संघ आणि छ. शिवाजी महाराज

विवेक मराठी    19-Feb-2018   
Total Views |


RSS 

संघाचे काम देशव्यापी आहे आणि आता ते विश्वव्यापी आहे. सगळया भारतात शिवराज्याभिषेक दिन उत्सव म्हणून गेली अनेक वर्षे संघस्वयंसेवक साजरा करीत आहेत. शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नाहीत, कुठल्या एका जातीचे नाहीत, ते साऱ्या राष्ट्राचे आहेत, साऱ्या समाजाचे आहेत, ही भावना संघाने सर्व देशभर रुजविली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणत्याही व्यक्तीची पूजा होत नाही, व्यक्तीचा जयजयकारही केला जात नाही. संघाला गुरुस्थानी भगवा ध्वज आहे. गुरूपेक्षा संघात कुणी मोठा नाही. ही सर्व रचना, प्रथा, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सुरू केली. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यात काही ना काही दोष असतात, ती पूर्ण आदर्श होऊ शकत नाही.

एकदा काही स्वयंसेवकांनी प्रश्न विचारला की, ''कुण्या व्यक्तीला आदर्श मानायचे असेल तर, कुणाला मानावे?'' डॉक्टरांनी उत्तर दिले, ''छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानावे.'' आधुनिक काळातील शिवाजी महाराज हे पूर्ण आदर्श पुरुष होते. संघातील त्यांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांनी जो भगवा ध्वज आदर्श म्हणून पुढे ठेवला, त्याची जरी परंपरा हजारो वर्षांची असली, तरी तो शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा ध्वज होता. या ध्वजाच्या माध्यमातूनदेखील त्यांनी शिवाजी महाराजांशी आपली नाळ जोडली.

नागपूरात बॅरिस्टर अभ्यंकर या नावाचे नामवंत राजकीय नेते होते. ते संघाचे टीकाकार होते, परंतु डॉक्टरांचे मित्र होते. गप्पा मारताना डॉक्टरांनी त्यांना विचारले की, ''समजा, उद्या शिवाजी महाराज अवतरले, अशी बातमी तुम्हाला समजली तर तुम्ही काय कराल?'' अभ्यंकरांनी तत्काळ उत्तर दिले, ''मी आनंदाने पेढे वाटेन.'' डॉक्टर हसून म्हणाले की, ''संघ शिवाजी महाराजांचेच काम करतो आहे, तरी तुम्ही संघावर टीका का करता?''

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वयंसेवकांनी आपल्या समोर ठेवला पाहिजे, असे डॉक्टर अनेक वेळा सांगत. त्याचा अर्थ काय होतो? शिवाजी महाराजांची नक्कल करायची का? त्यांच्याप्रमाणे पोशाख करून कमरेला तलवार लटकवून राहायचे का? बाह्यरूपाची नक्कल करता येत नाही. शिवाजी महाराज म्हणजे चालता-बोलता जिवंत आदर्श, जिवंत हिंदू आदर्श.

मी केवळ माझे सुख मिळविण्यासाठी जन्माला आलो नसून ज्या समाजात माझा जन्म झाला आहे, त्या समाजाचे मी काही देणे लागतो. म्हणून मी समाजासाठी निरंतर काम केले पाहिजे आणि समाजासाठी जगले पाहिजे, हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श आहे.

हा देश माझा आहे, देशाची संस्कृती माझी आहे, देशातील सर्व लोक माझे बांधव आहेत, त्यांच्या उत्कर्षासाठी मी सतत प्रयत्न केला पाहिजे; माझ्या देशावर, माझ्या संस्कृतीवर जर कुणी आक्रमण केले, तर ते मी सहन करता कामा नये, त्याच्याविरुध्द संघर्ष केला पाहिजे; मी कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही, त्याच वेळी मी पारतंत्र्यातदेखील राहणार नाही, असा संकल्प म्हणजे शिवाजी महाराज.

शिवाजी महाराज म्हणजे आदर्श पुत्र. त्यांनी माता जिजाबाई यांच्या कोणत्याही आज्ञेचे कधी अवमूल्यन केले नाही. अफजलखानाच्या भेटीला जाताना आईसाहेब म्हणाल्या, ''वडिलांचे उसने फेडून या.'' म्हणजे त्यांच्या अपमानाचा बदला घेऊन या! शिवाजी महाराजांनी ते केले.

