समर्थांची भक्ती व शक्ती उपासना

विवेक मराठी    26-Feb-2018
Total Views |



maruti_1  H x W

समर्थ रामदास स्वामींनी समाजाला भक्तीबरोबरच शक्ती उपासना, बलोपासना (मारुती मंदिरे स्थापून) शिकवली. समर्थस्थापित ११ मारुती आजही प्रसिद्ध आहेत. तसेच संत तुकारामांनीही महाबली हनुमंताच्या भक्तीचा महिमा गाऊन बलदेवतेचे, शक्ती उपासनेचे प्रतिपादन केलेले आहे. ‘हनुमंत महाबली। रावणाची दाढी जाळी। तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर॥‘ असा तुकोबांचा अभंग आहे. या अभंगात ते ‘रावणाची दाढी जाळी।’ म्हणतात, हा दाढीवाला रावण म्हणजे मुस्लीम धर्मांध बादशहाच! रामायणातील रावणाला दाढी कोठे होती? अशा प्रकारे संतांनी केलेली सामाजिक चेतनाजागृती आपण समजून घेतली पाहिजे.

 
समर्थ रामदास स्वामींचा काळ हा पारतंत्र्याचा – मोगल राजवटीचा काळ होता. धर्मांध मोगल बादशहाच्या मदतीच्या जोरावर मुसलमान फकीर व संत गावोगाव इस्लामच्या प्रचारार्थ अल्लाचे नाव घेत फिरत होते. हे सर्व फकीर घरोघर जाऊन भीक मागत व धर्मप्रचारार्थ गरीब-अज्ञानी लोकांना हेरून नंतर त्यांना एखाद्या पिराच्या - दर्ग्याच्या नादी लावत असत. हे फकीर घरोघर हिंडताना ‘गज्जला’ - म्हणजे अल्लाची भक्तिगीते मोठमोठ्याने गात असत. या फकीरांच्या ‘गज्जला’ गाण्याला उत्तर म्हणून सर्वाविषयी सावध असणार्‍या समर्थ रामदासांनी सहजपणे सुरात म्हणता येतील असे मनाचे श्लोक लिहिले. समर्थांचे एकूण धोरण हे ‘धटाशी धट’ असे सडेतोड प्रत्युत्तराचे होते. मुसलमान फकीराच्या ‘गज्जला’ला प्रभावीपणे तोंड देऊन त्याच तालावर, ठेक्यावर म्हणता येईल अशा भुजंगप्रयात छंदाची निवड करीत समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना केली असावी, अशी शक्यता थोर विचारवंत प्राचार्य अ.दा. आठवले उर्फ्र वरदानंद भारती यांनीही त्यांच्या ‘मनोबोध’ पुस्तकात (पान १४) व्यक्त केलेली आहे. एवढेच नव्हे, तर ते पुढे म्हणतात - ‘‘देशभर मुसलमानी सत्ता असताना केवळ महाराष्ट्रातच छ. शिवाजीराजे होतात व मुसलमानी बादशहाच्या नाकावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात, त्यामागे छ. शिवाजीराजांच्या पराक्रमाएवढेच तत्कालीन संत तुकाराम व समर्थ रामदास यांचे जनजागृती प्रयत्न होते.’’ या जनजागृतीत मनाच्या श्लोकाचे योगदान अपूर्व स्वरूपाचे आहे. या उभय संतांनी केलेली जनजागृती केवळ भजन-पूजन अशी धार्मिक नव्हती, तर स्वाभिमान, स्वधर्म व आत्महित अशा मूल्यांचीही जागृती होती. मनाच्या श्लोकाबरोबरच जिज्ञासूंनी संत तुकोबांचे ‘पाईकाचे अभंग’ सूक्ष्मपणे पाहावेत व त्यामागील गर्भित सूचक अर्थ जाणून घ्यावा.


Maruti Temples Maharashtr

समर्थ रामदास स्वामींनी समाजाला भक्तीबरोबरच शक्ती उपासना, बलोपासना (मारुती मंदिरे स्थापून) शिकवली. समर्थस्थापित ११  मारुती आजही प्रसिद्ध आहेत. तसेच संत तुकारामांनीही महाबली हनुमंताच्या भक्तीचा महिमा गाऊन बलदेवतेचे, शक्ती उपासनेचे प्रतिपादन केलेले आहे. ‘हनुमंत महाबली। रावणाची दाढी जाळी। तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर॥‘ असा तुकोबांचा अभंग आहे. या अभंगात ते ‘रावणाची दाढी जाळी।’ म्हणतात, हा दाढीवाला रावण म्हणजे मुस्लीम धर्मांध बादशहाच! रामायणातील रावणाला दाढी कोठे होती? अशा प्रकारे संतांनी केलेली सामाजिक चेतनाजागृती आपण समजून घेतली पाहिजे. 

