बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा झटू नको।

विवेक मराठी    24-Feb-2018
Total Views |

***धनंजय दातार****

बँकांकडून घेतलेले कर्ज बुडवण्याच्या गैरव्यवहाराच्या नव्या घटना उजेडात आल्याने देशातील आर्थिक विश्व सध्या ढवळून निघाले आहे. स्वत:ला अब्जाधीश म्हणवणारे बँकांकडून प्रचंड रकमेचे कर्ज घेतात आणि ते न फेडता चक्क परदेशांत पळून जातात, या संगनमतात बँकांमधील काही उच्चाधिकारीही सामील होतात. पैशाची हाव काही जणांना इतकी वेडेपिसे बनवते, की या लोभापायी अगदी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि कायदाही झुगारून द्यायला ते मागेपुढे बघत नाहीत. शाहीर अनंत फंदींच्या 'बिकट वाट वहिवाट नसावी' या फटक्यातील उपदेशाची एक ओळ राहून राहून आठवते - 'बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुनी हेवा झटू नको।'

 आपल्या देशात गेल्या दोन दशकांत जे प्रचंड रकमांचे गैरव्यवहार उघडकीस आले आणि अजूनही येत आहेत, त्यांबाबत माध्यमांतून प्रसिध्द होणारा तपशील वाचताना दर खेपेस संताप, उद्वेग, खिन्नता आणि सहानुभूती अशा संमिश्र भावना माझ्या मनात दाटून येतात. अब्जाधीश म्हणवणारे लोक बँकांची कर्जे लबाडीने बुडवून चक्क परदेशात पळून जातात, हे बघितल्यावर मला संताप येतो. या प्रकारांना पायबंद बसण्यापेक्षा ते नवनव्या रूपात पुन्हा घडत राहतात, हे बघितल्यावर उद्वेग निर्माण होतो. मूठभर हावरट अधिकारी आपल्या संस्थेचे हित जोपासण्यापेक्षा बाह्य प्रलोभनांना बळी पडतात, हे बघून खिन्नता दाटून येते आणि कष्टाचा पैसा लुबाडला जाताना हताशपणे बघणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांबद्दल अपार सहानुभूती वाटत राहते.

चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझ्या आयुष्यात माझे आजवर कधीच नुकसान झाले नाही. अर्थात यामागे माझी हुशारी नसून वडीलधाऱ्यांच्या अनुभवाचे ठोकताळे आहेत. सन 1995नंतर दुकान चालवण्याची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य माझ्याकडे सोपवून माझे बाबा भारतात निघून गेले होते. दुकान फायद्यात चालत असल्याने माझ्याकडे पैसे साठू लागले. त्याच काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनव्या कंपन्या उदयाला येत होत्या आणि त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार चढाओढीने पुढे येत होते. मलाही वाटले की आपण अशा प्रॉस्पेक्टिव्ह क्षेत्रात पैसे गुंतवावेत. मात्र त्यापूर्वी मला बाबांचा सल्ला घेणे भाग होते, कारण निवृत्त झाले तरी तेच व्यवसायाचे मालक होते. मी त्यांना माझा मनोदय सांगितल्यावर त्यांनी मला साधा प्रश्न विचारला, ''तुला संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बारकावे ठाऊक आहेत का?'' मी नकार देताच ते म्हणाले, ''ज्या प्रवाहाचा अंदाज नाही, तेथे पोहण्याचे धाडस शहाण्याने करू नये. तुझ्याकडे पैसे साठले असतील तर ते आपल्याच धंद्यात गुंतव.'' मी बाबांचा सल्ला मानला. पुढे डॉट कॉम कंपन्यांचा बुडबुडा फुटला आणि गुंतवणूकदार पोळून निघाले, तेव्हा मी चकित झालो. बाबांचे सांगणे किती खरे होते याचा प्रत्यय आला. मी नंतर कधीही जास्त व्याजदराचे आमिष दाखवणाऱ्या योजनांत, प्लॉट विक्रीच्या योजनांत, शेअर बाजारासारख्या चढ-उताराच्या क्षेत्रांत पैसे गुंतवले नाहीत. बचत करून गंगाजळी साठवायची, धीर धरायचा आणि त्याच पैशातून नवे दुकान टाकायचे, हे तंत्र वापरले. त्याचा फायदा असा झाला की मला गरजेच्या वेळी स्वत:चाच पैसा पुरेसा उपलब्ध होत गेला.

