भ्रष्ट खालिदा सध्या तरी तुरुंगात!

विवेक मराठी    16-Feb-2018
Total Views |

 

 

खालिदा झिया यांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. त्यांच्या अटकेने बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे भवितव्यच अंधारले आहे. या वर्षअखेरीस बांगला देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. खालिदा यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात केलेल्या या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण गेल्या दहा वर्षांपासून बांगला देशात गाजते आहे. ज्या झियांच्या नावाने हा अनाथालय विश्वस्त निधी चालवला जातो, त्याला देणगी देणे हा काही गुन्हा नाही; पण दिलेल्या देणगीच्या रकमेतून मोठी रक्कम काढून घेऊन ती अन्य काही जणांना द्यायची आणि त्या रकमेतून गब्तोली भागात २.७९ एकर जमिनीची खरेदी करून त्या जमिनीचा विनियोग स्वत:साठी करायचा, हा भ्रष्टाचार झाला. तो त्यांनी केला. न्यायालयानेच या निकालाला जोडून त्यांना निवडणूक लढवायला बंदी घातली आहे.

बांगला देशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पाच वर्षांची शिक्षा झाली आणि जणू काही आपल्यावर अन्यायाचा रणगाडाच फिरवला गेला असल्याचा आक्रोश त्यांच्या पक्षाने केला. बांगला देशात काही प्रमाणात हिंसाचार झाला, पण तो हाताबाहेर मात्र गेला नाही. खालिदा यांनी हा संघर्ष आता रस्त्यावरच सोडवायला हवा, अशा तºहेचा आक्रस्ताळेपणाही केला नाही, पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न रस्त्यावर नेला आणि हिंसाचार माजवलाच. त्यांच्या पक्षाला बांगला देश जमात ए इस्लामी या पाकिस्तानी हस्तक असणाऱ्या पक्षाचे पाठबळ लाभलेले आहे. खालिदा या बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या आहेत. सत्तेवर असताना त्यांनीच स्थापन केलेल्या ‘झिया ऑरफनेज ट्रस्ट’ या संस्थेला पंतप्रधान निधीतून दिलेल्या मोठ्या रकमेचा त्यांनी उघडउघड अपहार केल्याबद्दल त्यांना एका खास न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची  शिक्षा सुनावली. या शिक्षेला उपखंडीय राजकीय वर्तुळात रूढ असलेल्या पद्धतीनुसार त्यांनी रंग द्यायचा प्रयत्न केला, तरी न्यायालयाचा तो अवमान ठरेल या भीतीने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र त्यांना त्यात यश येईल आणि पुन्हा सत्तेवर यायचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरेल अशी शक्यता नाही. बांगला देशच्या पंतप्रधान आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसिना वाजेद यांनी खालिदा यांच्या शिक्षेपूर्वी एका जाहीर सभेत ‘खालिदा सध्या काय करतात?’ असा श्रोत्यांना उद्देशून सवाल केला होता आणि त्यास जमावातूनच ‘तुरुंग, तुरुंग’ असे उत्तर देण्यात आले होते. शेख हसिना या शेख मुजिबूर रहमान यांच्या कन्या आहेत आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी राजकारणात त्यांच्या विरोधकांवर मात केली आहे. हा संघर्ष मात्र दोन बेगमांचा नाही. तो राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह यांच्यातला नक्कीच आहे. तो सरळ मार्गाने जाणारे सामान्यजन आणि गुन्हेगारी राजकीय प्रवृत्ती यांच्यामधलाही आहे.

