संविधान :  जगण्याचा विषय

विवेक मराठी    21-Nov-2018
Total Views |

आपल्याकडील राजकारणी आणि त्यांनी पोसलेले विद्वान संविधानावर राजकारण करतात, संविधानाचा वापर करून, ज्यांना संविधान म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करतात, हे संवैधानिक पाप आहे आणि या पापाला जाणत्या लोकांनी क्षमा करता कामा नये. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारले, हा संविधान दिवस आहे. ज्याप्रमाणे रामजन्म, कृष्णजन्म, बुध्दजन्म, गांधीजन्म, आंबेडकर जन्म आम्हाला श्रध्देचा विषय असतो, तसा 26 नोव्हेंबर हा श्रध्देचा दिवस आहे आणि तो तेवढयाच पावित्र्याने साजरा केला पाहिजे.

विरोधी पक्षांचे आपआपसात पटत नसले, तरी 'मोदी नको' या बाबतीत त्यांचे एकमत असते. मोदींविरुध्द बोलण्यासाठी, तसे वजन असलेले फारसे विषय नसल्यामुळे संविधान हा विषय घेऊन मोदींविरुध्द प्रचार चालू असतो. त्यात 'बाळ', 'जाणता राजा', 'यस मॅडम - खर्गे' ही नावे सध्या आघाडीवर आहेत. यापैकी कुणाच्याही बोलण्याला कवडीचीही किंमत द्यावी, एवढया योग्यतेचे त्यांचे बोल नसतात. पण करणार काय? वर्तमानपत्रांच्या दृष्टीने यांची मुक्ताफळे ठळक बातम्यांचा विषय होतो आणि आम्हीही वृत्तपत्र व्यवसायात असल्यामुळे त्यांची दखल घ्यावीच लागते.

मल्लिकार्जुन खर्गे वांद्रे येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात म्हणाले, ''निवडणुका जवळ आल्या की नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळयांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करायचे उद्योग सुरू आहेत. 2019ची निवडणूक ही संविधान विरुध्द मनुस्मृती असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज राहा. संविधानामुळे देशातील अस्पृश्यता संपली. मनुस्मृतीचे रक्षण करायचे की संविधानाचे, याचा निर्णय 2019च्या निवडणुकीने होणार आहे.''

मल्लिकार्जुन खर्गे उर्फ 'यस मॅडम' खर्गे संविधान महर्षी आहेत, असे समजू या. संविधान म्हणजे काय? त्याची रचना कशी केली जाते? ते कोणासाठी केले जाते? राज्यसंस्थेवर संविधान कोणती बंधने घालते? संविधान व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण कसे करते? संविधानातून कायद्याचे राज्य ही संकल्पना येते, खर्गेंना त्याचा अर्थ उत्तम प्रकारे माहीत असेल. आपल्या संविधानाने राज्यसंस्थेवर कल्याणकारक राज्य निर्माण करण्याची, सामाजिक समता निर्माण करण्याची, आर्थिक समता निर्माण करण्याची आणि सामाजिक न्यायावर समाजाची रचना निर्माण करण्याची जबाबदारी टाकली आहे. खर्गेंना हे सर्व माहीत असेलच.

त्यांना हेदेखील माहीत असेल की संविधान सभेने 166 दिवस चर्चा करून चर्चेसाठी जो ड्राफ्ट तयार केला होता, त्यावर दोन हजारपेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवून 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकृत केले आहे. पूज्य डॉ. बाबासाहेबांनी या सर्व चर्चा शांतपणे ऐकून, त्यांना उत्तरे देऊन, आज जी लिखित राज्यघटना आपल्यापुढे आहे, ती ठेवलेली आहे. यातील प्रत्येक कलमावर जी चर्चा झाली, तिला डॉ. बाबासाहेबांनी जी उत्तरे दिली आहेत, ती डॉ. एस.एन. बुशी यांनी सहा खंडांत प्रकाशित केलेली आहेत. यस मॅडम-खर्गे यांनी ते वाचले असतील असे गृहीत धरतो, कारण ते संविधान महर्षी आहेत.

