नऊ हजार एकशे बत्तीस दिवसांचा प्रवास

विवेक मराठी    24-Feb-2018
Total Views |

आम्ही हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की, सगळे भटके विमुक्त माझ्याप्रमाणे हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहेत. याला अंगागी भाव म्हणतात. मग शरीराचे एक अंग अशा प्रकारे दुर्बळ राहून, अशिक्षित राहून, अडाणी राहून, परमवैभवम् नेतुम् येतद् स्वराष्ट्रम् कसे होणार? राष्ट्राला वैभवशाली बनवायचे असेल, तर या आपल्या बांधवांना आपल्या बरोबरीने आणले पाहिजे ही कर्तव्याची जाणीव आमच्या सर्वांच्या मनात होती, तीच या कामाची प्रेरणा आहे आणि याच प्रेरणेने गेली पंचवीस वर्षे हा प्रकल्प निरंतर कार्य करीत आहे.

नऊ हजार एकशे बत्तीस दिवस म्हणजे पंचवीस वर्षे. व्यक्तीच्या जीवानात ही वर्षे फार मोठी असतात, परंतु संस्थेच्या जीवनात ही वर्षे तशी फार मोठी आहेत असे नाही. यमगरवाडी प्रकल्पाला या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली. 27 एप्रिल 1990ला मी, गिरीश प्रभुणे, दादा इदाते, सुखदेव नवले, चंद्रकांत गडेकर, मधुकरराव व्हटकर इत्यादी कार्यकर्ते मंडळी रमेश चाटुफळे यांनी दान केलेली अठरा एकर भूमी बघण्यासाठी यमगरवाडीला आलो होतो. भर उन्हाळयाचे दिवस, माळरान, तेथे एक बोराचे झाड होते. त्या झाडाच्या सावलीत आम्ही बसलो. बोर म्हटले की शबरीची आठवण येते. ही शबरीची बोरे भविष्यात दिवसेंदिवस गोड होत जातील, असे जर कुणी मला सांगितले असते तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. या भूमीवर करायचे काय? असा प्रश्न होता.

गिरीश प्रभुणेच्या मनात या जागेवर भटके विमुक्त मुलांसाठी वसतिगृह सुरू करावे, असे होते. वसतिगृह म्हटले तर मुलांना राहण्यासाठी खोल्या बांधाव्या लागतील. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल, त्यांच्या आरोग्याची चिंता करावी लागेल आणि शिक्षणाची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला एवढे सगळे काम कसे जमेल? असा प्रश्न सहाजिकच मनात होता. परंतु तेथे बसलेला कोणताही कार्यकर्ता एकाकी कार्यकर्ता नव्हता, तो संघकार्यकर्ता होता. आपल्या मागे संघ उभा राहील, याबद्दल कोणाच्याही मनात कसलीच शंका नव्हती. आपण काम सुरू करू, संघाची पुण्याई आपल्यामागे उभी राहील आणि झालेही तसेच.

ज्या जमिनीवर एक बोराचे झाड, एक पडकी विहीर आणि एक खोपट होते, त्या ठिकाणी आता चारशे मुलांची शाळा, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी सुंदर निवासस्थाने, सेवाव्रती कार्यकर्त्यांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, असे भव्य संकुल पंचवीस वर्षांत उभे राहिले. प्रभुणे चालत राहिले, फिरत राहिले, तुकाराम माने आणि सरस्वती माने आपले पालावरचे घर सोडून या माळरानावर राहायला आले. असे माळरान की जिथे सापांची आणि विंचवांची नैसर्गिक वस्ती होती. पक्ष्यांचे दर्शन होत नसे. आज या माळरानावर मळे फुलले आहेत, भटकेश्वराचे एक मंदिर आहे, पुरेशी झाडे आहेत, चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत व एक मोठी विहीर बांधलेली आहे. 27 एप्रिल 1990ला याचे कोणतेही चित्र आमच्या डोळयासमोर नव्हते.

