शेतीपूरक व्यवसाय - स्वप्न व वास्तव

विवेक मराठी    23-Nov-2018
Total Views |

पैसा देत असेल तरच शेती करायची, हा ट्रेंड आता स्थिर होऊ लागला आहे. कारण नवी पिढी आता शेतीत उतरली आहे. ही पिढी कमी कालावधीत व खात्रीचा पैसा देणारी पिके तर घेतातच, त्याचबरोबर जोडधंदाही करतात. मात्र या पिढीने शेतीपूरक धंदे करायचे नुसते ठरवून भागात नाही, त्याला सोयीसुविधांची गरज भासते. आज उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्र समृध्द दिसतो, त्याला कारण या भागातील शेतकऱ्यांना मिळालेली पूरक व्यवसायांची जोड. येथे शेतकऱ्याच्या शेतात पोल्ट्री तरी दिसेल किंवा गोठयात दुधाळ ढोरे तरी दिसतील. उर्वरित महाराष्ट्रात हे चित्र दिसत नाही.

"सगळेच अपरिवर्तनीय आहे' हा अट्टाहास बाजूला ठेवून विचार करू या. भाकरी का करपली? पान का सडले? घोडा का अडला? नि राजा का हरला? याचे एकच उत्तर - परतले नाही म्हणून. यात खोटे काय आहे? परतणे हा नियम जर सगळयांना लागू आहे, तर आपल्याला का नाही? फक्त हे परतणे एकदम यू टर्न असू नये. अन्यथा आगीतून फुफाटयात पडण्यासारखे होते.

आपले शेतीचे नियोजन मे-जूनमध्ये सुरू होते, ते पाऊसमान जसे होईल त्यानुसार संपते. साधारणत: चांगलाच पाऊस होईल या अंदाजाने आपण नियोजन आखतो. मी कापूस पट्टयातला शेतकरी असल्याने त्याप्रमाणे हे नियोजन कसे असते ते सांगतो. 10 एकर शेती असलेला शेतकरी मागच्या वर्षी मक्याचे उत्पादन फसले म्हणून यंदा कापूस लागवड वाढवतो. किंवा कापूस फसला असेल तर मक्याचे क्षेत्र वाढवतो. यापेक्षा फारसा वेगळा बदल नसतो. निसर्ग अनुकूल राहिला, तर अपेक्षित उत्पादन येते. मात्र म्हणजे हंगामात आपण फायद्यात राहतो असे होत नाही. कारण बाजारात आपल्याला हवे तसे दर मिळतातच असे नाही. त्यामुळे पिकले तरी विकलेच जाईल याची शाश्वती नसते. ह्या रहाटगाडग्यातून सुटका करून घेऊन आता आपण शाश्वत उत्पन्नाकडे वळलेच पाहिजे. हे वळणे म्हणजे स्वत:ला परतवून घेणे होय.

हे स्वत:ला परतवून घेणे म्हणजे शेतीशिवाय आणखी वेगळा व्यवसाय जोडून घेणे होय. आजवर गाई-म्हशी पालन म्हणजे जोडधंदा समजला जायचा. पण आता अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना खुणावताहेत. आताची शिक्षित पिढी आवर्जून या जोडधंद्यात उतरत आहेत. पैसा देत असेल तरच शेती करायची, हा ट्रेंड स्थिर होऊ  लागला आहे. कारण नवी पिढी आता शेतीत उतरली आहे. ही पिढी कमी कालावधीत व खात्रीचा पैसा देणारी पिके तर घेतातच, त्याचबरोबर जोडधंदाही करतात. मात्र या पिढीने शेतीपूरक धंदे करायचे नुसते ठरवून भागात नाही, त्याला सोयीसुविधांची गरज भासते. आज उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्र समृध्द दिसतो, त्याला कारण या भागातील शेतकऱ्यांना मिळालेली पूरक व्यवसायांची जोड. येथे शेतकऱ्याच्या शेतात पोल्ट्री तरी दिसेल किंवा गोठयात दुधाळ ढोरे तरी दिसतील. उर्वरित महाराष्ट्रात हे चित्र दिसत नाही.

