लोथल - उत्खनन आणि वर्धन!

विवेक मराठी    11-Dec-2018
Total Views |


दर दशकात जग बदलत चालले आहे. लोथलमधल्या 5800 वर्षांपूर्वीच्या कितीतरी गोष्टी मात्र आजच्या आधुनिक जगताशी साधर्म्य असणाऱ्या आहेत, त्यामागचा विचार आश्चर्यकारकरीत्या प्रगत आहे. नगररचना, वास्तुशास्त्र, धातुशास्त्र, शेती, उद्योग व व्यापार, अभियांत्रिकीशास्त्र, कला अशा सर्व आघाडयांवर ही संस्कृती प्रगत होती, हे कळून येते. लिपी वाचता आली आणि भाषा समजली तर आणखी अनेक गोष्टींवरचा पडदा दूर होईल.

गुजराथमध्ये अहमदाबाद जिल्ह्यात, धोलका तालुक्यात लोथल नावाचे एक गाव आहे. तिथे भेट देण्याचा नुकताच योग आला. लोथल या शब्दाचा अर्थ आहे मृतांचा डोंगर! मोहंजोदडो शब्दाचाही अर्थ तोच आहे. कोणे एके काळी वसलेले सुंदर शहर असेल हे आणि नंतर काही कारणांनी ओस पडले असेल, घरे ओस पडली, माणसे सोडून गेली, भूकंपामुळे किंवा अवर्षणाने मातीच्या ढिगाऱ्याखाली शहर गाडले गेले आणि मग आजूबाजूच्यांनी नाव दिले मोहंजोदडो किंवा लोथल!

तर लोथल हेसुध्दा हरप्पा-सिंधू संस्कृतीतील एका वसलेल्या शहराचे अवशेष सापडणारे ठिकाण. 1955 ते 66दरम्यान उत्खननामध्ये सिंधू संस्कृतीशी साम्य असणारे हे अवशेष सापडले. साधारण इसवीसनपूर्व 3700 वर्षांपूर्वीचे, म्हणजे 5800 वर्षांपूर्वीचे हे नगर होते. लोथलची नगररचना, रस्ते, विहिरी, बंदर, गोदाम, मण्यांचा कारखाना आणि तिथे सापडलेल्या वस्तूंचे संग्रहालय बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव होता. अगदी झटपट बघून जाणाऱ्या तुरळक पर्यटकांमुळे हे सगळे 'खास आपल्यासाठी' आहे अशी एक उगीचच विशेष जाणीव होऊन ती शेवटपर्यंत राहिली.

जहाजांद्वारे व्यापार करणारे बंदर

दर दशकात जग बदलत चाललेय. लोथलमधल्या 5800 वर्षांपूर्वीच्या कितीतरी गोष्टी मात्र आजच्या आधुनिक जगताशी साधर्म्य असणाऱ्या आहेत, त्यामागचा विचार आश्चर्यकारकरीत्या प्रगत आहे. लोथलच्या अवशेषांवरून दिसते की पश्चिम भागाकडून येणाऱ्या पुरापासून बचाव होण्यासाठी म्हणून हे नगर 12 मीटर मोठया भिंतीने संरक्षित होते. नगर दोन भागात विभागले गेले होते. दुर्ग आणि नगर क्षेत्र! नगर क्षेत्रही निवासी आणि व्यापारी भागात विभागलेले दिसते. व्यापारी भागात केवळ कामगार राहत असत. ह्याच भागात एक बंदर आणि जवळच एक माल गोदाम आढळून आले. प्राचीन साबरमती नदी - जी पुढे अरबी समुद्राला मिळत असे, त्यातून कालवा काढून या 215 मी. लांब आणि 35 मी. रुंदी असलेल्या बंदराला जोडला होता. जास्तीच्या पाण्याचे निस्सारण होण्यासाठी दक्षिणेच्या बाजूला या बंदराला 317 फूट लांब आणि 5.6 फूट उंच असे आउटलेट दिले होते आणि कमी पाण्याच्या काळात पाण्याची पातळी राखण्यासाठी एक लाकडी दरवाजाही दिला होता, ज्याने पाणी अडवले जात असे. ह्या बंदरातून जहाजांच्या वाहतुकीद्वारे व्यापार होत असे. या व्यापाराने लोथल सिंधू संस्कृतीतील अनेक नगरांशी तसेच बाह्य जगताशी जोडले गेले होते. काही अभ्यासकांच्या मते मात्र हा चौकोन म्हणजे बंदर वगैरे नसून एक मोठा बांधीव जलाशय असावा. मात्र गोदामासारख्या, जेटीसारख्या सापडलेल्या अवशेषांमुळे, तसेच काही मुद्रांमुळे इथे जहाजांद्वारे व्यापार चालत असे, या संशोधनाला पुष्टी मिळते.

