''मराठी उद्योजकाला वेध 'उद्योगबोध'चे''- अशोक दुगाडे

विवेक मराठी    22-Nov-2018
Total Views |

मराठी माणसाचा उद्योग क्षेत्राविषयीचा न्यूनगंड काळाबरोबर कमी होताना दिसतोय. आज अनेक मराठी उद्योजक जगाच्या पाठीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात किंवा उद्योग क्षेत्राविषयीचा मराठी मनातील न्यूनगंड दूर करण्यात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवेगळया उपक्रमांच्या आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सॅटर्डे क्लबने देशभरात मराठी उद्योजकांचे जाळे तयार केले. हे उद्योजक स्वत:चा उद्योग वाढवतानाच परस्परांनाही सहकार्य करतात. सॅटर्डे क्लबतर्फे फेब्रुवारी 2019मध्ये होणारा 'उद्योगबोध' हा असाच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा उपक्रम असणार आहे. या उद्योगबोधच्या तयारीच्या निमित्ताने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे यांच्याशी केलेली बातचीत.

  सॅटर्डे कल्बमध्ये तुम्ही कधीपासून सहभागी आहात? निवृत्त बँक अधिकारी असताना त्यात तुमची भूमिका कशा प्रकारची आहे?

माझे करिअर बँकिंग क्षेत्रातले. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँकांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मार्च 2008मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेतून एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर या पदावरून निवृत्त झालो. दरम्यानच्या काळात माधवराव भिडे व्हॅल्युएशनच्या कामासाठी माझ्याकडे येत, त्या वेळी त्यांनी मराठी उद्योजकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली. मराठी माणूस उद्योगाकडे जास्तीत जास्त प्रमाणात ओढला जावा आणि त्याने उद्योगात प्रगती करावी, या दृष्टीने त्यांनी या क्लबची सुरुवात केली. त्यात माझाही सहभाग असावा असे त्यांनी सुचवले. मी त्यांना म्हटले, ''मी तर उद्योजक नाही, मग मी यात काय करणार?'' त्यांनी सांगितले की ''मराठी उद्योजकांना कर्जविषयक प्रक्रियेबाबत माहिती देणे, त्यांच्या लोन प्रपोजलमध्ये काही कच्चे दुवे असतील तर त्यात सुधारणा सुचवणे आणि आपले प्रपोजल प्रभावीपणे कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन करणे यासाठी तुमची मोलाची मदत होऊ शकेल.''

सुरुवातीला 2000 साली आम्ही 10-15 लोक औपचारिकरीत्या भेटायचो आणि चर्चा करायचो. त्या वेळच्या चर्चेत एक संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. 2009 साली संस्थेची एक घटना तयार केली, नियमावली तयार केली आणि चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून संस्थेची नोंदणी केली. 2009पासून मात्र 'सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट'ची खऱ्या अर्थाने प्रगती सुरू झाली. निरनिराळया शहरांमध्ये सॅटर्डे कल्बचे चॅप्टर्स (शाखा) सुरू झाले. आज जवळजवळ 51 चॅप्टर्स आहेत. 

सॅटर्डे क्लबचा उद्देश काय आहे? त्याचे काम कशा प्रकारे चालते?

याआधी मराठी माणसासमोर अर्थार्जनासाठी असलेले पर्याय म्हणजे इंजीनिअर बनून परदेशात नोकरी करावी, नाहीतर आयएएस ऑफिसर होऊन लाल दिव्यांची गाडी मिळवावी, नाहीतर बँकेत नोकरी करावी. या आणि अशाच नोकरीच्या रुळलेल्या वाटा सोडून मराठी माणसाने उद्योगात आले पाहिजे या विचारानेच सॅटर्डे क्लबचा उदय झाला. ज्या मराठी माणसाला उद्योग करण्याची इच्छा आहे, त्याने त्यात पुढे यावे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य आम्ही उपलब्ध करून देतो.

मराठी उद्योजकांचे जागतिक पातळीवर जाळे तयार करून त्यांना संधी उपलब्ध करून देणे हे सॅटर्डे क्लबचे उद्दिष्ट आहे. मराठी उद्योजकांनी परस्पर सहकार्यातून स्वत:चा आणि इतरांचा विकास घडवावा यासाठी आम्ही उद्योजकांचे एक नेटवर्किंग तयार केले आहे. 'एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत' हे आमचे घोषवाक्य आहे.

