कर्तारपूर कॉरिडॉर  कोणाला काय मिळाले?

विवेक मराठी    03-Dec-2018
Total Views |

 

आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानने भारताकडे टाकलेले मैत्रिपूर्ण पाऊल अशी कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन या घटनेची नोंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. परंतु सत्तर वर्षांनंतर असा पवित्रा घेण्याचे पाकिस्तानच्या मनात का आले की यामागे काही छुपा अजेंडा आहे, हाही प्रश्न नाकारता येत नाही. यामागील राजकारण काही असले तरी या रस्त्यामुळे भारतातील शीख समुदाय पाकिस्तानातील कर्तारपूर येथील सर्वात महत्त्वाच्या अशा गुरुद्वाराचे दर्शन घेऊ  शकणार आहे. भाजपा सरकारच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा ठरणार आहे.

मा. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबरला 'गुरुदासपूर' येथे भारतीय बाजूच्या कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन झाले. या रस्त्यामुळे भारतातील शीख समुदाय पाकिस्तानातील कर्तारपूर येथील सर्वात महत्त्वाच्या अशा गुरुद्वाराचे दर्शन घेऊ  शकणार आहे. येथे गुरू गोविंदसाहेब आपल्या आयुष्यातील अठरा वर्षे राहिले होते. इथे राहूनच त्यांनी शीख समुदायाला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 1539 साली त्यांचा मृत्यूही याच पवित्र भूमीवर झाला. पुढच्या वर्षी श्री गुरू नानकदेव यांचा 550वा जन्मोत्सव मोठया धामधुमीत साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

हा प्रवास पाकिस्तानच्या हद्दीत असला, तरी यासाठी भाविकांना व्हिसाची किंवा पासपोर्टची गरज असणार नाही. केवळ एक परमिट मिळवून भक्त दर्शनाला जाऊ  शकतील, अशी व्यवस्था केली जात आहे. हा 'एक दिशा मार्ग' (one way corridor) असणार आहे. गुरुद्वारात जाणे, दर्शन घेऊन, धार्मिक विधी आटोपून आल्या पावली परत येणे अशी त्याची आखणी आहे. म्हणजेच परमिट नसणारा कोणीही भारताच्या हद्दीत प्रवेश करू शकणार नाही. आणि भारतीय भाविकही गुरुद्वारा सोडून इतर कुठेही जाऊ शकणार नाहीत.

 भारतातील शीख बंधूंना याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या कर्तारपूर येथील गुरुद्वारा आता भारतीय शीख लोकांसाठी खुले झाले आहे. गेली सत्तर वर्षे ते कर्तारपूरपासून 4 कि.मी.वर असणाऱ्या गुरुद्वारात जाऊन आपली दर्शनाची आस भागवत असत. भारतीय हद्दीत असणाऱ्या डेरा बाग्रा या स्थानावर दुर्बिणी लावलेल्या आहेत. केवळ भारतीय असल्यामुळे आजपर्यंत या शीख, जाट लोकांना आपल्या गुरूंचे दर्शन दुर्बिणीतून घ्यावे लागत असे. त्यामुळे अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कर्तारपूर कॉरिडॉर बनवावा, अशी मागणी सर्वप्रथम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच त्यांच्या लाहोरच्या सद्भावना यात्रेच्या वेळी केली होती. आज मग्रूर, हरामखोर पाकिस्तानची अशी अवस्था झाली आहे की एक राजकीय खेळी म्हणून का होईना, त्यांना हे धार्मिक स्थळ भारतीय साधकांसाठी खुले करणे भाग पडले आहे. आता याला Referrendum 2020चीही एक किनार आहे.

अतिशय मैत्रिपूर्ण, प्रेमळ, सज्जन, निर्मळ, शांतिप्रिय अशी एकमेकांची प्रतिमा उभी करण्याचा काँग्रेसी नवज्योत सिध्दू आणि पाक पंतप्रधान इमरान खान जीव तोडून प्रयत्न करत आहेत. इमरान खान हे पाक मिलिटरीच्या हातातली बोलका बाहुला म्हणून ओळखले जातात आणि सिध्दूच्या बाबत काल-परवाच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अशाच प्रकारचे विधान केले आहे. (या काँग्रेसी नेत्याने या प्रकरणात घेतलेली भूमिका अभिमानास्पद आहे.) म्हणजे उंदराला मांजर साक्षी म्हणतात त्यातला प्रकार आहे. परंतु तरीही आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानने भारताकडे टाकलेले मैत्रिपूर्ण पाऊल अशी या घटनेची नोंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आणि त्या वेळी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत, ते असे-

  1. 70 वर्षांत हे काम का होऊ दिले नाही?

  2. आज असा पवित्रा घेऊन पाकला काय साधायचे आहे?

  3. दिवाळखोर अवस्थेत स्वनिर्मित शत्रुत्व सांभाळणे अशक्य होऊ लागले आहे काय?

