केळवे - एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ

विवेक मराठी    19-Feb-2018
Total Views |

केळव्यातील पर्यटन विकास लक्षात घेऊन या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांचे एकत्रीकरण होऊन 2008 साली एक संस्था स्थापन झाली. 'केळवा बीच पर्यटन उद्योग विकास संघ' हे तिचे नाव. 'जे दिसते ते विकते' या उक्तीप्रमाणे पहिल्यांदाच 'केळवे बीच पर्यटन महोत्सव 2018' या दोन दिवसीय महोत्सवाचे केळव्यात आयोजन करण्यात आले होते.

केळव्यातील पानमळे, केळी-नारळाच्या बागा, किनाऱ्यालगत असलेली सुरूची बने, रंगीबेरंगी पक्ष्यांचा किलबिलाट, कधीतरी समुद्रकिनाऱ्यावर येणारे परदेशी (पक्षी) पाहुणे, घोडागाडी-उंटाची सफर, गावातील टुमदार घरे, वाडया, मिठागरे, विशाल आणि स्वच्छ समुद्रकिनारा, ताजे मासे, ताजी भाजी आणि तेथील नीरव शांतता, त्याबरोबरच घरगुती भोजनाचा आस्वाद ही पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जानेवारी महिन्यात संक्रांत उत्सवात केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडहंडी ही केळव्याची खासियत आणि याचा स्वाद घेण्यासाठीदेखील काही पर्यटक केळव्यास आवर्जून भेट देतात.

केळवे गावाला पौराणिक संदर्भ आहेत. पुराणकाळात या प्रदेशाला कर्दळीबन म्हणून ओळखले जात होते. 'महिकावतीची बखर' या ग्रंथात केळवे गावाचा पुरातन इतिहास वाचावयास मिळतो.  वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर जमिनीत बाण मारला. तेथे एक कुंड (रामकुंड) तयार झाले. हजार-पंधराशे वर्षांपूर्वी रामकुंडाच्या समोरच्या जागेत जमिनीखाली सुप्तावस्थेत असलेल्या शितलादेवीने तत्कालीन गोपाळपंथीयांना दृष्टान्त देऊन आपली पुनःस्थापना करण्याचे संकेत दिले. आज हीच शितलादेवी महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

केळव्याचे चरितार्थाचे साधन म्हणजे शेती आणि मच्छीमारी हे होते. आज या दोन्ही गोष्टींना पर्यटन व्यवसायाची साथ लाभली आहे. साधारणपणे 1980 सालाच्या दरम्यान केळवे गावात भाविकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ सुरू झाली. त्या वेळी वन डे पिकनिकसाठी येणेच पर्यटक पसंत करत, कारण केळव्याला राहण्याची सोय नव्हती आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. भविष्यात केळवा गावाचा विकास आणि पर्यायाने गावकऱ्यांचा विकास पर्यटन क्षेत्रात होऊ शकतो, हा विचार केळवे बीच पर्यटन महोत्सव 2018चे अध्यक्ष हरिश्चंद्र (बालम) चौधरी यांच्या मनात आला आणि त्यांनी 1988 साली आपल्या मुकुंद आबा वाडीत पर्यटकांसाठी दोन खोल्या बांधल्या. खऱ्या अर्थाने तेव्हाच केळव्यात पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.

केळव्याचा पर्यटन व्यवसाय आता खूपच बहरत चालला आहे. आज केळव्यात एकूण 61 रिसॉर्ट्स व हॉटेल्स आहेत. राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था होत आहे. त्याचप्रमाणे अनेक स्टॉलधारक, किरकोळ विक्रेते, उंट-घोडागाडीवाले, बीचबाईकवाले, असे 157 छोटे धंदेवाईक असून त्यातून अनेक जणांना रोजगार निर्माण झाले आहेत. व्यक्तीच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार त्याला केळव्यात रोजगार उपलब्ध होत आहे. केळव्याचे स्वरूप आता बदलले आहे. केळवे फक्त वाडी-बागा, मच्छीमारी एवढयापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर केळवे हे एक पर्यटन केंद्र झाले आहे, दिवसेंदिवस अधिकच विकसित होऊ लागले आहे.

 

केळव्यातील पर्यटन विकास लक्षात घेऊन या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांचे एकत्रीकरण होऊन 2008 साली एक संस्था स्थापन झाली. 'केळवा बीच पर्यटन उद्योग विकास संघ' हे तिचे नाव. या संस्थेअंतर्गत पर्यटन व्यवसायात काम करताना येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावे लागते, त्याचा सामूहिक पातळीवर विचार करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातात. शासन, पर्यटन विकास महामंडळ आणि प्रत्यक्ष पर्यटक या तिन्ही पातळयांवर परस्परपूरक धोरण राबवून काम केले जाते. पर्यटन व्यवसायातील संधी पाहता वेगवेगळया मान्यवरांचे मार्गदर्शनही घेतले जाते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 'न्याहारी निवास' योजना आहे. या योजनेअंतर्गत केळव्यातील संबंधित अनेक लोक या योजनेचा लाभ घेतात. आपल्या अडचणी, शासनाचे सहकार्य आणि उद्योजकांचे संघटन या गोष्टी लक्षात घेऊन ही संस्था वाढवली आहे. पण हे करताना केवळ उद्योजकांच्या समस्या, प्रश्न यावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर ज्या भूमीवर आपण व्यवसाय करतो, त्या भूमीचे आपण उतराई झाले पाहिजे, ही येथील उद्योजकांची भूमिका. या भूमिकेतूनच या संस्थेने सुरूच्या बागेत कचऱ्याच्या पेटया ठेवल्या आहेत, मंदिर परिसरात भाविकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. ज्या गोष्टींतून नफा होतो, त्याचे संवर्धन आणि सौंदर्य जपणे, ही आपली जबाबदारी आहे ही येथील उद्योजकांची भावना.

