'अचूक' दृष्टी, अथांग 'आकाश'

विवेक मराठी    20-Feb-2018
Total Views |

शांत स्वभावाच्या योगिताला दृष्टी नसली, तरी तिच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे. देव प्रत्येकाला काही ना काही देणगी देतो. योगिताची दृष्टी हिरावून घेताना गोड आवाज, कॅलिग्राफी आणि वाद्ये वाजविण्याची देणगी ईश्वराने तिला बहाल केली.

अंध व्यक्ती गाणी गाताना आपण अनेक वेळा पाहतो. पण गाण्यासोबतच तबला, ढोलक, मृदुंग, ताशा, दिमडी, संबळ, जेंबे, घुंगरू, टाळ, मर्कस, कावळा, चिमणी अशी जवळपास 40-42 वाद्ये वाजविणारी, जवळपास 1000च्या वर भ्रमणध्वनी आणि इतिहासातील सर्व सनावळया लक्षात ठेवणारी आणि या सर्वावर कडी म्हणजे कॅलिग्राफी करणारी अंध व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? नाही ना? पण मी अशी मुलगी पाहिली आहे.

विश्वास बसत नाही ना? हो, हे शक्य करून दाखविले आहे योगिता तांबे या मुलीने. योगिता तांबे ही जोगेश्वरी येथील अस्मिता भवनमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विवेकच्या एका कार्यक्रमाच्या वेळी तिला भेटण्याचा योग आला. तिची कला पाहून, स्मरणशक्ती पाहून मी थक्क झाले.

शांत स्वभावाच्या योगिताला दृष्टी नसली, तरी तिच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे. देव प्रत्येकाला काही ना काही देणगी देतो. योगिताची दृष्टी हिरावून घेताना गोड आवाज, कॅलिग्राफी आणि वाद्ये वाजविण्याची देणगी ईश्वराने तिला बहाल केली.

तिच्याशी बोलताना कळले की ती जन्मत: अंध नव्हती, पण दृष्टी कमी असल्याने जसजसे वय वाढत गेले, तसतसे अंधत्व येत गेले. तिचे सुरुवातीचे शिक्षणही देवनागरीतच झाले आहे. पण डोळयांना हळूहळू अक्षरे पुसटशी होत गेली आणि डॉक्टरांनी अंधशाळेत घालण्याचा सल्ला दिला. श्रीमती कमला मेहता दादर अंधशाळा इथे वयाच्या नवव्या वर्षी तिचा पहिलीला प्रवेश झाला. तिथून तिचे ब्रेल लिपीतील शिक्षण सुरू झाले. अंधत्वावर मात करून मुलांनी आपले भविष्य घडवावे यासाठी त्या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम राबविले जात असतात. योगिताला अंधत्व आले असले, तरी आपल्या चळवळया स्वभावामुळे ती काही शांत बसून राहिली नाही. तिने अभ्यासाबरोबर इतर उपक्रमांमध्ये भाग घेतला. कलांमध्ये रमली. संगीताकडे - त्यातही वादनाकडे असलेला तिचा ओढा लक्षात घेऊन सहाव्या-सातव्या वर्षी तिच्या आजीने तिला तबल्याच्या क्लासला घातले. तिच्या घरच्यांनी कधीच तिचे व्यंग तिला जाणवू दिले नाही. आजी तर तिला चक्क खोबरे किसायला, कांदा चिरायलाही द्यायची. आजोबा भाजी आणायला बाजारात घेऊन जायचे. तिथे ते तिच्या हातात चिल्लर देऊन मोजायला सांगायचे. त्यामुळेच, 'फक्त मला दिसत नाही, बाकी मी सगळं करू शकते', ही भावना लहानपणापासूनच तिच्यात विकसित होत गेली. आपल्या समाजात व्यंग असलेली अशी अनेक मुले आहेत, पण सर्वांच्याच वाटयाला असे डोळस कुटुंब येत नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना तर मानलेच पाहिजे.

योगिताचे आई-वडील गावी असल्याने आजी-आजोबांकडेच तिचा मुक्काम होता. असे असले, तरी वडील तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. आपल्या आजोबांचा तिच्यावर इतका प्रभाव आहे, हे तिच्या कपडयांकडे बघून लक्षात येते. आजोबांसारखेच आपणही धोतर आणि शर्ट घालावे असे तिला लहानपणापासूनच वाटायचे. म्हणून पुढे जाऊन पांढरा पायजमा, शर्ट आणि त्यावर जॅकेट हाच पोषाख तिने आपलासा केला.