आमच्या डोळयासमोर होता तो भटका विमुक्त समाज. त्या समाजातच ज्यांचा जन्म झाला, त्यांना त्या समाजाच्या कथा-व्यथा माहीत होत्या. कारण ते त्यांचे जगणे होते. माझ्यासारख्या शहरी कार्यकर्त्यांला त्याची माहिती शून्य. गिरीशचे पालावर भटकणे भरपूर असल्यामुळे, प्रभुणे त्या समाजातील नसले तरी ते खऱ्या अर्थाने त्या समाजाचे एक झाले होते. समाजाच्या दुःख-कष्टांशी ते खऱ्या अर्थाने समरस झाले होते. मराठी भाषेत 'सुख-दुःख' असा शब्दप्रयोग करतो, परंतु भटके विमुक्त समाजाच्या बाबतीत सुखाला काही अर्थ नाही. अनिकेत अवस्थेत राहायचे, पोटासाठी भटकंती करायची, असाहाय्य जीवन जगायचे, पोलिसांचा ससेमिरा चुकवत, गावगुंडांचा मार सहन करीत, अकिंचन अवस्थेत राहायचे, कसलाही सन्मान नाही, कसलेच संरक्षण नाही आणि कुणाचीही सहानुभूती नाही.

हिंदू समाजाचे अंग असलेला हा समाज आहे. संघाच्या प्रार्थनेत आपण म्हणतो की, 'वयम् हिंदु राष्ट्रांगभूता।' आम्ही हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की, सगळे भटके विमुक्त माझ्याप्रमाणे हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहेत. याला अंगागी भाव म्हणतात. मग शरीराचे एक अंग अशा प्रकारे दुर्बळ राहून, अशिक्षित राहून, अडाणी राहून, परमवैभवम् नेतुम् येतद् स्वराष्ट्रम् कसे होणार? राष्ट्राला वैभवशाली बनवायचे असेल, तर या आपल्या बांधवांना आपल्या बरोबरीने आणले पाहिजे ही कर्तव्याची जाणीव आमच्या सर्वांच्या मनात होती आणि तीच या कामाची प्रेरणा होती.

एकेकाळी आपले राष्ट्र वैभवाच्या शिखरावर होते. जागतिक उत्पादनात आमचा वाटा 25 ते30%पर्यंत असे. आपली गरज भागवून उर्वरीत सर्व वस्तू जगाच्या बाजारपेठेत जात आणि जगातून सोन्याचा आणि चांदीचा प्रवाह नदीसारखा भारतात वाहत असे, म्हणून 'सुवर्णभूमी' या शब्दात भारतमातेचे वर्णन करण्यात येई. त्या सोन्याच्या लालसेमुळे परकीय लोक आक्रमक म्हणून भारतात येत. हा सोन्याचा प्रवाह कुणी आणला? हा सोन्याचा प्रवाह आज असलेल्या अकिंचन, अनिकेत, असाहाय्य बांधवांनी आणला. भारताला पुन्हा सुवर्णभूमी करायचे असेल, तर या लोकांना उभे करायला पाहिजे. त्यांच्या हातात कला आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे, अमर्याद कष्ट करण्याची शक्ती आहे, समूहाने राहण्याची सवय आहे. हिंदू जीवनमूल्यांचा आग्रह त्यांच्या जीवनात आहे. शेकडो वर्षांच्या उपेक्षेमुळे अनेक अंधश्रध्दा, वाईट चालीरिती यांची ते आज शिकार झालेले आहेत. आपल्या राज्याला धोका नको म्हणून, इंग्रजांनी यातील अनेक जातींना गुन्हेगार जाती ठरवून टाकले. भारताची श्रमशक्ती आणि उत्पादनशक्ती इंग्रजांनी मारून टाकली.

वसतिगृह सुरू झाले. प्रारंभीच्या पाच-सहा वर्षांत अनंत अडचणी समोर आ वासून उभ्या राहत गेल्या. अन्य कुठली संस्था असती, तर तिने हा नाद केव्हाच सोडून दिला असता. हे आपल्याला जमणारे काम नाही असा त्यांचा ग्रह सहज झाला असता. परंतु महाराष्ट्रातील संघशक्तीने असे होऊ दिले नाही. मी विवेकमधून तेव्हा वर्गणीदारांना आवाहन केले की 'वार्षिक वर्गणी 150 रुपये भरत असताना केवळ एक रुपया या प्रकल्पासाठी द्या.' अनेक वाचकांना असे वाटले की, मागून मागून काय मागितले, तर एक रुपया. एकाही वाचकाने एक रुपया दिला नाही, त्याने शंभराच्या आणि लाखाच्या पटीत रुपये भटके विमुक्त परषिदेच्या झोळीत टाकले. मुलांसाठी गहू-तांदूळ हवेत असे कुठे मागायला गेले की नुसत्या गहू-तांदळाने काय होते? भाजी करण्यासाठी तिखट-मीठ-तेल लागते. न मागतातच विवेकच्या वाचकांनी हे भरभरून दिले.

