पिटू समतेचा डांगोरा

विवेक मराठी    24-Dec-2018
Total Views |

 सध्या काही व्यक्ती, काही संघटना समाजात विषमता निर्माण करून राष्ट्राचे ऐक्य तोडू पाहत आहेत.  याला आळा घालायचा असेल, तर संतांनी सांगितलेला समतेचा विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' ही वारी सामाजिक समतेचा पाया मजबूत होण्यासाठी कामी येत आहे. या वारीचे दुसरे वर्ष असून 1 जानेवारी 2019 रोजी मंगळवेढा येथील संत चोखोबा मंदिरापासून वारीला प्रारंभ होणार आहे, तर 12 जानेवारी 2019 रोजी देहू येथे वारीची सांगता होणार आहे. ही वारी 6 जिल्ह्यांतून 950 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

ज्ञानदेव, नामदेव, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, तुकाराम, नरहरी सोनार आदी संतांनी धर्मसुधारणेबरोबरच सामाजिक विषमतेविरुध्दची प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. केवळ प्रतिक्रियासुध्दा भविष्यातील क्रांतीची नांदी ठरत असते. ती संतांच्या अनेक अभंगांतून प्रत्ययास येते. रूढी-परंपरेच्या, अंधश्रध्देच्या विध्वंसाने प्रथम समाजाची मनोभूमी नांगरून तिच्यात भक्तिभावाची, नीतीची आणि समाजोध्दाराच्या विधायक बियांची पेरणी मराठी संतांनी केली आहे. संतांचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' पुढे सरसावत आहे. वृंदावन फाउंडेशन व संत चोखोबा अध्यासन केंद्र, पुणे यांच्यावतीने ही अभिनव वारी काढण्यात येते. यंदा वारीच्या बोधचिन्हाचे अनावरण माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते, तर पोस्टरचे अनावरण माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्राची ओळख बनलेले मुंबईचे डबेवाले एक दिवस वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या वारीला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

''समाजाच्या आणि राष्ट्राच्या उध्दारासाठी
चोखोबा ते तुकोबा वारी''
- सचिन पाटील

वारकरी संतांचे कार्य केवळ धार्मिक पातळीपुरतेच मर्यादित नव्हते
, तर त्यांनी सामाजिक विषमतेवर भाष्य करून समतेचा विचार रुजविला. हा विचार आजही लोकांना जवळचा वाटतो, इतकी ताकद या विचारात आहे. महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संतविचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच सामान्य माणसाला कायम प्रेरित केले आहे. संतविचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे. संतविचारांची आवश्यकता लक्षात घेऊन समाजाच्या आणि राष्ट्राच्या उध्दारासाठी 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' या मोहिमेची सुरुवात झाली आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारांतून सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न वारीतून होत आहे. पहिल्या वर्षी वारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदा वारीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. त्यामुळे मागच्या वेळेपेक्षा वारीला लक्षणीय यश मिळेल.

निमंत्रक,

चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची


पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. या वारीच्या तुलनेत 'चोखोबा ते तुकोबा' ही वारी खूप छोटी आहे. तिचे स्वरूप, मर्यादा वेगळया आहेत. ही वारी चोखोबाच्या गावी जाते, गोरोबाकाकांच्या तेरमध्ये जाते, सावता माळयाच्या अरणमध्ये जाते, नाथांच्या पैठणमध्ये जाते, ज्ञानाकडे जाते, तिथे संतविचारांचा जागर करते. या वारीत वारकरी संप्रदाय आणि संविधानावर विश्वास असलेले तरुण एकत्र येतात, समकालीन घटनांवर भाष्य करतात, विचार करतात, चर्चा करतात, प्रभावीपणे मत मांडतात. विशेष म्हणजे वाडया-वस्त्यांत, शाळा-महाविद्यालयात, शहरात जाऊन समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करते. लोकांच्या मनातील अस्वस्थता दूर करते. एका गावाहून दुसऱ्या गावात जाते, तेव्हा कुणी भेदाभेद, उच्च-नीच, जातिभेद, धर्मभेद करत असेल तर समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न करते. तिथल्या लोकांची गळाभेट घेऊन मजल-दरमजल करत समतेचा डोंगारा पिटीत जाते.

मंगळवेढा येथून समता वारीस पहिल्यांदा सुरुवात झाली

अशी वारीच का?

जेव्हा संस्कृतीच्या विविध घटकांतील परस्पर संबंधात बिघाड निर्माण होतो, त्या वेळी सामाजिक विघटन उदयास येते. सामाजिक विघटनापासून सामाजिक समस्यांची निर्मिती होते. सामाजिक समस्या समाजातील बहुसंख्य लोकांवर प्रभाव पाडते. अशा सामाजिक विघटनाला आळा बसावा अशी लोकांची मानसिकता असते. आजची स्थिती पाहिली, तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशातील - विशेषतः महाराष्ट्र राज्यातील सामाजिक स्थिती ठीक नाही. दहशतवाद, नक्षलवाद, जातीय हिंसाचार, कोरेगाव भीमासारख्या समस्या ह्या एखाद्या व्यक्तीशी किंवा समाजातील बहुसंख्य लोकांशी संबंधित नसतात, तर समाजातील बहुतांश लोकांना तोंड द्यावे लागते. कोरेगाव भीमा प्रकरणामुळे माणसा-माणसातील दरी वाढली,  माणूसपणाच्या तटबंदी ढासळल्या. ताण-तणाव निर्माण झाला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. वरील स्वरूपाच्या सामाजिक समस्या ह्या समाजासमोरील मुख्य अडथळे आहेत. सामाजिक विघटनात साचलेले गढूळ पाणी बाहेर निघावे, संत-महापुरुषांना अपेक्षित असलेली सामाजिक, आर्थिक समानता निर्माण व्हावी, सामाजिक स्थिती ठीक राहावी यासाठी जी प्रक्रिया करावी लागणार आहे, ती प्रक्रिया पूर्णत्वासाठी धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व समता याशिवाय पर्याय नाही. संविधानाच्या चौकटीत राहून संतविचार पोहोचावा, यासाठी 'चोखोबा ते तुकोबा' अशी अभिनव स्वरूपाची वारी उदयास आली आहे. या वारीने गेल्या वर्षभरात लोकांत चैतन्य निर्माण केले आहे. हे चैतन्य केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायांच्या तत्त्वांशी निगडित आहे, हेच या वारीचे वेगळेपण आहे

