बोलभांडांचे 'प्रेम'

विवेक मराठी    17-Feb-2018
Total Views |

जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे तेथील जनजीवन विस्कळीत होत असते, त्याचप्रमाणे भारतीय लष्करी तळांवरही हल्ले केले जातात. भारतीय सैन्यदल त्याला उत्तर देत असते. नुकताच जम्मू-काश्मीरमधील सुंजवान या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देताना भारतीय सैन्यदलाचे सहा जवान हुतात्मा झाले, एक नागरिक मृत्युमुखी पडला, तर तीन दहशतवादी ठार झाले. आपले सैन्यदल पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करत असताना त्याच्या मनोधैर्याला तडा जाईल आणि सैन्यदलातही जातिधर्माच्या आधाराने फूट पाडता येईल अशी इच्छा असणारेही आपल्या देशात आहेत, याचा प्रत्यय या घटनेमुळे आला आहे.

खा. ओवेसी यांनी आपल्या मनात सळसळणारे कट्टर धार्मिकतेचे जहर प्रसारमाध्यमांतून व्यक्त केले आहे. सुंजवान घटनेनंतर बोलताना ते म्हणाले, ''लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला होता. यात हुतात्मा झालेले जवान मुस्लीम होते. आता मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेणारे कुठे आहेत?'' खा. ओवेसी यांच्या सुरात सूर मिसळत दिल्लीतील काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित म्हणाले की ''मुस्लीमही देशभक्त असतात.'' खा. ओवेसी आणि संदीप दीक्षित यांच्या वक्तव्याला मुस्लीम मतपेढीची किनार आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही आणि त्यावर फार भाष्यही करण्याची गरज नाही. लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी खा. ओवेसीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहेच. खा. ओवेसीला उत्तर देताना ते म्हणाले, ''हुतात्मांना कोणताही धर्म नसतो. त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. हुतात्म्याच्या धर्मावर भाष्य करणाऱ्यांना सैन्याची पुरेशी माहिती नाही.''

खा. ओवेसी आणि संदीप दीक्षित यांचे व्यक्तव्य आपण गंभीरपणे घ्यायला हवे, कारण आपल्या देशात राष्ट्रभक्तीची धार्मिक विभागणी करण्याची त्यांची ही पध्दती म्हणजे देशात आणि सैन्यदलात विभागणी करणारी आहे, म्हणून तिची दखल घ्यायलाच हवी. 'जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, या देशावर प्रेम करतो, या देशाच्या जडणघडणीत आपली समिधा तनमनधनपूर्वक अर्पण करतो, देशासाठी स्वतःचे प्राणही अर्पण करायला मागेपुढे पाहत नाही, तो देशभक्त' अशी देशभक्तीची साधी सरळ व्याख्या  आहे. त्याच्याशी धर्माचा आणि जातीचा काहीही संबंध नाही. खा. ओवेसीसाठी अशा देशभक्तीचे जळजळीत उदाहरण म्हणजे अब्दुल हमीद होय. 1965च्या युध्दात अतुलनीय कृतीतून अब्दुल हमीद यांनी आपली देशभक्ती प्रकट केली होती आणि ही देशभक्ती प्रकट करण्यासाठी त्यांना धर्म आडवा आला नाही की भारतीय जनतेला त्यांच्या धर्माची चौकशी करण्याची गरज वाटली नाही. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे होय. भारतीय स्वातंत्र्यलढयात अनेक मुस्लीमांचा सहभाग राहिला, तो धार्मिक अंगाने नव्हे, तर या देशाचे नागरिक म्हणून होता. या इतिहासावर, या आदर्शावर कधी खा. ओवेसीने भाष्य केले नाही, की त्यांना त्याचा वारसा वाटला नाही. खा. ओवेसी आणि संदीप दीक्षित यांच्यासारख्या बोलभांडांना या आदर्शांची जाणीव असण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्यांना देश, देशभक्ती या गोष्टींशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना हवा मताचा जोगवा. त्यासाठी नको त्या गोष्टींनाही ते धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्न करत आहेत. सैन्यदलातील सर्वच सैनिक भारताचे सैनिक असतात आणि ते भारतीय म्हणूनच शत्रूशी लढत असतात. त्यांची ही लढाई भारताच्या शत्रूशी असते. म्हणूनच अब्दुल हमीद अतुलनीय पराक्रम करू शकतात. खा. ओवेसी, दीक्षित यासारख्या मंडळींना सैन्यदलाची मानसिकता समजून घेण्याची गरज वाटत नाही, कारण त्यांना अशा एकात्म आणि राष्ट्रनिष्ठ विषयांचे वावडे आहे. त्यांना फक्त लांगूलचालन करायचे आहे. काहीही करून मुस्लीम समाज वेगळा पडला पाहिजे, त्याला कायम असुरक्षित वाटले पाहिजे आणि या मंडळींना त्याने मतांचे दान भरभरून दिले पाहिजे, एवढयाचसाठी तर त्यांचे प्रेम उतू जात असते. आणि मग जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा तेव्हा ही मंडळी आपला बोलभांडपणा दाखवून देतात.

