ध्येयासक्त रमेश  सावंत

विवेक मराठी    27-Feb-2018
Total Views |

आयुष्याच्या एका टप्प्यावर रमेशजींना अंधत्व आले. नोकरी, संसार, मुलेबाळे यांत रमलेल्या रमेशजींना अचानक काळोखाचा सामना करावा लागला. अशा क्षणी कोणताही माणूस उन्मळून पडण्याची दाट शक्यता असते. रमेशजी मात्र याला अपवाद ठरले. अंधत्वाने आपल्याला नवे जीवन आणि नवी दिशा दिली आहे.

दि. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी कोकण प्रांताच्या प्रांतिक बैठकीत रमेश सावंत यांना डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या माध्यमातून दिला जाणारा पावित्र्य पुरस्कार सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका प्रामाणिक आणि ध्येयासक्त कार्यकर्त्याचा सन्मान झाला. आदल्या दिवशी निवेदिताने ही बातमी सांगितली, तेव्हा मनात आनंदाचे तरंग उमटले. त्या तरंगांवर स्वार होऊन मी भूतकाळात भटकंतीला निघालो  भूतकाळ उकरून मी माझ्या जीवनातील रमेशजींना शोधू लागलो. रमेशजींची पहिली भेट अस्मिता शाळेत झाली. समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनंत तोरो यांचा सत्कार सोहळा अस्मिता शाळेत होता. त्या कार्यक्रमात सुनील ढेंगळेंनी रमेशजींचा परिचय करून दिला. तेव्हापासून आजपर्यंत रमेशजींशी मी जोडलो आहे. बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलेली कामे करण्यात आनंदही वाटला आहे. माझे आणि रमेशजींचे नाते काय? या प्रश्नाला नक्की उत्तर सांगता येत नाही. अनेक रूपात रमेशजी मला भेटले आहेत. मार्गदर्शक आणि आत्मीय मित्र अशा भूमिका रमेशजींनी पार पाडल्या आहेत. रमेशजींकडे सक्षम या संघटनेचे क्षेत्राचे काम आहे. सक्षम हे नामविधान होण्याअगोदर दृष्टिहीन कल्याण संघ या नावाने काम चाले, तेव्हाची गोष्ट. मुंबई परिसरातील अंध कवींचे कविसंमेलन आपण आयोजित करू या असा प्रस्ताव रमेशजींनी माझ्यासमोर ठेवला, तेव्हा मला प्रश्न होता - किती कवी येतील? रमेशजींनी मुंबई, ठाणे, कर्जतपर्यत प्रवास करून कविसंमेलनात पन्नास कवी उपस्थित केले. रमेशजींच्या जनसंपर्काचे आणि संघटन कौशल्याचे मला झालेले ते दर्शन होते. जोगेश्वरीच्या अरविंद गंडभीर शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध दलित साहित्यिक राजा जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमच्या डोळसपणाची आम्हाला लाज वाटावी अशा देखण्या कविता या कविसंमेलनात सादर झाल्या. या कार्यक्रमाने आम्हाला नवी दिशा मिळाली आणि सातत्याने समरसता साहित्य परिषद आणि सक्षम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करण्याचा मानसही आम्ही व्यक्त केला. रमेशजींनी उपस्थितीसाठी प्रवास आणि प्रयत्न करायचे आणि मी कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था पाहायची, अशी आमची कार्यविभागणी ठरली. पहिला कार्यक्रम बळ देऊन गेला आणि मग आम्ही एक दिवसीय संमेलनाचा घाट घातला. शि.गो. देशपांडे सरांनी आमची कल्पना उचलून धरली आणि या संमेलनात उपस्थित राहण्याचे कबूल केले .तात्या जोगळेकर, जयंतराव सहस्रबुद्धे इत्यादी मान्यवरही या संमेलनात सहभागी झाले. याच संमेलनात आम्ही सूरदास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. जे हे जग पाहू शकत नाहीत, त्यांच्या अनुभूतीतून जन्मलेल्या शब्दांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकलो. या साऱ्यात रमेशजींचे परिश्रम व अचूक निर्णयाची अनेक वेळा प्रचिती आली. काही वर्षांपूर्वी माझे ‘आयाबाया’ प्रकाशित झाले. निवेदिता, तनुजा यांना जवळ बसवून रमेशजींनी ते पुस्तक वाचून घेतले. “या पुस्तकाची ऑडिओ रेकॉर्ड करून द्या. आमच्या कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे .लवकर करा” असा आग्रह धरला. मला त्यांचा आग्रह पुरा नाही करता आला. पण त्या निमित्ताने त्यांचा सामाजिक कळवळा माझ्या लक्षात आला.


 आयुष्याच्या एका टप्प्यावर रमेशजींना अंधत्व आले. नोकरी, संसार, मुलेबाळे यांत रमलेल्या रमेशजींना अचानक काळोखाचा सामना करावा लागला. अशा क्षणी कोणताही माणूस उन्मळून पडण्याची दाट शक्यता असते. रमेशजी मात्र याला अपवाद ठरले. अंधत्वाने आपल्याला नवे जीवन आणि नवी दिशा दिली आहे. या कठीण काळात रमेशजींना साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची. वृषालीकाकूंनी संसाराचा भार स्वतःच्या शिरावर घेतला आणि त्या ठामपणे उभ्या राहिल्या. दुःख, खेद व्यक्त करण्यापेक्षा जे भोग आहेत ते आनंदाने स्वीकारून त्यांनी जगण्याला आनंदाची किनार लावली. जे पदरात पडले ते पवित्र करून घेत रमेशजी सक्षमचे काम करू लागले. सक्षमच्या बैठका, कार्यक्रम यासाठी राज्यभर प्रवास करू लागले. अंध-अपंगांसाठी रस्त्यावर आंदोलने करू लागले. एका आंदोलनात डोक्याला जखम झाली, तरी मागे न हटता रमेशजी आंदोलनात पुढे उभे राहिले. नुकत्याच नगर येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनात रमेशजी आपल्या सहकाऱ्यासह हजर होते.

रमेशजी मूळचे कोकणातले. कोकणी माणसांची सारी गुणवैशिष्ट्ये रक्तीमांसी खिळली असतानाही रमेशजींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेवाभाव आणि आत्मीयता हा रमेशजींचा स्थायिभाव झाला आणि तोच माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी दीपस्तंभही ठरला. पावित्र्य पुरस्काराच्या निमित्ताने या दीपस्तंभाचा समयोचित सन्मान झाला आहे. रमेशजींना यातून नवी ऊर्जा मिळाली असेल आणि ते नव्या दमाने नव्या प्रवासाची तयारी करत असतील.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
 https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद 
https://www.facebook.com/VivekSaptahik/