लहानपणापासूनच रेडिओवरची गाणी ऐकायला तिला खूप आवडत असे. तबल्याच्या क्लासला जाऊ लागल्यावर तबल्याबरोबरच ढोलक, ढोलकी, मृदुंग, हलगी, ड्रम्स अशी वेगवेगळी वाद्ये हाताळता हाताळता त्या प्रत्येक वाद्यात ती रमायला लागली. योगिता तांबे वर्गात नसेल तेव्हा संगीत रूममध्ये सापडेल, याची सर्वांना खात्री होऊ लागली.

तिच्या कलेला वाव मिळावा, म्हणून शाळेच्या 50 वर्षांच्या वाद्यवृंदात तिला संधी मिळाली आणि त्या संधीचे तिने सोने केले. दुसरीपासूनच ती प्रोफेशनली वाजवायला शिकली आणि महाविद्यालयाच्या यूथ फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झाली. प्रसिध्द ढोलकी वादक विजय चव्हाण, कृष्णा मुसळे यांच्यासारख्या मोठमोठया ढोलकी वादकांनी राष्ट्रीय चमूत तिची निवड केली. आणि राज्य, विभाग आणि राष्ट्रीय अशा तिन्ही स्तरांवर तिने सुवर्णपदके मिळविली.

आपल्या व्यंगाचा बाऊ करत न बसता त्यावर मात करून तिने आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आणि आपल्या क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करून तिने यशाचे उत्तुंग शिखर गाठले.

इतिहास म्हटले की सर्वसामान्य माणसाचे तोंड वाकडे होते. पण योगिताकडे असामान्य स्मरणशक्ती असल्यामुळेच कदाचित, इतिहास हा तिच्या सर्वात आवडीचा विषय झाला. इतिहासात इतके आवडण्यासारखे काय आहे? असे तिला विचारल्यावर ती म्हणते, ''आपले आयुष्य हादेखील एक इतिहास आहे. प्रत्येक क्षण जगून आपण मागे टाकत असतो, आणि त्याच्या आठवणी मात्र आपल्या मेंदूत साठवत असतो. त्यामुळे तोही इतिहासच आहे.'' तिचे हे उत्तर ऐकल्यावर मी तिला ''धन्य आहेस'' एवढेच म्हणू शकले.

''मी कॅलिग्राफीदेखील करते'' हे तिचे वाक्य ऐकल्यावर तर मी उडालेच. त्याविषयी सांगताना ती म्हणते, ''2008 साली फाइन आर्टमध्ये सुमित पाटील नावाचा एक अवलिया मला भेटला, जो आता कमर्शिअल आर्टिस्ट आहे. दिव्यांग मुलांकडून चित्रकला कशी करवून घ्यावी, यावर त्याचा सध्या थीसिस चालू आहे. त्याने अंध मुलांकडून चित्र काढून घेतली आहेत. ज्या वेळेला माझी दृष्टी पूर्णत: गेली, तेव्हा माझ्यासमोर डोळस लोकांचे कार्य येईल असे मला कधी स्वप्नातदेखील वाटले नव्हते. 2010 साली याच सुमितबरोबर एका कार्यक्रमासाठी मी हरियाणाला गेले होते. एकदा रात्री आमचा गप्पांचा कार्यक्रम रंगला असता सुमित मला म्हणाला, ''योग्या, तू कधी चित्र काढलेस का?''

मी म्हटले, ''हो.''

''तुला लिहिता येते का?'' त्याचा पुढचा प्रश्न

मी म्हटले, ''अरे, वेडा आहेस का? मला आता कसे लिहिता येणार?''

''पण तू बघायचे नाहीच आहेस. तू फक्त लिहायचे. आम्ही बघणार.''

असे म्हणून त्याने माझ्याकडून कॅलिग्राफी करवून घेतली. आमचे काम हे चाचपडत असते. पण जेव्हा मी कॅलिग्राफीचा पहिला स्ट्रोक काढला, तेव्हा मात्र पटले की वेडे लोकच इतिहास घडवितात. त्याच्या या कॅलिग्राफीच्या वेडामुळे मी 'व्हिज्युअलाइज' करायला शिकले.'' त्यामुळेच 2010ची ती रात्र तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना ठरली.

