कुठे नेऊन ठेवेल 5G  तंत्रज्ञान?

विवेक मराठी    20-Feb-2018
Total Views |

कुठलेही तंत्रज्ञान विकसित होताना एका विशिष्ट कालावधीची आवश्यकता असते. आज आपल्या खिशात मोबाइलच्या स्वरूपात एक छोटा कॉम्प्युटर आहे, त्याचे श्रेय गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना जाते. त्याचप्रमाणे 5G तंत्रज्ञान विकसित होताना या स्वरूपाची कामगिरी जगाला अपेक्षित असेल.

तंत्रज्ञान क्षेत्र हे आजच्या युगातील प्रभावी क्षेत्र मानले जाते. यामुळे जागतिक स्तरावर अनेक बदल घडत असतात. एखादे नवीन तंत्रज्ञान जेव्हा विकसित होते, तेव्हा त्याचा प्रभाव कसा पडेल? व त्यामुळे जग कोणत्या दिशेला वाटचाल करेल? हे ठरत असते. संवाद तंत्रज्ञान त्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते, त्याचे महत्त्व जाणूनच या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 5G तंत्रज्ञानावर चिंतन केले आहे, त्यातून पुढे आलेल्या बाबींवर येथे प्रकाश टाकत आहे.

मोबाइल तंत्रज्ञान आणि त्यामुळे बदलते जगत

मोबाइल तंत्रज्ञानात प्रत्येक पिढीत नवीन संशोधन बाहेर पडले, परिणामी प्रत्येक पिढीत त्याचे वेगवेगळे परिणाम जाणवत गेले. पहिल्या पिढीच्या मोबाइल तंत्रज्ञानात ऍनालॉग व्हॉइस प्रणाली होती, जी अतिशय खर्चीक आणि वापरताना अनेक वेळा अडथळयांनी भरलेली असे. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील तंत्रज्ञान विकसित झाले, जे डिजिटल व्हॉइस प्रणालीने प्रभावित होते, तसेच तुलनेने अधिक स्वस्त असे होते. हे तंत्रज्ञान अनेकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर 3G प्रणालीचा तिसऱ्या पिढीत उदय झाला, ज्यामुळे इंटरनेटचा वापर, मोबाइल कॉम्प्युटिंग, मोबाइल ऍप्स या प्रणालींनी गती घेतली. 4G तंत्रज्ञानात याहून पुढे झेप घेत HD ऑॅडिओ, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडियाचा सुकर वापर या बाबींना पोषण मिळाले.

या पार्श्वभूमीवर 5G तंत्रज्ञानात याहून वेगळया अपेक्षा आज आहेत, ज्यात 4Gतील अडचणी दूर करून व्यावसायिक वापरासाठी अधिक सुकर प्रणाली विकसित होऊन त्यासाठीचे पोषक वातावरण तयार व्हायला मदत निर्माण होईल. भारत सरकारचा स्टार्ट-अप इंडिया प्रकल्प याच प्रणालीवर मोठया प्रमाणत विस्तारित होईल.

5G तंत्रज्ञान

कुठलेही तंत्रज्ञान विकसित होताना एका विशिष्ट कालावधीची आवश्यकता असते. आज आपल्या खिशात मोबाइलच्या स्वरूपात एक छोटा कॉम्प्युटर आहे, त्याचे श्रेय गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना जाते. त्याचप्रमाणे 5G तंत्रज्ञान विकसित होताना या स्वरूपाची कामगिरी जगाला अपेक्षित असेल.

ई-कॉमर्स, मॅपिंग, जलद आणि सुरक्षित पेमेंट गेटवे याचा प्रभावी उपयोग 5G तंत्रज्ञानात होईल. अशा एका विश्वाची आपण कल्पना करू शकतो, जेथे वाहने मॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर धावतील, तेव्हा चालकाशिवाय चालणाऱ्या कार सहज उपलब्ध असतील. वैयक्तिक मेडिकल उपकरणे असतील, जेथे सामान्य आजारांवर चिकित्सा केली जाईल. वैद्यकीय उपकरणांचा दैनंदिन जीवनात तसेच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढेल, यातून अधिकाधिक निरोगी जीवनशैली विकसित होऊ शकेल. बाजारपेठेत सुरू असलेल्या ट्रेंडबद्दल लोकांना योग्य सल्ले मिळून त्यात बेस्ट-फिट (सर्वोत्तम उपलब्धता) असलेल्या वस्तूंची माहिती देणाऱ्या मोबाइल ऍप्सचा वापर मोठया प्रमाणात वाढेल.

या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कोटयवधी मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढणेदेखील अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्व कनेक्शन्स अधिकाधिक सुरक्षित तसेच जलद होण्याचीदेखील अपेक्षा आहे. आजचा मोबाइल तंत्रज्ञानाचा प्रभाव पाहता येणारे 5G तंत्रज्ञान हे ऑॅटोमोबाइल, वैद्यकीय, वास्तुनिर्माण, आपत्कालीन सेवा, रिटेल बाजारपेठ यांसारख्या प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करेल - किंबहुना या सर्व क्षेत्रांनी मोबाइल तंत्रज्ञाचा प्रभावी वापर करावा, यासाठीच 5G तंत्रज्ञान विकसित केले जाईल.   

 9579559645