रसलंपट गोसाव्याची 'साद '...

विवेक मराठी    30-Nov-2018
Total Views |

निसर्गकविता आणि प्रेमकविता यांच्यातून बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांनी प्रतिभेची नेहमीच उधळण केली. मात्र लौकिक, सन्मान यांच्या आहारी न जाता आपल्यावरील सरस्वतीचं हे वरदान बोरकरांनी जबाबदारीने जपलं. बोरकरांच्या  या सजगपणाचं दर्शन घडवणाऱ्या 'साद' या कवितेचं रसग्रहण त्यांच्या जयंती निमित्त...

 "सलंपट मी तरिही अवचित गोसावीपण भेटे' असं लिहिणारे बोरकर हे एक अद्भुत रसायन खरंच! 'स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा' म्हणणारे बोरकरच पुढे 'पार्थिव्याचा वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा' असं म्हणतात.

आपल्या निसर्गकविता, प्रेमकविता यातून आपलं रसलंपटपण भरभरून उधळणारे बोरकर, एखाद्या कवितेतून असा काही विचार मांडतात की 'जीवन त्यांना कळले हो' असं त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं.

त्यांच्या 'साद' या कवितेची आठवण आली ती एका अगदीच निराळया संदर्भात.
सध्या गाजत असलेला '...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' पाहून परत येताना कलाकार, अभिनय, मांडणी सगळयाचं कौतुक भरभरून केलं, तरीही काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत राहिलं.

साद

एकच माझा साद ऐक प्रभु

एकच माझा साद

पचू न देई मला कधीही

इवलासाहि प्रमाद

स्वार्थे माझे मिटता लोचन

घाल त्यात अविलंबे अंजन

मोहि गुंतता जरा कुठे मन

मागे लाव प्रवाद

परदु:खावर शिजले जे सुख

विटाळले जरि तेणे हे मुख

या हृदयातुनि त्या दु:खाचे

उठवी शत पडसाद

ठेच अचानक लाव पदाला

खोक पडू दे अभिमानाला

पाज यशाची चढता मजला

चढला जरि उन्माद

कलेतुनी घसरता विलासी

अथवा मुक्तत्वातुनि दास्यी

आग लावुनी आत्मसुखाला

धुमसत ठेव विषाद

निष्ठा जरि मम दुबळी झाली

खचवी भू झणि चरणाखाली

विकल करी वरवंचित प्राणा

कोंडुनि अंतर्नाद

विश्वनाटयविकसनी तुझ्या या

रंगत मजला हवे फुलाया

दयामया! कविपति! निजनियमा

न करी मज अपवाद

पापासरशी देउनि शापा

सन्मार्गी मज लावी बापा!

जाणतसे मी तुझ्या घरी प्रभु!

शासन हाहि प्रसाद

 

सरस्वतीने या गुणी कलाकाराला रूपाचं, अभिनयाचं असं भरभरून दान देतानाच आत्मकेंद्रितपणाचा असा शाप का दिला असेल? की सरस्वतीच्या मंदिरात जाताना पायरीपायरीवर मिळालेलं ऐश्वर्य लुटूनच हा परत फिरला? गाभाऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही! ज्या ईश्वरी कृपेने अंगात कला, गुण, संपत्ती, बुध्दी मिळते, त्या ईश्वरी कृपेप्रति कृतज्ञ असणं हे खऱ्या प्रतिभावंताचं लक्षण. ज्या समाजाच्या प्रेमावर आपण मोठे होतो त्याला आपण कोणता आदर्श देतोय, त्यांच्या प्रेमाची कशी परतफेड करतोय याचं भान कलावंताला नक्कीच हवं. त्यामुळेच सामान्य माणसापेक्षा ज्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सार्वजनिक प्रतिमा आहे, त्या सर्वांनीच वैयक्तिक आयुष्यातही काही बंधनं पाळावीत अशी रास्त अपेक्षा असते. त्यांच्या एका लहानशा कृतीचे पायंडे पडतात, फॅशन येते, नकळत वृत्ती बदलते.

सरस्वतीने दिलेलं दान मिरवताना तिने दिलेल्या जबाबदारीचं भानही जपायला हवंच. कलावंत स्वत:च्या प्रेमात असणं आणि आपल्याला मिळालेल्या कलेच्या बीजावर प्रेम असणं यात फरक आहे.

रवींद्रनाथांविषयी बोरकर म्हणतात, 'प्रत्येकाला त्याची एक जीवनदेवता असते व तीच त्याला हाती धरून चालवत असते. रवींद्रांची जीवनदेवता हे त्यांचेच विशुध्द ऐश्वर्यतत्त्व. त्यांच्या प्रतिभेला बहर देणारी व सार्थकाला पोहोचवणारी तीच.

आपले ऐहिक अस्तित्व तिच्या हाती सोपवून ते कर्तृत्वाचा मद व कर्मफलाचा आस्वाद या दोन्हीतून सहज सुटत!'