यस मॅडम खर्गे यांना हेदेखील माहीत असेल की, मॅडमच्या सासूबाई इंदिरा गांधी यांनी 42वी घटना दुरुस्ती आणली. या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिटयूशन असे म्हणतात. घटनेचा सर्व चेहरामोहरा बदलून टाकण्याचे काम या घटना दुरुस्तीने केले. मूलभूत अधिकार मडक्यात गुंडाळून ठेवण्यात आले. न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालविण्यात आली. लोकसभेचा कार्यकाळदेखील वाढविण्यात आला होता. घटना दुरुस्त्यांना कोर्टात आव्हान देता येणार नाही, अशा प्रकारच्या व्यवस्था मॅडम सासूबाईंनी केल्या होत्या. खर्गे घटना महर्षी असल्यामुळे हा इतिहास त्यांना माहीत असेल.

त्यांना हेही माहीत असेल की, 1973 साली सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती खटला चालला. या खटल्याचे वर्णन 'भारताची लोकशाही वाचविणारा खटला' या शब्दात केले जाते. खर्गेंचे इंग्लिश चांगले आहे, म्हणून इंग्लिशमध्ये सांगायचे तर त्याला 'लँडमार्क जजमेंट' म्हणतात. या खटल्यात न्यायालयाने सांगितले की, घटनेत सुधारणा करता येते, परंतु घटना बदलता येत नाही. घटनेची मूलभूत चौकट कुणालाही बदलता येणार नाही. या मूलभूत चौकटीत संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, संघीय ढाचा, अशा अनेक संकल्पना आलेल्या आहेत. घटनेमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे. परंतु केलेली सुधारणा योग्य आहे की अयोग्य आहे, याची न्यायालयीन समीक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. याला इंग्लिशमध्ये 'ज्युडिशियल रिव्ह्यू' असे म्हणतात. (खर्गेंच्या माहितीसाठी).

केशवानंद भारती खटल्याच्या निकालानंतर न्यायालयाने मूलभूत सिध्दान्ताच्या चौकटीच्या संदर्भात कोणते कोणते महत्त्वाचे निवाडे केले आहेत, यावर घटनातज्ज्ञांची पुस्तके आहेत. त्यातील एका पुस्तकाचे नाव आहे  - DEMOCRACY AND CONSTITUTIONALISM IN INDIA - A Study of the Basic Structure Doctrine - Sudhir Krishnaswamy. आपल्या राज्यघटनेला कोणताही सत्ताधीश त्याच्या मनात येईल तसा हात लावू शकत नाही. असा हात लावणे म्हणजे दहा हजार अंश तापमान असलेल्या अग्निगोळयास हात लावण्यासारखे आहे. काडयाच्या पेटीतील एका जळत्या काडीला हात लावला तर काय होते, याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. राज्यघटना म्हणजे अग्निगोळा आहे. इंदिरा गांधींनी या अग्निगोळयाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्या भस्मीभूत होता होता वाचल्या. खर्गे एवढे घटनेसंबंधी बोलतात, म्हणून त्यांना या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे माहीत असतीलच.

खर्गेंच्या बोलण्यात एक मेख आहे. त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख केला. आपला देश एक हजार वर्षे पारतंत्र्यात होता. दीर्घकाळ कुराणाची घटना चालली आणि नंतर इंग्रजांची साम्राज्यवादी घटना चालली. मनुस्मृतीचे राज्य या हजार वर्षांत पार धुऊन निघाले. हजार वर्षांपूर्वी सर्व भारत एक पॉलिटिकल स्टेट नव्हते. म्हणजे सर्व भारतात एकच राज्यसत्ता नव्हती. छोटी छोटी असंख्य राज्ये होती. ती कोणत्या स्मृतीने चालत होती, हे सांगणे अवघड आहे. मनुस्मृतीने देश चालला, याच्यासारखी असत्य ऐतिहासिक गोष्ट दुसरी कोणती नाही. पण लोकांना मनुस्मृती सापडली आहे, ती विषमतेचा पुरस्कार करते. त्यामुळे विषमतेचे राज्य म्हणजे मनुस्मृती असे समीकरण झालेले आहे. खर्गेंच्या बोलण्यातील मेख अशी की, बाबासाहेबांचे संविधान समता सांगते आणि मनुस्मृती विषमता सांगते. मनुस्मृतीचे राज्य म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाला तिलांजली, हे खर्गेंना आडवळणाने सांगायचे आहे.