पर्यटन म्हणून केळवे गावाच्या विकासाबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना केळवे गावाची ओढ निर्माण व्हावी, हा केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ स्थापनेचा मूळ उद्देश. हा उद्देश डोळयासमोर ठेवून तो कृतीत आणण्याच्या प्रयत्न संघ करत आहेत. आज उद्योजकांची संख्या गुणाकाराने, तर पर्यटकांची संख्या बेरजेच्या संख्येने वाढत आहे. याचा ताळमेळ राखणे, पर्यटकांचा ओघ कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणे, पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचा संघटितपणे तोडगा काढणे, पर्यटन व्यवसायाशी संबंधित कार्यशाळा, पर्यटन क्षेत्रातील कायदे, नियम, व्यवसायात वाढ यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिबिरे, व्याख्याने, तसेच उद्योजकांचे समुपदेशन, आधुनिकता, व्यवसायातील शिस्त, काटेकोरपणा, जेणेकरून केळवे गावातील पर्यटनाची पत आणि प्रतिष्ठा सुधारून केळवे गाव पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण करेल. पर्यटन क्षेत्रात केळवे गावाची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधता येईल यासाठीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व परिसराची माहिती करून देण्यासाठी पर्यटन महोत्सवासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

'जे दिसते ते विकते' या उक्तीप्रमाणे पहिल्यांदाच 'केळवे बीच पर्यटन महोत्सव 2018' या दोन दिवसीय महोत्सवाचे केळव्यात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात केळव्यातील पर्यटन, नैसर्गिक सृष्टिसौंदर्य यांचा प्रचार व प्रसार करून पर्यटन व्यवसायात वृध्दी करणे तसेच येथील वैविध्यपूर्ण स्वादिष्ट खाद्यसंस्कृती, लोककला व परंपरा यांचा बाहेरील जगाला परिचय करून देणे, हाच या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे.

केळवे बीच पर्यटन महोत्सव जानेवारीत आदर्श विद्या मंदिर पटांगण येथे दोन दिवस आयोजित करण्यात आला होता. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भांडारी आणि आमदार, महाराष्ट्र विधानसभा मनीषाताई चौधरी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून आमदार अमितजी घोडा, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, माजी मंत्री राजेंद्र गावित, कार्याध्यक्ष, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे, विरार-वसई महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील, तसेच नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड ऍग्रिकल्चर फाउंडेशनचे डॉ. राजीव चुरी, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र चौधरी, उपाध्यक्ष आशिष पाटील, केळवे ग्रामपंचायत सरपंच भावना किणी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी 'पर्यटन विशेषांक 2018'च्या अंकाचे दिवंगत खा. वनगा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मा. रमेश पतंगे यांच्या हस्ते फेसबुक लिंकचेही प्रसारण करण्यात आले.

केळवे गाव पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार हा या महोत्सवाचा उद्देश तर होताच. पर्यटन उद्योग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्यापैकी समस्यांवर गावकरी आणि केळवा बीच पर्यटन उद्योग विकास संघ आपल्या परीने या अडचणींवर मात करत असते. परंतु अशा काही गोष्टी आहे, त्या फक्त सरकारच्या हस्तक्षेपानेच साध्य होऊ शकतात. त्यासाठी या संघाने सरकारकडे निवेदनदेखील केले आहे. पर्यटन विकास आणि पर्यटनाची गती साध्य करायची असेल, तर सरकारने काही गोष्टी पुरविल्या, तर केळवे गाव फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत न राहता पर्यटन क्षेत्रात ते जगाच्या पटलावर आपले स्थान निर्माण करू शकेल.

  केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे सरकारला निवेदन

* केळवे परिसरात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तीन तलावांचे (वडाळा तलाव, जोगाळे तलाव, कालिका माता मंदिर तलाव) खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढविता येऊ शकते. शिवाय त्यांचे सुशोभीकरण करून हे तिन्ही तलाव पर्यटकांना बोटिंगसाठी उपलब्ध करता येतील आणि रोजगार निर्माण होईल.

* बायपास रोड - पर्यटकांचा वाढता ओघ पाहता केळव्यात बायपास रोड व्हावा, तो असा - शितलादेवी मंदिर, देवीपाडाच्या मागून नारतळे, शिऱ्यादेव, दादरपाडा ते केळवे पूलनाका अंदाजे दोन किलोमीटर अंतर होईल. तसेच केळवे गावाकडे येणारे सर्व रस्ते संलग्न करून त्यांची दुरुस्ती व केळवे स्थळदर्शक फलक जागोजागी लावणे आवश्यक आहे.

* टेट्रोपोल धूप प्रतिबंधक बंधारा - केळवे समुद्रकिनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी दीड ते दोन कि.मी. किनाऱ्यालगत हा बंधारा बांधणे आवश्यक असून त्यास शासनाची मंजुरीही मिळाली आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही.

* वीज प्रवाहाची समस्या - केळव्यातील विजेची समस्या ही पर्यटनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आणि पर्यटन उद्योगावर याचा परिणाम होत आहे. यासाठी भूमिगत विद्युतवाहिन्या, प्रमाणशीर ट्रान्सफॉर्मर्सची संख्या व क्षमता वाढविणे, तसेच केळव्यासाठी 33 kv स्वतंत्र फीडर देणे गरजेचे आहे.

* किल्ल्यांचे संवर्धन - केळवे गावातील पुरातन किल्ले व पाणकोट यांची डागडुजी, नूतनीकरण आणि सुशोभीकरण केल्यास केळव्याचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि पर्यटनास गती प्राप्त होईल.

  9594961859