राष्ट्रीय प्रश्नांचे भान असणारा पत्रकार

विवेक मराठी    22-Feb-2018
Total Views |

एक मुस्लीम पत्रकार संघविचारांचा आहे, याचे सर्वांना आश्चर्य वाटत असे. टोपण नावाने कुणीतरी हिंदूच हे स्तंभ लिहीत असावेत असाच त्यांचा समज असे. परंतु त्यांची जसजशी व्याख्याने होऊ  लागली, तशी मुझफ्फर हुसेन हे टोपण नाव नसून खरोखरची व्यक्ती आहे, याची ओळख सर्वांना होऊ  लागली. त्यांचे वक्तृत्व उत्कृष्ट व हृदयाला हात घालणारे असे. त्यामुळे त्यांनी स्वतःचा असा श्रोतृवर्ग तयार केला होता.

मी विवेकचे काम करण्याकरिता मुंबईस आलो, तेव्हा काही दिवसांतच माझा मुझफ्फरजींशी परिचय झाला. पहिल्याच भेटीत आपल्या खानदानी अदबशीर वागण्याने मला चकित केले. मराठी माणसाला एवढी आदब आणि नम्रता सोसवत नाही. पण मुझफ्फरजींच्या वागण्यात एवढी अभिजात सुसंस्कृतता होती की त्यामुळेच माणसे त्यांच्या प्रेमात पडत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा जनसंग्रह खूप मोठा होता. मुस्लीम धर्माचे व मुस्लीम देशांत घडणाऱ्या घडामोडींचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्या वेळी माहितीच्या प्रसाराची एवढी साधने नव्हती. त्यासाठी परदेशी वृत्तपत्रे व नियतकालिके यांच्यावरच अवलंबून राहावे लागत होते. ती खूप महाग असत. पण तरीही मुक्त पत्रकारिता करण्याचा आपला निर्णय त्यांनी बदलला नाही. हळूहळू या विषयावर मूळ माहितीच्या आधारावर लिहिणारे स्तंभलेखक म्हणून त्यांनी स्वतःचे स्थान प्रस्थापित केले. एक मुस्लीम पत्रकार संघविचारांचा आहे, याचे सर्वांना आश्चर्य वाटत असे. टोपण नावाने कुणीतरी हिंदूच हे स्तंभ लिहीत असावेत असाच त्यांचा समज असे. परंतु त्यांची जसजशी व्याख्याने होऊ  लागली, तशी मुझफ्फर हुसेन हे टोपण नाव नसून खरोखरची व्यक्ती आहे, याची ओळख सर्वांना होऊ  लागली. त्यांचे वक्तृत्व उत्कृष्ट व हृदयाला हात घालणारे असे. त्यामुळे त्यांनी स्वतःचा असा श्रोतृवर्ग तयार केला होता. विवेकच्या व्यासपीठावरून त्यांचे कितीतरी कार्यक्रम झाले. तेव्हा वक्त्याला मानधन देण्याची विवेकची क्षमताही नव्हती. पण आमच्यामध्ये तो प्रश्न कधी आला नाही. विवेकला आपल्या परिवाराचा एक घटक असेच त्यांनी मानले. नफीसा भाभी, त्यांची दोन्ही मुले सीमा आणि शमशाद हे सारेच परिवाराचे घटक बनले होते.

मुझफ्फरजी जेव्हा मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्थिरावत होते, तेव्हा सर्व वृत्तपत्रसृष्टीत संघाबद्दल आकस होता. पण त्यांनी आपल्या संघाबद्दलच्या निष्ठा कधीच लपवून ठेवल्या नाहीत. तरीही त्यांचे स्तंभ सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांतून कधी ना कधी प्रकाशित झाले. मराठीतील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या प्रतिष्ठित संपादकाशी त्या वृत्तपत्रातील नियमित स्तंभाविषयी बोलणे सुरू असता त्या वृत्तपत्रात लिहीत असताना अन्य वृत्तपत्रात लिहिणार नाही हे मुझफ्फरजींनी मान्य करावे, असा त्यांचा आग्रह सुरू झाला. परंतु मुझफ्फरजींनी स्पष्ट केले की विद्याधर गोखले माझे मित्र आहेत व त्यांनी एखाद्या विषयावर मला लिहायला सांगितले तर नकार देता येणार नाही. एखाद्या मुक्त पत्रकाराला असे सांगणे अवघड असते. पण मुझफ्फरजींचा आपल्या लिखाणावर जसा भरवसा होता, तसेच आपल्या माणसाविषयी खरीखुरी आस्था व प्रेम होते. आपल्या अशा प्रेमातून त्यांनी जो गोतावळा निर्माण केला होता, त्याचे दर्शन ईदच्या वेळी होत असे. त्यांच्या घरी ईदला तास दोन तास जरी जाऊन बसले, तरी अनेक क्षेत्रांतली अनेक माणसे तिथे भेटत. त्या सर्वांचे प्रेमाने होणारे आगतस्वागत हा अनुभवण्याचाच विषय असे.