अर्थात पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी फारच जागरूक होता नि उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी बधिर होता असे नाही; तर पश्चिम महाराष्ट्राला रस्ते, पाणी, वीज ह्या सुविधा उपलब्ध होत्या, तर उर्वरित महाराष्ट्र या सुविधांपासून बराच काळ वंचित राहिला. कोल्हापूर, सातारचा शेतकरी रस्ता चांगला असल्याने पुण्याला आपले दूध पटकन पोहोचवू शकत होता, तेच उर्वरित महाराष्ट्रात झाले नाही. चाळीसगावचे दूध खराब रस्त्यामुळे मुंबईला वेळेवर न पोहोचल्याने नासायचे. आता मात्र सर्वदूर रस्ते चांगले झाले आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादनापासून ते शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन सुसह्य होऊ लागले आहे. डाळिंबाच्या चार एकर बागेतून चार लाखाचे उत्पन येईल असे दिसत असताना तेल्या रोगाने सगळी फळे ग्रासली. डागाळलेली फळे बाजारात विकली, तर हाती आले 40 हजार रुपये. फलोत्पादनाचे असे हाल असताना त्याच कालावधीत जावयाने जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या रेशीम पैदास उद्योगाच्या चार गुंठे क्षेत्रातल्या शेडमध्ये 250 अंडीपुंजांपासून फक्त 30 दिवसांत 45 हजार रुपये कमविले. चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने हे सत्य कथन केले. डाळिंब रोप लागवडीपासून प्रत्यक्ष फळे यायला काळ लागतो तीन ते चार वर्षे, तर रेशीम उत्पादन फक्त 30 दिवसांत पैसा देऊन जाते. अळयांना खायला लागणारा तुतीचा पाला लागवडीनंतर तयार होतो 45 दिवसांत. शेड वगैरे तयार झाल्यास दीड-दोन महिन्यांत रेशीमकोष विक्रीस तयार. रेशीम उत्पादनाकडे शेतकरी मोठया संख्येने वळत असताना उत्पादित माल कुठे खपवायचा, ही समस्या येते. सध्या महाराष्ट्र शासनाचा रेशीम विभाग अंडीपुंजा पुरविण्यापासून ते रेशीमकोष खरेदीपर्यंत जबाबदारी पार पाडतो. कर्नाटक रेशीम उत्पादनात आघाडीवर असल्याने रामनगरम हे रेशमाचे मोठे मार्केट आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाचा रेशीम विभाग कोष खरेदी करतो.

मग कर्जात लोटणाऱ्या डाळिंबाला कुठवर कवटाळत बसायचे? इवल्याशा रोपापासून काळजी घेत बाग उभी करायची. मात्र फळे लागतील नि चांगलीच येतील, भाव चांगला मिळून हाती पैसा येईल याची शाश्वती नाही. डाळिंब बागायतदार ते कापूस उत्पादक सगळयाच शेतकऱ्यांच्या भाळी आलेले हे संकट. हे चित्र उसापासून केळीपर्यंत तर द्राक्ष, डाळिंबापासून पेरू, सीताफळापर्यंत. कोरडवाहू ज्वारी-बाजरीपासून कडधान्यवर्गीय मूग, उडीद, हरभऱ्यापर्यंत भरपूर उत्पादन काढूनही शेतकऱ्याला समाधानकारक पैसा देत नाहीत, हे ढळढळीत सत्य आहे. मग याला पर्याय काय? तर शेती सोडा, नाहीतर शेतीला जोडून वेगवेगळे व्यवसाय करा.

शेतीला जोडून पूरक व्यवसाय हा काही नवा विषय नाही. दुग्धोत्पादन, शेळी-मेंढीपालन आपण परंपरेने करत आलो आहोत. यापैकी दुग्धोत्पादकापेक्षा किरकोळ दूध विक्री करणारे अधिक पैसे कमावतात. त्यामुळे शेतकरी आता या परंपरागत पूरक व्यवसायाची नव्याने मांडणी करू लागलेत.