वैयक्तिक आयुष्यात मात्र माझा काही वेळा विश्वासघात झाला आहे. मला मोठे नुकसान सोसायला लावून धडा शिकवणारा दुसरा-तिसरा कुणी नसून माझाच एक मित्र निघाला. मुंबईत कामानिमित्त आलो असताना माझी व या मित्राची खूप वर्षांनंतर भेट झाली. बोलण्याच्या ओघात तो खूप अडचणीत असल्याचे समजले. 'कर्ज थकले आहे, वसुली करणारे लोक घरी येऊन वाटेल ते बोलतात, फोनवरून धमक्या देतात, जीवनात नैराश्य दाटून आले आहे' वगैरे कहाणी ऐकून माझे मन द्रवले. मी त्याला म्हणालो, ''हे बघ, तुझे पाच लाख रुपयांचे कर्ज मी एकरकमी फेडतो. तू नव्याने सुरुवात कर.'' आता त्याचे चांगले चालेल या अपेक्षेने मी पैसे देऊन दुबईला रवाना झालो. पुढे मित्रपरिवाराचे गेट-टुगेदर ठरवण्यासाठी आणखी एका मित्राचा फोन आला, तेव्हा मी या जुन्या मित्राचे सध्या कसे चालले आहे, अशी चौकशी केली. त्यावर समोरचा मित्र हसून म्हणाला, ''काय रे? तूसुध्दा पाच लाख दान योजनेत पैसे घालवून बसलास का?'' हे ऐकताच मला धक्काच बसला. मग समजले की त्या महाशयांना लोकांकडून उधारी घेण्याची आणि ती न चुकवण्याची खोडच लागली होती. तो मिळेल तेथून पैसे घ्यायचा. बँका, मित्र, नातलग, अगदी खासगी सावकारांकडूनही कर्ज घेऊन झाले होते. तो इतका निबर कातडीचा झाला होता की वसुलीसाठी आलेले लोक संतापाने बोलू लागताच बिनधास्त म्हणायचा, ''तुम्हाला माझे हवे ते करा, पण मी पैसे देऊ  शकत नाही.'' मैत्री, विश्वास, प्रतिष्ठा, कायद्याचा धाक यापैकी कशाचीच त्याला पर्वा नव्हती. मी तेव्हापासून कानाला खडा लावला आणि अक्कलखात्यात तोटयाच्या बाजूला पाच लाख रुपये नोंद करून विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर कुणाला कर्जाऊ  आणि उधार-उसनवार देणे बंद करून टाकले.

