मुलं अशी का वागतात?

विवेक मराठी    26-Feb-2018
Total Views |

मूल असं का वागलं? हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. यासाठी पालक त्यांना मारतात किंवा रागावतात. मग यातून एकतर मूल खजिल होतं, सारखंसारखं पालकांकडून दुखावलं जातं तर कधी ते अधिकाधिक निगरगट्ट होतं आणि मग माहिती मिळवण्याची त्याची भूक अधिकाधिक भागवू लागतं, तेही पालकांच्या परोक्ष... कधी मनालीच्या आईसारखं एकटयानेच अडचणींचा, प्रश्नांचा भार पालक वाहतात आणि याचा जास्त तणाव जाणवतो. यासाठी काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

खूप अस्वस्थपणे ती सांगत होती. ''आमचं काय चुकलं काही कळत नाही... मुलगी असं वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. काय चुकलं हो आमचं? दोन दिवसांपासून डोकं भणभणून गेलंय विचार करून...'' तिच्या डोळयातून अश्रू अनावरपणे ओघळत होते. संताप, चिंता, पश्चात्ताप अशा अनेक छटा त्या आईच्या आक्रोशात दिसत होत्या.

तिला शांत करणं गरजेचं होतं. तिला मोकळं व्हायला थोडा वेळ दिला आणि मनात येणारं सारं कागदावर उतरवायला सांगितलं.

या आईचं दु:ख हे होतं की सहावीमध्ये शिकणारी तिची मुलगी कॉम्प्युटरवर अश्लील काही पाहण्याचा प्रयत्न करत होती. आई-वडील नोकरीमध्ये व्यग्र. एकच मुलगी. लाडात बालपण एन्जॉय करताना तिला हे 'असलं' काही का सुचावं, यामुळे आईची चिडचिड होत होती. ''का असं? आम्ही आई-वडील तिच्यापुढे अगदी काळजीपूर्वक वागलो. मग हे असं का?'' पुन्हा एकदा आगीत तेल पडावं तसं संतापाने ती म्हणाली. हा प्रकार कळेपर्यंत कोकरू असणारी तिची लेक एकदम खलनायिका झाली होती.

मी तिला संध्याकाळी मुलीसह येण्यास सांगितलं. मुलगी खूप भेदरलेली दिसत होती. आईने तिला दोन दिवस बराच शाब्दिक आणि हाताचाही मार दिला होता आणि तिच्या बाबांना कामावरून आल्यावर त्रास नको म्हणून यातील काहीही सांगितलं नव्हतं.

मी आईला बाहेर बसवून मुलीशी - मनालीशी (काल्पनिक नाव) गप्पा मारायला सुरुवात केली. हळूहळू ती मोकळी होऊ लागली.

घडला विषय हळूहळू स्पष्ट होऊ लागला. तिच्या वर्गातील काही मुलींनी स्वत:चा बॉयफ्रेंड निवडला होता. वर्गात जोडया लावल्या नव्हत्या, पण मनात उत्सुकता मात्र होती. मुली तिला कधी म्हणायच्या 'तुला बॉयफ्रेंड नाही सापडला अजून...' अशा काही मुली तिच्या वर्गात होत्या, ज्यांना नेमकं काय ते शोधावंसं वाटू लागलं... मग त्यांनी गूगलवर सर्च करायचं ठरवलं. मनालीने जेव्हा सर्च केलं तेव्हा काही माहिती, इमेजेस समोर आल्या, पण तिला त्यात फारसा रस वाटला नाही आणि तिने ते बंद केलं. पण आईने त्याच दिवशी इंटरनेटची हिस्टरी पाहिली आणि संतापाने मनालीला फैलावर घेतलं.

मनाली म्हणाली, ''मी आईला खरं खरं सांगितलं तरी आई मला मारू लागली आणि दोन दिवस मला सारखं बडबडते. बोलत नाही माझ्याशी पहिल्यासारखं...'' मनालीला अश्रू अनावर झाले. अश्रू दोन्हीकडे होते, पण एकमेकांकडे पाठ फिरवलेले...

अशा अनेक केसेस पाहायला मिळतात. ज्यांची मुलं-मुली किशोरवयात आली आहेत ना, त्यांना अशा अनुभवांना बरेचदा सामोर जावं लागतं आणि बहुतांशी पालकांचा त्रागा होतो की आम्ही इतकं चांगलं वागून, सारं पाहिजे ते देऊनदेखील मूल असं का वागलं?

प्रश्न खरा असला, तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तपासण्याचा थोडा प्रयत्न करू या.

