कुटुंबाचा जमाखर्च - पैशाची आवक

विवेक मराठी    15-Feb-2018
Total Views |

खरं तर ‘ऋण काढून सण साजरा करू नये’ ही पारंपरिक मराठी मध्यमवर्गीय मनोवृत्ती सध्याच्या काळात कधीच मागे पडली आहे. घरं, गाड्या अशा मोठ्या खरेद्यांसाठी आपण कर्ज काढतोच, पण अगदी TV, Washing Machine, Fridgeपासून ते मोबाइल, लॅपटॉपपर्यंत सर्वच उपकरणं EMIवर घेतो. सण-समारंभ-प्रवास इत्यादीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डस सररास वापरतो.

 शाळेत तिसरीत किंवा चौथीत असताना ‘जमाखर्च’ मांडायला शिकवतात. कागदाचे दोन भाग करून डाव्या बाजूला ‘जमा’ होणारे पैसे लिहायचे आणि उजव्या बाजूला ‘खर्च’ होणारे पैसे. जमेच्या बाजूपेक्षा खर्च कमी असेल तर शिल्लक आणि खर्चाच्या बाजूपेक्षा जमा कमी असेल तर तूट. वाणिज्य शाखेत शिकायला गेलेल्यांना पैशाची आवक आणि जावक यांचं याहून सविस्तर विश्लेषण शिकवलं जातं. इतर शाखांमध्ये मात्र काहीच शिकवलं जात नाही. (अर्थात वाणिज्य शाखेचे पदवीधरही शिकलेल्या तत्त्वांचा स्वतःच्या आयुष्यात किती वापर करतात, हा प्रश्नच आहे).

 हे सगळं सांगण्याचं कारण असं की पैसे कमावणं-खर्च करणं, आपल्याकडे येणं-आपल्याकडून जाणं किंवा त्याची आवक-जावक यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे त्याचं सविस्तर विश्लेषण करता येणं हे अत्यंत गरजेचं असतं.

 येणाऱ्यापैशाचे प्रकार

दोन मुख्य मार्गांनी पैसा आपल्याकडे येऊ शकतो.

 . उत्पन्न - पहिला म्हणजे आपला पगार किंवा व्यवसायातली कमाई, बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर आलेलं व्याज, म्युच्युअल फंड्सच्या किंवा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर मिळणारा लाभांश, घर भाड्याने दिलं असेल तर मिळणारं घरभाडं इत्यादी. हा प्रकार म्हणजे आपलं उत्पन्न. आपण कष्ट करून केलेली कमाई किंवा आपल्या बचतीवर-गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे आपलं उत्पन्न असतं. हे आपल्याला कायमस्वरूपी मिळालेलं असतं. हे कोणालाही परत द्यायचं नसतं.

 उत्पन्नाचे दोन उपप्रकार असतात. पगार, व्यावसायिक उत्पन्न किंवा मिळणारं व्याज-भाडं इत्यादी वर पाहिलेले प्रकार हे ‘नियमित’ उत्पन्न असतं. हे साधारण दर महिन्याला किंवा तिमाहीला-सहामाहीला-वर्षाला मिळतं. ते किती मिळणार याची बऱ्यापैकी माहिती किंवा अंदाज असतो. याशिवाय काही ‘अनियमित’ आणि अजिबात अंदाज बांधता येणार नाही अशा काही मार्गांनीही पैसा येऊ शकतो. उदा. वाढदिवस-सणसमारंभांना मिळणारा आहेर, कुठून तरी मिळालेली गिफ्ट व्हाउचर्स, क्वचित जिंकलेलं लॉटरीचं तिकीट इत्यादी. हेही सारं आपल्याला कायमस्वरूपीच मिळालेलं असतं. कोणाला परत द्यायचंही नसतं, यालाही उत्पन्न म्हणलं पाहिजे. पण हे अत्यंत अनियमित आणि बेभरवशाचं असतं.

 . कर्ज - आपल्याकडे पैसा येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कर्ज काढून आलेला पैसा. यातली बँका-पतसंस्थांकडून घेतलेली कर्जं आपल्याला माहीत असतात किंवा पटकन लक्षात येतात. याचबरोबर, कोणा मित्रा-नातेवाइकाकडून ‘जरा लागत आहेत म्हणून दे’ असे घेतलेले पैसे हेही कर्जरूपीच असतात. कागदावर आणि खिशात ‘जमे’च्या बाजूला दिसत असले, तरी हे आपलं ‘उत्पन्न’ नसतं. याची परतफेड आपल्याला करायची असते. याशिवाय जोवर याची परतफेड करत नाही, तोवर घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावं लागतं. व्याज वेळेत दिलं नाही, तर तेही कर्जात धरलं जाऊन व्याजावरही व्याज द्यावं लागतं.

 कर्जाचा एक नवा उपप्रकार आहे. सध्याच्या काळात सररास वापरला जाणारा आणि अजिबात आपल्या लक्षात न येणारा कर्जाचा प्रकार म्हणजे ‘क्रेडिट कार्ड’! खरं तर नुसतं क्रेडिट कार्ड (याला पर्यायी मराठी शब्द नाही! ऋण-पट्टी म्हणावं का?) हे कर्ज नसतं. क्रेडिट कार्डाचं लिमिट हे ‘रेडी-टू-यूज’ असं पण न घेतलेलं कर्ज असतं. खरेदीसाठी कार्ड वापरलं की आपोआप आपण कार्ड कंपनीचे देणेकरी बनतो. क्रेडिट कार्डाचं मासिक देणं वेळेत पूर्णपणे दिलं नाही, तर उरलेल्या रकमेवर ते सणसणीत दराने व्याज लावतात आणि जोवर पूर्ण रक्कम देत नाही, तोवर दर महिन्याला चक्रवाढ दराने व्याज आकारत राहतात.

 खरं तर ‘ऋण काढून सण साजरा करू नये’ ही पारंपरिक मराठी मध्यमवर्गीय मनोवृत्ती सध्याच्या काळात कधीच मागे पडली आहे. घरं, गाड्या अशा मोठ्या खरेद्यांसाठी आपण कर्ज काढतोच, पण अगदी TV, Washing Machine, Fridgeपासून ते मोबाइल, लॅपटॉपपर्यंत सर्वच उपकरणं EMIवर घेतो. सण-समारंभ-प्रवास इत्यादीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डस सररास वापरतो.

 आपलं उत्पन्न आणि अफाट कर्ज घेऊ शकण्याची क्षमता ह्या दोन्हीमधून येणाऱ्या - येऊ शकणाऱ्या पैशाच्या ‘आवकी’चं नियोजन करायचं असेल, तर त्याच्या ‘जावकी’चे प्रकार समजून घेतले पाहिजेत. त्याविषयी पुढच्या लेखामध्ये.

prasad.shir

 

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
 https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/