हे सर्व करीत असताना ती एम.ए.देखील झाली. आता पुढे काय? हा प्रश्न होताच. कारण नाटक, गाणी, वाद्यवादन याने काही पोट भरणार नव्हते. या दरम्यान अस्मिताच्या सुधाताई वाघ यांच्याशी तिची भेट झाली. 28 नोव्हेंबरला या शाळेत अपंग मुलांचा कार्यक्रम होणार होता, त्याची तालीम चालू होती. त्यातील काही मुले योगिताच्या ओळखीची होती. शांत बसणे हा स्वभाव नसल्यामुळे तिने ती संपूर्ण तालीम कंडक्ट केली. सुधाताई, वालावलकर मॅडम तिचे हे सर्व पराक्रम पाहतच होते. ते पाहून सुधाताईंनी तिला विचारले, ''तू आमच्या शाळेत शिकवायला येशील का?'' त्यांच्या या प्रश्नामुळे देवच पावला असे तिच्या मनात आले. कारण ती नोकरीच्या शोधात होतीच. त्यामुळे आनंदाने तिने ही नोकरी स्वीकारली.

आता एक नवीन आव्हान तिच्यापुढे उभे राहिले होते. हे आव्हान होते डोळस विद्यार्थ्यांना शिकविण्याचे. अंध मुलांना शिकविणे ही खूप सोपी गोष्ट असते, कारण ती शांत बसतात. पण डोळस मुले शांत बसणे फार कर्मकठीण काम असते. त्यांना विश्वासात घेऊनच शिकवावे लागते. पण हे आव्हानदेखील तिने लीलया पेलले आणि काही दिवसांतच ती मुलांची आवडती ताई झाली.

तिची कला पाहून अस्मिताचे संस्थापक दादा पटवर्धन तिला म्हणाले, ''वारणानगरचा तात्याराव कोरे यांचा वाद्यवृंद मी पाहिला आहे. आपलाही तसा वाद्यवृंद असावा, असे माझे स्वप्न आहे.'' दादांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास आता योगिताने घेतला आहे, त्या दृष्टीने तिने पावलेही उचलली आहेत.

कुठले ना कुठले व्यंग असलेली माणसे खरोखरच असामान्य असतात. त्यांच्याकडे एक वेगळीच ताकद असते. ती त्यांच्यात कशी येते? कुठून येते? हा प्रश्नच आहे. योगिताकडेदेखील तशीच ताकद आहे. तिची स्मरणशक्ती. तिच्या मोबाइलमध्ये एकही नंबर सेव्ह नाही. तरीही तिचे 1000पेक्षा जास्त फोन नंबर पाठ आहेत. तसेच त्यांची इतर इंद्रिये इतकी संवेदनशील असतात की आपल्या ड्रेसवर वा साडीवर कोणती नक्षी आहे, हे ती केवळ स्पर्शाने ओळखू शकते.

अस्मितामुळे योगिता अधिक प्रकाशझोतात आली, हे ती प्रांजळपणे मान्यही करते. तिच्या कलागुणांमुळे 2016ला दिल्लीला राष्ट्रपती पुरस्कार, झी 24चा झी अनन्या पुरस्कार 2016, फिनिक्स पुरस्कार, डोंबिवली नाटयशाळेचा सुगंधी स्मृती पुरस्कार 2017, मिती क्रिएशनचा गगनाला पंख नवे हा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे.

आज अशा कित्येक अंध मुली आहेत, ज्यांनी वाद्यवृंदात आपला ठसा उमटविला होता, पण काही घरगुती कारणांमुळे असेल, काही आर्थिक कारणांमुळे असेल, आज त्या वाद्यवृंदापासून दूर गेल्या आहेत. अशा मुलींना पुन्हा प्रवाहात आणण्याचा योगिता तांबेचा प्रयत्न चालू आहे. तिच्या या अनन्यसाधारण कलेमुळे तिची आर्थिकदृष्टया खूप प्रगती झाली नसली, तरी कलात्मक प्रगती नक्कीच झाली आहे आणि यातच ती समाधानी असल्याचे तिच्याशी बोलताना जाणवते.

- शीतल खोत

--------------------------------------------------------------

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 

https://www.facebook.com/VivekSaptahik/

मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/