यात राज्यघटनेच्या पावित्र्याविषयी काही नाही. श्रध्दावान आंबेडकरी अनुयायांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण करून मते मिळविण्याचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटना लिखित स्वरूपात देत असताना ती सर्व भारतीयांसाठी दिली, सर्व जाती-जमातींसाठी दिली आणि सर्व उपासना पंथांसाठी दिलेली आहे. तिचे स्वरूप सर्वसमावेशक आहे. ती केवळ दलितहिताचा विचार करीत नाही, त्याचप्रमाणे ती विशिष्ट धर्म मानणाऱ्यांचाही विचार करीत नाही. या राज्यघटनेपुढे देशाचे ऐक्य आणि देशाची एकात्मता हे दोन फार महत्त्वाचे विषय आहेत. देशाचे ऐक्य शाबूत राहिले आणि सर्व समाज एकात्म झाला, तर आपण आपोआपच जगातील महासत्ता होतो, एवढे सामर्थ्य आपल्यापाशी आहे.

ही राज्यघटना म्हणजे राष्ट्राची कोनशिला आहे. मल्लिकार्जुन खर्गे, बाळ आणि जाणता राजा यांना ग्रॅनव्हिले ऑस्टीन यांचे 'इंडियन कॉन्स्टिटयूशन, कॉर्नरस्टोन ऑफ ए नेशन' हे पुस्तक नक्कीच माहीत असेल. राष्ट्राची कोनशिला या राज्यघटनेने कशी घातली आहे, याचे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मर्मग्राही विवेचन या पुस्तकात आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महत्त्वाच्या संवैधानिक खटल्याचे निकाल देताना ऑस्टीन काय म्हणतो, हे सांगतात.

आपली ही राज्यघटना केवळ शब्दांचे गाठोडे नाही, पांढऱ्यावर काळे केलेली पाने नाहीत, तो एक विचार आहे, ती एक संकल्पना आहे, ती एक मूल्यव्यवस्था आहे, ती एक नवरचना आहे, ती भारताच्या प्राचीन आणि सनातन विचारातील नित्यनूतनता शोधणारी आहे, ती जैविक आहे, तिच्यात प्राणतत्त्व आहे. कोणत्याही जैविक गोष्टीचा विकास होत असतो. झाडे जीवमान आहेत, म्हणजे अगोदर त्याचे छोटे रोपटे असते, हळूहळू ते वाढत जाते, त्याचे खोड मोठे होते, त्याला फांद्या फुटतात आणि त्याचा विशाल वृक्ष तयार होतो. मनुष्यजीवनाचेदेखील असेच आहे. जन्मतः तो दीड-दोन फुटाचा असतो, हळूहळू त्याची शारीरिक वाढ होते, बुध्दीचा विकास होतो आणि त्यातूनच पुढे शिवाजी, गांधी, आइनस्टाइन, आंबेडकर अशी भव्य माणसे तयार होतात. याला म्हणतात जैविक विकास.

आपल्या संविधानात एक प्राणतत्त्व आहे. हे प्राणतत्त्व संविधानाने दिलेल्या 21व्या कलमात आहे. हे कलम (21 - जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण) सांगते की, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपध्दती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस, तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.

'कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली' या कलमाचा अर्थ असा होतो की, कायदा मनमानी कायदा नसावा, कोणताही कायदा मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारा नसावा, बहुमताने पारित केलेला कायदा बहुमताच्या नियमाप्रमाणे जरी योग्य असेल, तरी न्यायाच्या तत्त्वावर तो टिकेलच असे नाही. व्यक्तीच्या जीवन जगण्याचा अधिकार वाटेल तो कायदा करून हिरावून घेता येणार नाही. कारण जगण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला जन्मत: प्राप्त झालेला असतो. त्या एका अधिकारावर बाकी सर्व अधिकार अवलंबून आहेत. जर मी जिवंत राहिलो तर बाकी सर्व अधिकारांना अर्थ प्राप्त होतो. जिवंत असलो तर समता, जिवंत असलो तर भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य... अशी यादी खूप लांबविता येते. मी लुळा असेन की पांगळा असेन, बुध्दिमान असेन की निर्बुध्द असेन, गरीब असेन की धनवान असेन, या कशावरही माझा जीवन जगण्याचा अधिकार अवलंबून नाही, तो मला जन्मतः प्राप्त झालेला अहस्तांतरणीय, नैसर्गिक म्हणून मौलिक अधिकार आहे. सासूबाई इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत हा अधिकार संपविण्याचा प्रयत्न केला. मोदी तसा प्रयत्न तर राहू द्या, पण विचारदेखील मनात आणू शकत नाहीत. कारण असा विचार मनात आणल्यास त्या विचाराने मन भाजून निघेल. या अधिकाराच्या रक्षणासाठी नानी पालखीवालांनी जी झुंज दिली, ती 'नानी पालखीवाला - कोर्टरूम जिनियस' या पुस्तकात आहे आणि खर्गे आणि त्यांच्या साथीदारांनी ती वाचली असेल.

गेल्या सत्तर वर्षांत संविधानाचा विकास विविध अंगांनी होत गेला आहे. मूल जसे पहिले पालथे पडते, मग पोटाने पुढे पुढे सरकू लागते, रांगू लागते, चालू लागते, आणि मग काही वर्षांत त्याला कुणाच्याही मदतीची गरज राहत नाही. आपले संविधान 1950पासून अंमलात आले. पहिली काही वर्षे त्यांच्या कलमाचे अर्थ काय, ते कसे लावायचे, याचे भरपूर खटले चालले. न्यायपालिकाही शिकत गेली आणि कार्यपालिकाही शिकत गेली, हा शिक्षणाचा क्रम 2019 साल उजाडत असतानाही चालू आहे. आताशी आपण कुठे 12वीच्या परीक्षेला बसलो आहोत, अजून आपल्याला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. असा हा दीर्घ प्रवास आहे. त्याची थोडीशी तोंडओळख करून देणारे India's Living Constitution हे Zoya Hasan यांचे पुस्तक आहे. खर्गे आणि त्यांच्या साथीदारांच्या पाहण्यात हे पुस्तक नक्कीच आले असेल.

संविधान ही जैविक संकल्पना आहे, हा विचार मूळ अमेरिकेचा आणि अमेरिकन संविधानावर या संदर्भातील वाचनीय आणि अप्रतिम पुस्तके आहेत. अमेरिकेतील राजकारणी आणि विद्वान संविधानावर राजकारण करीत नाहीत. ते संविधान जगतात. आपल्याकडील राजकारणी आणि त्यांनी पोसलेले विद्वान संविधानावर राजकारण करतात, संविधानाचा वापर करून, ज्यांना संविधान म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करतात, हे संवैधानिक पाप आहे आणि या पापाला जाणत्या लोकांनी क्षमा करता कामा नये. हे पाप करून ते संविधान दुबळे करतात, संविधान सवंग चर्चेचा विषय करतात. राजकारणासाठी उदंड विषय आहेत. संविधान फक्त जगण्यासाठी आहे, संविधानाची मूल्ये जीवनात आणण्यासाठी आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारले, हा संविधान दिवस आहे. ज्याप्रमाणे रामजन्म, कृष्णजन्म, बुध्दजन्म, गांधीजन्म, आंबेडकर जन्म आम्हाला श्रध्देचा विषय असतो, तसा 26 नोव्हेंबर हा श्रध्देचा दिवस आहे आणि तो तेवढयाच पावित्र्याने साजरा केला पाहिजे.

vivekedit@gmail.com