श्रीगुरुजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदा संघाशी त्यांचा संबंध आला व नंतर ते संघरूपच झाले. सरसंघचालक सुदर्शनजींना ते आपला गुरू मानत. ते त्यांच्या परिवाराचेच एक घटक बनून गेले होते. आपली पत्रकारिता राष्ट्रहिताची असली पाहिजे, असे त्यांना सुदर्शनजींनी सांगितले व तो वसा त्यांनी आयुष्यभर पाळला. राजकीय व राष्ट्रविरोधी शक्तींनी मुस्लिमांच्या मनात संघाबद्दल जे गैरसमज करून दिले आहेत, ते कमी करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत. त्यांच्या माध्यमातून अनेक संघ अधिकाऱ्यांच्या मुस्लीम नेत्यांशी, मौलावींशी चर्चा झाल्या. सर्वच चर्चा अपेक्षेइतक्या यशस्वी नाही झाल्या, तरी त्यामुळे ते कधीच निराश झाले नाहीत. त्यांनी कधीच आपली चिकाटी सोडली नाही. एखादी गोष्ट यशस्वी होण्याकरिता विशिष्ट वेळ यावी लागते. ती वेळ आता येत आहे ते पाहून त्यांना आनंद होत असे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना व त्यांच्या पत्नी नफीसा भाभींना मुस्लीम समाजात खूप त्रास व उपहास सहन करावा लागला. पण त्यांनी त्याची कधी तक्रारही केली नाही व त्याचा आपल्यावर परिणामही होऊ  दिला नाही. पार्क साइट येथील सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचा पुढाकार असे. उपासना पध्दत व संस्कृती या दोन वेगळया गोष्टी आहेत, पण परस्पर विसंगत नाहीत अशी त्यांची धारणा होती. त्याच धारणेतून ते श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही सक्रिय होते. मुस्लिमांच्या सभांमध्येही त्यांनी तो विषय मुस्लीम दाखले देऊन मांडला होता.

समान नागरी कायदा हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. शाह बानो खटल्यातील निकालानंतर मुस्लीम समाजाची जी प्रतिक्रिया झाली, त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर राजीव गांधी सरकारने मुस्लीम जातीयवादी नेत्यांपुढे जी लोळण घेतली, त्यामुळे व्यथित होऊन त्या विरोधात मुंबईत राष्ट्रीय एकजूट ही संघटना स्थापन करण्यात आली. त्यांच्याबरोबर वसंतराव तांबे, बाळ देसाई यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व खासदारांच्या घरासमोर निदर्शने करून त्यांना निवेदने देण्यात आली. मुझफ्फरजींनी समान नागरी कायद्यासंबंधातील गैरसमज दूर करण्यासाठी पुस्तिका लिहिली. मानवी स्वातंत्र्यावर बंधने असणाऱ्या व स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या परंपरा दूर व्हाव्यात, यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकबद्दल जो निर्णय दिला आहे, त्यामुळे या विषयातील कोंडी फुटेल अशी त्यांना खात्री वाटत होती.

 गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी भरपूर गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या पत्नीच्या - नफीसा भाभींच्या सामाजिक कार्यामागचे ते प्रेरणास्थान होते. या वयातही अजूनही त्या कार्यरत असतात. त्यांची मुलगी सीमा ही एनजीओच्या क्षेत्रात एड्स या विषयात महिलांमध्ये काम करते. समाजाच्या त्या क्षेत्रातील अनुभव ऐकल्यानंतर आपण कोणत्या जगात राहतो, यावर विश्वासच बसेनासा होतो. या निमित्ताने तिने आफ्रिकन देशांतही प्रवास केला आहे. सीमाचे सार्वजनिक काम व शमशादचे व्यावसायिक यश त्यांना सुखावून टाकणारे होते. तरीही त्यांचे अजून जाण्याचे हे वय नव्हते. त्यांनी आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतला होता, ते शक्यतेच्या कोटीत येत असताना काही वर्षे राहून ते पाहायला हवे होते, ही रुखरुख मात्र कायम राहील.    

