पुण्याचे सार्वजनिक नाना

विवेक मराठी    10-Feb-2018
Total Views |

नाना सदैव कार्यरत राहतात. कारण त्यातून त्यांना जगण्याची ऊर्जा मिळत असते. आपला समाज हा गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणे जगणारा असावा, कोणाचा द्वेष नको, कोणाशी वैर नको, सर्वानी बंधुभावाने व्यवहार करावा असे तत्त्वज्ञान सांगणारे खूप लोक आपण पाहतो. पण आपल्या जगण्यातून तसा आदर्श उभा करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात. नाना त्यापैकी एक आहेत.

परवा नानांचे 'गठलं' हे आत्मकथन पोहोचले. नानांनी आपल्या आयुष्याची चित्तरकथा खूप सोप्या भाषेत पण प्रवाहीपणे मांडली आहे. पुण्यातील सार्वजनिक जीवनावर नानांनी आपल्या कार्याने स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे.
नानांचा पहिला परिचय झाला तो मोतीबागेत झालेल्या समरसता विषयाच्या बैठकीत. दुपारी "जेवायला माझ्याबरोबर चल" असा नानांनी आदेश काढला आणि मी नानांबरोबर कसबा पेठेतील गाडगेबाबा समाज मंदिरात बारसं सोडायला गेलो. परीट समाजातील गणमान्य व्यक्ती म्हणून नानांचे काम तेथे पाहता आले. समाजाविषयी पराकोटीची तळमळ आणि सेवायोगी संत गाडगेबाबा यांच्यावरची डोळस श्रद्धा ही नानांची वैशिष्ट्ये तेव्हा कायमसाठी मनात कोरली गेली. पुढे परिचय वाढत गेला आणि नानांची विविध रूपे लक्षात येऊ लागली. कल्पनेपलीकडचा साधेपणा आणि सातत्याने काहीतरी करत राहण्याची धडपड हीच नानांची खरी ओळख आहे हेही लक्षात येऊ लागले.
सुरेश दत्तात्रेय नाशिककर या नावाचा माणूस नाना या नावाने प्रसिद्ध झाला आणि तेच नाव त्यांची सार्वजनिक जीवनातील ओळख झाले. नाना राजकारणात होते. पुण्याचे उपमहापौरपद त्यांनी भूषवले. डेक्कनवरचा शंभूराजांचा पुतळा नानांच्या पुढाकाराने बसवला गेला. शंभूराजे आणि गाडगेबाबा ही नानांची आस्थाकेंद्रे आहेत. राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी नानांचे कौतुक केले ते त्यांच्या शंभूनिष्ठेमुळेच. नानांनी याच निष्ठेपायी हजारो वेळा वढू तुळापूरची परिक्रमा केली आहे. शंभूराजांच्या पुतळ्याप्रमाणे त्यांचे छायाचित्रही प्रकाशित करण्यात नानांचा खूप मोठा वाटा होता. संत गाडगेबाबांच्या निधनाला पन्नास वर्षे झाली, तेव्हा नानांनी महाराष्ट्रव्यापी प्रबोधन यात्रा काढली आणि गाडगेबाबांचा संदेश साऱ्या महाराष्ट्राला दिला. नानांनी गाडगेबाबांच्या कीर्तनांचे संकलन-संपादन केले. गाडगेबाबांचे छोटेखानी चरित्र प्रकाशित केले.
साधारणपणे २००३च्या आसपास नानांकडे समरसता मंचाचे काम आले. तेव्हापासून नानांचा परिचय. नानांचा स्वभाव शांत, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून मगच ते आपले मत व्यक्त करतात. जमिनीवरचा विचार आणि त्यानुसार व्यवहार हा नानांचा स्थायिभाव आहे. हाती घेतलेला विषय पूर्ण ताकदीने तडीस नेण्याची नानांकडे हातोटी आहे. जुन्नर येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी तो अनुभव घेतला आहे. नानांना कायम काम लागते, ते कामाशिवाय स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यामुळे ते कधी समरसता चळवळ, तर कधी शाकाहार चळवळ, तर कधी गाडगेबाबा समाज मंदिर अशा वेगवेगळ्या कामांत गुंतलेले दिसतात.
नाना नाशिककरांच्या या कामाची दखल पुणेकरांनी घेऊन त्यांना 'सार्वजनिक काका' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नाना बैठकीत बसले की विषय भरकटू देत नाहीत. नेमकेपणा आणि पूर्वनियोजन यावर त्यांचा भर असतो. एका बैठकीत समरसता अभियान या विषयाची चर्चा चालू होती. चर्चा मूळ विषयावरून भरकटली आणि वेगळ्या दिशेला जाऊ लागली. नाना उठले आणि म्हणाले, "आपल्याला साथीची लागण झाली आहे का?"
नाना बोलले आणि बैठकीचा नूर पालटला. चर्चा मूळ विषयावर आली. ही किमया केवळ नानाच करू शकतात. असे अनेक अनुभव नानांच्या बाबतीत सांगता येतील.
नानांनी जे आपल्या व्यवहारातून संचित जमा केले, ते संचित त्यांनी शब्दात बांधून त्यातून 'गठलं' तयार झाले आहे. गठलं या शब्दाला विशेष अर्थ आहे. परीट बांधव धुलाईसाठी आलेल्या कपड्याचे 'गठलं' बांधतात आणि स्वच्छ धुतलेल्या कपड्यांना कडक इस्त्री करतात. कपड्याचा मळ काढून त्याला पडलेल्या घड्या नष्ट करण्याचे काम परीट बांधव करतात. नानाही हेच काम आयुष्यभर करत आले आहेत. फक्त कपड्याऐवजी त्यांनी समाजाच्या स्वच्छतेचे काम स्वीकारले आहे. नाना समाजमन स्वच्छ करतात आणि सामाजिक व्यंग दूर करत समाजाला परीटघडीची शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच नाना जगन्मित्र होतात. नानांचा पुण्यात अनेक सामाजिक संस्थाशी जिवंत संबंध आहे, त्यामुळे अनेक कठीण विषय ते सहज मार्गी लावतात.
नाना सुमारे पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात आहेत. समाजमनाची जाण आणि समस्यांची उत्तरे शोधण्याची त्याची धमक ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि पुढील काळातही राहील.
नाना सदैव कार्यरत राहतात. कारण त्यातून त्यांना जगण्याची ऊर्जा मिळत असते. आपला समाज हा गाडगेबाबांच्या उपदेशाप्रमाणे जगणारा असावा, कोणाचा द्वेष नको, कोणाशी वैर नको, सर्वानी बंधुभावाने व्यवहार करावा असे तत्त्वज्ञान सांगणारे खूप लोक आपण पाहतो. पण आपल्या जगण्यातून तसा आदर्श उभा करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात. नाना त्यापैकी एक आहेत.

9594961860