                खालिदा झिया यांचे हे प्रकरण एका भ्रष्टाचाराचे आहे आणि आणखी पाच प्रकरणे न्यायालयापुढे आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्यांचा मुलगा तारीक याला दहा वर्षांची शिक्षा झाली आहे आणि सध्या तो फरारी आहे. तो इंग्लंडमध्ये राहतो. खालिदा झिया या १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ या काळात बांगला देशच्या पंतप्रधानपदी होत्या. त्याच काळात तारीकने झिया चॅरिटेबल ट्रस्ट या त्याच्या आईने निर्माण केलेल्या विश्वस्त निधीच्या पैशावर डल्ला मारला. तो त्याच्या अंगाशी आला. त्या प्रकरणात खालिदा यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. या पैशातून या मायलेकांनी परेश बरुआ उर्फ कमरूझ झमान खान, नूर उझ्झमान, झमानभाई उर्फ पबन बरुआ याला लक्षावधी डॉलर्सची मदत केलेली आहे. तो सध्या बांगला देशात राहतो आणि तिथूनच ‘युनायटेड लिबरेशन फोर्स ऑफ आसाम’ (उल्फा) या दहशतवादी संघटनेचे काम चालवतो. सौदी अरेबियाच्या सध्याच्या राजपुत्राने भ्रष्टाचाराविरूद्ध जी मोहीम हाती घेतली आहे, त्यात सौदी अरेबियात उभारण्यात आलेल्या अनेक मॉलमध्ये खालिदा झिया यांनी १२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या खटल्यात त्यांना शिक्षा झाली, त्यात त्यांनी पंतप्रधान निधीतून अडीच कोटी डॉलर्स इतक्या रकमेचा विनियोग अन्यत्र केल्याचे उघडकीस आले. या पैशातून त्यांनी जमिनीचीही व्यक्तिगत खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. खालिदा यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांना किंवा त्यांच्या मुलाला निवडणूक लढवता येणे अशक्य होणार आहे. तरीही बांगला देश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी तारीकची निवड करण्यात आली आहे.

                काही दिवसांपूर्वी फासावर लटकवण्यात आलेला पाकिस्तानवादी युद्ध गुन्हेगार सलाहुद्दिन कादिर चौधरी याला बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या बैठकीत श्रद्धांजली वाहणारा ठराव संमत करण्यात आला. त्यावर बांगला देशाच्या प्रसारमाध्यमांमध्ये टीकाही झाली, पण त्या पक्षाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. याआधीही जमात ए इस्लामीच्या ६ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले, तेव्हाही या पक्षाने त्यांच्या बाजूने उभे राहून आपल्या विषारी वृत्तीचे प्रदर्शन मांडले होते. आपण अजूनही अत्याचार करणाऱ्या देशाच्या आणि व्यक्तींच्या बाजूने उभे राहू शकतो, हे दाखवून दिले. हा सलाहुद्दिन असो की गुलाम आझ्झम की अब्दुल कादिर मुल्ला की दिलावर हुसेन, या सर्वांनी पाकिस्तानी सैन्याला पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात ३० लाख जणांची कत्तल करण्यास मदत केली. या सैन्याने दोन लाख महिलांवर अत्याचार केले आणि तरीही जमात ए इस्लामी आज त्याच पाकिस्तानच्या बाजूने उभी असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे. या जमातचा मोतीऊर रहमान याला २०१३मध्ये अशाच हिंस्र पाशवी गुन्हेगारीसाठी फाशी दिले असता बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीने त्याची बाजू घेतली. त्याने तर बांगला देशच्या स्वातंत्र्ययुद्धात ४८० जणांना ठार केले होते आणि असंख्य महिलांवर बलात्कार केला होता. ज्या पक्षाचे प्रमुखपद एका महिलेकडे आहे, त्याची ही विकृत बाजू आहे. ही टीका इतक्या टोकाची होती की आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तानच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या बांगला देश नॅशनॅलिस्ट पक्षाला कोणत्याही अर्थाने जनतेत जाऊन मते मागण्यासाठी तोंड राहणार नाही. जनरल झियाऊर रहमान यांनी या पक्षाची स्थापना केली. ते खालिदा यांचे पती. त्यांना सैन्याच्या ‘वीरोत्तम’ या शौर्यपदकाने गौरवण्यातही आलेले आहे. जनरल झियाऊर रहमान सत्तेवर आले, तेव्हा लष्करी राजवटींचे अनेक चढउतार चालू होते. शेख मुजिब यांच्यासह २० जणांना ठार करून अध्यक्षपद घेणाऱ्या जनरल खोंडकर मुश्ताक अहमद यांनी जाहीर केलेल्या लष्करी कायद्याचा फायदा घेत झियाऊर रहमान यांनी सत्ता हस्तगत केली. वास्तविक शेख मुजिब यांनी त्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सनदेचे वाचन करायचा बहुमान (२६ मार्च १९७१) दिला होता. १९७७मध्ये अध्यक्षपद ताब्यात घेतल्यावर त्यांनी बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीची स्थापना केली. आधीच्या लष्करी कारकिर्दीत लेखन, मुद्रण आणि भाषण यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती, ती त्यांनी दूर केली आणि सर्वांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला मोकळीक दिली. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांगला देश, भूतान आणि नेपाळ या आठ देशांच्या ‘साउथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन’ म्हणजेच ‘सार्क’ या संघटनेचे ते प्रणेते आहेत. आधीच्या काळात लष्करी अधिकारी असतानाही एका स्वतंत्र पक्षाची स्थापना करून बांगला देशला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबाव वाढला. स्वत:लाच त्यांनी लेफ्टनंट जनरल पद बहाल केले आणि नंतर त्या पदावरून ते निवृत्तही झाले. त्यांनी आपल्या पक्षाला बांगला देशाच्या राजकारणात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले, हे लक्षात घेण्याजोगे आहे. ३० मे १९८१ रोजी चित्तगावमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याकडून त्यांचा खून झाला. हे सर्व अशासाठी सांगितले की, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात नदीम कादिर या पत्रकाराने त्यांच्याविषयी अतिशय स्फोटक अशी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात नदीम म्हणतात, की बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या बैठकीत पाकिस्तानच्या हस्तकांच्या बाजूने जेव्हा देशद्रोही ठराव संमत झाला, तेव्हा त्याचे आपल्याला तितकेसे आश्चार्य वाटले नाही. याचे कारण त्या पक्षाची निर्मिती करणाऱ्यांच्या सगळ्या चाली अगदी सुरुवातीपासूनच देशद्रोहाच्या आरोपाच्या चौकटीत बसतील अशाच आहेत.

