स्वाईन फ्ल्यू (भाग 2)

विवेक मराठी    17-Feb-2018
Total Views |

 


 स्वाईन फ्ल्यू हा संसर्गजन्य आजार आहे, हे आपण मागील लेखात बघितलं. म्हणूनच शक्यतो हा आजार होणार नाही याची काळजी घ्यावी. ही काळजी फक्त स्वत:पुरती मर्यादित नसावी. आपल्या शरीरात आजाराचे विषाणू असतील तर आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्याची लागण होऊ  नये ही खबरदारी घेणेदेखील प्रतिबंधक उपायांमध्ये अंतर्भूत आहे. त्यासाठी

1) हात नेहमी शिकेकाई किंवा रिठयाने अथवा गरम पाण्याने धुवावे. (ही सवय कुठल्याही संसर्गजन्य आजारासाठी प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी ठरते. 'शेर कभी अपने पंजे धोया नाही करते' वगैरे डायलॉग शेरालाच शोभतात. कारण तो स्वाईन फ्ल्यूला घाबरत नाही.)

2) गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

3) ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे.

4) हस्तांदोलन करणे अथवा आलिंगन देणे टाळावे.

5) खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

6) पुरेशी झोप घ्यावी.

7) संतुलित आणि ताजा आहार घ्यावा.

8) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. (आपल्या देशातील लोकांना ही सवय कशी आणि कधी लागणार हा मोठ्ठा प्रश्न आहे. पादचारी काय किंवा वाहनात असलेले लोक काय, रस्त्यावर बिनधास्त थुंकत असतात. थुंकणारा माणूस बघितला नाही असा एकही दिवस जात नाही, हे फार दुर्दैव आहे. काही सांगायला गेले तर लोक शिवीगाळच करायला लागतात, हे तर त्याहून वाईट.)

9) तोंडावर मास्क लावावा.

10) या आजारावर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. तिचे दुष्परिणाम जाणून घेऊन सारासार विचारपूर्वक तिचा वापर करावा.

स्वाइन फ्लूची लक्षणं ही सर्वसाधारण फ्लूसारखीच असतात. यात बारीक थंडी वाजत राहणे किंवा थंडी वाजून येणे,  १०० अंश फॅ. पेक्षा जास्त ताप, सर्दी (वाहणारी), खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व क्वचित कधीतरी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

साधी सर्दी आणि स्वाईन फ्ल्यू  यातील फरक कसा ओळखावा?

फ्लूची लक्षणं सर्दीच्या लक्षणांच्या मानाने काही काळ अगोदर दिसू लागतात. सर्दीच्या लक्षणांपेक्षा  स्वाईन फ्ल्यूची  लक्षणे अधिक तीव्र स्वरूपाची असतात. स्वाईन फ्ल्यू झालेल्या व्यक्तीला दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणा जाणवत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते. त्यानंतर डोकेदुखी व घसादुखी चालू होते. मग ताप आणि अंगदुखी चालू होते.

खालील तक्ता सर्दी आणि स्वाईन फ्ल्यू यातील भेद कळून घेण्यास  मदत करू शकेल.

 

 तपासणी

घशातील स्त्रावाची प्रयोगशाळेत तपासणी करून या आजाराचे निश्चित निदान करता येते. बऱ्याच वेळा हा स्त्राव जमा करण्याची पध्दतच रुग्णाला जास्त त्रासदायक ठरते. खाजगी प्रयोगशाळांमधील ही निदानप्रक्रिया काहीशी खर्चिकदेखील आहे.

साध्यता  

मुळात हा आजार प्राणघातक नाही. (जे मृत्यू होतात ते बऱ्याच वेळा अन्य आजारामुळे झालेले असतात.) योग्य उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो. हे लक्षात घेतले तर भीती दूर होऊन आजार बरा व्हायला मदत होते.

उपचार

1) कामाला सुट्टी देऊन पूर्ण विश्रांती घ्यावी. अगदी स्नानाचे परिश्रमसुध्दा शरीराला देऊ नयेत. अशक्तपणा जाईपर्यंत ही विश्रांती चालू ठेवावी.

2) टॅमी फ्ल्यू हे यावरील औषध भारत सरकारने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. परंतु स्वाईन फ्ल्यूचे विषाणू शरीरात नसताना त्याचा प्रयोग केल्यास त्या औषधाचा प्रभाव नाहिसा होतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. अन्य उपचार योग्य वेळी आणि योग्य पध्दतीने केले तर या औषधाची गरज लागतेच असे नाही.

3) लोकसंपर्क शक्य तितका कमी करावा.

4) आहारात गरम आणि पातळ पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्यावेत. उदा. भाजलेल्या तांदळाची पेज, मूग किंवा मसूर शिजवून त्यावरील पाणी (याला शास्त्रात यूष म्हणतात. यात जिरपूड आणि मीठ घालून घेता येते.), लाह्यांची पेज इ.

5) तहान लागल्यावर गरम पाणी प्यावे.  नागरमोथा, सुंठ, पटोल या चूर्णांचे 15 गॅ्रम मिश्रण अर्धा लिटर पाण्यात घालून उकळावे. तहान लागल्यावर हेच पाणी प्यावे. (थर्मासमध्ये ठेवल्यास गरम राहते.)

6) भूक असेल तरच आहार घ्यावा. अन्यथा लंघन करावे. भूक नसताना केलेल्या लंघनाने अशक्तपणा वाढत नाही. उलट अग्नी प्रदीप्त झाल्याने, आधीच्या अपचनाचे परिणाम निस्तारून अशक्तपणा कमी व्हायला मदत होते. मात्र लंघन कधी थांबवायचे यासाठी वैद्यांचा सल्ला घ्यावा.

7) घसादुखीसाठी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. काही जण दूध-हळद घेतात, पण ते चुकीचे आहे. कफाचे स्त्राव असताना दूध घेऊ नये. हळद पाण्यासोबत किंवा मधात कालवून घ्यावी.

8) ताप, डोकेदुखी, अंगदुखी यावर आपल्या नेहमीच्या वैद्यांकडून औषध घ्यावे.

9322790044