 सॅटर्डे क्लबचे काम नेटवर्किंग पध्दतीने चालते. हे चॅरिटेबल ट्रस्ट असल्याने आम्ही फक्त मेंबरशीप फी आकारतो. कमिशन, दलाली असे काही घेतले जात नाही. सॅटर्डे कल्बच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये सरासरी 50 असे सुमारे 2500 सभासद आहेत. त्यात केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील मराठी उद्योजकांचाही समावेश आहे. उद्योगात यशस्वी होण्यासाठी फक्त चिकाटी हवी असते. आम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवतो, एकमेकांना मदत करण्यास प्रवृत्त करतो. मराठी उद्योजकाने नेहमीच आपले ध्येय (आर्थिकही) उच्च ठेवावे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आम्ही मानतो.

मराठी उद्योजकांचे नेटवर्किंग हे सॅटर्डे क्लबचे वैशिष्टय मानले जाते. त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो?

आमच्याकडे सगळया क्षेत्रांतील सभासद आहेत. आर्किटेक्ट, अकाउंटंट्स-सीए, वकील, हॉटेलचालक, उत्पादक, वितरक, घाऊक विक्रेते, इंजीनिअर्स, हाउसकीपिंगवाले. तुम्हाला ज्याची कोणाची गरज असेल तो तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो, अशा प्रकारचे आमचे नेटवर्किंग आहे.

 प्रत्येक चॅप्टर्सच्या महिन्याला दोन मीटिंग्ज होतात. या मीटिंगमध्ये '1 मिनिट प्रेझेंटेशन' हा उपक्रम आम्ही घेतो. म्हणजे प्रत्येक सभासदाने आपल्या उद्योगाविषयी एका मिनिटात सादरीकरण करायचे. त्या एका मिनिटात सभासदाने आपले नाव, आपल्या उद्योगाचे नाव, कधीपासून त्या उद्योगात आहे, त्याच्या उद्योगाची वैशिष्टये काय, उत्पादनाला कोणते मानांकन मिळाले आहे का? आणि त्या सभासदाला त्याच्या उद्योगाला पूरक माहिती-संपर्क हवे आहेत का? हे त्यात सादर करायचे असते. सुरुवातीला ज्यांना प्रेझेंटेशन करता येत नसेल त्यांना त्याबाबतही मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक मीटिंगला दीडशे-दोनशे रेफरन्सेसची देवाणघेवाण होते. त्याचा त्या सभासदांना त्यांच्या त्यांच्या उद्योगात फायदा करून घेता येतो.

आमच्या नेटवर्किंगचे वैशिष्टय असे आहे की कुठल्याही चॅप्टरचा सभासद इतर कोणत्याही शहराच्या मीटिंगला हजर राहू शकतो. कारण सर्व मीटिंग वेगवेगळया दिवशी असतात. त्यामुळे बाहेरच्या शहरातीलही जास्तीत जास्त सभासदांसमोर स्वत:च्या उद्योगाविषयी सादरीकरण करून त्यांना त्याच्याशी संबंधित संपर्क वाढवता येतो. याद्वारे सभासदांमध्ये परस्पर विश्वास आणि खूप चांगले बाँडिंग तयार होते.

या बाँडिंगचे एक उदाहरण सांगतो. नाशिकच्या चॅप्टरच्या मीटिंगसाठी मुंबईचे एक सभासद गेले होते. त्यांना तेथे सीव्हिअर ऍटॅक आला. त्या वेळी उपस्थित सर्व सभासदांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची तत्काळ ऍन्जिओप्लास्टी होणे गरजेचे होते. त्यासाठी नातेवाइकांच्या परवानगीची सही हवी होती. तेथे उपस्थित सर्व सभासद नातेवाईक म्हणून सही करायला तयार झाले. उपचाराचे बिलही त्यांनीच भरले. ऍन्जिओप्लास्टी होऊन ते काका बरे झाले. त्या वेळी डॉक्टरांनी सांगितले, ''पाच मिनिटे जरी उशीर झाला असता, तरी काही खरे नव्हते.''

असेच एक उदाहरण म्हणजे पुण्याचे काही लोक मुंबईला आले हाते. तळोजाच्या पुढे त्यांच्या गाडीला अपघात झाला. तेव्हा पनवेलमधले आमचे सभासद घटनास्थळी मदतीसाठी गेले. एकमेकांना साह्य करून मोठे होण्याचे सॅटर्डे क्लबचे घोषवाक्य या उद्योजकांनी व्यवहारातही आत्मसात केलेले आहे.


'उद्योगबोध' या आपल्या आगामी उपक्रमाविषयी सांगा.

दर दोन वर्षांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक परिषद होते. तिचे नाव 'उद्योगबोध'. ती संपूर्ण भारतासाठी असते. ही दोन दिवसांची परिषद असते. त्यात सॅटडर्े क्लबच्या बाहेरच्याही उद्योजकांना प्रवेश असतो. यावर्षी हा कार्यक्रम 13-14 फेब्रुवारी रोजी वाशी येथे सिडको भवनमध्ये होणार आहे.

