ऱ्हासपर्व

विवेक मराठी    16-Nov-2018
Total Views |

'आणि... डॉ.काशिनाथ घाणेकर' या सिनेमाचं हे परीक्षण नाही, हे सगळयात आधी सांगू इच्छितो. दिग्दर्शन, कॅमेरा ऍंगल, अभिनय यावर पिंका टाकायची हौस नाही, कारण त्यातलं फार काही कळत नाही. सिनेमा बघितल्या बघितल्या माणूस भारावलेला असतो, तेही भारा'वय आता नाही. तरीही अजून डिसेक्शन न करता आनंद घेत सिनेमा बघता येतोय हे भाग्य आहे. सुबोध भावेंचा मी थिएटरला बघितलेला हा दुसरा सिनेमा आहे. (टिळक पहिला). त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठलंही पूर्वग्रहदूषित मत नाही. चॅनलवर जाहिरातीतून अधूनमधून दाखवलेला 'बालगंधर्व' मी थोडाफार बघितलाय आणि मूळ 'कटयार' नाटक अनंत वेळा पाहिलं असल्यामुळे त्याची फिल्मी माती बघण्यास मी धजावलो नाही. त्यांची कुठलीही सिरिअल मी पाहिलेली नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल अतिप्रेमाचं किंवा द्वेषाचं माझं मत अजून तयार झालेलं नाही, याची नोंद घ्यावी.

सोशल मीडिया, चॅनल्स, वर्तमानपत्रं, ब्लॉग्ज, व्हॉट्स ऍप सगळीकडे भावे दुथडी भरून वाहत आहेत. सगळयाचं एकत्रीकरण केलं आणि मोजकं उचलून डकवाडकवी केली, तरी सिनेमा न बघताही तुम्हाला त्याचं परीक्षण लिहिता येईल अशी सुंदर परिस्थिती आहे. तर मूळ विषय 'आणि..'

सगळया कलाकारांनी कुठेही लाउड अभिनय केलेला नाही. दिग्गज माणसांबद्दल चांगलं किंवा वाईट मत  तयार होणार नाही, उलट तटस्थपणे प्रेक्षक त्याकडे बघू शकतील इतकं सुंदर काम सगळयांनी केलं आहे. पणशीकर असल्या मनस्वी दोस्तासाठी किती प्रयत्न करतात हे बघण्यासारखं आहे. लागूंचा संयम बघण्यासारखा आहे. कुठल्याही पात्राच्या तोंडी वादग्रस्त विधान नाही. सुलोचनादीदींविषयी एक विधान कांचनच्या तोंडी आहे, तेसुध्दा खूप संयत आहे. संधी असताना कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नाही हे फार फार कौतुकास्पद आहे. त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक दोघंही कौतुकास पात्रं आहेत. उतारावर ऊर फुटेस्तोवर अधोगतीकडे धावणाऱ्या माणसाची ही शोकांतिका आहे, हे ठसतं. आयुष्यात काही दु:खं नशिबात असतात, त्यातली बऱ्यापैकी आपण कल्पिलेली असतात. घाणेकरांचं दु:खं त्यांचं एकटयाचं आहे. प्रसिध्दीचा सोस, टाळयांसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी, बेलगाम वागणं यातून त्यांनी स्वत:साठी ते निर्माण केलं आहे. कडक... वगैरे डायलॉग्ज त्यांच्या पडत्या काळात किती केविलवाणे होतात, हे भावी नटांसाठी उपयोगी आहे.

बालपणी पाहिलेले 'हा खेळ सावल्यांचा' आणि 'गारंबीचा बापू' हे दोन चित्रपट आणि वाचलेलं कांचन घाणेकरांचं 'नाथ हा माझा' हे पुस्तक यापलीकडे मला काशिनाथ घाणेकर या माणसाबद्दल जे माहीत आहे, ते सगळं फक्त ऐकलेलं आहे. त्यांचा रंगमंचावरचा अभिनय मी पाहिलेला नाही. त्यामुळे 'सुबोध भावेंनी हुबेहूब घाणेकर रंगवलेत' हे वाक्यं लिहिणं केवळ चित्रपटावर लिहिताना लिहावं लागतं तसं होईल. बायोपिक करणं मोठं मुश्किलीचं काम असतं. त्या माणसाबद्दल अधिकृत माहितीपेक्षा लोकांना त्याच्याबद्दलच्या अफवा, वावडया जास्त माहीत असतात, किंबहुना लोकांना त्यात जास्त औत्सुक्य असतं आणि कुठलाही ठोस पुरावा नसतानाही त्या खऱ्या आहेत हे वाटून घ्यायला लोकांना आवडतं. त्यामुळे एकाच वेळी सगळया माणसांना तुम्ही खूश करू शकत नाही. बेन किंग्जलेचा 'गांधी' पाहिल्यावर डिटेलिंग म्हणजे काय, काळ उभा करणं म्हणजे काय हे पाहून अचंबित झालो होतो. '...आणि'ला त्यासाठी दाद द्यायला हवी.

