासाठी खुद्द डॉक्टरांनी नागपूरहून मुंबईला पाठवलं होतं, ते गोपाळराव येरकुंटवार. गोपाळराव संघावर व्याख्यान देण्यासाठी एकदा कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आले होते. तिथे रामची त्यांच्याशी भेट झाली होती आणि त्या भेटीची संधी साधून रामने ''मी मुंबईत आलो, तर माझी उतरण्याची काही सोय होईल का?'' अशी विचारणा केली होती. गोपाळरावांनी रामला ''संघ कार्यालयात ये, तिथेच उतरण्याची सोय होईल'' असं म्हटलं होतं आणि तोच धागा पकडून सुधीर फडके मुंबईत आले होते.

मुंबईत आल्यानंतर एका प्रभात शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली होती. 1937च्या मे महिन्यात ते द्वितीय वर्षाच्या शिक्षणासाठी नागपूरला गेले होते. इतर विषयांबरोबरच बाबूजींनी बँड हा विषय घेतला होता. चाळीस दिवसांच्या त्या वास्तव्यात ते बासरी आणि साइड ड्रम वाजवायला शिकले होते. वर्गाहून परत आल्यानंतर त्यांनी मुंबई शाखेचा बँड (ज्याला पुढे घोष असं म्हणायला सुरुवात झाली) तयार करायला सुरुवात केली. त्या काळी संघाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. गुरुदक्षिणा फारशी जमत नसे. तेव्हाचा आकडा होता तीन-चारशे रुपये. त्यातून संघाचा वर्षाचा खर्च भागवायला लागायचा. घोषपथक सुरू करायचं ठरलं, पण वाद्यं घेण्याइतके पैसे संघाकडे कुठे होते? मग कल्पना निघाली - संघाचा हा घोष लग्नकार्यासाठी वापरायचा आणि त्यातून पैसे मिळवायचे. पण संघाच्या नावावर हे करणं शक्य नव्हतं. मग दुसरंच नाव घेऊन ते पथक सुरू झालं आणि काही कार्यांत ते पथक बँड म्हणून उभंही राहिलं.

तासा-दोन तासांची गाण्याची मेहनत, गायन शिकवण्या आणि संघ हेच आता रामचं जीवन होऊन गेलं होतं. संघाचं कार्यालयही वेस्टएन्ड सिनेमाजवळून हलून नाझ सिनेमाजवळ आलं होतं. तिचं भाडं मात्र भरपूर होतं. 65 रुपये भाडयातले 15 रुपये राम देत असे. एव्हाना रामकडे मुंबईतल्या संघाच्या सर्व प्रभात शाखांचं एकत्रित काम आलं होतं. गाण्याच्या कार्यक्रमांसाठी जिथे जिथे जाई, तिथे तिथे संघ शाखा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करी. पनवेलची शाखा अशातूनच सुरू झाली होती. संघ आणि संगीत अशा दोन चाकांच्या ढकलगाडीने रामचा प्रवास सुरू होता. राम जे काही पैसे मिळवी, त्यातले बरेचसे संघकार्यासाठीच खर्च होत. गोपाळराव येरकुंटवारही असे पैसे उभे करण्याकरता लुधियानाच्या गरम कापडांच्या ऑॅर्डर्स घेत. तरीही भाडयाला पैसे पुरत नव्हते.

अशातच संघकामासाठी म्हणून गोपाळरावांना आंध्र प्रदेशात पाठवायचा निर्णय डॉ. हेडगेवारांनी घेतला आणि भाडयासाठी होणारी त्यांची मदतही थांबली. रामने मग गायन क्लास काढण्याचा आणि उत्पन्न वाढवण्याचा विचार सुरू केला. विद्यार्थी मिळू शकणार होते, पण सामान आणि जागा घेण्यासाठी बरेच पैसे लागणार होते. रामने घरी कळवून पैसे मागवले. मामांनी आणि दादाने ते पाठवलेही. दोघांचे पैसे आले तर कुणाचे तरी एकाचे परत कर, असं मामांनी बजावलं होतं, पण संघाच्या तत्कालीन कुणा अधिकाऱ्याच्या हाती ती मनीऑॅर्डर पडली आणि आठ दिवसांच्या बोलीवर त्याने ते पैसे जे ठेवून घेतले ते ठेवलेच. शेवटी पैसे परत का येत नाहीत हे पाहण्यासाठी मामा मुंबईत आले आणि काय झालं होतं हे न विचारता, ''तू या पैशाचं काय केलं असशील ते माझ्या लक्षात आलं आहे, तू खरं सांगितलं असतंस तर मी तुला क्षमा केली असती, आता तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो'' असं म्हणून मामा निघून गेले. वर ''यापुढे तुला मिरज, कोल्हापूर, जमखंडी सगळं बंद'' असंही बजावून गेले.

