निसटते, पण चिंताजनक!

विवेक मराठी    15-Dec-2018
Total Views |

 राहुल गांधी स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत किंवा देवळांना, मठांना भेटी देत आहेत याची कुचेष्टा करण्याऐवजी मिर्झाराजे जयसिंगही शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी अभिषेक घालीत होते अशी उदाहरणे देण्याची गरज आहे. मोदी कसे चांगले आहेत आणि लोकच कसे वाईट आहेत, असे अनेक संदेश सोशल मीडियावरून फिरत असतात. असे संदेश पाठविणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे.

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज like  करावे 
https://www.facebook.com/VivekSaptahik/

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल नुकतेच लागले असले, तरी त्यातील राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणूक निकालांची चर्चा अधिक सुरू आहे. या तिन्ही राज्यांत भाजपा विरुध्द काँग्रेस असा प्रमुख सामना होता व आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व आहे. या तिन्ही राज्यांत भाजपाला हरवून काँग्रेस सत्तेत आली आहे. छत्तीसगड वगळता राजस्थान व मध्य प्रदेश येथील काँग्रेसचा विजय निसटता आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी प्रस्थापितविरोधी मतदान झाले, त्या वेळी लोकांनी निःसंदिग्ध कौल दिले आहेत. मात्र या दोन्ही राज्यांत लोकांनी नाराजी दाखविली आहे, पण नकार दिलेला नाही. असे असले, तरीही अशा प्रकारच्या विजयांनी ज्या प्रवृत्तींना बळ मिळण्याची शक्यता आहे, त्याचा विचार करता हे पराभव ज्यांच्या मनात राष्ट्रहिताची चिंता आहे, त्यांना विचारप्रवृत्त करणारे आहेत. केवळ तेवढयावरच न थांबता ते कार्यप्रवृत्त करणारे कसे ठरतील, याचा विचार करणे आवश्यक आहे.

2014च्या निवडणुकीत लोकांनी मोठया अपेक्षेने मोदी सरकारला निवडून दिले. लोकांची अपेक्षा असते की जादूच्या कांडीसारखा बदल व्हावा. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. परंतु जेव्हा अशा आश्वासनामागे फक्त घोषणा असते, ते बदल घडवून आणण्याची सचोटी किंवा निर्धार नसतो, तेव्हा लोकांचा तीव्र भ्रमनिरास होतो. श्रीमती इंदिरा गांधींची 'गरिबी हटाव'ची घोषणा व नंतर राजीव गांधींचे स्वच्छ राजकारणाचे आश्वासन ही इतिहासातील दोन उदाहरणे बोलकी आहेत. 71 साली इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर अडीच-तीन वर्षांतच संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू झाले आणि राजीव गांधी सत्तेवर आल्यानंतर तीन-साडेतीन वर्षांत बोफोर्स आंदोलनाला सुरुवात झाली. या तुलनेत राफेलच्या मुद्दयावरून राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केले, तरी लोकमनावर त्याचा परिणाम झालेला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता राफेल मुद्दयातील हवा काढून घेतली असून राफेल विमान खरेदीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नसल्याचा निकाल दिला आहे व राफेल प्रकरणात दाखल झालेल्या सर्व याचिका रद्द केल्या आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस जरी राफेलचा विषय घेऊन न्यायालयात गेले नसले, तरी सभागृहात आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी राफेलचे तुणतुणे वाजविले होते. पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात राफेल हा एक महत्त्वाचा मुद्दा करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आणि राफेल खरेदीत मोदींनी खूप मोठा भ्रष्टाचार केल्याची आवई उठविली होती. आता न्यायालयाने या विषयावर निकाल दिल्यामुळे राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी नवा मुद्दा शोधावा लागेल. संसदेत या विषयावर खूप चर्चा होऊनही राहुल गांधी यांचे समाधान झाले नव्हते. आता ते संसदीय चौकशी समितीची मागणी करू पाहत आहेत. त्याचप्रमाणे मोदीद्वेषाने पछाडलेल्या व्यक्तींना आणि संस्थांनाही राफेलचा मुद्दा सोडून द्यावा लागेल. मोदींची कार्यपध्दती, शासनावरची पकड यामुळे ज्यांना त्रास होतो, ती मंडळी सातत्याने काही ना काही कारणाने मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. मात्र अशा प्रयत्नांना आणि आरोपांना जनता स्वीकारत नाही, हे वारंवार सिध्द झाले आहे.

परंतु मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर आपले अस्तित्वच धोक्यात येईल याची पूर्ण कल्पना असल्याने मुस्लीम जातीयवादी, डाव्या अराजकवादी व अन्य फुटीरवादी शक्ती एकत्रित येऊन राजकीय संधिसाधू पक्षांना हाताशी धरून जे राजकारण करीत आहेत, त्यांचा उत्साह आता वाढला आहे. मोदी यांनी जी धोरणे स्वीकारली आहेत, त्यांचे परिणाम यायला वेळ लागेल, पण वेगवेगळया प्रकारे त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा अत्यंत नाजूक काळ आहे. संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदू दहशतवादाचा मुद्दा ज्या प्रकारे निर्माण केला गेला व त्यात अनेक लोकांना अडकविण्याचा प्रयत्न झाला, ते उदाहरण पुरेसे बोलके आहे. त्यामुळे पुढील वर्षातील लोकसभा निवडणुका देश कोणत्या दिशेने जाणार ती दिशा निश्चित करणार आहेत.

अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जी ज्या प्रकारे या शक्तींना मदत करत आहेत, ते पाहिले तर, जर या शक्ती विजयी झाल्या, तर देशावर कोणती परिस्थिती उद्भवेल याची कल्पना येऊ शकते.

या परिस्थितीवर मात करायची असेल, तर व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ते करीत असताना ज्या कारणांमुळे देश संकटात सापडणार आहे, त्या मुद्दयांवर लोकजागृती करण्याची गरज आहे. केवळ राहुल गांधींची चेष्टा करणे, गांधी किंवा नेहरू घराण्याची टिंगलटवाळी करणे यातून आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करीत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. राहुल गांधी स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत किंवा देवळांना, मठांना भेटी देत आहेत याची कुचेष्टा करण्याऐवजी मिर्झाराजे जयसिंगही शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी अभिषेक घालीत होते अशी उदाहरणे देण्याची गरज आहे. मोदी कसे चांगले आहेत आणि लोकच कसे वाईट आहेत, असे अनेक संदेश सोशल मीडियावरून फिरत असतात. असे संदेश पाठविणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे. आणीबाणीपासून अनेक निवडणुकीत भारतीय मतदारांनी आपल्या परिपक्वतेचा परिचय दिला आहे. निकाल आपल्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत म्हणून त्यांची अवहेलना करणे म्हणजे आपला लोकशाहीवर विश्वास नाही असा अर्थ होतो. योग्य मुद्दयाच्या आधारे 'शहाणे करून सोडावे सकळ जन' असा प्रयत्न करणे सर्वांच्या हाती आहे. लोकशाहीतील ते ब्रह्मास्त्र आहे.