खूप छोटया छोटया गोष्टींमधून जुना काळ उभा केलाय. कपडे, केशभूषा, संवाद, बोलण्याच्या पध्दती, गाडया, जुन्या नोटा, नाटकांचे प्लॅन्स, जाहिराती यावर काम झालेलं कळतंय. भालजी, पणशीकर, लागू, मा. दत्ताराम, कानेटकर यांच्याबद्दल नवीन पिढीला कितपत माहीत असेल, शंका आहे. यात फक्त लागू हयात आहेत आणि 'नटसम्राट'मुळे ते नवीन पिढीला माहीत असतील अशी आशा आहे. पणशीकर नक्कीच लखोबा लोखंडेमुळे थोडेफार माहीत असतील. कानेटकर, भालजी आणि दत्ताराम हे कोण बुवा? असा प्रश्न सिनेमा बघताना नवीन पिढीला पडला, तर त्यात चूक काहीही नाही, कारण त्यांच्याबद्दल त्यांना माहीत नाही. त्यामुळे 'त्यांची भूमिका अगदी हुबेहूब वठवलीये' हे वाक्यं 'ठोकून देतो ऐसा जे' या चालीवर लिहिलं गेलं असणार, याची खात्री बाळगा. माणसाला नक्कल खूप आवडते. चॅप्लिनच्या नकलेच्या स्पर्धेत स्वत: चॅप्लिनने भाग घेतला होता, पण पहिला, दुसरा क्रमांकही त्याला मिळाला नव्हता. कोण तंतोतंत करतोय याचं आपल्याला कौतुक असतं. हुबेहूब करताना मिमिक्री होता कामा नये, याची जाणीव हवी म्हणजे विषयमूर्ती दिसतो, नाहीतर एक नकलाकार बघतोय असं वाटतं. सुमित राघवनने लागूंचा आब सुरेख दाखवलाय. ते गालावर हात ठेवून बोलणं दाद देण्याजोगं.

'संजू' हा बायोपिक हाताशी पैसा, चांगला दिग्दर्शक असल्यामुळे त्याची प्रतिमा उजळण्यासाठी काढला असावा. किती धंदा केला यावर हल्ली यश मोजलं जातं. त्यामुळे तो चमू त्यात यशस्वी झाला. इथे घाणेकरांच्या गुणवर्णनासाठी हा सिनेमाचा खटाटोप नाही, हे विशेष. माणूस म्हणून जे काय गुणदोष असतील ते तटस्थपणे मांडलेत असं वाटतं. ते खरे किती, खोटे किती, अतिशयोक्त किती, लेखकाची लिबर्टी किती हे त्यांच्याशी संबंधित असलेली माणसं सांगू शकतील. हे सगळं बघताना मला कायम प्रश्न पडत आला आहे की अशा गत माणसाविषयी त्यांच्या ज्या काही आठवणी असतील, त्या किती ढवळून निघत असतील? काही विपर्यास करून दाखवलं असेल, काही न घडलेलं दाखवलं असेल, चुकीचं दाखवलं असेल तर किती त्रास होत असेल. सुलोचनादीदी, कांचन घाणेकर यांना या सगळयाकडे परत एकदा बघताना काय वाटत असेल? अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकताना काय भावना असतील? तेव्हा त्यांच्याबरोबर जगताना जे भोगलं, उपभोगलं त्याच्याकडे आता एकटयाने बघताना काय वाटत असावं नेमकं? अर्थात आपण खपल्या काढून लोकांच्या जखमा वाहत्या राह्यला की आनंदित होतो. दुसऱ्याच्या दु:खाचा आनंद वाटणं हासुध्दा हल्ली सुखी व्हायचा मार्ग आहे.