इकडे संघ अधिकारी पैसे परत देण्याचं नाव काढत नव्हते, आणि वर टेलिफोन घेऊन खर्च वाढवून बसले होते. त्याचंही भाडं होतं दरमहा अठरा रुपये. बाबूजींना असं वाटायचं, संघाची प्रतिष्ठा मोठया जागेत आणि टेलिफोनमध्ये आहे अशी मूर्खपणाची कल्पना करून घेतलेले हे अधिकारी आहेत. अर्थात त्यांचं वागणं त्याच शब्दात ध्वनित होणारं होतं. बाबूजींनी त्या अधिकाऱ्याला कुणा वरिष्ठाने समजेल अशा भाषेत सांगावं यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्या अधिकाऱ्याने उलट बाबूजीच संघद्रोही आहेत अशी दवंडी पिटायला सुरुवात केली आणि संघाच्या कार्यालयातूनच नव्हे, तर संघातून बाबूजींना हाकलून लावल्याचा फतवा काढला. साधारणपणे कुणीही संघाचा कट्टर वैरी बनला असता, संघाला बदनाम करण्यासाठी त्याने कोणताही बरावाईट उपाय योजला असता, असाच तो प्रसंग होता. पण बाबूजींच्या हातून यातलं काहीही झालं नाही.

या प्रसंगाविषयी बाबूजींनी 'जगाच्या पाठीवर'मध्ये लिहिलं आहे, 'खरा संघ मला माहीत होता. याही अवस्थेत संघाविषयीचं माझं प्रेम आटलं नाही. निष्ठा कमी झाली नाही. मी पुण्याला आणि नागपूरला संघ शिक्षा वर्गात चाळीस चाळीस दिवस राहिलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांचा सहवास मला लाभलेला होता. गोपाळराव येरकुंटवारांसारख्या बुध्दिमत्ता, ज्ञान, वक्तृत्व, अंत:करणाचा ओलावा आणि संघटन कौशल्य या साऱ्या गोष्टींचं वरदान लाभलेल्या संघप्रचारकाच्या समवेत मी दोन वर्षं राहत होतो. डॉ. हेडगेवारांसारख्या असामान्य महापुरुषाचं सान्निध्य थोडा थोडा काळ का होईना, पण मला अनेक वेळा लाभलं होतं. संघाचं उद्दिष्ट माझ्या मनावर स्पष्टपणे कोरलेलं होतं. आजही इतक्या वर्षांनंतर माझ्या मनात कुणाही व्यक्तीविषयी कटुता नाही. त्यामुळेच मी कुणाही व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. ज्या दोनशे रुपयांनी हे भीषण नाटय घडलं, ते दोनशे रुपये कधीच परत मिळाले नाहीत, पण त्यामुळे त्या वेळी वाचलेलं संघाचं कार्यालय अजूनही चांगल्या अवस्थेत शिल्लक आहे हे मी माझं भाग्य समजतो.'

मनाचा हा मोठेपणा बाबूजींकडे होता. संघाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, त्याचं बाबूजींनी केलेलं वर्णन सुन्न करणारं आहे. एक कप चहासाठी पाच-सात मैल चालत जाणं, चर्नीरोडच्या बागेत नळावर आंघोळ करणं, एकच एक कपडा धुऊन तसाच ओलेता अंगावर चढवणं असे कितीतरी प्रसंग. बाबूजींनी लिहिलं आहे, 'जुनी वर्तमानपत्रं गोळा करायची, फुटपाथवर अंथरायची आणि त्याच्याच वर झोपायचं. रात्री रहदारी संपल्यावर झोपायचं आणि पहाटे रहदारी सुरू होण्यापूर्वी उठायचं. अन्न नाही, पुरेशी झोप नाही, कपडे नाहीत, कुणाची सहानुभूती नाही' असे दिवस अन दिवस बाबूजींनी काढले.

अशा स्थितीत एक दिवस एक स्वयंसेवक बाबूजींना भेटला आणि म्हणाला, ''अरे, तू आहेस कुठे? परवापासून अनेक स्वयंसेवक तुझा शोध घेताहेत. पूजनीय डॉक्टरांनीच तुला शोधून काढायला मला सांगितलं होतं.'' बाबूजी लिहितात, 'मला संघातून काढून टाकण्याचा हुकूम मुंबईच्या प्रमुखांनी बजावला होता, हे खरंच. पण डॉक्टर सर्वांच्या वरचे. त्यांनी बोलावल्याचा निरोप येताच त्यांना भेटायला जायचं असं बाबूजींनी मनाशी ठरवलं. थोडी चौकशी केली तेव्हा कळलं की झाल्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यासाठी डॉक्टरांनीच अकोला जिल्हा संघचालक बाबासाहेब चितळे यांना मुंबईला पाठवलं होतं. बाबासाहेबांनी संबंधितांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की यात बाबूजींची काहीच चूक नव्हती. बाबासाहेबांकडून हे सगळं कळल्यानंतर डॉक्टरांनी मला भेटायला बोलावलं होतं. बाबूजी भेटायला जायचाही संकोच करत होते, कारण दोन दिवस आंघोळ करायला मिळालेली नव्हती, कपडे मळके, फाटके होते.