मग आठवण झाली ती कल्पवृक्षाची. मला तर अनेकदा असा अनुभव येऊ लागला की, मी तर कल्पवृक्षाच्या खाली बसलो आहे. ज्याची इच्छा करावी, ते हा सर्व समाज देत राहतो. एकदा प्रकल्पावर सतीश हावरे आले आणि त्यांनी एक लाखाचा धनादेश दिला. जयलक्ष्मी मुंडकर यांना पैशांची अत्यंत गरज असताना आणि त्यांच्याकडे मी पैसे मागितले नसतानादेखील, त्या विवेकमध्ये आल्या आणि त्यांनी दोन लाखाचा धनादेश माझ्या हाती ठेवला. डोंबिवलीचे अण्णा नाबर यांनी, विवेकानंद शाळेच्या मुलांच्या मदतीने एक ट्रकभर धान्य पाठवून दिले. डोंबिवलीच्या गणेश मंदिर देवस्थानाने तेवढेच धान्य, निधी आणि तेलाचे डबे पाठवून दिले. असा प्रत्येक अनुभव टिपायचा म्हटला, तर लेख किती पानांचा होईल हे सांगता येणार नाही. संघाशी काही संबंध नसलेल्या माझ्या मोठया जावयाने न मागताच लाखो रुपये प्रकल्पाला दिले, तेव्हा मला 'अल्पसे केलेले धर्मकार्यदेखील महान परिणाम घडवून आणते' या गीतेच्या वचनाची आठवण झाली.

 

जुने कार्यकर्ते थांबत गेले, त्यांची जागा नवीन कार्यकर्त्यांनी घेतली. विनोद पेंढारकर, अप्पा लातुरे, बिपीन शहा यांनी प्रकल्पाच्या बांधकामासाठी जे कष्ट घेतले आणि जो निधी उभा केला, तो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची छाती दडपून टाकणाराच आहे. आज त्यांच्यामुळेच यमगरवाडीला भव्य संकुल उभे राहिलेले आहे. 'इदम् न मम्' म्हणत आपले काम झाल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते सहजपणे बाहेर पडले. फार कठीण असते हे. कार्यकर्त्यांच्या मनात कधी आणि केव्हा अहम्भाव निर्माण होईल, माझ्यामुळे हे सर्व घडले असे त्याला वाटेल हे सांगता येत नाही, परंतु संघाचे वैशिष्टय काही औरच आहे. श्रीगुरुजींनी सर्व कार्यकर्त्यांना या जन्मात काय, परंतु पुढील जन्मात पुरेल असा मंत्र दिलेला आहे - 'मी नाही, तूच!'

माधवराव गायकवाड, चंद्रकांत गडेकर, रावसाहेब कुलकर्णी, मधुकर व्हटकर या कार्यकर्त्यांचे वर्णन काय करावे! बाळासाहेब देवरस यांच्या शब्दात सांगायचे, तर हे सर्व देवदुर्लभ कार्यकर्ते आहेत. पहिल्या दिवसापासून प्रकल्पात राबत आहेत, परंतु अपेक्षा शून्य. धनाच्या अपेक्षेचा तर प्रश्नच येत नाही. मान-सन्मानाची, पुरस्काराचीदेखील अपेक्षा नाही. मिळाला तर आनंद आहे, न मिळाल्यास दुःख नाही.

पंचवीस वर्षांच्या वाटचालीतला अतिशय महत्त्वाचा टप्पा 13 फेब्रुवारीच्या महाशिवरात्र मेळाव्यात गाठला गेला. आता यमगरवाडी प्रकल्पाची धुरा प्रा. डॉ. सुवर्णा रावळ आणि त्यांचे सहकारी डॉ. अभय शहापूरकर, नरसिंग झरे, शालिवाहन, उमाकांत मिटकर, गिरीश कुलकर्णी अशा अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे. या प्रकल्पात नवीन नवीन काय जोडता येईल, याचा विचार सुवर्णाच्या मनात कायम असतो. आपल्या शाळेत दहावीपर्यंत मुले शिक्षण घेतात, पुढे काय? पहिल्या दिवशी एवढाच विचार होता की निदान पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण द्यावे. मग प्रश्न आला की सातवी झाल्यानंतर काय? त्यामुळे हायस्कूल सुरू झाले, त्याला मान्यता नाही. शिक्षक चांगले मिळाले, संस्था जे मानधन देईल त्यावर काम करू लागले. आता हायस्कूलला मान्यता मिळाली आहे. पुन्हा प्रश्न आला, पुढे काय?