पाणी निचरा व्यवस्था 

बंदराजवळच 49 मीटर लांब व 40 मीटर रुंद असे माल गोदामाचे अवशेष आहेत. ते 3.5 मीटर उंच चौथऱ्यावर बांधले आहे. ह्या चौथऱ्यावर मातीचे 64 स्तंभ होते आणि त्यावर लाकडाचे छत होते. जहाजांमधून उतरलेला माल या गोदामात ठेवला जात असे. बंदराच्या पश्चिमेकडून गोदामाकडे जाण्यासाठी माती, वाळू, तांदळाचा भुस्सा वापरून केलेल्या विटांचा एक घाट आढळतो.

वैशिष्टयपूर्ण नगररचना

लोथलमधली नगररचना नियोजनबध्द दिसून येते. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची आणि नगरप्रमुखांची वस्ती असे भाग दिसून येतात. एकसारख्या समान रुंदीचे रस्ते दिसून येतात, ज्यावर पुढच्याही काळात अतिक्रमण दिसत नाही. बाजाराच्या बाजूने सततच्या येणाऱ्या पुरामुळे सुरक्षित राहावीत, म्हणून 1 ते 2 मी. उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेली घरे, सर्वसामान्यांच्या घरांच्या बाहेर सार्वजनिक स्नानगृहे, दोन खोल्यांची दुकाने, लोहारांच्या आणि ताम्रकारांच्या कार्यशाळा असे अनेक अवशेष आढळतात. एकसारख्या आकाराच्या उत्तम भाजलेल्या विटा सिंधू संस्कृतीतील प्रागतिकता दर्शवून देतात. प्रगतिशील सांडपाणी निचरा व्यवस्था हे सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय! नगरप्रमुखाचे घर आकाराने मोठे आणि घरातच स्नानगृहाची व्यवस्था दिसते. छोटी विहीर, त्यामधून भूमिगत आणि विटांचे आवरण असलेला पाण्याचा मार्ग, तसेच सांडपाण्यासाठी गटारे सापडली आहेत. घरे, चौथरे, दुकाने, पाण्याचे मार्ग, विहिरी, भिंती अशी सर्वच बांधकामे भट्टीत भाजलेल्या विटांची, चुना आणि वाळू-मातीच्या गिलाव्याने केलेली असल्याने आज 5800 वर्षांनतरही त्या विटा सुस्थितीत आहेत. त्यांचा आकारही अगदी नेमका 1:2:4 किंवा 1:2:3 अशा प्रमाणात! जलनिस्सारण, मॅनहोल्स, मलकुंड यामुळे नगर स्वच्छ होते. 


संस्कृती आणि कला

लोथलमध्ये अवशेषांमधून उरलेला मण्यांचा कारखाना (Bead Factory) ही एक अर्थशास्त्रीयदृष्टया तेव्हा महत्त्वाची असलेली वास्तू आहे. गोमेद, सोन्याचे, मातीचे मणी, हस्तिदंती, शंख, तांब्याच्या आणि इतर धातूंच्या वस्तूंचे, दागदागिन्यांचे उत्पादन हा लोथल नगराचा प्रमुख व्यवसाय होता. बरोबरच कापूस आणि भातशेती उत्पादनाचे ते एक मुख्य केंद्र होते. सापडलेले पर्शियन खाडी शिक्के, छोटी पिरॅमिडची खेळणी, ममीच्या मातीच्या मूर्ती हे लोथलशी इजिप्त, बहारीन, सुमेर अशा अनेक बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांचे पुरावे आहेत.

उत्खननात पुरातत्त्व विभागाला हरप्पा संस्कृतीतील ज्या वस्तू सापडल्या, त्यांचे एक पुरावशेष संग्रहालय या साइटच्या शेजारीच आहे. विविध प्रकारचे मौल्यवान धातूंचे आणि मातीचेही मणी, त्यांचे दागिने, शंख, हस्तिदंती, तांब्याच्या आणि कास्याच्या वस्तू, मातीची भांडी अशा अनेक वस्तू पुरातत्त्व विभागाला सापडल्या आहेत. त्यामध्ये सोपस्टोनचे अतिसूक्ष्म मणी बघण्यासाठी इथे भिंगाची व्यवस्था केली आहे. देशी व विदेशी अशा अनेक मुद्रा इथे सापडल्या आहेत. लोथलच्या मुद्रांवर बैलांची, तसेच अन्य पशूंची चित्रे आणि काही अक्षरे कोरलेली दिसतात. मात्र या लिपीचे वाचन करून भाषेचा अर्थ लावणे संशोधकांना अजून शक्य झालेले नाही. मातीचे, टेराकोटाचे विविध जार्स, सुरया, मोठे घडे, अशा विविध आकारातली सापडलेली मातीची भांडी इथल्या संग्रहालयात आहेत. बऱ्याच भांडयांवर अतिशय सुंदर नक्षीकाम आणि प्राणी, पशू, पक्षी, पाने, फुले इ. विविध चित्रे रंगवलेली आहेत. एका चित्रात एका छोटया घडयावर कावळयाचे आणि हरणाचे चित्र आहे - हरीण घडयातले पाणी पिऊ शकत नाही, मात्र कावळा घडयात खडे टाकून पाण्याची पातळी वाढवून पाणी पितो; तर दुसऱ्या एका चित्रामध्ये एक पक्षी मासा चोचीत घेऊन झाडावर आहे, तर त्याखाली एक कोल्हा बघत उभा आहे. तसेच भुकेला कोल्हा आणि हुशार कावळा या पंचतंत्रामधील दोन्ही गोष्टींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हे संग्रहालय बघितल्यावर हरप्पा संस्कृतीत कलेलाही खूप महत्त्व होते, हे कळून येते.  