बाबूजी आतमध्ये गेले. हॉलमध्ये डॉक्टर बसले होते. ते म्हणाले, ''ये, बैस. कुठे असतोस? काय करतोस?'' बाबूजी म्हणाले, ''काहीच करत नाही. काही करता येतं हेच मला माहीत नाही.'' डॉक्टरांचे डोळे पाणावले, हे उपस्थितांच्याही लक्षात आलं. बाबूजी उठले, त्यांनी डॉक्टरांना नमस्कार केला आणि ते कार्यालयाच्या बाहेर पडले. हृदयात अमृत, वाणीत वात्सल्य, विचारात धीर-गंभीरता, रोमरोमात देशप्रेम आणि स्वातंत्र्याची तेवती ज्योत आणि वागण्यात आपल्या ध्येयासाठी आयुष्याचा होम करणारी प्रखरता असलेले डॉक्टर त्यांना जणू छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशाला पहिल्यांदाच लाभलेला त्या तोलामोलाचा माणूस वाटत होते.

डॉक्टरांच्या डोळयात उभे राहिलेले अश्रू हे आपलं भाग्य समजायचं की राष्ट्रसेवेचं महाप्रचंड कार्य अहोरात्र करणाऱ्या महापुरुषाच्या जिवाला आपल्यासारख्या फडतूस स्वयंसेवकामुळे झालेल्या यातना मानायच्या, हा प्रश्नच त्यांना पडला. त्या घटनेनंतर बाबूजी पुन्हा कधीच डॉक्टरांना भेटले नाहीत. पण त्या एका दर्शनाने आणि त्यांनी केलेल्या चौकशीने बाबूजींच्या मनातले आत्महत्येचे, जीवन संपवण्याचे विचार कुठल्या कुठे पळून गेले.

*******

बाबूजींचा संघाशी असलेला संबंध पुढल्या काळात अधिक गहिरा झाला. गोळवलकर गुरुजींपासून ते अगदी थेट शेवटच्या क्षणापर्यंत ते तसेच राहिले. संघस्वयंसेवकांच्याच प्रयत्नातून छेडल्या गेलेल्या गोवा मुक्ती आंदोलनात त्यांचा प्रत्यक्ष, सशस्त्र सहभाग राहिला. आणीबाणीविरोधी लढयात त्यांचं घर अनेक भूमिगत कार्यकर्त्यांचं नि:संकोच मुक्कामाचं ठिकाण बनलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने ईशान्य भारतासाठी सुरू झालेल्या उपक्रमाचा भाग म्हणून असलेल्या 'मेरा घर भारत देश' उपक्रमात ते सक्रिय सहभागी झाले. लेजी फुन्सो नावाचा जेमतेम पाच-सहा वर्षे वयाचा मुलगा त्यांच्या घरी शिक्षणासाठी म्हणून राहिला आणि घरचाच एक बनून गेला. त्यानंतरच्या तळजाईच्या शिबिरात बाबूजी उपस्थित राहिले. अयोध्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ग्राहक चळवळीचे तर ते पहिले अध्यक्ष बनले. संघाच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत, भाजपाच्या मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बाबूजींनी गायलेली वैयक्तिक गीतं हा एक अनमोल ठेवा बनला आहे.

हा साराच प्रवास थक्क करणारा. छोटया छोटया कारणाने संघावर रागावणाऱ्या आणि संघकार्यापासून चार हात लांब राहणाऱ्या मंडळींना खूप काही शिकवून जाणारा. जन्मशताब्दीच्या निमित्ताने खूप काही सांगीतिक सुरू असताना हा पैलू वाचकांसमोर यायला हवा, असं विवेकला आवर्जून वाटलं, म्हणूनच हे लिखाण झालं. महाराष्ट्र सरकारने बाबूजींची जन्मशताब्दी साजरी करण्याची घोषणा केली आहे. सरकारशी आणि सत्ताधारी पक्षाशीच नव्हे, कुठल्याही राजकीय, सामाजिक विचारधारेशी संलग्न असणाऱ्या मंडळीनी बाबूजींसारखी अव्यभिचारी संघटननिष्ठा जपायला हवी, याचं स्मरण करून देण्याची आवश्यकता सारखी भासते आहे, म्हणूनही या लिखाणाला महत्त्व आहे.

ssumajo51@gmail.com