स्टॅमिना

विवेक मराठी    15-Feb-2018
Total Views |

नुसतं भरमसाठ खायला अक्कल लागत नाही, पचवायची ताकद हवी त्यासाठी. एकदा भरमसाठ खात गेलात की तुमच्या पोटाला नाइलाजाने सवय होते. अर्थात त्याचे दुष्परिणाम इतके वाईट की माणसं बारीक होण्याचा नाद सोडून देतात. पण मला कायम एक खंत वाटत आलीये. स्वत:चं स्वत:ला का कळत नसावं? अति खाणं हे कर्जासारखं आहे, नंतर फेडायचंय ते सव्याज.

लोकांना काय मस्ती असते कळत नाही. लग्नात पंगतीत आग्रह किती करायचा ते कळत नाही अजून लोकांना. बफे आल्यावर लोक आता अन्न जास्त वाया जाणार नाही यासाठी खूश झाले. पण हेतू अजून पूर्ण साध्य झाला नाहीये. लोक वाट्टेल तसं घेतात आणि डिश भरभरून फेकून देताना दिसतात. अन्नाची किंमत हवी. आपल्याला किती जातं यात न कळण्यासारखं काय आहे? वाढणारा आचरट असेल, पंगतीत अटेन्शन सीकिंग सिन्ड्रोमने आजारी असेल तर त्याच्यापासून जपून राहायला लागतं. मला अजूनही लोकांच्या पानात उगाचच जिलेबीचा, श्रीखंडाचा ढीग लावणारे वाढप्ये पाहिले की त्यांना धरून चोपावंसं वाटतं. माणूस खाणारा असेल तर गोष्ट वेगळी. पण उगाच कुणावर तरी इंप्रेशन मारायच्या नावाखाली वधुपित्याच्या पैशांनी नासाडी का करतात, ते कळत नाही. मुळात हल्ली लोकांचा स्टॅमिना आहे कुठे खाण्यात! जुन्या काळच्या पंगती गेल्या आणि खाणारेही गेले. रग्गड खाऊन नंतर अस्वस्थ झाल्याने गडाबडा लोळण्यात काय स्किल आहे? ते पचवण्याची ताकद असेल तर खरी मजा. आपण नेहमी खाण्याच्या स्टॅमिनाचे खरे-खोटे किस्से ऐकतो आणि त्यात भर घालून पुढे सांगतो. 

राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे कीर्तनात एक किस्सा सांगायचे. मंडईत आटवलेलं दूध मिळायचं तेव्हा लोटीतून. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी पन्नास लोटया दूध प्यायची शर्यत लावली. दुसरा माणूस म्हणाला. ''आलोच.'' पहिल्याला वाटलं, हा काहीतरी आचरट प्रकार करायला गेला पैज जिंकण्यासाठी, म्हणून तो त्याच्या मागे गेला. दुसरा माणूस तिथे लोटया रिचवत होता. उत्तर भन्नाट होतं, ''अरे, मी बघत होतो आपल्याला जमेल की नाही ते.'' फॅट किती सांगणारं आत्ताचं दूध नव्हतं ते. भेसळ नसलेलं आणि आटवलेलं मटेरियल होतं. लोकांच्या बुडाखाली गाडया नव्हत्या, त्यामुळे सायकल आणि चालणं यांनी श्रम व्हायचे. भूक लागायचीच आणि भूक लागल्यावर कंदमुळं खाल्ली तरी अंगी लागतील. बोर्नव्हिटा, 50+ कॅप्सूल्स, च्यवनप्राशची गरज नव्हती तेव्हा. आता शरीरात हाडाचं अस्तित्व नाहीये अशी शंका येईल असे चरबीने लदबदलेले देह अखंड चरत असताना दिसतात, तेव्हा त्यांची कीव येते. तिशी-पस्तिशीत लोक ट्रेडमिल टेस्ट करताहेत, बीपीच्या गोळया खाताहेत, इन्शुलीन घेताहेत. सुजलेयत लोक पैसे आणि वाट्टेल ते खाऊन. मग हाताबाहेर गेलं की घरी सायकल आणून कौतुकं चालू होतात, पण रस्त्यावर काही सायकल चालवणार नाहीत, कारण फुप्फुसं बाहेर येतील. असो!

