गोष्ट छोटी डोंगराएवढी..

विवेक मराठी    12-Dec-2018
Total Views |

सामाजिक काम करायला वयाची, शिक्षणाची अट नसते. गरज असते ती केवळ नि केवळ स्वतःला बाजूला सारून मानवतेच्या विचारांनी दुसऱ्याला जाणण्याची. ठाण्यातील 'वसुंधरा संजीवनी मंडळ' ही स्वयंसेवी संस्था नेमके हेच करत आहे. या संस्थेतील बहुतेक सर्व सदस्य 'सिनियर सिटिझन' गटात मोडणारे आहेत. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेने मुरबाड-शहापूर भागात 125 वनराई बंधाऱ्यांच्या आणि 6 चेक डॅमच्या बांधणीसह विविध लोकोपयोगी कामात डोंगराएवढे कार्य उभे केले आहे. 'वसुंधरा संजीवनी'च्या कामाची ही कहाणी.

 मुरबाड व शहापूर हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे दोन तालुके. पावसाच्या पाण्यावर लोकांचा उदरनिर्वाह चालतो. भात हे मुख्य पीक. या भागामध्ये प्रतिवर्षी सरासरी 2500 मि.मी. पाऊस पडूनही नियोजनाअभावी वर्षानुवर्षे सर्व पाणी वाहून वाया जाते आणि ऑक्टोबर महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष असते. पावसाळयात हिरवागार दिसणारा हा भाग उन्हाळयात मात्र शुष्क होऊन जातो. पाऊलवाटेवर दिसणारे पाण्याचे झरे उन्हाळयात आटलेले असतात. दूरदूरपर्यंत पाण्याचा मागमूस दिसत नाही. कुठेतरी खोल दरीत अथवा तलावाच्या डबक्यात गोड पाणी नजरेस पडते तेवढेच. ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य हा प्रश्न अाणखी वेगळा. घोटभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण ही मूळ समस्या आहे. उंच माथ्यावर डोक्यावरचा पाण्याचा हंडा घेऊन चढताना महिलांचे होणारे हाल शब्दांत मांडता न येणारे आहेत.

लोकसहभागातून निर्माण झालेला बंधारा

सर्वाधिक पर्जन्यवृष्टी, समृध्द नैसर्गिक संपदा असलेल्या मुरबाड व शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा आणि बारवी या धरणांतून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना पाणीपुरवठा होतो. मात्र धरणक्षेत्रातील गावांना, पाडयांना वर्षभर पुरेसे पाणी का मिळत नाही? आजही इथली अनेक गावे तहानलेली आहेत. त्यांच्या हक्काचे पाणी काही औद्योगिक कारखाने ओढून घेत आहेत. वसुंधरा संस्थेचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांचे काही वर्षांपूर्वी या भागात एका प्रशिक्षणानिमित्त जाणे झाले. तिथली पाण्याची चिंताजनक परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. इथल्या अभावग्रस्तांच्या परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी संघटनांनी इथे शिरकाव केला तर काय होईल? हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत राहिला. त्यासाठी या भागात काहीतरी केले पाहिजे हे मनात पक्के होत गेले. समविचारी मंडळींना बरोबर घेऊन त्यांनी मुरबाड-शहापूर भागात प्रवास केला. त्यांना परिस्थितीचे दर्शन घडवले. त्या सर्वांनी गावकऱ्यांशी, शाळेतल्या शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावाची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना बरोबरीने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि या सगळया प्रयत्नांचे फलित म्हणून दोन वर्षांपूवी - म्हणजे सन 2016 साली 'वसुंधरा संजीवनी मंडळ' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या कामातून तहानलेल्या गावांना खरोखरच संजीवनी मिळाली. पाणी प्रश्नावरून कामाला सुरुवात झाली, तरी या संस्थेने ग्रामीण भागातील प्रश्नांसंदर्भात काही निश्चित ध्येय, कामाची पध्दती डोळयांसमोर ठेवली होती. त्यानुसार काम सुरू झाले. लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग ही कामाची त्रिसूत्री संस्थेने नक्की केली.


या संस्थेने जलसंधारणाच्या कामात अल्पावधीत जे काम यशस्वीपणे उभे केले आहे, त्याचे श्रेय संस्थेतील अनुभवी आणि ऊर्जावान सदस्यांना जाते. जलसंवर्धन, शेती, शिक्षण, शेतीपूरक उद्योग आदी विषयांवर ही संस्था काम करते. संस्थेतील सर्व सदस्य शिक्षण, उद्योग, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आदी क्षेत्रांतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दीर्घ अनुभवांचा, तज्ज्ञतेचा फायदा संस्थेला झाला आहे. विशेष म्हणजे बहुतेक सदस्य सत्तरी-एेंशीकडे झुकलेले आहेत. या वयात ही मंडळी मोठया उत्साहाने काम करत आहेत, समस्यांवर उपाय शोधत आहेत. हे सदस्य गावातील नागरिकांशी नियमित संपर्क ठेवून असतात. लोकांशी संवाद साधून, त्यांना सहभागी करून घेत ग्रामीण समस्यांवर ठोस उपाय शोधत असतात. 