   नदीम यांनी ‘मुक्तियुद्ध, ओजना ओद्धाय’ या बंगाली पुस्तकात लिहिलेली हकीकत थक्क करून सोडणारी आहे. ते लिहितात, ‘झियाऊर रहमान आणि त्यांच्या पत्नी खालिदा हे दोघे आमच्या घरी माझ्या वडलांकडे आले होते. माझे वडील लेफ्टनंट कर्नल एम. अब्दुल कादिर हे झियाऊर यांना सात वर्षांनी ज्येष्ठ होते. बांगला देशच्या स्वातंत्र्याआधीची ही घटना आहे. खालिदा आणि माझी आई या दोघी स्वतंत्र दालनात निघून गेल्या. जेव्हा माझ्या वडलांनी मेजर झियाऊर रहमान यांना “शेख मुजिब यांच्या आवाहनानुसार तुम्ही ‘प्रतिकार दलात’ दाखल होणार का?” असा सवाल केला, तेव्हा झियाऊर यांनी उत्तर दिले की, “नाही सर, ते शक्य नाही. मला स्वत:ला बांगला देश निर्माण होईल की नाही याचीच शंका आहे. पाकिस्तानी सैन्याकडून देशद्रोही म्हणून मला फासावर लटकवून घ्यायचे नाही, तेव्हा मी का म्हणून स्वत:वर पाकिस्तानचा रोष ओढवून घेऊ?” एवढ्या मोठ्या नरसंहारानंतर आणि स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या प्रचंड आहुतीनंतरही एका लष्करी अधिकाऱ्याने ‘प्रतिकार दलात’ दाखल व्हायला नकार दिला आणि तोच पुढे बांगला देशचा अध्यक्ष झाला. मुजिब यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांना ढाक्यात एका लष्करी उठावात ठार करण्यात आले, तेव्हा कन्या हसिना आणि रेहाना या तेव्हाच्या पश्चिम जर्मनीत होत्या आणि त्यामुळेच त्या वाचल्या. हसिना या पुढे शेख मुजिब यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्या बनल्या. मात्र त्या बांगला देशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या नाहीत. बेगम खालिदा झिया या १९९१मध्ये पंतप्रधान बनल्या आणि सलग नाही, तरी दहा वर्षे त्या सत्तेवर राहिल्या आहेत.