kkdilip54@gmail.com

 ---------------------------------------------------------------

पत्रकारितेतील दीपस्तंभ

मुझफ्फर हुसेन यांच्या आकस्मिक निधनाने आम्हा सर्व सुपरिचित मित्रांना व वृत्तपत्रसृष्टीतील वाचकांना धक्का बसला आहे. मुझफ्फर हुसेन मिशनरी वृत्तीच्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांना तत्त्वाशी कुठल्याही प्रकारची तडजोड पसंत नसे. ते देशभावनेने प्रेरित झालेले व राष्ट्रीयत्वाच्या भावनेला वाहिलेले होते. त्यांची लेखणी धारदार होती व त्यांच्या वक्तृत्वामध्ये जोश होता. एक-एक, दीड-दीड तास सभा गाजवून ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकत. ते अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेख तर लिहीत होतेच, तसेच त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकेदेखील लिहिली आहेत. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लीम मानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद - एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंबनियोजन, लादेन -दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही विशेष उल्लेखनीय आहेत. देशातील निरनिराळया प्रादेशिक भाषांतील जवळपास 40 ते 50 प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये ते स्तंभलेखक म्हणून नियमित आपले योगदान देत असत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला त्यांचा पाठिंबा होता व हिंदुत्वासंबंधीचे विचार ते आग्रहाने मांडत. संघपरिवारातील अनेक संस्थांशी ते संबंधित होते व त्यांच्या सेवा कार्यांशी जोडलेले होते.  संघपरिवारातील राष्ट्रीय मुस्लीम मंचाशी त्यांचा निकटचा संबंध होता. मुस्लीम महिलांच्या तिहेरी तलाकसंबंधी प्रश्नांवर, तसेच मुस्लीम घटस्फोटित महिलांचे पुनर्वसन करण्याच्या समाजकार्यामध्ये, त्यांच्या पत्नी श्रीमती नफीसाजी यांच्याबरोबर ते हिरिरीने भाग घेत असत.

त्यांच्या प्रभावशाली कर्तृत्वामुळे त्यांना समाजात उच्च प्रतिष्ठा लाभली होती व अनेक मानसन्मानदेखील मिळाले होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांना केंद्र शासनाने पद्मश्री या सन्मानाने गौरविले होते व महाराष्ट्र शासनाचा 2014 सालचा लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, तसेच यासारखे अनेक पुरस्कार मिळाले होते. केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन परिषदेच्या (एनसीपीयूएलच्या) उपाध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली होती.

मुझफ्फर हुसेन मनमिळाऊ  असून पत्रकारांमध्ये व मित्रमंडळींमध्ये प्रिय होते. त्यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकांमध्ये राष्ट्रीय विषयांवरील चर्चा रंगत असे व समविचाराच्या लोकांचे चांगले प्रबोधन होत असे. रा.स्व. संघाच्या, तसेच भाजपाच्या अनेक मोठया नेत्यांशी त्यांचा स्नेह होता. मात्र त्यांनी वैयक्तिक लाभासाठी त्या स्नेहसंबंधांचा कधी उपयोग करून घेतला नाही.

मुझफ्फर हुसेन यांच्या निधनाने झालेले दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

- मधू देवळेकर, माजी आमदार

022-26496070,9819331071

mmydeolekar@yahoo.com

 ------------------------------------------------------

 सच्चा मित्र गमावला

विवेकच्या कामानिमित्त विदर्भाचा दौरा. मलकापूर स्टेशनवर उतरलो. सकाळची वेळ. गुलाबी थंडी. अचानक हाक आली. ''आबासाब'' मी त्या दिशेने पाहिले आणि आश्चर्यचकित झालो. दस्तुरखुद्द मुझफ्फर हुसेन हाक मारत होते. समोरच्या चहाच्या टपरीसमोरील बाकडयावर मोठया खुशीत मुझफ्फर हुसेन बसले होते. मी जवळ पोहोचताच त्यांनी टपरीच्या मालकाला म्हटले, ''भाईसाब, अब लाइये चाय'' आणि वाफभरले चहाचे ग्लास त्याच्या हातातून घेताना त्याला म्हणाले, ''आज आपको नया दोस्त मिलेगा।'' आणि त्याच्याशी माझा परिचय करून दिला. कोवळया उन्हात गुलाबी थंडीत वाफाळणाऱ्या चहाबरोबर आमची 'चाय घेण्याची' सुरू झाली. विदर्भाबद्दलचे प्रेम हा दोघांचा कॉमन मुद्दा असल्यामुळे ती चांगलीच रंगली. तेवढयात टपरीवाल्याने पुन: चहाचे दोन ग्लास आमच्या हातात ठेवले.

पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांच्या वैचारिक प्रगल्भतेचे, साहित्याचे आणि पत्रकारितेचे त्या चहावाल्याला काहीच आकलन असण्याचे कारण नव्हते. परंतु त्याला एक माहीत होते की ते इथे आले की पाच-पंचवीस स्नेही इथे हटकून जमतात आणि गप्पांची मैफल अशीच रंगते. हा दिलदार माणूस सर्वांना आपला वाटतो आणि त्याला ऐकायला आणि त्याच्याशी बोलायला सर्वांनाच आवडते. पंचवीसएक वृत्तपत्रांना खाद्य पुरवणाऱ्या, नियमित लिहिणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्येष्ठ पत्रकार असलेल्या आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या मुझफ्फर हुसेन यांचे सामान्यातल्या सामान्याशी असे जडलेले नाते होते.

विवेकच्या कामानिमित्त विक्रीला जाणे झाले, तेव्हा मुद्दाम भेटून त्यांनी आवजून आग्रह केला होता. ''आबासाब, नफीसाजी को जरूर मिलना।'' राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून दिल्लीत असलेल्या नफीसा भाभींना जेव्हा भेटलो, तेव्हा गप्पांच्या ओघात ह्या भगिनीचे महिलांच्या प्रश्नाबाबतचे चिंतन ऐकून आणि आयोगाच्या कामाबद्दलची ओढ जाणून बराच प्रभावित झालो. वैचारिकतेचा आणि सामाजिक कार्याचा वसा ह्या दोघांनीही जपला होता.

ईदच्या निमित्ताने विक्रोळीला घरी शीरखुरमाची लज्जत चाखण्यासाठी त्यांचे आग्रहाचे आमंत्रण असे आणि ''तुम्ही आल्याशिवाय 'ईद नही मनायी जायेगी'' अशी प्रेमळ धमकीही असे. सणासुदीच्या दिवशी पटवारी कुटुंबीयांबरोबर भोजनाचे निमंत्रण ते अगत्याने स्वीकारत. त्या कुटुंबासमवेत घालविलेला दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी असे. पण त्यांच्या व्यग्र वेळापत्रकात असा दिवस अपवादानेच उगवे.

सामाजिक जीवनात अनेक चढ-उतार मुझफ्फरांनी अनुभवले. सन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. ह्या सर्वांवर कळस चढविला 'पद्मश्री'ने. परंतु अहंकाराचा स्पर्श त्यांना होऊ दिला नाही. तसेच संघविचारांशी असलेली त्यांची बांधिलकी अनेकांना बाधली असली, तरी त्यांनी ती मनोमन स्वीकारली होती आणि जपली होती. ते इस्लाम धर्माचे अभिमानी जाणकार आणि तौलनिक अभ्यासक होते. म्हणूनच प्रगल्भ हिंदुत्वाचे चाहते आणि पुरस्कर्ते होते.

एखादी गोष्ट भावली की त्यांचे उद्गार उत्स्फूर्त असत. एकदा मा. मोहनजींच्या एका भाषणाला आम्ही दोघे उपस्थित होतो. भाषण संपल्यानंतर ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, ''पू. डाक्टर साब जैसी दिवालवाली टोपी पहना दो, बाकी व्यक्तिमत्त्व, विचार और प्रतिपादन उन्हींकी याद दिलाता है।''

काल सकाळी सीमाला फोन केला. दु:खाच्या आवेगापोटी तिला हुंदके आवरत नव्हते. तिचे सांत्वन करताना शब्द सुचत नव्हते. तिचे प्रिय पिताजी सोडून गेले होते. आम्हीही आमचा सच्चा मित्र गमावला होता, ज्याची उणीव सतत जाणवत राहील. श्रध्दांजली.

- आबासाहेब पटवारी