मारुती - हनुमान हा केवळ महाबलीच नव्हे, तर ‘बुद्धिमानम् वरिष्ठम्’ आहे, बुद्धिमान आहे, तसेच ते दासभक्तीचे मूर्तिमंत आदर्श व अनुकरणीय उदाहरण आहे. ‘दास कसा असावा? तर मारुतीसारखा’ असे म्हटले जाते. मारुतीचे आणखी एक सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो भक्तिमार्गावरील ‘आचार्य’ आहे. भक्तीच्या क्षेत्रातही तो श्रेष्ठ आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी मारुतीस्तोत्रात म्हणतात - ‘’मारुतीच्या प्रसादाने भक्ती-मुक्ती सदा वसे।‘’ मारुती ही समर्थांची कुळवल्ली आहे. ‘हनुमंत आमची कुळवल्ली’, ‘आमचे कुळी हनुमंत’, ‘हनुमंत आमुचे मुख्य दैवत’ ही समर्थ रामदासांची वचने व रचना मुळातून अभ्यासण्यासारख्या आहेत. ईश्वराचे अनेक अवतार झाले व कार्य सिद्धीस जाताच समाप्त झाले. पण मारुती हा चिरंजीव आहे. आपल्या परंपरेत सात चिरंजीव आहेत, त्यात मारुती एक आहे. समर्थांप्रमाणे संत तुकारामांनीही मारुतीला भक्तिमार्गाचा आचार्य मार्गदर्शक मानलेले आहे. ‘‘काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावाव्या सुभटा॥‘ ही तुकोबांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास व संत तुकाराम या दोन समकालीन संतांमध्ये अशी अनेक सुंदर साम्यस्थळे आहेत, त्याचा बोध घेत आपण संतासंतामधील अंतरंग एकता जाणून वरवरच्या भेदाभेदांना निर्धाराने मूठमाती दिली पाहिजे. 

मनाच्या श्लोकातील ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा।’ या चरणात समर्थ रामदासांनी लवकर उठण्याचा अप्रत्यक्ष बोध केलेला आहे. लवकर उठण्याच्या या एका क्रियेत अनेक गोष्टी साध्य होतात. लवकर उठणे (सूर्योदयापूर्वी) ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते. Early to rise and early to bed असे इंग्लिशमध्येही एक सुभाषित प्रसिद्ध आहे. तेच समर्थ रामदास ‘प्रभाते’ या एका शब्दातून सुचवतात. सूर्योदयापूर्वीचा २ तासाचा वेळ - म्हणजे सुमारे ४ ते ६ वाजताचा काळ आयुर्वेदाच्या दृष्टीने वाताचा काळ मानला जातो. या काळात उठण्याने शरीरातील पित्त (अ‍ॅसिडिटी), रक्तदाब (बी.पी.) रक्तशर्करा (ब्लड शुगर) यांचे संतुलन-नियंत्रण होते. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे रात्र रात्र जागून काम करणे व दिवसा उशिरा उठणे ही गोष्ट सर्वसामान्य - ‘कॉमन’ झालेली आहे. आय.टी. क्षेत्रातील युवक तर चाळिशीतच अनेक व्याधी-विकारांना बळी पडल्याचे आढळतात. पूर्वीचे लोक सकाळी लवकर उठत, उठल्या-उठल्या बिछान्यावर स्वस्थ बसून सर्वप्रथम पाच मिनिटे ईश्वराचे चिंतन करीत. या चिंतनातून त्यांना एक प्रकारचे चैतन्य - ऊर्जा मिळत असे. उठल्या उठल्या अंथरुणावर बसूनच ‘कराग्रे वसती लक्ष्मी। करामध्ये सरस्वती। करमूलेतु गोंविदा। प्रभाते करदर्शनम्।’ असा श्लोक म्हणून आपल्याच दोन्ही तळव्यांचे दर्शन करीत. ही हाताबद्दलची कृतज्ञता होय. कारण दिवसभर आपण दोन्ही हातांनी राबतो. आपली सारी कर्मे हातांनी करतो. ही हातांनी केलेली कर्मोपासनाच असते. त्या हातांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपणासच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. अशा करदर्शनानंतर पृथ्वीमातेवर (जमिनीवर) पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी आणखी एक दुसरा श्लोक म्हणून तिची क्षमा मागून पाऊल ठेवले जाते. ‘समुद्रवसने देवी। पर्वतस्तनमंडले। विष्णुपत्नी नमस्तुभ्यम्। पादस्पर्श क्षमस्व मे।‘ हा तो दुसरा श्लोक. या श्लोकात पृथ्वीचे वर्णन करून तिला वंदन केलेले आहे व पादस्पर्श करण्याबद्दल क्षमा मागितलेली आहे. ज्या पृथ्वीवर आपण दिवसभर चालतो-फिरतो, वावरतो, त्या वसुंधरेची सकाळी सकाळी पहिले पाऊल ठेवण्यापूर्वी केलेली स्तुती – प्रार्थना म्हणजे (Salute to mother Earth) पृथ्वीदेवतेला - वसुंधरेला कृतज्ञतापूर्वक केलेले वंदन आहे. केवढा थोर विचार! केवढी थोर परंपरा!! पण धावपळीच्या जीवनशैलीत आपण हे विसरलो आहोत. आज आपण सहजपणे कोठेही कोणालाही पाय लागला, नव्हे, साधा धक्का लागला, तरी sorry म्हणतो. मग ज्या पृथ्वीवर पाय ठेवून अखंडपणे चालतो, तिच्याविषयी प्रभातसमयी कृतज्ञतेने वंदन करणे हे प्रतिगामी - बॅकवर्ड out of date कसे होऊ शकते? असो.

मनाच्या श्लोकात समर्थ रामदास पुढे म्हणतात - ‘मना धर्मता नीति सोडू नको। मना अंतरी सार विचार राहो॥‘ या व अन्य श्लोकांचा विचार पुढील लेखात.

जय जय रघुवीर समर्थ॥

विद्याधर ताठे

९८८१९०९७७५