शिवाजी महाराज म्हणजे चारित्र्याचा सर्वश्रेष्ठ आदर्श. ''हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे.'' असे ते म्हणत. म्हणजे मी निमित्तमात्र आहे, हे राज्य जनताजनार्दनाचे आहे, अशीच त्यांची भावना होती. अफजलखानाच्या भेटीला जाताना, ''जर मला काही दगाफटका झाला, तर नेताजीच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा लढा चालू ठेवावा'' असे ते म्हणाले.


त्यांच्या उज्ज्वल चारित्र्यामुळे ते मातांना आपला मुलगा वाटत आणि स्त्रियांना आपला वडीलभाऊ वाटत. राझांच्या पाटलाने बलात्कार केला, महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. सिंधुदुर्गच्या ठाणेदाराने किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य पाठविण्यास दिरंगाई केली. महाराजांनी त्याला सुनावले, ''तुम्ही ब्राह्मण आहात, म्हणून तुम्हाला शिक्षा केली जाणार नाही, अशा भ्रमात राहू नका. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवील?'' असे होते शिवाजी महाराज.

सारा भारत मोगलांच्या तावडीतून मुक्त करावा, ही त्यांची महत्त्वकांक्षा होती. औरंगजेबाशी आपल्याला निर्णायक संघर्ष करावा लागेल, हे लक्षात घेऊन त्यांनी दक्षिणेतील पादशाही दक्षिणेच्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, हे सूत्र घेऊन मुसलमानी राजवटीशीदेखील हातमिळविणी केली.

कलियुगात म्लेंच्छ (अहिंदू) राज्य करणार असा एक समज झालेला होता. नंदकुळानंतर क्षत्रियांचा नाश झाला, असा समज करून देण्यात आला. महाराजांनी हा राष्ट्रघातक कलीधर्म गाडून टाकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक केला. हिंदू सिंहासन निर्माण केले. त्यांचा राज्याभिषेक ही त्या काळातील महान क्रांतिकारक घटना होती. डॉक्टरांनी शिवराज्याभिषेक दिन संघात 1925सालापासून उत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा निर्माण केली.

संघाचे काम देशव्यापी आहे आणि आता ते विश्वव्यापी आहे. सगळया भारतात शिवराज्याभिषेक दिन उत्सव म्हणून गेली नव्वद वर्षे संघस्वयंसेवक साजरा करीत आहेत. शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नाहीत, कुठल्या एका जातीचे नाहीत, ते साऱ्या राष्ट्राचे आहेत, साऱ्या समाजाचे आहेत, ही भावना संघाने सर्व देशभर रुजविली.

हिंदू जन्मताच सर्व उपासना पंथाचा आदर करणारा असतो. शिवाजी महाराजांनी धर्मावरून कुणाचा छळ केला नाही, कोणती मशीद पाडली नाही की चर्च पाडले नाहीत. परंतु त्यांनी एकतर्फी सहिष्णुता पाळली नाही. गोव्यातील दोन ख्रिश्चन पादरी त्यांच्या हातात सापडले. महाराजांनी त्यांना सांगितले, ''बळजबरीने धर्मांतर करू नका.'' पादरी म्हणाले,''धर्मांतर करणे हा आमचा धर्म आहे.'' महाराज म्हणाले,''असे काम करणाऱ्यांचा शिरच्छेद करणे हा आमचा धर्म आहे.''

डॉक्टरांचे स्वयंसेवकांना सांगणे असे की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचे अनुसरण करावे. शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥ शिवरायांचे चालणे कैसे। शिवरायांचे बोलणे कैसे। शिवरायांचे सलगी देणे। कैसे असे॥ याचे अनुसरण स्वयंसेवकांनी करावे. याचा अर्थ असा झाला की, या शिवचारित्र्य धर्मापेक्षा जो वेगळा वागेल, त्याला स्वयंसेवक कसे म्हणायचे? तो संघाचा घटक कसे म्हणायचे? शिवाजी महाराजांच्या कोषात चारित्र्यहीन व्यक्तीला क्षमा हा शब्द नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी एक संघटना आहे. एक स्वयंसेवक म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचेच काम करतो, अशी माझी ठाम धारणा असते. ही धारणा मतांसाठी निर्माण झालेली नाही, कुठल्याही जातींना खूश करण्यासाठी झालेली नाही. महाराजांचे काम राष्ट्रीय होते, आदर्श हिंदू कसा असावा, हे दाखवून देणारे होते, आणि निःष्कलंक चारित्र्य हा त्याचा पाया होता. या सर्वांचा पराकोटीचा आदर्श म्हणजे संघ आहे.

vivekedit@gmail.com

---------------------------------------------

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/Manage

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.