नॉलेजबेस्ड, फायनान्स, मार्केटिंग या उद्योगाशी संबंधित मूलभूत क्षेत्रांत उद्योजकांना मार्गदर्शन मिळवून देणे हा 'उद्योगबोध'चा मुख्य उद्देश आहे. हे मार्गदर्शन केवळ पुस्तकी असू नये, यासाठी यशस्वी उद्योजक त्यांच्या अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन करतात. यासाठी विविध उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांना वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.

'उद्योगबोध'साठी राउंड टेबल पध्दतीने उपस्थितांची बसण्याची व्यवस्था असते. प्रत्येक राउंड टेबलभोवती 7-8 जण बसत असतील, तर ते सर्व जण वेगवेगळया चॅप्टरमधील किंवा शाखेतील असतील अशी आम्ही व्यवस्था करतो, ज्यामुळे प्रत्येक उद्योजकाला 7-8 वेगवेगळया शहरांमध्ये पोहोचण्याची संधी निर्माण होते. अशी 5-6 सत्रे असतात. प्रत्येक सत्रावेळी आसनव्यवस्था बदलते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सुमारे 50 वेगवेगळया शहरांतील लोकांशी संवाद साधता येतो. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरे आणि उपस्थितांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मधला वेळ किंवा चहापानाचा, जेवणाचा वेळ ठेवला जातो.

मागच्या 'उद्योगबोध'ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीही सुमारे 2500 जणांची उपस्थिती अपेक्षित आहे.

सॅटर्डे क्लबचे अन्य कोणकोणते उपक्रम आहेत?

आमची बारा क्षेत्रे (रीजन्स) आहेत. दर तीन महिन्यांनी क्षेत्रीय परिषदा (रीजनल कॉन्फरन्सेस) होतात. त्या परिषदांमध्ये वेगवेगळया क्षेत्रांतील उद्योजक एकत्र होतात. त्यांच्यामध्ये अनेक जॉइंट व्हेंचर्स होतात. यात स्टार्ट अप उद्योजकांचाही मोठया प्रमाणात सहभाग असतो. या परिषदांमध्ये उद्योजकांना मार्गदर्शक ठरतील अशी अनेक व्याख्याने होतात. अनेक यशस्वी उद्योजक आपल्या यशोगाथा सांगतात. आपल्यासमोर कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर न डगमगता कशी मात केली, हे ते उपस्थित सभासदांना सांगतात. त्यातून अन्य उद्योजकांना प्रेरणा मिळते.

तसेच 1 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये 'उद्योगकुंभ'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक मोठया उद्योजकांची व्याख्याने होती. 'उद्योगकुंभ'लाही मोठया संख्येने प्रतिसाद मिळाला होता.

सॅटर्डे क्लबच्या ज्या सदस्यांची उलाढाल कोटयवधींमध्ये असते, त्यांच्यासाठी एलिट चॅप्टर सुरू केला आहे, ज्यामुळे त्या स्तरावरचे जॉइंट व्हेंचर्स करणे त्यांना शक्य होते. या एलिट चॅप्टरचेच एक सदस्य अभिनेता संदीप कुलकर्णी हे सॅटर्डे क्लबचे ब्रँड ऍम्बॅसेडर आहेत. या एलिट चॅप्टरचे सदस्यही त्यांच्याकडची अनेक कामे सॅटर्डे क्लबचे सदस्य असलेल्या छोटया उद्योजकांना देऊन सहकार्य करतात.

सॅटर्डे क्लबचे आगामी ध्येय काय आहे?

प्रत्येक शहरात एकतरी चॅप्टर सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. तसेच सॅटर्डे क्लबमधील नवीन उद्योजकांपैकी 40 जणांची मेंटॉरिंगसाठी निवड केली जाते. महिन्यातून एक दिवस त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतला जातो. दर महिन्याला त्यांनी या कार्यक्रमाच्या आधारे त्यांच्या कार्यशैलीत कशी प्रगती केली, याची विचारणा केली जाते. याचाच पुढचा भाग म्हणजे त्या त्या उद्योजकाच्या व्यवसायानुसार, उत्पादनानुसार त्याच्या गरजा जाणून घेऊन मार्गदर्शन करण्याचे आम्ही योजत आहोत. नवीन तंत्रज्ञान, वाढते ऑनलाइन ट्रेडिंग या सगळयाचा विचार करून आमचे आयटी सेल उद्योजकांना मार्गदर्शन करत असते, त्यातही सतत सुधारणा करण्यावर आमचा भर असेल.

मुलाखत : सपना कदम-आचरेकर

 संपर्क

अशोक दुगाडे

भ्रमणध्वनी : 9769640009

ashokkumar.10827@gmail.com