तुम्ही लोकप्रतिनिधी आहात!

विवेक मराठी    23-Nov-2018
Total Views |

 विधिमंडळाचे अधिवेशन म्हटले की हवसे, नवसे, गवसे यांची जत्रा असे वर्णन केले तर चूक ठरणार नाही, अशी स्थिती मागील काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. अधिवेशनकाळात विविध संघटना आपल्या समर्थकांसह मोर्चे घेऊन विधानभवनावर धडकतात आणि आपल्या रास्त मागण्या सरकारदरबारी मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी घोषणाबाजी, उपोषण या मार्गांबरोबरच कधीकधी हिंसक मार्गावरही ही आंदोलने जात असतात. सर्वसामान्य जनतेला आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा सोईचा मार्ग वाटत असतो. पण लोकप्रतिनिधीही अशाच मार्गाचा वापर करू लागले तर काय करायचे? लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील समस्या आणि विकासाचे प्रश्न यासाठी सभागृहात मांडले पाहिजेत, त्यासाठी अभ्यास करून प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे अशी अपेक्षा असते. पण असे होत नाही, हे वारंवार सिध्द होऊ लागले आहे. काही लोकप्रतिनिधी तर सभागृहाबाहेर नाटकबाजी केली की सर्व प्रश्न सुटतात अशा भ्रमात वावरताना दिसत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये हे होय.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत.  तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी  
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज likeकरावे....

धन्यवाद 

मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आमदार प्रकाश गजभिये विधानभवनाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आले. प्रकाश गजभिये अशा प्रकारच्या वेशभूषा करण्यात पटाईत झाले आहेत. मागच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी संभाजी भिडे गुरुजींची वेशभूषा करून आपले पुरोगामित्व सिध्द केले होते आणि त्यांच्या या कृतीला तेव्हा मीडियाने खूपच हवा दिली होती. आता मराठा आरक्षण या विषयामुळे समाजमन ढवळले गेले आहे. सर्वच राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या विषयाकडे मतपेढीच्या दृष्टीकोनातून पाहत असताना आमदार प्रकाश गजभिये शिवाजी महाराज कशासाठी होतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. वाहत्या गंगेत आंघोळ करून पवित्र होण्याचे काम अनेक लोक करतात. त्याला गजभिये अपवाद कसे असतील? गजभिये यांनी छत्रपतींसारखी वेशभूषा करण्याला आमचा आक्षेप नाही. कारण तशी वेशभूषा करून ते छत्रपती बनू शकणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. छत्रपतींची वेशभूषा करून जेव्हा प्रकाश गजभिये दुसऱ्या व्यक्तीला मुजरा करतात, तेव्हा ते छत्रपतींचा अपमान करत असतात. मात्र यावर स्वतःला पुरोगामी म्हणवणारे किंवा छत्रपतींचा वारसा आम्हालाच आंदण मिळाला आहे अशा तोऱ्यात वावरणारे कोणतेही अवाक्षर काढत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. काही वृत्तपत्रांनी प्रकाश गजभिये छत्रपतींच्या वेशात आल्याची बातमी केली, पण त्यांनी केलेले छत्रपतींचे अवमूल्यन छापण्याचे मात्र विसरून गेले. अशा प्रकारे अर्धवट बातम्या छापणारे जेव्हा लोकमान्य, लोकशक्ती म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतात, तेव्हा कीव करावीशी वाटते. प्रसारमाध्यमांनी लोकप्रतिनिधींवर आपला अंकुश ठेवला पाहिजे, त्यांना जनहिताच्या कामासाठी बाध्य केले पाहिजे, अशी अपेक्षा असली तरी त्याला हरताळ फासण्याचे काम ही प्रसारमाध्यमे करताना दिसत आहेत. प्रकाश गजभिये यांनी छत्रपतींची वेशभूषा करून आपण मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देत आहोत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ तरी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात आपण यशस्वी होऊन आणि आपली दखल घेतली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र अशा हलक्या प्रसिध्दीच्या धुंदीत त्यांनी छत्रपतींचा जो अपमान केला आहे, त्याचा त्यांना जाब कोण विचारणार?

महाराष्ट्राच्या विधिमंडळ सभागृहात याआधी प्रेक्षकांनी गॅलरीतून उडी मारणे, पेपरवेट फेकून मारणे अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांनंतर ज्या विषयासाठी अशी कृत्ये केली गेली, त्यांची सखोल चौकशीही झाली आहे. पण जे सभागृहाबाहेर घडते त्याचे काय? त्यावर काय कारवाई होते? कोणाची तरी वेशभूषा करायची आणि विधान भवनाच्या परिसरात उभे राहून प्रसिध्दीचा झोत स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून महापुरुषांचे जे अवमूल्यन होते त्याची जबाबदारी कोणाची? प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. त्यासाठी त्यांना सर्वसामान्य जनता माफ करणार नाही.

प्रकाश गजभिये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्याच्या अशा नाटकी वर्तनाला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा आहे का? हेही एकदा सामान्य मतदारांना कळायला हवे. इतर वेळी तत्परतेने प्रतिक्रिया देणारे थोरले साहेब, धाकटे साहेब आणि सुसुताई यापैकी कुणीही प्रकाश गजभिये यांच्या नाटकीपणावर आणि त्यातून झालेल्या छत्रपतींच्या अपमानाबाबत भाष्य केले नाही. प्रकाश गजभियेंच्या कृतीला त्यांचा छुपा पाठिंबा आहे का? हेही मतदारांना कळायला हवे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की प्रकाश गजभिये, आपण लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीसारखे वागा. सभागृहाबाहेर नाटकबाजी करण्यापेक्षा सभागृहात जा, जनतेच्या प्रश्नावर बोला.