  4. Referrendum 2020शी याचा काय संबंध आहे? कारण प्रो-खलिस्तानी बिलबोर्ड्स पाकिस्तानात जागोजागी दिसत आहेत.

  5. सीमेवर सातत्याने होणारी killings का थांबवली जात नाहीत? हाफिज सईदचा उजवा हात गोपालसिंग चावला या सोहळयात उजळ माथ्याने कसा मिरवू शकतो? या सगळया प्रकारांमधून पाकिस्तान भारताचा अपमान करत आहे, ना भारतीयांसाठी काही सत्कृत्य..

  6. जवळपास निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यामागे विविध प्रकारची तस्करी, हवाला, घुसखोरी यातले तर काही शिजत नाही ना?

  7. एकीकडे गिलगिट-बाल्टिस्तान हा सध्या पाकव्याप्त असलेला भारताचा अविभाज्य भाग पाकिस्तानी प्रांत असल्याचे विधेयक मांडण्याची तयारी करायची आणि दुसरीकडे साळसूदपणे मैत्रीचे ढोंग रचायचे, हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर मांडायला हवा.

  8. बलुची नेत्यांना फुटीरतावादी चळवळीसाठी भारत मदत करतो, असा आरोप पाकिस्तान सतत करत असतो. तुमच्याकडे बलुचिस्तान तर आम्ही ISIच्या मदतीने खलिस्तानची चळवळ पेटवू, अशी पाकिस्तानची भूमिका या त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होते आहे.

भारतीय मुत्सद्दयांनी जागतिक मंचावर असे प्रश्न आणि मुद्दे उपस्थित करणे आवश्यक आहे.


खरे तर मोदीजींची परराष्ट्रनीती पाकला नाचवत आहे. पण आम्हाला नृत्य आवडतेच मुळी, म्हणून आम्ही नाचतो आहोत असा आव आणण्याचा पाकचा ढोंगी प्रयत्न अगदीच उघडा पडतो आहे. मोदी 2019 साली परत सत्तेवर आले, तर पाकिस्तानला जगणे मुश्कील होईल हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. बलुचिस्तान, पश्तुन, सिंध प्रांतात फुटीरतावादाची सुरुवात झालीच आहे. मोदींच्या रणनीतीमुळे पाकिस्तान स्वत:चे जगभरातील सहानुभूतिपूर्ण समर्थनही गमावत आहे. हटकून मागे उभे राहणारे अमेरिका, रशिया सध्या हात झटकून टाकत आहेत. पाकिस्तानात तीव्र स्वरूपाच्या आर्थिक विवंचना आहेत. चीन म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते असे हिंस्र जनावर आहे, असा अनुभव हळूहळू येतो आहे. अशी एकंदरीत परिस्थिती गंभीर आहे.

आता यावर तोडगा म्हणून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने खानसाहेबांनी भारतीय काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. (हे वेळोवेळी लक्षात येते आहे.) आणि सिध्दूसाठी जोरदार बॅटिंग करण्यात ते धन्यता मानत आहेत. सिध्दूपाजीही काही कमी नाहीत. पाकिस्तानात होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या आपल्या भाषणात तर त्यांनी खानसाहेबांना केवळ लोटांगण घालण्याचे बाकी ठेवले होते. तसेच गुप्त बैठकीत खलिस्तानी दहशतवादी आणि हाफिज सईदचा महत्त्वाचा साथीदार गोपालसिंग चावला याच्याबरोबर सिध्दूचे फोटो पुराव्यांच्या रूपात पुढे येत आहेत. भारताच्या एकात्मतेच्या आणि शांततेच्या दृष्टीने ही खळबळजनक माहिती आहे. नवज्योत सिध्दू यांना पदच्युत करण्यात यावे अशी मागणीही जोर धरत आहे.

या सगळया स्वार्थी राजकारण्यांच्या भाऊगर्दीत एक चेहरा भारतीय अस्मितेची चमक दाखवून गेला. मा. सुषमाजींच्या वतीने पंजाब राज्यातील केंद्रात मंत्री असणाऱ्या 'हरसिमरत कौर बादल' यांनीही या कार्यक्रमात भाषण केले. गुरू गोविंदसिंगांचे विचार, शीख तत्त्वज्ञान, भारतीयांच्या भावना, भारत सरकारची या विषयातली भूमिका अशा सगळया गोष्टी त्यांनी आपल्या भाषणातून अतिशय समर्थपणे मांडल्या. त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर वाढला आहे.

कर्तारपूर कॉरिडॉर हा सजग नेतृत्व, भारतीय समाजाप्रती असणारी केंद्रातील सत्तेची सहभावना, भारतीयांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याची तळमळ अशा अनेक गोष्टींचा परिपाक आहे. भाजपा सरकारच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा आहे.

9987883873