सार्वजिनक स्नानगृह 

उत्खननात अतिशय लहान ते मोठया वस्तूंनाही तोलता येईल असे वजन करण्यासाठी उपयोगात असणारे दगड सापडले आहेत. अनेक प्रकारची हत्यारे, अवजारे, पूजांसाठी लागणारे साहित्य, चमचे, भांडी आदी वस्तू, मातीची आणि दगडांची खेळणी, माणसे, पशू यांच्या छोटया मूर्ती, छोटया बैलगाडीचे खेळणे, दगडावरील सारीपाट अशा असंख्य वस्तू तिथे सापडल्या आहेत.

लोथलवासीयांची उपासना प्राचीन वैदिक धर्माशी नाळ जोडणारी होती. तत्कालीन नागरिक अग्निपूजा करत असत, अशी चिन्हे दिसतात. तिथे मिळालेल्या मुद्रांवर असलेली शिंगधारी देवता पशुपतीशी साम्य दाखवते. लोथलमध्ये एक दफनभूमी सापडली असून त्यामध्ये दोन सांगाडे मिळाले आहेत. मृत्यूनंतर शवाबरोबर मातीची भांडी, मणी आणि रोजच्या उपयोगातल्या वस्तू ठेवण्याची पध्दत होती, असे दिसून येते. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात अशी ठिकाणे अतिशय कमी सापडल्याने मृत व्यक्तींस दहन करण्याची पध्दतही प्रचलित होती, असे अभ्यासकांना वाटते.

विहिरी 

प्रगतीच्या पाऊलखुणा

एकतर सातत्याने येत असलेल्या पुरांमुळे तरी, किंवा प्रदीर्घ काळ चाललेल्या दुष्काळामुळे तरी, इसवीसनपूर्व 1900च्या दरम्यान लोकांनी हे नगर सोडून दिले असावे आणि दुसरीकडे कुठेतरी वस्ती केली असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

नगररचना, वास्तुशास्त्र, धातुशास्त्र, शेती, उद्योग व व्यापार, अभियांत्रिकीशास्त्र, कला अशा सर्व आघाडयांवर ही संस्कृती प्रगत होती, हे कळून येते. लिपी वाचता आली आणि भाषा समजली तर आणखी अनेक गोष्टींवरचा पडदा दूर होईल. 'आपण कोण होतो?' हा प्रश्न कधी ना कधी पडतोच! पूर्वजांच्या अशा पाउलखुणा का शोधाव्याशा वाटतात? त्या शोधत असताना मोहेंजोदडो, धोलाविरा, कालीबंगन, राखीगढी किंवा लोथल ही नगरे आणि प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडतात, त्यातल्या प्रगतीचे पुरावे मिळतात, तेव्हा आपण कोण होतो या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळते का? या मिळणाऱ्या पुसटशा उत्तराने आपल्या मनात समृध्दतेच्या भावना का निर्माण होतात? असे काही प्रश्न परतीच्या वाटेवर मनात तरंगत राहतात. पण अशा काही पूर्वखुणा आपली पाळेमुळे घट्ट बांधून ठेवतात, अदृश्य नाळ तशीच राहते. ती इतरांसमोर खंबीरपणे उभे राहायला, अभिमानाने जगायला आधार देते, तादात्म्याची अनुभूती देते, संस्कृती जपायला आणि संवर्धन करायला बळ देते आणि ह्याहून अधिक चांगले मार्ग, अधिक प्रगतिशीलला वर्धित करण्याची जबाबदारी आणि प्रेरणा देते! अशी जबाबदारीची जाणीव मिळाली आणि प्रेरणा निर्माण झाली, तर कोणत्याही 'उत्खननाला' अधिक अर्थ प्राप्त होतो.

9822671110