मूल असं का वागलं? हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. यासाठी पालक त्यांना मारतात किंवा रागावतात. मग यातून एकतर मूल खजिल होतं, सारखंसारखं पालकांकडून दुखावलं जातं तर कधी ते अधिकाधिक निगरगट्ट होतं आणि मग माहिती मिळवण्याची त्याची भूक अधिकाधिक भागवू लागतं, तेही पालकांच्या परोक्ष...

कधी मनालीच्या आईसारखं एकटयानेच अडचणींचा, प्रश्नांचा भार पालक वाहतात आणि याचा जास्त तणाव जाणवतो.

यासाठी काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

- आई-वडील ही आपण आनंदाने स्वीकारलेली भूमिका आहे. मग ती नोकरी-व्यवसायाच्या ताणांमध्ये दुय्यम समजणं रास्त आहे का?

- आई किंवा वडील या डयुटीला सुट्टी नसते, हे आपल्याला मान्य आहे का?

या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं शोधली की एक गोष्ट लक्षात येते की, आपल्या मुलाची-मुलीची कोणतीही समस्या ही एकटयाने न हाताळता ती आई-वडील दोघांनी हाताळणं हे पहिलं सोल्युशन आहे.

आता मनालीने किंवा तिच्यासारख्या मुलामुलींनी इंटरनेटच्या माध्यमातून स्त्री-पुरुष संबंध व तत्सम गोष्टीबाबत माहिती घेण्याविषयी आपण थोडा विचार करू.

- मुलाला या विषयाची माहिती घ्यावी असं का वाटलं, याचं कारण आपण शोधलं किंवा समजून घेतलं का?

- मुलाने अशा गोष्टी सर्च केल्या ही गोष्ट स्वीकारणं मला अवघड वाटतं का?

- माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी त्याच्याकडे अन्य काही साधन उपलब्ध होतं का?

- मूल या साऱ्या गोष्टीत किती गुंतलं आहे?

- मी त्याचा/तिचा राग करून, सारखं टोचून बोलून, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर या कृतीची सावली पाडत राहून ही परिस्थिती आणि मला जाणवलेली समस्या सुटणार आहे का?

नक्कीच नाही... उलट ती समस्या अधिक गडद होत जाईल.

यासाठी एक पालक म्हणून आपण पुढील गोष्टी समजून घेऊ.

मूल एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आजपर्यंत ते माझ्या विश्वाच्या परिघात फिरत आहे, तरी एक वेळ अशी येईल की ते स्वत:च एक केंद्र ठरवेल आणि त्या वेळी त्याच्या अफाट जगाच्या परिघावर मी असावं असं वाटत असेल, तर मला 'त्याचं' मोठं होणं मान्य करावं लागेल.

साधारणत: 11व्या वर्षापासून या किशोरावस्थेला सुरुवात होते. हॉर्मोनल बदलांमुळे शारीरिक, मानसिक विकास होऊ लागतो. त्याच वेळी मेंदूचा विकासही घडत असतो. नावीन्याचा शोध घेण्याची ओढ लागते. मनात अनेक प्रश्न, शंका निर्माण होतात. त्यातच आपले निर्णय आपण घ्यावेत, प्रश्न आपले आपणच सोडवावेत अशी हाक मेंदूकडून येऊ लागते. शारीरिक बदल व भावनिक चढ-उतार ही कसरत करताना निर्माण होणाऱ्या शंका अस्वस्थ करतात. आणि यात समवयस्कांकडून संबंधित विषयाची भलीबुरी, अतिरंजित वा अर्धसत्य आणि मुख्य म्हणजे 'अशास्त्रीय' माहिती कळत-नकळत कानावर पडते आणि मग सहज उपलब्ध असलेल्या भल्या-बुऱ्या माहितीच्या खजिन्याची चावी त्यांच्या हाती येते. 'सुसंस्कृतपणाच्या' आवरणाखाली झाकलेली, पालकांनी मुलांपासून दडवून ठेवलेली अनेक गुपिते एका क्लिकवर त्यांच्यासमोर विकृत पध्दतीने (अनेकदा) उघड होऊ लागतात.

सुरुवातीला मुलांना हे सारं धक्कादायक वाटतं, पण त्यातील नावीन्य, थ्रिल मात्र खुणावू लागतं. मग अशा फिल्म्स पाहणं, फोटो पाहणं किंवा अशा विषयांवर मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करणं असे सहज मार्ग मुलांकडून निवडले जातात.