त्रिसूत्री

लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या आधारावर संस्थेचे कार्य चालते. आतापर्यंत जलसंधारणासह जी विविध कामे झाली आहेत, ती या त्रिसूत्रीवरच आधारित आहेत. मुरबाड-शहापूर भागातील 22 गावांमधल्या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनांशी निगडित समस्यांवर उत्तरे शोधायचा प्रयत्न चालू आहे. जलसंधारणाच्या कामाविषयी असलेली तळमळ, ग्रामीण भागातील प्रश्नांचा केलेला अभ्यास आणि योग्य नियोजनासह केलेले परिणामकारक काम ही या संस्थेची सांगण्याजोगी वैशिष्टये आहेत.

 

आर्थिक नेतृत्व विकास शिबिरात सहभागी झालेल्या महिला

प्रभावी काम

जनजाती पाडयांवर पाण्याची भीषण समस्या होती. लोकांकडे शेती आहे, पण पाणी नाही. पावसाचे सर्व पाणी वाहून जात होते. हे पाणी अडवून शेतीसाठी उपयोग करण्याचा निर्णय झाला. पाण्याची समस्या पूर्णपणे संपली पाहिजे या हेतूने संस्थेने प्रभावी पाऊल उचलले. 'पाणी' या मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करून गावाचे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून तो उपयोगात कसा आणता येईल यासाठी विचार केला. वनराई बंधारे, चेक डॅम्स, जुन्या तलावांचे आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भातील विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. मुरबाड-शहापूर तालुक्यातील ओढयाला आणि नाल्यांना बांध घालून पाणी अडवून पाणी जिरवण्याचे काम संस्थेने तळमळीने केले. गेल्या दोन वर्षांत 125 वनराई बंधारे आणि 6 चेक डॅम्स बांधण्यात आली आहेत. काही संस्थांच्या व व्यक्तींच्या देणगीच्या माध्यमातून 3 चेक डॅम्सची बांधणी करून अल्पावधीत जलसंधारणाची वैशिष्टयपूर्ण कामे उभी राहिली आहेत. वाघाची वाडी या कातकरी पाडयातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तीन वनराई बंधारे बांधले आहेत. वैशाखरे येथे एका ओढयावर तीन वनराई बंधारे बंाधण्यात आले आहेत. सरकारी पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी या कामाची दखल घेतली आहे. ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून कामाचे कौतुक केले आहे हे विशेष.

फलश्रुती

वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न वसुंधरा संजीवनी संस्थेने केला. पावसाचे पाणी लगेच डोंगरावरून खाली उतरू नये यासाठी सीसीटी (Continuous Contour Trenches) या नवीन तंत्राचा उपयोग करण्यात आला. यामुळे मातीचे संरक्षण आणि भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाल्याचा उतार जास्त आहे अशा ठिकाणी गॅबियन पध्दतीचा बंधारा बांधण्यात आला. अशा पध्दतीने एकाच ओढयावर, नदीवर पाचपेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्यात आले. आसुसे या गावात हा प्रयोग अधिक प्रमाणात राबवण्यात आला. या वनराई बंधाऱ्यांत 50 लाख लीटर पाणी साचले होते. या कामामुळे पर्यावरणाला कुठेही धक्का बसत नाही. याचा परिणाम विहिरींवर व बोअरवेलवर झाला. उन्हाळयात मुबलक पाणी असल्याचे पाहून अनेक शेतकरी भाजीपाल्याकडे वळले आहेत. या भागात पूर्वी भात पीक घेतले जात असे. आता बारमाही पिके घेणारे शेतकरी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

अन् कनकवीरा नदी जिवंत झाली..

'वसुंधरा संजीवनी'च्या कामाची आणखी एक फलश्रुती म्हणजे कनकवीरा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम होय. मुरबाड तालुक्यातील सह्याद्री डोंगररांगांच्या माथ्यावर विद्यानगर गावाजवळ ही नदी उगम पावते. तिची लांबी 17 किलोमीटर आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश गावे डोंगराळ भागांमध्ये असल्याने या ठिकाणी यापूर्वी जलसंधारणाची मोठी कामे झालेली नव्हती. त्यामुळे पर्जन्यमान मोठया प्रमाणात असूनसुध्दा विद्यानगर, एकलहरे, वैशाखरे, पळू, टोकवडे, हेदवली, खापरी, तळवली, खरचोंडे अादी गावांना नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असते. आजही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यातच वर्षानुवर्षे नदीत गाळ साचल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. नदीत माती कमी व दगडगोटे जास्त होते. चेक डॅमच्या उंचीएवढा गाळ तयार झाला होता. पावसाळयात दुथडी भरून वाहणारी नदी उन्हाळयात कोरडी पडायची. लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल व्हायचे. नदी पुनरुज्जीवन कामाची गरज लक्षात घेऊन कनकवीराचे काम संस्थेने हाती घेतले. साडेचार किलोमीटरपर्यंत नदीतील गाळ काढण्यात आला आहे. जवळपास 40 हजार घनमीटर गाळ निघाला आहे. यामुळे कनकवीरा नदी जिवंत तर झालीच आहे, शिवाय साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरींच्या आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

