थेंबे थेंबे तळे साचे...

विवेक मराठी    22-Feb-2018
Total Views |

लहानपणी शालेय पुस्तकात आपण 'थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण वाचलेली असली, तरी तिचे खरे महत्त्व मोठेपणी उमगते. माझ्याबाबत तेच झाले. मी लहानपणी काटकसरीचे महत्त्व माझ्या आईकडून शिकलो होतो, पण नियमित बचतीचे महत्त्व मोठेपणी मला एका हॉटेल मालकाने ध्यानात आणून दिले. काटेकोर बचतीतून साठलेल्या गंगाजळीच्या जोरावरच गेली 33 वर्षे मी व्यवसायाचा विस्तार साधत आलो आहे.

 मी वयाच्या चोविसाव्या वर्षापर्यंत गरिबीचे आणि काटकसरीचे जीवन जगलो. नेमकेपणाने सांगायचे झाले, तर सन 1988मध्ये जेव्हा आमचे दुबईतील दुकान फायद्यात चालू लागले, तोपर्यंत. ही गरिबी अशी होती, जिने किमान गरजेपेक्षा अधिक काही मिळू दिले नाही. पण आम्ही कधीही उपाशी राहिलो नाही किंवा कुणाकडे हात पसरायला लागला नाही, याचे श्रेय माझ्या आई-वडिलांच्या काटकसरी आणि स्वाभिमानी वृत्तीला आहे. तेच संस्कार त्यांनी आम्हा भावंडांवर केले. आई-बाबा लहानपणी आम्हाला बजावत, ''बाळांनो! आपल्या घरी तुम्हाला किमान चटणी-भाकरी रोज मिळेल याची काळजी आम्ही नक्की घेऊ, पण तुम्हीही असेल त्यात समाधान मानायला शिका. आपल्या घरी मिळत नाही म्हणून परान्नाचा मोह धरून जीवनात कधी मिंधे होऊ नका. संयमाने राहिल्यास दिवस पालटतात.'' ही शिकवण माझ्या मनावर इतकी घट्ट ठसली की मी कधीही कुणाच्या - अगदी मित्राच्या घरी गेलो आणि तेथे काही खाण्याचा आग्रह झाला, तर मी नकार देत असे. ''माझे नुकतेच जेवण झाले आहे आणि पोटात कणभरही जागा नाही'' असे सांगत असे.

माझी आई कोंडयाचा मांडा करणारी होती. तिच्याकडून संयम, श्रध्दा, चिकाटी, सकारात्मकता, आव्हानांना तोंड देणे, कौशल्याने खरेदी करणे असे अनेक गुण मी शिकलो. आम्ही परिस्थितीने गरीब असलो, तरी अधून-मधून आमच्या घरात अचानक समृध्दीच्या झुळकीही येत, पण लवकरच अडचणीची स्थितीही अनुभवाला येई. असे दोन टोकांना जाणारे परिस्थितीचे हिंदोळे खूप अनुभवले. त्यातील एकच नमूद करतो. माझ्या बाबांची दुबईतील पहिली नोकरी संपुष्टात येताच त्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. तशी त्यांना मिळालीही. नव्या कंपनीत रुजू होण्यापूर्वी ते आम्हाला भेटायला भारतात आले. येताना त्यांनी तिकडून खूप नवलाईच्या गोष्टी आणल्या होत्या. रिस्टवॉच, भारी कापड, टेप रेकॉर्डर वगैरे. आम्हाला वाटले,'चला सुखाचे दिवस सुरू झाले', पण आमचा आनंद जेमतेम महिनाभर टिकला. ज्या कंपनीत बाबा रुजू होणार होते, तिने त्यांना व्हिसाच दिला नाही. त्यामुळे बाबांची अवस्था विचित्र झाली. जुनी नोकरी संपली आणि नवी नोकरी अधांतरी लटकलेली. ते तब्बल सहा महिने मुंबईत बेरोजगार म्हणून बसून राहिले. त्यांनी साठवलेली रक्कम घरखर्चासाठी भरभर संपू लागली. एक वेळ तर अशी आली की हातात पैसा नाही आणि घरात धान्य नाही. आमची अवस्था लाजिरवाणी झाली होती. एकीकडे अंगावर झुळझुळीत कपडे होते, पण संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत होती. पण माझी आई निश्चयी होती. कोणत्याही संकटाच्या वेळी तिचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजाभवानीवर तिचा गाढ विश्वास होता. 'ती आई (देवी) सगळे नीट करेल' हे तिचे आश्वासक शब्द असत.

रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली, तसे आईने देवघरातून काही पुरचुंडया बाहेर काढल्या. आईला ओटीमध्ये जे तांदूळ मिळत, ते ती छोटया पुरचुंडयांत साठवून देवघरात ठेवत असे. काही पैसेही होते त्या पुरचुंडयांमध्ये. ते तिने बाबांच्या हवाली केले आणि त्या तांदळाची खिचडी रांधून आम्ही सगळे जेवलो. आजचा दिवस संकटाचा असला तरी उद्याचा दिवस चांगला असेल या विश्वासावरच आई असे प्रसंग निभावून नेई. खरोखर पुढचा दिवस आशादायक ठरला. बाबांचा रखडलेला व्हिसा मंजूर झाला. त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. नेहमीप्रमाणे त्यांनी आईच्या गळयातील सोन्याची साखळी गहाण टाकली, घरात दोन महिन्यांचा शिधा भरला आणि विमानाचे तिकीट काढून ते दुबईला रवाना झाले. हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे.