बोरकरांनी एका भाषणात कवीला उद्देशून जे म्हटलं, ते सर्वच कलावंतांना - खरं तर आयुष्यात यशस्वी होऊ  इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच फार मोलाचं आहे. बोरकर म्हणतात -

'काव्यसाधना ही एक विलक्षण आनंदसाधना आहे. तुमच्यासाठी कवीला शेवटपर्यंत माणूस राहून देवांशी कायमचं सख्य जोडावं लागतं. त्याच्यातला माणूस सदैव इतका उत्कट अन जागृत असायला हवा की, त्याच्या रक्ताला माणसाची सारी प्रमादशीलता, सारी दुबळीक, सारे मोह, सारे लोभ आणि सर्व प्रकारचे हर्ष-विषाद सहज जाणवतील, आणि त्याचबरोबर त्यातून सुटण्यासाठी त्याची जी मुकी तगमग चालते, तीही तितक्याच उत्कटपणे भावेल. असला हा 'मानुष भाव' हे त्याचं मोठं धन असतं. त्याचमुळे माणसाची सारी गाऱ्हाणी तो देवांपर्यंत पोहोचवू शकतो, आणि त्यांच्या कृपेचं वरदान त्यांच्या पदरात टाकू शकतो.'

असं कृपेचं दान भरभरून मिळालेल्या बोरकरांचा हा मानुष भाव किती सजग होता, हे 'साद' या त्यांच्या कवितेतून दिसतं.

कलावंत देवाकडे अक्षय प्रतिभा मागेल, कुणी रसिकमनात अढळपद मागेल! बोरकर मात्र, चुकताक्षणी आईच्या कर्तव्यदक्षतेने कान धरण्याची विनंती देवाला करतात!

हे प्रभू! माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे.

माझा इवलाही प्रमाद मला तू पचू देऊ  नको. आज मी माझ्या मूल्यांवरून एक रेसभर ढळलो अन जर ते पचलं, तर मी अधिकाधिक ढळतच जाईन, त्यामुळे वेळीच तू मला सावध कर!

स्वार्थाचा पडदा डोळयांपुढे येऊन मला सत्य दिसेनासं होतंय असं जेव्हा तुला दिसेल, तेव्हा माझ्या डोळयात झणझणीत अंजन घाल. जर मोहाच्या आवरणाखाली कुठे गुरफटून पडलो, तर ते आवरण खसकन खेचून मला उघडं पाड! असे प्रवाद माझ्यामागे लाव, की त्याला भिऊन तरी मी सरळ वागेन!

जर चुकून कुणाच्या तरी दु:खातून निर्माण झालेलं सुख मी ओरपलं, तर माझ्या शरीरात त्या दु:खाचे आवेग धडका मारू देत. माझ्या हृदयातून त्या वेदनेचे शेकडो पडसाद उमटू देत. ती जाणीव मला टोचत राहू दे.

यशाच्या मार्गावर एक एक पायरी वर जात असताना माझ्यातला अहंकार, गर्व तसाच फुगत फुगत राहील. त्यामुळे यशाची धुंदी चढताक्षणीच मला अशी ठेच लागू दे की माझा सारा अभिमान खळकन चूर होईल.

मी कलेचा उपासक. सरस्वतीचा पुजारी.

मी तिच्याकडून मिळालेले प्रतिभेचे पंख लावून मुक्तीच्या मार्गाला जायला हवं. मी परत परत त्याच भोगविलासात गुरफटतो आहे, आणि मुक्तीऐवजी इंद्रियांचा गुलाम बनतो आहे असं दिसताच हे प्रभो, माझ्या सुखाला जाणिवेची चूड लाव. त्या राख झालेल्या माझ्या वासनांमध्ये माझा विषाद, पश्चात्ताप सतत धुमसत राहू देत.

ज्या मूल्यनिष्ठ मार्गावरून मी चालायला हवं, त्यावरची माझी श्रध्दाच कधी डळमळू शकते. अशा वेळी खुशाल माझ्या पायातळीचा आधार हिसकावून घे. मग अधांतरी लटकलेला माझा प्राण कासावीस होऊ दे, आतला आवाज ऐकण्यासाठी!

 ईश्वरा! विश्वनाटयाचा सूत्रधार तू. तुझ्या या नाटयात तू जी भूमिका मला देऊ केली आहेस, त्यात रंग भरत त्यात दंग होणं, फुलणं आणि हे नाटय खुलवणं हे माझं काम असताना मी जर तुझ्या तालमीप्रमाणे माझी भूमिका वठवली नाही, तर तुझ्या शिस्तीला माझा अपवाद करू नकोस! तू कविपती. मी कवी म्हणून तुझा लाडका! हो ना? मग मला सूट देऊ  नको.

मी पाप करताक्षणी शापवाणी उच्चार.

तुझा शापच मला पुढची पापं करण्यापासून थांबवणार. भगवंता, संकटं, विपदा, अडचणी या तुझ्या कृपेच्या खुणा. ही तुझी प्रसादलक्षणं. ती माझ्या वाटयाला भरभरून येऊ दे. तुझी शिक्षा भोगण्यातच माझं भलं आहे, हे मी जाणतो! हा कृपाप्रसाद मला देच!

ज्या कलावंताला सरस्वतीच्या वरदहस्ताबरोबरच तिचा जाणिवेचा स्पर्श झाला नाही, तो खरंच दुर्दैवी म्हणायला हवा. माणसाला माणूस करणारी आणि तिथून महामानवाकडे नेणारी ही जाणीव तिच्याकडे मागत राहायला हवी. मिळणाऱ्या टाळया, लौकिक, सन्मान हे सारं तिच्या कृपाप्रसादामुळे मिळतंय, हे विसरलो की त्याच टाळयाचं रूपांतर सरस्वतीच्या शापात होतं! पार्थिव्याचा ध्यास बाळगतानाच दिव्याचा हव्यास धरणाऱ्यांसाठी मात्र परमेश्वर स्वत:च निळा निळा उ:शाप बनून येतो!