    खालिदा झिया यांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. त्यांच्या अटकेने बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे भवितव्यच अंधारले आहे. या वर्षअखेरीस बांगला देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. खालिदा यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात केलेल्या या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण गेल्या दहा वर्षांपासून बांगला देशात गाजते आहे. ज्या झियांच्या नावाने हा अनाथालय विश्वस्त निधी चालवला जातो, त्याला देणगी देणे हा काही गुन्हा नाही; पण दिलेल्या देणगीच्या रकमेतून मोठी रक्कम काढून घेऊन ती अन्य काही जणांना द्यायची आणि त्या रकमेतून गब्तोली भागात २.७९ एकर जमिनीची खरेदी करून त्या जमिनीचा विनियोग स्वत:साठी करायचा, हा भ्रष्टाचार झाला. तो त्यांनी केला. न्यायालयानेच या निकालाला जोडून त्यांना निवडणूक लढवायला बंदी घातली आहे. आपल्याला या खटल्यात शिक्षा दिली जाणारच आहे, असे विधान त्यांनी आदल्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. म्हणजे त्यांना या शिक्षेबद्दलची खात्री होती, असा त्याचा अर्थ होतो. हा निकाल अवामी लीगनेच निश्चित केला आहे आणि तो त्या न्यायाधीशांचा नाही, असेही त्या म्हणाल्या.

     खालिदा झिया यांच्या पक्षाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता आणि त्यामुळे बेगम हसिना यांना त्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यानंतर बेगम खालिदा यांना कदाचित त्याबद्दल पश्चात्ताप झाला असेल, पण त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागलेला आहे. समजा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या, तरी त्यांची तुरुंगातली जागा निश्चित होती. त्यांच्यावर असलेल्या एका खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि अन्य ३४ खटले त्या मार्गावर आहेत. कोमिल्ला न्यायालयाने त्यांच्यावर असलेल्या दोन खटल्यांचे आरोपपत्र दाखल करून घेतलेले आहे. त्यात एका खटल्यात बस जाळल्याबद्दलचा खटला आहे. त्यात एक जण जळून मृत्युमुखी पडला. ती बस जाळण्यामागे खालिदा यांची चिथावणी होती, म्हणून तो मृत्यूही खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. लक्षात घ्या, त्या बांगला देशच्या माजी पंतप्रधान, एका माजी लष्कर प्रमुखाच्या आणि माजी अध्यक्षाच्या पत्नी आहेत, म्हणून त्यांच्या गुन्ह्यांना माफी नाही. (हा राजकीय गुन्हा असल्याचा दावा करून खटले मागे घेण्याची ‘प्रथा’ त्या देशात नाही.) दुसऱ्या एका प्रकरणात एका बसवर पेट्रोलबाँब फेकल्यानंतर आठ जण मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या या खुनामागे खालिदा झिया आहेत, असा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. न्यायालयाने एवढाच आदेश दिला की, या प्रकरणात असणारी एक  महिला राजकारणी असल्याने तसेच त्या सत्तरीच्या पुढे असल्याने त्यांना तुरुंगात प्रथम वर्गाची वागणूक द्यावी, पण त्यांना तुरुंगात ठेवले जावे. त्या वेळी त्यांच्या वकिलाने न्यायालयास स्पष्ट केले की, त्यांना सर्वसाधारण वर्गाच्याच बराकीत आदल्या रात्री ठेवण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्यांना रात्रीच्या वेळी स्वतंत्र काळजीवाहू बराकीत ठेवले जावे असा आदेश दिला. याचा अर्थ त्या दिवसा नेहमीच्या तुरुंगात राहतील असा घेतला गेला आणि पोलिसांनी त्याचे तंतोतंत पालन केले. आता इतर ३३ खटले सुनावणीसाठी घेतले जातील, तेव्हा त्यांचे काय होईल ते सांगता येणे अवघड आहे.

               या सर्व प्रकरणांवरून एकच निष्कर्ष काढता येऊ शकतो, की त्यांनी बांगला देशच्या स्वातंत्र्ययुद्धात गद्दारी करणाऱ्यांच्या आणि हिंसाचार, खून, बलात्कार घडवणाऱ्यांच्या बाजूने आपल्या पक्षाला उभे केले, या त्यांच्या बेशरम देशद्रोही कृत्याने त्या देशाच्या सामान्यातल्या सामान्य माणसात प्रचंड संताप आहे आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला न्यायालयीन कामकाजावर आणि त्यांच्या एका खटल्याच्या निमित्ताने केलेल्या लिखाणातून दिसून येते. म्हणूनच पंतप्रधान हसिना यांनी जेव्हा वर उल्लेख केलेल्या सभेत समाजाला उद्देशून विचारले की “बेगम खालिदा सध्या काय करतात?” तर त्याचे उत्तर सहजच दिले जाते आणि ते म्हणजे, “भ्रष्ट खालिदा सध्या तरी तुरुंगात आहेत.”

 अरविंद व्यं. गोखले

९८२२५५३०७६