मी महाविद्यालयीन जीवनात मुंबईत दारोदार फिरून फिनेल विक्री करत होतो, तेव्हा मला बचतीची सवय होती. पण ती बचत बहुधा काही आकस्मिक खर्चासाठीच वापरली जाई. मी दुबईत गेलो तेव्हा मला बचतीची खरी ताकद समजली. दुबईत सुरुवातीला आमचे एकच दुकान होते. ते चांगले चालू लागल्यावर मी बँकेचे कर्ज घेऊन दुसरे दुकान सुरू केले. तेही चांगले चालू लागले, पण त्या कर्जाचे दडपण माझ्यावर येऊ  लागल्याने सहा महिन्यांतच मी जवळच्या पैशातून कर्जफेड करून टाकली. त्या काळात मी आमच्या दुकानाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला जात असे. हॉटेल मालकाची एक सवय होती. तो रोज 100 दिऱ्हॅमच्या दोन नोटा काउंटरखालच्या दोन छोटया डब्यांमध्ये साठवत असे. एकदा मी त्याला कुतूहलाने त्याचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, ''अरे, याचा खूप फायदा होतो. माझे महिन्याला सहा हजार दिऱ्हॅम साठतात. त्यातील निम्म्या पैशातून मी हॉटेलचा खर्च, मालखरेदी व नोकरांचा पगार भागवतो, तर उरलेले निम्मे पैसे हे माझी बचत असल्याने ते गुंतवणुकीसाठी राखून ठेवतो. त्यामुळे ऐन वेळी पैसा कुठून उभारायचा याची काळजी मला उरत नाही आणि कुणाकडे हातही पसरावे लागत नाहीत.'' मलासुध्दा त्याची ती कल्पना आवडली. स्वत:च्या उत्पन्नातून नियमितपणे काही भाग बचत म्हणून साठवायचा. तो चैनीसाठी उपयोगात न आणता निर्धारपूर्वक केवळ अडीअडचणीसाठी राखून ठेवायचा आणि त्या गंगाजळीतूनच नवी गुंतवणूक करायची. मला एकदम माझ्या आईच्या पुरचुंडी बँकेची आठवण आली. तिच्या त्या समयसूचकतेमुळे आम्ही उपाशी राहण्यापासून वाचलो होतो.

मीसुध्दा उत्साहाने माझ्या दोन दुकानांमागे पाचशे दिऱ्हॅमच्या दोन नोटा छोटया डब्यांमध्ये साठवायला सुरुवात केली. काहीही झाले तरी त्यांना वर्षभर हात लावायचा नाही, असा निश्चय केला आणि तो तडीस नेला. वर्षभराने बघितले तर त्यात भारतीय चलनाच्या हिशेबात चक्क 25 ते 30 लाख रुपये जमा झाले होते. ही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती. त्यातून मी अबूधाबीला तिसरे दुकान सुरू केले. यथावकाश ते चालू लागल्याने हाच बचतीचा प्रयोग मी पुढे सुरू ठेवला आणि दोन वर्षांनी शारजाला चौथे दुकान थाटले. साठवलेल्या पैशांच्या जोरावर मी अगदी दर वर्षी एक नवे दुकान सुरू करत गेलो. आश्चर्य वाटेल, पण याच बचतीतून मी पिठाच्या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानसज्ज गिरण्या आणि मसाल्याचे कारखानेही उभारले.

जवळ पैसा असेल तेव्हा माणसाला काळजी वाटत नाही. उद्याचे कुणी बघितलेय, या बेफिकिरीत तो भरपूर उधळपट्टी करतो, पण अडचणीच्या वेळी पैशाची खरी किंमत कळते. समर्थ रामदासांनी दिलेला इशारा मननीय आहे -

मिळविती तितुके भक्षिती। ते कठीण समयी मरुन जाती। दीर्घ विचारे वर्तती। तेचि भले॥

आपण मिळवलेले सर्व उत्पन्न खर्च करून टाकले, तर हातात काही उरत नाही. संकटाच्या वेळी हातात पैसा नसला, की उसनवारी किंवा कर्ज काढण्याखेरीज पर्याय राहत नाही. त्यापेक्षा रोज, आठवडयाला किंवा महिन्याला थोडे थोडे पैसे 'इदं न मम' म्हणत बाजूला काढत राहिल्यास कालांतराने त्याचा इतका मोठा बचत निधी तयार होतो, की आपल्याला कुठे याचना करण्याची गरज पडत नाही. महिलांच्या, नोकरदारांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या अनेक वर्तुळांत दरमहा भिशी चालवली जाते. ही भिशी म्हणजे बचतीचाच एक प्रकार. मात्र भिशी लागल्यावर मिळालेली मोठी रक्कम चैनीत उडवण्यासाठी वापरल्यास त्या बचतीचा काहीही फायदा होत नाही, हेही तितकेच खरे.

मित्रांनो! बचत ही नेहमी पैशाचीच असते असे नाही. तुम्ही वेळेची, श्रमाची, शब्दांचीही बचत करू शकता. बचतीचा फर्ॉम्युला अजमावून पाहा. तुमचा तुम्हालाच फायदा दिसून येईल. बचतीचा अर्थ एका संस्कृत सुभाषितातही अधिक नेमकेपणाने उकलून सांगितला आहे -

जलबिंदु निपातेन क्रमश: पूर्यते घट:।

स हेतु: सर्वविद्यानां धर्मस्यच धनस्यच॥

(पाण्याच्या थेंबाथेंबाने जशी घागर हळूहळू भरत जाते, त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या विद्या, धर्म आणि धन यांचा संचयही असाच क्रमाक्रमाने होतो.)

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)