भविष्यातील धोका

पर्जन्यातील घट व बोअरवेल संख्या वाढत असल्यामुळे भूजल पातळीत मोठया प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. भूजलात आता गोडयाऐवजी क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुरबाड-शहापूर तालुक्यापासून अरबी समुद्र अगदी जवळ आहे. या समुद्राचे पाणी मिसळण्याची शक्यता आहे. खाऱ्या पाण्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. त्याचा शेतीवर, पिण्याच्या पाण्यावर परिणाम होतो. त्यामुळे भविष्यातील धोक्याची घंटा ओळखली पाहिजे आणि त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत, असे संस्थेचे मार्गदर्शक आनंद भागवत याचे म्हणणे आहे.

संपूर्ण परिवर्तनासाठी शपथ

वसुंधरा संजीवनी संस्थेने मुरबाड-शहापूर भागातील गावांसाठी भरभरून असे काम केले आहे. त्याला समाजाच्या विविध स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक गावे पुढे सरसावत आहेत. ''आमच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी संस्थेसाठी आम्ही सर्वतोपरि सक्रीय सहकार्य करू इच्छितो. आमच्यामधले सर्व व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वार्थ, मतभेद पूर्णपणे दूर ठेवून आम्ही एकदिलाने पुढच्या पिढयांच्या भल्यासाठी कटिबध्द आहोत'' अशी शपथ अनेक गावांनी घेतली आहे.

  

सेंद्रिय शेतीचा ध्यास

शेती व्यवसायात अनेक धोके आहेत. काळाच्या ओघात रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीचा पोत कमी कमी होत चालला आहे. हा पोत टिकवायचा असेल, तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. या भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती  व्हावी आणि त्याची गोडी लागावी, यासाठी संस्थेने प्रोत्साहित केले आहे. झिरो बिजेट शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्यात आला. आज अनेक शेतकरी स्वतः स्थानिक बीजनिर्मिती करून उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीमालास बाजारात मोठी मागणी असल्यामुळे स्थानिक शेतकरी गट तयार करून शहरात मालाची विक्री करत आहेत.

प्रगतीच्या पाऊलखुणा

संस्थेने मुरबाड, शहापूर भागात आपल्या कामाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम केले आहे. पाणी हा मुख्य विषय त्यांच्या अजेंडयावर आहेच, शिवाय अनेक हातांना शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी वसुंधरा संजीवनीच्या माध्यमातून दिली जात आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन अशा विविध शेतीपूरक उद्योगांशी शेतकऱ्यांना व तरुणांना जोडण्यात येत आहे. अनेक मुलींना आणि महिलांना शिवणकामाचे व इतर कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.

मुरबाड-शहापूर तालुक्यातील आणखी एक समस्या म्हणजे शिक्षण. या तालुक्यातील अनेक पाडे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे असंख्य मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. रस्ते चांगले नसल्यामुळे आणि शाळा दूर असल्यामुळे अनेक मुलामुलींना शाळेत जाता येत नाही. या भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांना सायकली दिल्या आहेत. त्यामुळे अनेक मुलांची पायपीट वाचली आहे. विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात संस्थेने यश मिळवले आहे.

वृक्षदान

नैसर्गिक संपदा लाभलेल्या या तालुक्यात बेसुमार वृक्षतोड होत आहे. जंगल वाचले, तरच इथला भूमिपुत्र वाचणार आहे ही गरज लक्षात घेऊन वसुंधरा संजीवनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक काम उभे राहिले आहे. तलावांच्या, नद्यांच्या, ओढयाच्या किनाऱ्यावर आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने उपयोगी पडतील असे वृक्ष लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वृक्षदान करण्यात आले आहे. झाडांची निगा, जोपासना करण्याची जबाबदारी वृक्षदान केलेल्या शेतकऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. भविष्यात झाडांपासून मिळणारा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. 'वृक्षदान' ही संकल्पना लोकांना पटली असून ती मोठया प्रमाणात अंगीकारली जात आहे.

एकूणच वसुंधरा संजीवनीच्या कामाचे मूल्यमापन करावयाचे झाले, तर ते संख्यात्मक न करता गुणात्मक करावे लागेल. अवघ्या दोन वर्षांच्या काळात 'पाणी' या क्षेत्रात संस्थेने जे काम केले आहे, ते नेत्रदीपक स्वरूपाचे आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कशा पध्दतीने पावले उचलावीत याचा उत्तम नमुना 'वसुंधरा संजीवनी' संस्थेने समाजासमोर ठेवला आहे.

 संपर्क

वसुंधरा संजीवनी मंडळ

७४, संस्कृती प्रसाद बिल्डिंग, शिव प्रसाद समोर, राम मारुती रोड, ठाणे (प) - ४०० ६०२.

9892207121