गणपती पालीला माझी आत्या राहायची. तिचे मिस्टर अप्पा साठे देऊळवाडयातले जेवणाचे, पंगतीचे किस्से सांगायचे. शेवटची पंगत म्हणजे खास पंगत. आम्ही बटरएवढे डोळे करून ऐकायचो. संपूर्ण जेवण झाल्यावर जिलेबीची ताटं रिचवणारे, संपूर्ण ताटात मोतीचुराचा ढीग करायचा, ते सगळे कुस्करायचे आणि त्यात तूप घालून वरणभातासारखे घास घेऊन तो ऐवज खाणारे लोक होते, अजूनही असतील. एक किस्सा माझ्या लक्षात आहे. एकाने असंच जेवण झाल्यावर, दोनेक ताटं जिलबी हाणली होती. माणूस नेहमीचा होता. नंतर दोन-तीन तास झाले तरी फिरकला नाही देवळात, म्हणून माणसांना जरा टेन्शन आलं. सर्वानुमते घरी जाऊन बघायचं ठरलं. सगळे घरी गेले तर तो पठ्ठया वाडग्यात दूध-पोहे खाताना सापडला. ''अरे, घरी आलो आणि तडस लागल्यासारखं झालं. चैन पडेना. मग तासभर विहिरीवर पाणी शेंदलं, सगळया झाडांना पाणी घातलं, तेव्हा कुठे मोकळा झालो. पण मग भूक लागली आता, करणार काय? घरी केलेलं काहीच नाही ना आज. हिला म्हटलं, दूध-पोहे तरी दे.'' भेटायला आलेल्यांनी डोक्यावर हात मारून घेतला, दुसरं काय करणार?

नुसतं भरमसाठ खायला अक्कल लागत नाही, पचवायची ताकद हवी त्यासाठी. एकदा भरमसाठ खात गेलात की तुमच्या पोटाला नाइलाजाने सवय होते. अर्थात त्याचे दुष्परिणाम इतके वाईट की माणसं बारीक होण्याचा नाद सोडून देतात. पण मला कायम एक खंत वाटत आलीये. स्वत:चं स्वत:ला का कळत नसावं? अति खाणं हे कर्जासारखं आहे, नंतर फेडायचंय ते सव्याज. एक इंग्लिश कोट वाचलं होतं मागे, साधारण अशा अर्थाचं - 'कुणी पोट कमी करण्यासाठी पळतं, कुणी पोटासाठी पळतं.' माझ्या माहितीत एक माणूस आहे. गडगंज आहे. सलग चार महिने रोज, असेल त्या भावात डझनभर आंबे स्वत:साठी आणू शकतो; पण एकही फोड खाऊ शकत नाही... शुगर वाढते. माझ्या ओळखीच्या एक काकू होत्या, आता नाहीत. साखरेकडे बघितलं तरी शुगर वाढेल इतका डायबेटिस. एका लग्नात जिलेबीचे पाचेक सेंटीमीटर लांबीचे दोन तुकडे खाल्ले असतील, बाई घरी आल्यावर अर्ध्या तासात फुटबॉलसारखी सुजली होती. वीसेक हजारला पडले त्या काळी ते दोन तुकडे. मला अंगावर काटा येतो या कल्पनेने की ऐपत आहे पण खाऊ शकत नाही.

नुसतं आडमाप खाणं म्हणजे स्टॅमिना नव्हे, ते पचवण्याची ताकद असणं म्हणजे स्टॅमिना. कळेल तेव्हा कळेल, आपल्याला काय करायचंय म्हणा!  

9823318980

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/