 वारीचे वेळापत्रक

समता वारीचा नियोजित मार्ग व मार्गावर होणारे प्रमुख कार्यक्रम याप्रमाणे -

मंगळवार 1 जानेवारी - श्री संत चोखामेळा परिसर, मंगळवेढा, सायं. 5. वा. प्रस्थान कार्यक्रम. मुक्काम गोपाळपूर.

बुधवार 2 जानेवारी - सकाळी 9 वा. पंढरपूर, स. 10 वा. संत सावतामाळी जन्मभूमी अरण, दु. 3. वा. मोहोळ, दु. 4.30 वा. सोलापूर, मुक्काम अक्कलकोट.

गुरुवार 3 जानेवारी - स. 9 वा. मुरूम, स. 11 वा. उमरगा, दु. 1 वा. येणेगूर, दु. 2.30 वा. नळदुर्ग, दु. 4 वा. अणदूर, सायं.5.30 वा. तुळजापूर, मुक्काम जयप्रकाश विद्यालय रुईभर.

शुक्रवार 4 जानेवारी - स. 9 वा. व्यंकटेश महाजन विद्यालय, उस्मानाबाद, दु. 1 वा. संत गोरोबाकाका जन्मभूमी, तेर, दु. 2.30 वा. कसबे तडवळे, सायं. 5.30 वा. येडशी, मुक्काम येरमाळा.

शनिवार 5 जानेवारी - स. 10.30. वा. मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी, दु. 2 वा. भूम, सायं. 5 वा. पाथरूड, मुक्काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृतिस्थळ, चौंडी.

रविवार 6 जानेवारी - स. 8.30 वा. जामखेड, स. 11 वा. सौताडा, दु. 12.30 वा. कुसळंब, दु. 3 वा. श्री संत भगवानबाबा जन्मभूमी सावरगाव, सायं. 5 वा. गहिनीनाथगड, संध्या. 7 वा. मुक्काम तारकेश्वरगड.

 सोमवार 7 जानेवारी - स.8.30 वा. पाथर्डी, स.11. वा बोधेगाव, दु. 12.30 वा. श्री संत एकनाथ महाराज जन्मभूमी, पैठण, दु. 4 वा. शेवगाव, मुक्काम नेवासा.

मंगळवार 8 जानेवारी - स. 9 वा. श्रीरामपूर, स. 11 वा. शिर्डी, दु. 2. वा. राहुरी, मुक्काम नगर.

बुधवार 9 जानेवारी - स. 11.30 वा. पत्रकार परिषद, नगर, दु. 3. वा. संत निळोबाराय जन्मभूमी, पिंपळनेर, सायं. 5 वा. राळेगणसिध्दी, मुक्काम राळेगणसिध्दी.

गुरुवार 10 जानेवारी -  स. 10 वा. शिरूर, दु. 12 वा. कोरेगाव, दु. 2 वा. रांजणगाव, दु. 3.30 वा. सणसवाडी,  मुक्काम वाघोली.

शुक्रवार 11 जानेवारी - स. 8.30 वा. वाघोली, स. 10.30 वा. चंदननगर, दु. 1 वा. येरवडा, दु. 4 वा. विश्रांतवाडी, मुक्काम आळंदी.

शनिवार 12 जानेवारी - स.9 वा. आळंदी वारकरी शिक्षण संस्था भेट, दु. 4 वा. देहू येथे समारोप.

 वारीची उद्दिष्टे

वारकरी संतांनी समाजाला मानवता, समता, बंधुता, सदाचरण यांची शिकवण दिली आहे. ही शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, आचार-विचारांचा प्रसार करणे हे 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' या वारीच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असले, तरी मानवतावादी, समतावादी भूमिकेतून सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, तरुणांना जातवाद, प्रांतवाद, फुटीरतावाद अशा विषयांपासून दूर ठेवून राष्ट्राभिमानी तरुणांची फौज तयार करणे, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रविघातक प्रवृत्तीपासून दूर ठेवणे, आपल्या धर्मावर विश्वास, श्रध्दा ठेवून दुसऱ्या धर्माचा आदर करणे, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' अखंड चालणार आहे. वारीचे स्वरूप, व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

 

वारीची फलश्रुती

'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची'च्या माध्यमातून पुण्यात संत चोखामेळा अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. संत चोखामेळा यांच्या अभंगांचे संकलन करणे, अभंगांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांस प्रोत्साहन देणे, परिसंवाद व चर्चासत्रे घडवून आणणे, चोखामेळा यांच्यासह समकालीन संतांवर वर्षभरात दोन पुस्तकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील संत चोखोबांच्या स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागास सूचना दिल्यामुळे एका दुर्लक्षित संतास न्याय मिळाला आहे.

आजच्या बदलत्या परिस्थितीत 'चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची' या मोहिमेने समाजकार्यासाठी उचललेले पाऊल आदर्शवत आहे. ही वारी समाजमनाला जोडणारा सेतू आहे. यामुळे समाजात बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीला निश्चितच आळा बसणार आहे.