आपल्या देशात अशा बोलभांडांची काही कमी नाही. मुस्लीम समाजाच्या प्रेमाच्या आणि पाकप्रेमाच्या अनेकांना अधूनमधून उकळया फुटत असतात. या सर्वांचे मेरुमणी आहेत मणिशंकर अय्यर. मणिशंकर अय्यर या पाकधार्जिण्या माणसाचा इतिहास जसा लाळघोटेपणाचा आहे, तसा अराष्ट्रीय कृत्यांचाही आहे. 1962च्या युध्दात चीनसाठी आर्थिक मदत गोळा करणारा हा इसम पाकिस्तानबाबतही फारच हळवा आहे. या हळवेपणाचा स्फोट अधूनमधून होत असतो. नुकताच हा इसम पाकिस्तानमध्ये जाऊन बरळला आणि आपल्याच देशाला तेथून सल्ला दिला, ''मी पाकिस्तानवर प्रेम करतो. कारण मी भारतावरही प्रेम करतो. भारताने आपल्या शेजारी देशावर प्रेम केले पाहिजे.'' जो देश सीमेवर सातत्याने कुरबुरी करतो आहे, आपल्या देशात दहशतवादी पाठवून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यावर प्रेम करण्याचा सल्ला मणिशंकर अय्यर देतात. हाच मणिशंकर काही दिवसांपूर्वी म्हणाला होता, ''पाकिस्तानला शांतता हवी असेल तर भाजपाला हटवून काँग्रेसला सत्तेवर बसवा.'' अमेरिकेच्या दबावामुळे ज्या हाफिज सईदला पाकिस्तानने आतंकवादी घोषित केले, त्या कुविख्यात दहशतवाद्याला 'हाफिजसाहेब' म्हणून गौरवण्यात मणिशंकर आघाडीवर होता. असा बोलभांडगिरीचा इतिहास असणाऱ्या मणिशंकर अय्यरला पाकप्रेमाचा सातत्याने उमाळा येत असतो. पकिस्तान आणि मुस्लीम यांची दाढी कुरवाळली की मतांची बेगमी मिळते, असा मणिशंकर अय्यर यांचा समज असावा. गुजरातच्या निवडणुकीत बेताल विधान करूनही त्याचा काहीही फायदा झाला नाही. पण त्याची बोलभांडगिरी समाजाने अनुभवली आहे. आपला देश, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी त्यांचे कसल्याही प्रकारचे देणेघेणे नाही. त्यांचे हे बेगडी मुस्लीमप्रेमही आता उघडे पडू लागले आहे. या बोलभांडांचे खरे रूप देशातील सर्वच नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. समाजमाध्यमांतून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्या पाहता अशा बोलभांडांना आपली दुकाने लवकरच बंद करावी लागतील, हे मात्र नक्की.