मग सुरू होतो ड्रामा. डबलशेलचा. थ्रिलिंगचा अनुभव घेणारी मुलं-मुली आपण निवडलेला मार्ग पालकांपासून लपवताना कमालीची बालिश वागू लागतात.

जोपर्यंत पालकांना हे माहीत नसतं, तोपर्यंत ठीक. पण नंतर मनालीसारखी उपेक्षा वाटयाला येते.

बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो, ''सगळं मान्य, पण मग आम्ही नेमकं काय करावं ते सांगा.''

इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की, समस्या ही काही एकाएकी उभी होत नाही. त्याला कारणं असतात. ती खोल भूतकाळात रुजलेली असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर एक धारणा पक्की करावी की, 'पालकत्व' म्हणजे काही गूगल मॅपवर सापडणारा, विशिष्ट असा तयार रस्ता नाही, तर ती आपल्या पाल्याच्या दृष्टीने विचार करत त्याला अधिक उन्नत करत जाणारी नवी वाट घडवण्याची एक प्रक्रिया आहे.

कुणाला ही फिलोसॉफी वाटते. पण हे एक तत्त्व कळलं ना, की सारे प्रॅटिकल्स यशस्वी होऊन जातात.

मुलाला हवी ती वस्तू देऊन आपण त्याला खूश करतो, पण त्याच्या नावीन्याच्या भुकेला आपण समजून घेतो का? याचा विचार करणं आवश्यक आहे.

यासाठी पालकांना काही टिप्स... पाहा बरं विचार करून -

1) यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मुलाच्या-मुलीच्या वागण्यात, देहयष्टीत 'मोठं' होण्याचं चिन्ह दिसू लागतात. त्यांना सोप्या, शास्त्रीय भाषेत त्यांच्या पौगंडावस्थेची, त्याच्या कारणांची, परिणामांची जाणीव करून द्या.

2) अधूनमधून त्यांना ''काही शंका आहे का?'' काही विचारावं, जाणून घ्यावंसं वाटतं का? हे (Indirectly) तपासून पाहा.

3) काही शंका असल्यास त्या निरसन करणारी पहिली व्यक्ती 'मी' (आई/वडील) असेन, याचा विश्वास मुलाच्या मनात खोल रुजवा.

4) तथापि मुलाकडून असं वर्तन घडल्यास त्याच्यावर त्रागा न करता, त्याने निवडलेला मार्ग कसा अयोग्य आहे ते शांतपणे समजावून सांगा.

5) तो/ती तुम्हाला आवडतो/ते, पण त्याने/तिने निवडलेला पर्याय मात्र आवडत नाही, हे त्याला/तिला पटवून द्या.

6) आपण लहानाचे मोठे होताना आलेल्या अनुभवांचा दाखला देत त्याच्या जिज्ञासेचं सकारात्मकतेने त्यालाच दर्शन घडवा.

7) त्याच्या विरोधात उभं राहून काहीही हाती लागणार नाही. त्याच्या भावना समजून घ्या आणि हळुवारपणे बदल घडवा.

8) त्याच्या/तिच्या बोलण्यात काही चुकीचे, शारीरिक किंवा अश्लील संदर्भ आल्यास त्याच वेळी त्याला स्पष्ट सांगा. एक व्यक्ती म्हणून गुणावगुणांचा संच म्हणून प्रत्येकाकडे पाहायला शिकवा.

9) समवयस्क मुलामुलींचा सन्मान करायला लहानपणापासूनच शिकवा.

10) त्यांच्यातील Strengths समजून घ्या. त्यांच्यातील एखाद्या गुणाला खुलवण्यासाठी साहाय्य करा. ज्याला स्वत:कडे पाहताना आदर वाटतो, तो इतरांनाही आदराने पाहू शकतो.

ज्या गोष्टी यथार्थ कळतात, त्याबाबत माणसाला Curiosity वाटत नाही; पण ज्या गोष्टी लपवल्या जातात, त्या शोधून काढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणं हा मानवी मनाचा स्वभाव आहे.

पण आपल्या समाजात Sex Education देण्याबाबत आजही फारशी उत्सुकता आणि मान्यता दिसत नाही.

अभिजात असलेले स्त्री-पुरुष संबंध निकोप राहावेत असं वाटत असेल, तर नव्या उमलत्या पिढीला आवश्यक तितकं आणि आवश्यक तेव्हा ते शास्त्रीय पध्दतीने सांगावेच लागतील. नाहीतर निसर्गाच्या शास्त्रशुध्द अशा मनुष्यदेहाला केवळ वासनेच्या डोळयांनीच पाहिलं जाईल.

9273609555