तीन भावांचे एक कुटुंब आहे. त्यांच्याकडे 60 एकर शेती आहे. तिघांपैकी दोघे शेती बघतात, तर लहान भाऊ त्यांच्याकडे असलेल्या 60 म्हशींचे व्यवस्थापन बघतो. जळगाव शहरापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या फुलपाट गावातून हा लहान भाऊ जळगावच्या कॉलन्यांमध्ये किरकोळ दूध विक्री करतो. या कुटुंबाचा अनुभव असा आहे की, 60 एकर शेतीपेक्षा 60 म्हशींपासून अधिक उत्पन्न येते. एक उदाहरण मोठे विलक्षण आहे. शेतमजूर कुटुंबातील एक तरुण पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर काही वर्षे नोकरी करून गावाकडे परतला. त्याने देशी गाईंचे संगोपन केले. सुरुवातीला गाईच्या दुधाच्या किरकोळ विक्रीचा व्यवसाय त्याने सुरू केला. यात फारसा फायदा नाही असे त्याच्या ध्यानात आले, म्हणून त्याने दुधावर प्रक्रिया करून विविध उपपदार्थ तयार करून स्वत:च विक्री सुरू केली. स्वत:च्या डेअरीत तो आता इतरांना नोकरी देऊ शकतोय. या त्याच्या व्यवसायामुळे मूल्यवर्धन होऊन दुग्धोत्पादन फायद्याचे ठरू लागले. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा व्यवसाय शहरे व महानगरांच्या जवळच्या गावातल्या शेतकऱ्यांसाठीच उपयोगी आहे. सरसकट सगळयांना दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय फायद्याचा ठरत नाही. आजही गावात गाईच्या दुधाला 23 ते 25 व म्हशीच्या दुधाला 38 ते 42 रुपये दर मिळतो, तर शहरात गाईचे दूध 40 रुपये व म्हशीचे 60 रुपये लीटर विकले जाते. त्यामुळेच शहरांमध्ये गाईंचे गोठे व म्हशींचे तबेले दिसतात, तर गावांमधून गाई-म्हशी दिसेनाशा होत चालल्यात. यातून हे सिध्द होते की स्थलकालपरत्वे पूरक व्यवसायाचे महत्त्व बदलते. पुणे, नाशिक, मुंबई अशा महानगरांच्या जवळच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादन, कोंबडीपालन असे जोडधंदे फायदेशीर ठरतात. परंतु विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे असे जोडधंदे तितकेसे फायद्याचे ठरत नाहीत असा अनुभव आहे. असे असले, तरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता वेगवेगळे जोडधंदे असावेत याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

या जोडधंद्याची संकल्पना मात्र बदलत चालली आहे. फक्त दूध आणि कोंबडीपालन इथेच शेतकरी थांबला नाही, तर तो त्यापेक्षा वेगळे काही करू लागला आहे. अलीकडे मोठया प्रमाणात फोफावलेला जोडधंदा म्हणजे बंदिस्त शेळीपालन. प्रशिक्षण घेऊन शेतकरी आफ्रिकन बोरपासून ते उस्मानाबादी शेळयांपर्यंत गोटफार्म करू लागले आहेत. प्रशिक्षणामुळे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करता येऊ लागले. परंपरागत शेळीपालनात त्यांचा पोषक आहार, रोगराई व उपाय, कर्जयोजना, विमा, मार्केटिंग हा भाग नव्हता, त्यामुळे सुरक्षितता नव्हती. प्रशिक्षणामुळे शेळीपालन सुसह्य झाले आहे. बकरी ईदला मोठया प्रमाणात बोकडांची कुर्बानी दिली जाते, म्हणून अनेक शेतकरी आता स्वतंत्रपणे कुर्बानीच्या बोकडांचे संगोपन करू लागले आहेत.

शेतकरी यापेक्षा वेगळे जोडधंदेही करताना दिसतात. कंत्राट पध्दतीच्या पोल्ट्री फार्मप्रमाणे शेतकरी अंडयांसाठी लेअर कोंबडीपालन, मश्रूम (अळंबी) उत्पादन, त्रिस्तरीय मत्स्योत्पादन, इमूपालन, ससेपालन, वराहपालन करतात. मात्र यापैकी इमूपालन, ससेपालन व वराहपालन व्यवसाय फसल्याचे आढळून आले आहे. यापैकी मश्रूम व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. त्याचे एक उदाहरण येथे पाहू या.

शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारे तरुण शेतीकडे सहसा वळत नाहीत. मात्र एक उदाहरण मोठे प्रेरक आहे. शिक्षणासाठी पुण्यात असलेल्या या दोघा भावांनी पुण्यातच मेकॅनिकल इंजीनियरची नोकरी करता करता मश्रूम शेतीचा प्लान आखला. संदीप व राकेश पाटील या दोघा भावांनी नंतर नोकरी सोडून जळगाव जिल्ह्यातील करंज या आपल्या गावात 5 हजार चौरस फूट जागेत मश्रूम (अळंबी) व्यवसाय सुरू केला. या उद्योगातून ते आता महिन्याला 1 लाख रुपये इतके उत्पन्न कमावितात. कोरडे आणि ताजे (ड्राय आणि फ्रेश) मश्रूम उत्पादन करताना ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मश्रूम उत्पादन प्रशिक्षणही देतात.

मश्रूमचा ग्राहक आपल्याला जवळपास उपलब्ध नाहीत, हे खरेय. पंचतारांकित हॉटेल्स ही मश्रूमची बाजारपेठ आहे. कोरडया मश्रूम पावडरला बेकरी उद्योगात फार मागणी आहे.

जोडधंद्याला आता प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली आहे. हे उद्योग क्षेत्रानुसार बदलत जातात. कोकणात कोकम सरबत तर पश्चिम महाराष्ट्रात गुऱ्हाळे वाढली आहेत. नाशिक-सांगलीत बेदाणा उद्योग पूरक व्यवसाय म्हणूनच वाढलाय. त्यातून मूल्यवर्धनाचा फायदा होतो. शेतीला जोडून एक नाही, तर अनेक व्यवसाय करण्याचे कसब शेतकऱ्यांकडे असते, हे नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथील वाल्मिक मोगल यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. कुक्कुटपालनापासून त्यांनी सुरू केलेला जोडधंदा गीर गाईंच्या पालनापर्यंत आला आहे. मोगल यांनी आपल्या वडिलांना दुसऱ्या शेतकऱ्याच्या गुऱ्हाळावर 25 पैसे आंदन या मजुरीवर कामाला जाताना पाहिले होते. त्याच वेळी त्यांनी आपलेही गुऱ्हाळ असावे हा निश्चय केला. आज लखमापूर येथे त्यांचे स्वत:चे गुऱ्हाळ आहे. गुऱ्हाळ सुरू करण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळया गुऱ्हाळांत काम करून अनुभव घेतल्यानंतर गुऱ्हाळ टाकले. रासायनिक घटक न वापरता ते दर्जेदार सेंद्रिय गुळाचे उत्पादन करतात. त्या गुळाला थेट हैदराबाद, मुंबई, पुणे येथून मागणी असते.

मोगल फक्त गुळाचेच उत्पादक नाहीत, तर ते गावातल्या 1 हजार लीटर दुधाचे संकलन करून गुजरात डेअरीला पुरवठा करतात. ज्या काळात दुधाला मंदी असते, तेव्हा ते या दुधाचा खवा करून विकतात. त्यासाठी गुऱ्हाळातील कढयांचा ते उपयोग करून घेतात. याशिवाय उन्हाळयात आपल्या लखमापूर फाटयावरील दुकानावर रसवंती सुरू करतात. अलीकडे आहारात गुळाचा वापर वाढू लागलाय. अशा कालखंडात ते गुळाचे विविध पदार्थ बनवून विकतात. काकवी, गूळ पावडर, आले-वेलचीमिश्रित चॉकलेट, चिक्की आदी पदार्थांचा यात समावेश आहे.

अशी दर्जेदार उत्पादने असली, तरी विक्रीचे काय? असा प्रश्न येतो. याला मोगल अपवाद ठरतात. गटशेतीमुळे त्यांना बाजारपेठ सहज उपलब्ध आहे. मोगलांनी सांगितले की, ''आम्ही गटातील शेतकरी एकमेकाचा माल विकत असतो. उदा. येवल्याचे सदूभाऊ शेळके यांची बाजरी मी नाशिकला विकतो, तर ते माझा गूळ येवला, सिन्नर भागात विकतात.'' तसेच मुंबईतील वांद्रयाच्या कविता मुखी यांच्या मॉलमध्ये त्यांचा गूळ हातोहात खपतो.

आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव, अक्कलकुवातील पाडयावरील आदिवासी शेतकरी प्रक्रिया उद्योग करू लागलाय. या भागात मोठया प्रमाणात आंब्याची झाडे असल्याने कच्च्या कैऱ्यांपासून आमचूर बनविण्याचा उद्योग या भागात चांगलाच फोफावलाय. मात्र येथे आमचुराला सहज बाजारपेठ उपलब्ध नाही. आमचुराला मार्केट उपलब्ध झाल्यास आदिवासींसाठी शेतीला चांगला पूरक व्यवसाय होऊ शकेल.

रोपवाटिका (नर्सरी) महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात फोफावल्यात. 30-40 एकर कापसाच्या शेतात जेवढे उत्पन्न येणार नाही, त्यापेक्षा जास्त पैसे नर्सरीतून मिळविणारे अनेक शेतकरी आहेत. यापैकी कमलेश पाटील यांचे उदाहरण बोलके आहे. ते पारोळा तालुक्यातील तरुण शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित 40 एकर शेती असून या शेतीत कापूस, ज्वारी अशीच पिके ते घ्यायचे. परंतु खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी यायचे. हिरव्या मिरचीला वाढती मागणी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी थोडया क्षेत्रात मिरची व वांगे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावाला लागून असलेल्या शेतात गादी वाफे तयार करून रोपवाटिका तयार केली. स्वत:ची लागवड करून उरलेली रोपे विकायची, असे ठरले. रोपांना तत्काळ ग्राहक मिळाले. या शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा रोपांची नोंदणी केली. अशा प्रकारे 2012मध्ये नर्सरीचा जन्म झाला. स्वत:साठी गादी वाफ्यांवर रोपे तयार केली होती. परंतु शेतकऱ्यांना ट्रेमध्ये रोपे तयार करून द्यायला प्रारंभ केला. मार्च ते जून असा चार महिन्यांचा हा सीझन असतो. मागणी असेल तर इतर वेळीही रोपे तयार करून दिली जातात. अशा प्रकारे पारंपरिक शेतीला नर्सरी या पूरक व्यवसायाची जोड मिळाली.

आजचा तरुण शेतकरी वेगवेगळया पूरक व्यवसायांच्या शोधात आहेत. शासन-प्रशासन, बँका या शेतकऱ्याला सहकार्य करतील, तर ह्या पूरक धंद्यात त्याला अधिक रस निर्माण होऊ शकेल.

चिंतामण पाटील

 8805221372

 'रसवंती व्यवसायाचा पर्याय'

भरपूर रहदारी असलेल्या रस्त्यांच्या बाजूला आता मोठया प्रमाणात रसवंतीची दुकाने दिसतात. रस्त्याला लागून असलेल्या आपल्या शेताचा शेतकरी रसवंतीसाठी वापर करू लागले आहेत. किमान 6 महिने तरी हा व्यवसाय चांगला चालतो, असा अनेकांचा अनुभव आहे. यातून रसवंतीला लागणाऱ्या उसाची लागवड वाढली. 'रसवंतीचा व्यवसाय करा' असे कोणालाच सांगावे लागले नाही. निर्माण झालेल्या परीस्थितीने शेतकरी या व्यवसायाकडे वळले नि परंपरागत शेतीपेक्षा जास्त कमवते झाले.

  

रेशीम शेतीचे गाव - दहिगव्हाण

जालना जिल्ह्यातील दहिगव्हाण येथील विनायक नाईकवाडे तीन एकरांत रेशीमशेती करतात. त्यांच्याकडे 21 एकर शेती आहे, त्यापैकी फक्त 3 एकरात ते तुतीची लागवड करून रेशीम उत्पादन घेतात. ह्या पूरक व्यवसायातून त्यांना चांगला फायदा झाला. त्यांनी 2012 या वर्षी रेशीमशेतीला प्रारंभ केला. एका वर्षात त्यांना 4 चार बॅचेसमधून तीन एकरांत खर्च वजा जाता चार लाख रुपये उत्पन्न आले. याच जिल्ह्यातील डोंगरगाव कवाड हे तर 'रेशीमशेतीचे गाव' म्हणून प्रसिध्द झाले आहे. या गावात 100 शेतकरी रेशीमशेती करतात. दुष्काळी असूनही रेशीमशेतीमुळे हे गाव आज समृध्द गाव म्हणून ओळखले जाते.