माझ्या या मित्रासारखी निर्लज्ज माणसे श्रीमंतांमध्ये आढळतात, तेव्हा फार आश्चर्य वाटते. प्रतिष्ठा, सुबत्ता, मालमत्ता, सुखी कुटुंब असताना दुसऱ्याचा पैसा ढापण्याची ही कसली हाव म्हणायची? बँकेचे कर्ज बुडवून असे लोक एकाच वेळी बँक या संस्थेचा आणि सर्वसामान्य ग्राहकांचाही विश्वासघात करत असतात. बँकिंग हा व्यवसाय आहे. ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारणे व अधिक व्याजदराने तोच पैसा कर्जदारांना देणे, हीच बँकांची पध्दत असते. कर्जदार जो पैसा बुडवतात तो बँकेचा नसून ठेवीदारांचा असतो. बँकेच्या मूठभर हावरट कर्मचाऱ्यांच्या मदतीने गैरव्यवहार घडतो, पण त्या बँकेची प्रतिष्ठाही धुळीला मिळते. विश्वास निर्माण करायला काही शतके गेलेली असतात, पण तो गमवायला एक क्षण पुरेसा होतो. आणखीही एक अप्रत्यक्ष नुकसान होते. एखाद्या व्यावसायिकाने बँकेचे प्रचंड रकमेचे कर्ज थकवले की बँक सावध होऊन सगळयाच व्यावसायिकांकडे शंकेने बघू लागते व खऱ्या गरजूंना वेळेवर कर्ज मिळत नाही. मी उद्योजकीय मार्गदर्शनात नवउद्योजकांना नेहमी सांगतो, ''बाबांनो! कर्ज ही धंद्याला संजीवनी असते. कर्ज घ्या, पण नियमितपणे फेडा. त्यात कसूर करू नका.'' मलाही सुरुवातीला एका बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला होता. मला सुकामेव्याचे मोठे कंत्राट मिळाले होते आणि माल खरेदीसाठी पैसे नव्हते, तेव्हा केवळ माझ्याजवळचे ऑॅर्डरचे पत्र बघून त्या बँकेने तत्काळ कर्ज देऊ  केले. ते मी अल्पावधीतच चुकते केले. माझी एका दुकानाची दोन दुकानेही एका अन्य बँकेच्या कर्जाच्या मदतीने झाली. मात्र मला कर्ज म्हणजे डोक्यावर टांगती तलवार वाटत असल्याने नेहमी दडपण येते. त्यामुळे मी कर्जाचा मार्ग न वापरता बचतीतून आणि गंगाजळीतून व्यवसाय वाढवत गेलो. असे असले, तरी बँकेच्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून मी बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी नेहमी मदत केली.

बँकेसारख्या उपयुक्त संस्थेचे कर्ज बुडवणे किंवा गुंतवणूकदारांच्या पैशाचा अपहार करणे, या गोष्टी दीर्घकाळात नाशाला कारणीभूत ठरतात. आर्य चाणक्याने आपल्या अर्थशास्त्रात एक नीतिसूत्र सांगितले आहे - 'पापाने मिळवलेला पैसा जास्तीत जास्त दहा वर्षे टिकतो आणि अकराव्या वर्षी तो समूळ नष्ट होतो.' मला एक संस्कृत सुभाषित आठवते -

परस्वानां च हरणं परदाराभिमर्षणम्। सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषा: क्षयावहा:॥

(परधनाचे हरण, परस्त्रीची अभिलाषा आणि मित्रांवर संशय हे तीन दोष विनाशकारी असतात.)

मित्रांनो! मी माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणाला अत्यंत महत्त्व दिले आहे. त्याचा मला कधीही पश्चात्ताप झालेला नाही. प्रामाणिकपणा हा बावनकशी सोन्यासारखा असतो आणि त्याचे मोल कुठल्याही काळात श्रेष्ठच असते. आपण प्रामाणिकपणे वागत गेलो, तर आपली कीर्ती निष्कलंक राहते. पैशाची आसक्ती धरून जे परद्रव्याचा अपहार करतात, त्यांना तरी काय मिळते? आयुष्याच्या अखेरीस लोकांच्या मनात 'एक चोर' इतकीच त्यांची प्रतिमा उरते. बरे, इतके करून तो लुबाडलेला पैसा तरी मरताना बरोबर नेता येतो का?

संत सेना महाराजांचा उपदेश ध्यानी धरण्यासारखा आहे -

लबाडी करुनि साठविले धन। मृत्यू येता जाण घेता नये।

नागवेचि येई नागवेचि जाई। सुखे उतराई झाले पाही॥

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क़्रमांकावर पाठवू शकतात.)