नवीन कार्यकर्त्यांना उत्तर सापडले - आता कौशल्य शिक्षणाचा उपक्रम सुरू केला पाहिजे. त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या. संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली. अध्यात्म आणि योगविद्येतील अधिकारी पुरुष श्रध्देय लाहिरी गुरुजी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी कामाची सर्व माहिती घेतली आणि विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या नावाने काम सुरू करावे असा निर्णय झाला. लाहिरी गुरुजींनी आपल्या शिष्यांतील तंत्रज्ञ, उद्योजक, यांना यात सहभागी केले. पंधरा-वीस कोटींच्या भव्य प्रकल्पाची संकल्पना सर्वांच्या विचारविनिमयातून आकाराला येऊ लागली.

एवढा भव्य प्रकल्प करायचा, तर त्यामध्ये शासनाचे सहकार्य पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्या संदर्भात बोलणे सुरू झाले. यमगरवाडी प्रकल्पाची ख्याती त्यांच्या कानावर होतीच. आम्ही त्यांना म्हटले की, आपण या, महाशिवरात्रीला संस्थेजवळ असलेल्या तुळजापूरजवळील भूमीवर शिलान्यासाचा कार्यक्रम करू आणि कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिले पाहिजे. त्यांनी त्याला अनुमोदन दिले आणि तेरा तारखेला 'विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र' या प्रकल्पाच्या शिलान्यासाचा कार्यक्रम झाला.

ज्यांच्या कौशल्यावर आणि श्रमावर एके काळी सुवर्णभूमी भारत उभा राहिला, त्याची एक पाऊलवाट महाशिवरात्रीला अधोरेखित करण्यात आली. पहिल्या दिवसाप्रमाणेच काम सुरू करण्याचा विचार झाला, परंतु साधने आज हातात नाहीत. आज संस्थेकडे काय आहे? तर संकल्पाने भारावलेल्या कार्यकर्त्यांचा चमू आणि कल्पवृक्षाप्रमाणे उभा राहणारा समाज आणि जोडीला देशव्यापी संघाची पुण्याई. आज शिलान्यासाचा केवळ दगड उभा आहे. कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी प्रश्न समजून घेणारी भाषणे केली, सरकार्यवाह भय्याजी यांनी उत्तम मार्गदर्शन केले. या शिलान्यासाच्या मागे आता हळूहळू बांधकामाला सुरुवात करावी लागेल. भटके विमुक्त समाजातील मुले आणि मुली वस्त्रोद्योग, धातुकाम, लाकूडकाम, मूर्तिकाम याचे आधुनिक शिक्षण घेऊ लागतील. पारंपरिक कौशल्याला आधुनिकतेची जोड, आधुनिक अवजारांची जोड, संगणकाची जोड देऊन हे काम उभे राहील.

नऊ हजार एकशे बत्तीस दिवसांचा प्रवास हा लेख लिहीत असताना आणखी एक दिवस पुढे गेला आहे. भगवान शंकर हे भटके समाजाचे आराध्य दैवत आहे. भगवान शंकर म्हणजे निरंतर भ्रमंती, भगवान शंकर म्हणजे सर्व कलांचा आणि ज्ञानाचा साठा, भगवान शंकर म्हणजे अनेक अस्त्रांचे जनक, योगविद्येचे जनक. आपल्याकडे असे म्हटले गेले की, शिव होऊन शिवाची पूजा केली पाहिजे. म्हणजे ज्याची पूजा करायची त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्णतः तसे बनणे शक्य नसते, परंतु दिव्व्यातील एक अंश आपल्यात उतरविण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करता येतो. तुळजापुरातील हे भूमिपूजन म्हणजे पूर्णत्वाची अंशरूपाने पूजा करण्याचा संकल्प आहे. या संकल्पात आपल्या स्वभावाप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे विवेकचे वाचकही सहभागी होतील. कारण हा प्रकल्प आपल्या सर्वांचा आहे.

vivekedit@gmail.com