नम्र झाला भुता, तेणे कोंडिले अनंता।

विवेक मराठी    18-Dec-2018
Total Views |

 

निवडणुका जिंकण्याचा हमखास फर्ॉम्युला कोणाकडेही नसतो. सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक पक्ष जनहिताची कामे करीत जातो. जनहिताची कामे केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनांची मते हमखास मिळतील, याची काहीही शाश्वती नसते. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाने जनहिताची कामे भरपूर केली. त्याचे लाभार्थीसुध्दा प्रचंड संख्येत आहेत, परंतु या लाभार्थींनी निवडणुकांत भाजपाच्या मतपेटया ओसंडून वाहतील एवढया भरल्या नाहीत. 2014च्या निवडणुकीपूर्वी मनमोहन सरकारने अल्पकिमतीत गरिबांना धान्य, मनरेगा अशा योजना सुरू केल्या. त्याचे लाभार्थीदेखील कोटयवधी लोक आहेत. परंतु तेवढया कारणाने लोकांनी काँग्रेस पक्षाला मते दिली नाहीत.

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/ मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

मत देताना मतदार कोणता विचार करील, याचे भाकीत करणे अजूनपर्यंत तरी कोणाला जमले नाही. आपल्याच देशात ही परिस्थिती आहे, असे नाही. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये मतदार आपल्या मतदारांपेक्षा राजकीयदृष्टया अतिशय जागरूक असतो. आम्हाला फुकट काय मिळणार आहे, यावर नजर ठेवून तो मतदार मतदान करीत नाही. तो राजकीय पक्षाचा कार्यक्रम बघून मतदान करतो. असे असले, तरी तो कोणाला निवडून देईल, याचे भाकीत करणे अतिशय कठीण असते. हिलरी क्लिंटन निवडून येणार असा सर्वांचा अंदाज होता, पण आले डोनाल्ड ट्रम्प. मतदारांच्या मनाचा अंदाज करणे कठीण असल्यामुळे 2019च्या निवडणुकीत काय होईल, याचे निश्चित भाकीत करणे खरोखरच कठीण आहे.

असे जरी असले, तरी 2014ची निवडणूक का जिंकली गेली? याचा विचार केला, तर दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. पहिली गोष्ट देशातील सर्व संघस्वयंसेवकांनी मनोमन हा निश्चय केला होता की, काहीही झाले तरी काँग्रेसला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. संघाचा तसा आदेश नव्हता. स्वयंसेवकांनी हा निर्णय स्वत:हून घेतला होता. ज्यांना संघ माहीत आहे (पुस्तकी नव्हे, अनुभवाचा) त्यांना हेदेखील समजते की, सर्वसाधारणपणे स्वयंसेवक एकसारखा विचार करतात. अनेक वेळा सरसंघचालकांचा विचार आणि सामान्य स्वयंसेवकांचा विचार यातून हे विचारांचे साम्य प्रकट होते. अनेकांना याचे कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे वास्तव आहे.

दुसरा विषय होता की, मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील सरकार सोनिया गांधी चालवीत होत्या. सोनिया गांधी भारतीय नाहीत, त्या कॅथोलिक आहेत आणि अत्यंत छुप्या रितीने त्यांची कॅथोलिक विषयसूची चालू होती. ती हिंदूविरोधी होती. हिंदूविरोध हा मनमोहन सरकारच्या परवलीचा शब्द झाला. देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा  (मुसलमानांचा) असे निर्लज्ज विधान त्यांनी जाहीरपणे केले.  महत्त्वाच्या स्थानी ख्रिश्चन माणसे बसू लागली. हिंदू समाजाला ही धोक्याची घंटा वाटली आणि त्याने 2014 साली हिंदू या भावनेने मतदान केले. मोदींविरुध्द जहरी प्रचार केला गेल्यामुळे आपोआपच ते हिंदू अस्मितेचे प्रतीक झाले आणि जनतेने मोदी यांच्या पारडयात भरभरून मते टाकली.