कलाकार लहरी असतो, मनस्वी असतो  हे एकदा मान्य केलं की त्याचे अवगुणही आपण मान्य करून टाकलेले असतात. त्याचं सुरुवातीला कौतुक होतं आणि नंतर तेच खडे डोंगराएवढे वाटायला लागतात. एकदा रंग तोंडाला फासला की त्याची नशा शेवटपर्यंत उतरत नाही. हिट नाटक, सिनेमा मिळणंसुध्दा नशिबात लागतं. एकदा तुमचा यशाचा शिक्का तयार झाला की नुसते ठप्पे मारायचं उरतं. घाणेकरांच्या नशिबात ते होतं. मी पाहिलेल्या दोन्ही चित्रपटांत नैसर्गिक वावर यापलीकडे मला त्यांचे फारसे अभिनयगुण दिसलेले नाहीत अभिनेता म्हणून. 'बापू'मध्ये ते जास्त भावले, कदाचित ते कोकणातले असल्यामुळे भाषा जास्ती जवळची वाटली असावी. 'रायगडाला', 'अश्रूंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यू' यात ते राजे होते, हे सिनेमा बघताना जाणवतं. एक मानसिक गंमत असते. आपल्या आवडीच्या कुठल्याही थोर माणसाचं काम करणारा माणूस आपल्याला वंदनीय, प्रिय असतो. 'रामायण', 'महाभारत' सिरीज  उदाहरणादाखल घ्या. अरुण गोविलच्या, पंकज धीरच्या, गजेंद्र चौहानच्या अभिनयाबद्दल कधी चर्चा झाली का? आठवा. त्यांनी साकारलेली माणसं वंदनीय, प्रिय होती. माझ्या अल्पबुध्दीप्रमाणे संभाजी हे पात्र घाणेकरांना प्रसिध्दी मिळवायला मदतीला आलं. त्यात गोरापान रंग, घारे डोळे, केसांची बट, बेदरकारपणा यांचा सहभाग कुणाला मोठा वाटत असेल तर तो गैरसमज आहे.

नुसत्या देखण्या चेहऱ्याचे नट काय कमी होते का? या सगळया प्रसिध्दीत घाणेकर वाहवत गेले, हे चित्रपट बघताना जाणवतं. प्रसिध्दी पेलायला जमलं पाहिजे. एव्हरेस्टच्या उंचीवर पोहोचणं एकवेळ सोपं असेल, पण पाय न घसरता तिथे टिकून राहणं खूप अवघड असतं. 'वाहतो ही दुर्वांची जुडी'मध्ये (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - 'नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो.' उंचीवर पोहोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला, घसरायला. घाणेकर स्वप्रेमात होते हे जाणवतं. प्रसिध्दी, आणखी प्रसिध्दी, कौतुक, जे होतंय ते अपुरं वाटणं आणि मग न संपणारी ती अवस्था माणसाला माणूस ठेवत नाही. तेच कौतुक नवीन तोंडातून ऐकण्यासाठी धडपड होते. नवीन भाट मिळतात, कौतुकांच्या आरत्या आळवल्या जातात आणि ज्याच्यासाठी होतात तो देवासारखा मध्ये उभा राहून या सगळयाकडे कौतुकाने बघतो. (राजेश खन्ना आठवा). सूर्य कितीही तेजस्वी असला तरी अस्त आहेच त्यालाही. बदलणारा काळ, वाढलेलं वय, प्रसिध्दीची बदलती परिमाणं, नवीन पिढी या सगळयात सतत प्रकाशझोतात राहणं सगळयांनाच जमतं असं नाही.

माणसाला वाटतं - आपला स्टॅमिना वाढला, मी संपूर्ण बाटली संपवतो एका बैठकीत.... हळूहळू दारू त्याला संपवते, हे लक्षात येत नाही. नंतर येणाऱ्या झोपेमुळे डोक्यातल्या चिंता, काळज्या, अपयश काही काळापुरतं समोर नाचत नाही, एवढंच. मग जाग आली की ती भुतं फेर धरत असावीत. मग सुटका कशी करायची? तर परत एकदा झोपेच्या अधीन व्हायचं. कधी एकदा 'होम अलोन'च्या मेकॉले कल्किनचा फोटो बघा तरुणपणातला गूगलवर, ओळखू येणार नाही तुम्हाला. लहान वयात मिळालेली प्रसिध्दी त्याला पचवता आली नाही आणि तो मादक पदार्थांच्या आहारी गेला. टेनिसपटू जेनिफर कॅप्रिआतीसुध्दा त्याच मार्गाने गेली. यश पचवता आलं पाहिजे. घाणेकरांना अफाट यश मिळालं. आर्थिक यशापेक्षा दाद, टाळया, प्रसिध्दी याचं यश माणसाला जास्त बिघडवतं. आपल्यासम आपणच हे एकदा ठाम झालं की ते ठसवण्याकडे एकांगी वाटचाल चालू होते. सुजाण प्रेक्षक लाभणंसुध्दा नशिबात लागतं. 'पुरुष'च्या बलात्कारी गुलाबरावला टाळया यायला लागल्यावर नानाने नाटक बंद केलं. तिकीट काढण्याची ऐपत आली म्हणजे दाद कुठे द्यावी, टाळी कशाला वाजवावी हे कळतंच असं नाही. 'वैदेही परशुरामीसाठी परत एकदा बघणार' हे बऱ्याच ठिकाणी वाचलं आणि सुजाणपणा किती आहे याची जाणीव झाली. सौदर्यच बघायचं असेल तर तिचे फोटो रग्गड आहेत की, सिनेमा कशाला हवाय! एक अल्लड मुलगी तिने किती सुंदर रंगवलीये, ते कधी बघणार आपण? घाणेकरांना बघणारे, डोक्यावर घेणारे प्रेक्षक सुजाण नव्हते का? असतीलच, पण त्यांना त्यांच्या स्वप्रेमातून बाहेर काढणं जमलं नसावं, कारण चांगलं सांगणारे लोक संख्येने तसेही कमी असतात जगात. चलनी नाणं झिजेपर्यंत किंवा किंमत कमी होईपर्यंत चालवत राहायचं, हा नियम आहे. जुनं नाणं टाकेपर्यंत नवीन नाणी पायलीला पन्नास तयार असतात.

सुदैवाने घाणेकरांवर ती वेळ आली नाही. कमी वयात त्यांनी एक्झिट घेतली. अर्थात एकदा माणूस दारूच्या आहारी गेला की 'कधी'? एवढाच प्रश्न उरतो. झोपताना मोगऱ्याची फुलं उशाला ठेवून झोपणारी, ऍगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या वाचणारी मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन असेल का? फक्त अडतीस वर्षांचं आयुष्य ती जगली आणि शेवटी मदनमोहन, लघुकथांचा बादशाह ओ हेन्री, गीता दत्त यांच्यासारखीच लिव्हर सिऱ्हॉसिसने गेली. आर.डी., बेर्डे, सतीश तारे अशी गुणी, हुनर असलेली माणसंही दारूने गेली. बायोपिक बघून कुणी काही चांगला बोध घेईल तर ते यश असेल. यशाने न उतलेली, मातलेली अनेक नाव आहेत, त्यांच्यावरही असे बायोपिक यायला हवेत. कदाचित त्याला प्रेक्षकवर्ग मिळणार नाही. पुलं येत आहेत जानेवारीमध्ये, पण त्यांची पुण्याई मोठी आहे. लोक लोटतील थेटरात. पण बाबूजी, गदिमा, द्रविड, अटलजी ही नावं चटकन आठवली - आपापल्या क्षेत्रात अफाट यश मिळूनही यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. तसेही आता आदर्श बोटावर मोजण्याइतके असतील. त्यामुळे पूर्वसुरींचा इतिहास पुढच्या पिढीला समजण्यासाठी असे सिनेमे गरजेचे आहेत. मोकळया मनाने त्यांचे गुणदोष दाखवता यायला पाहिजेत आणि बघताही यायला पाहिजेत.

चित्रपटात 'काशिनाथपर्व' सुरू झालं असा उल्लेख आहे. काही काळापुरतं ते खरं असेलही, पण माझ्या मते ते त्यांचं 'ऱ्हासपर्व' होतं. 

 

जयंत विद्वांस

9823318980