आता मे 2019मध्ये निवडणुका येतील तेव्हा काय होईल? राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा हिंदू बनविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यांचे सल्लागार ख्रिश्चन नाहीत, मुस्लीम नेत्यांना ते प्रचारात उतरवीत नाहीत, हिंदू श्रध्दांविषयी ते कुत्सितपणे काही बोलत नाहीत, मध्य प्रदेश-राजस्थान यासारख्या राज्यांत त्यांच्या पक्षाने गाईचा विषय आपल्या हाती घेतलेला आहे. निवडणूक प्रचारादरम्यानच्या काळात ते चुकून मशिदीत गेलेले नाहीत किंवा त्यांनी कुठल्या चर्चला भेट दिलेली नाही. बिशपचे आशीर्वाद घेतलेले नाहीत, आणि मुल्ला-मौलवींच्या कळपातदेखील गेलेले नाहीत. यामुळे 2019च्या निवडणुकीत हिंदू हा विषय राहणार नाही.

सत्तेवर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी फार गंभीरपणे या विषयाचा विचार करायला पाहिजे होता, तो आपण कोणत्या कारणामुळे आणि कोणामुळे सत्तेवर आलेलो आहोत? सर्वांच्या मनात याविषयी सुस्पष्टता नाही असे म्हणता येणार नाही, परंतु चार-दोन वरिष्ठ नेत्यांच्या वागण्या-बोलण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत किंवा जनतेपर्यंत योग्य तो संदेश जातो, असे नाही. स्थानिक स्तरावरचे नेते, सत्ताधीश कसे बोलतात, कसे वागतात, कार्यकर्त्यांना कशा प्रकारची वागणूक देतात यावरून पक्षाची प्रतिमा तयार होत जाते. सत्तेचा गुणधर्म असा आहे की, सत्तेवर गेल्यानंतर जाणाऱ्याच्या मनात ती अहंकार निर्माण करते. सत्तेबरोबर सर्व प्रकारचे सन्मान येतात, लाल दिव्याची गाडी येते, सरकारी नोकरांचा ताफा बरोबर असतो आणि सत्तेत मंत्र्याचे शब्द झेलण्यासाठी फलटणच्या फलटण उभी असते. त्यामुळे मंत्र्यांना असे वाटू लागते की, मी खूप मोठा झालो आहे, माझ्यासारखा मीच.

यातील अनेक जण विरोधी पक्षाविषयी आणि विरोधी नेत्यांविषयी कुत्सितपणे बोलत राहतात. राजकारणात असे करून चालत नाही. निवडणुकीतील हार-जीत ही त्या खेळाचा एक भाग असते. जो हरला, त्याला जनाधार नाही, लोक त्याला विचारत नाहीत, असे काही नसते. त्याचाही खूप मोठा अनुयायी वर्ग असतो. एखाद्या नेत्याविषयी अनुद्गार काढले असता ते त्याच्या अनुयायांच्या जिव्हारी लागतात. राजकारणात हा धंदा होतो. जिभेला लगाम आणि वाणीला संयम असावाच लागतो. भारतीय जनता कोणत्याही प्रकारचा उध्दटपणा अजिबात सहन करीत नाही.

संत तुकाराम म्हणतात की, 'नम्र झाला भुता, तेणे कोंडिले अनंता।' जो सर्व प्राणिमात्रांपुढे नम्र झाला, त्याने परमेश्वराला जिंकले. सत्ताधारी अहंकारी झाले की प्रथम कार्यकर्ते मनाने दूर जातात. कार्यकर्ते दूर गेले की जनता दूर जाते. हा एक शाश्वत सिध्दान्त आहे. महाभारतात यक्षप्रश्नात यक्षाने धर्माला एक प्रश्न विचारला आहे की, ''कशाचा त्याग केला असता माणूस सर्व लोकांत प्रिय होतो?'' धर्माने तत्काळ उत्तर दिले, ''अहंकाराचा त्याग केल्याने माणूस सर्वांत प्रिय होतो.'' नम्र झाला भुता या वचनात तुकाराम महाराजदेखील हेच सांगतात. लोकप्रिय होण्यासाठी लोकप्रिय भाषणांचा उपयोग नाही, लोकप्रिय घोषणांचा उपयोग नाही आणि लोकप्रिय योजनांचादेखील उपयोग नाही.

 संघस्वयंसेवकांच्या हृदयात पू. डॉ. हेडगेवार आणि पू. श्रीगुरुजी यांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे अढळ असते, का? या दोघांनी कोणतीही भौतिक गोष्ट स्वयंसेवकांना दिलेली नाही. पद, मानमरातब, किताब, पैसा, काहीही दिलेले नाही. मग त्यांनी दिले काय? त्यांनी अहंकारमुक्त नम्रता दिली. डॉक्टरांचे आणि श्रीगुरुजींचे जीवन म्हणजे नम्रतेची वाहती गंगा आहे. सामान्यातील सामान्य स्वयंसेवकांच्या सुख-दु:खात एकरूप होण्याची त्यांची आंतरिक ओढ खरोखरच धक्क करणारी होती. आणि त्यामुळेच त्यांच्या सहवासात जे जे आले, ते ते आपापल्या शक्तीं-बुध्दीप्रमाणे राष्ट्रकार्यात समर्पित झाले.

अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे जीवनदेखील नम्रतेची मिसिसिपी नदीच होते. एका लहान मुलीने - बेडेल असे जिचे नाव, तिने - लिंकनला एक पत्र लिहिले की काका, तुम्ही दाढी ठेवलीत तर चांगले दिसाल. आणि पत्रात लिहिले, तुमच्या मुलींना माझ्या शुभेच्छा! लिंकनने त्या मुलीला उत्तर पाठविले की, मला मुली नाहीत, मुलेच आहेत. आणि दाढी ठेवण्याचे म्हणशील, तर अगोदरच मी आहे कुरूप, त्यात दाढी ठेवण्याने सुंदर कसा होणार? लिंकन अध्यक्ष झाल्यानंतर स्प्रिंगफील्ड ते वॉशिंग्टन रेल्वे गाडीने तो यायला निघाला. वाटेत बेडेलचे गाव लागले. लिंकनला पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. लिंकनने मोठया आवाजात विचारले, ''बेडेल नावाची एखादी मुलगी इथे आली आहे का?'' ती आईच्या खांद्यावर होती. लोकांनी तिला वाट करून दिली. ती लिंकनच्या डब्याजवळ आली, लिंकनने तिचा पापा घेतला आणि म्हणाला, ''बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी दाढी ठेवली आहे. आता मी चांगला दिसतो ना!'' लिंकनची ही आठवण त्या छोटया मुलीपुरती मर्यादित राहिली नाही. आज ती अमेरिकन भावविश्वाचा एक भाग झालेली आहे. अशा भावपूर्ण आठवणी आमच्या नेत्यांच्याही निर्माण झाल्या पाहिजेत.

ज्या हिंदू मतदारांनी भरभरून मते दिली, त्यांच्या श्रध्दा जपण्याचे काम चार वर्षांत किती केले गेले? रामजन्मभूमीचा प्रश्न जिथे होता तिथेच आहे. आज सरसंघचालकांना सांगावे लागते की, त्याचा कायदा करा. अजून काशीविश्वेश्वराच्या मंदिराचा आणि श्रीकृष्ण जन्मस्थानाचा विषय तसाच पडला आहे. देश केवळ जीडीपी वाढल्याने उभा राहत नाही. केवळ नोकऱ्यांची संख्या वाढल्याने उभा राहत नाही. देशाची ओळख असते. तिची अस्मिता असते. देशाचे मानबिंदू असतात. आणि हे माणसाला जगण्याची आणि उदंड कष्ट करण्याची प्रेरणा देतात. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ज्यांनी मोठया अपेक्षेने आपल्याला सत्तेवर बसविले, त्यांचा अपेक्षाभंग करण्यासारखे आहे.

भाजपासारखा पक्ष कोणत्याही एका नेत्यामुळे सत्तेवर येत नसतो. घराणेशाहीवर चालणारा तो काही काँग्रेस पक्ष नव्हे. संघ विचारधारा आणि संघ आचारधारा यावर चालणारा तो पक्ष आहे. कार्यकर्ता हा त्याचा प्राण आहे. धर्मासंबंधी म्हटले जाते की, धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील. कार्यकर्त्याविषयी म्हटले जाते की, कार्यकर्त्याचे संवर्धन करा, कार्यकर्ता तुम्हाला यश देईल. 2019ची निवडणूक जर जिंकायची असेल, तर देशभर विखुरलेल्या लाखो-करोडो कार्यकर्त्यांमध्ये सत्ता राखण्याचा जोश निर्माण करावा लागेल. त्यांच्यात चेतना भरावी लागेल. त्यांच्यात स्वयंजागृती निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करावे लागेल. हे कार्यकर्ते कोणाच्याही आदेशाने काम करीत नाहीत. ते तत्त्वासाठी काम करतात. देशासाठी कष्ट करतात. आणि आपल्या संस्कृतीच्या आणि मूल्यांच्या रक्षणासाठी प्रसंगी संघर्षाला सिध्द होतात.

vivekedit@gmail.com