सभ्यतेला मूठमाती देणारी मनोविकृत माध्यमं

विवेक मराठी    28-Feb-2018
Total Views |

श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूमागे जोवर या वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने 'सेन्सेशनल' मुद्दे होते, तोवर देशासमोरचे अन्य महत्त्वाचे विषय त्यांच्यासाठी गौण बनले होते. मात्र खुद्द श्रीदेवीच्या विषयातही या वाहिन्यांचे रंग चार दिवसांत बदलत गेले - पहिले दोन दिवस तिला मखरात बसवणारे नंतर तिच्या खाजगी आयुष्याचे जाहीर वाभाडे काढू लागले. वाहिन्यांच्या या कोडग्या वर्तनाने अनेक संवेदनशील दर्शक हादरून गेले.

अभिनयाच्या प्रांतातली तिसरी इनिंग अधिक प्रगल्भपणे चालू झालेली असताना आणि त्याआधीच्या कारकिर्दीच्या आठवणीही चाहत्यांच्या मनात जिवंत असताना बॉलीवूडमधील पहिली स्त्री सुपरस्टार श्रीदेवी हिने जीवनाच्या रंगमंचावरून अगदी अनपेक्षितरित्या 'एग्झिट' घेतली. तिचं जाणं केवळ चित्रपटसृष्टीलाच नव्हे, तर सर्वसामान्य चाहत्यांनाही चटका लावून गेलं. वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेली ही दाक्षिणात्य अभिनेत्री जेव्हा बॉलिवूडमध्ये आली, त्या वेळीच ती दक्षिणेकडची सुपरस्टार होती. हिंदी भाषेचा गंध नसतानाही अंगभूत अभिनयक्षमता, व्यवसायिक चित्रपट करतानाही प्रयोग करण्याचं दाखवलेलं धाडस आणि त्यात राखलेलं सातत्य या गुणांच्या बळावर बॉलीवूडमधली पहिली सुपरस्टार अभिनेत्री बनली. कोणताही गॉडफादर पाठीशी नसताना या पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:च्या कामाचा ठसा उमटवणं, कामातून दबदबा निर्माण करणं, तो टिकवणं हे सोपं काम नव्हतं. आणि हे सगळं करतानाही स्वत:चं खाजगीपण जपण्याचीही दक्षता घेणंही श्रीदेवीने साधलं होतं. म्हणूनच पन्नास वर्षांची चित्रपट कारकिर्द होऊनही तिचं नाव कधी कुठल्या वादात, प्रकरणात अडकलेलं ऐकायला मिळालं नाही. या दोन जगांमध्ये आखलेली सीमारेषा तिने शेवटपर्यंत काटेकोरपणे सांभाळली. 

मात्र जे खाजगीपण तिने आयुष्यभर जाणीवपूर्वक जपलं, त्याचेच पुरते वाभाडे काढण्याचा विडा उचलल्यागत अनेक वृत्तवाहिन्यांनी तिच्या मृत्यूनंतर अक्षरश: हैदोस घातला. या कालावधीत सोशल मीडियावर एक वाक्य वाचलं - 'Converting RIP into TRP', त्याची प्रचिती वृत्तवाहिन्यांचं विधिनिषेधशून्य वार्तांकनं पाहताना येत होती. 

 श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूमागे जोवर या वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने 'सेन्सेशनल' मुद्दे होते, तोवर देशासमोरचे अन्य महत्त्वाचे विषय त्यांच्यासाठी गौण बनले होते. मात्र खुद्द श्रीदेवीच्या विषयातही या वाहिन्यांचे रंग चार दिवसांत बदलत गेले - पहिले दोन दिवस तिला मखरात बसवणारे नंतर तिच्या खाजगी आयुष्याचे जाहीर वाभाडे काढू लागले. वाहिन्यांच्या या कोडग्या वर्तनाने अनेक संवेदनशील दर्शक हादरून गेले.

पूर्णपणे तथ्यावर आधारित आणि शाब्दिक फुलोऱ्यात न गुदमरलेली विश्वासार्ह बातमी दर्शकांपर्यंत पोहोचवणं हेच कोणत्याही वृत्तवाहिनीचं काम असायला हवं. मग ती वृत्तवाहिनी दिवसातून कितीही तास का चालत असेना! '24 तास बातम्या दाखवण्याच्या सक्तीपोटी कोणत्याही गोष्टीचं बातमीत रूपांतर केलं जातं... त्यांचाही नाइलाज आहे' या आणि अशा समर्थनांमागे लपायची आणि वाट्टेल ते दाखवायची सवयच अनेक वृत्तवाहिन्यांना लागली आहे. त्याचा गंभीर परिणाम दर्शकांच्या मानसिकतेवर होतो आहे, याची त्यांना जराही पर्वा नाही. भडक आणि अंगावर येणारं सादरीकरण म्हणजे बातमी असे संस्कार दर्शकांवरून करून त्यांनाही अशा गोष्टीतून विकृत आनंद मिळवण्याची सवय या वृत्तवाहिन्या लावत आहेत. हे काही अचानक आजच घडलेलं नाही. अशा बातम्यांची सवय हळूहळू दर्शकांना लावण्यात आली आहे. साधारण 10-12 वर्षांपूर्वी बोअरवेलमध्ये 'प्रिन्स' नावाचा 4 वर्षांचा मुलगा पडला, त्या वेळी अस्तित्वात असलेल्या वृत्तवाहिन्यांनी त्याची बातमी जवळजवळ दिवसभर दाखवली. त्या दिवशी देशभर फक्त याच बातमीची चर्चा आणि चर्वितचर्वण चालू होतं. साधारण याच बातमीपासून वृत्तवाहिन्यांना अशा बातम्या दाखवण्याची चटक लागली, असं म्हणता येईल. अशा भडक सादरीकरणाविरोधात नापसंती व्यक्त करणाऱ्यांची, आवाज उठवणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने या वृत्तवाहिन्या काळाच्या ओघात सोकावत चालल्या आहेत. श्रीदेवीच्या मृत्युपश्चातचं त्यांचं वर्तन तर शिसारी आणणारं आणि भयकारी आहे.

या वृत्तवाहिन्या आज ज्यांच्यासाठी जगाशी जोडलेलं राहण्याचं एकमेव माध्यम असतील त्यांची मानसिकता बदलण्याचं, त्याला एक विकृत वळण लावण्याचं काम या वृत्तवाहिन्या करत आहेत. होणाऱ्या बऱ्या-वाईट परिणामांची त्यांना पर्वा नाही, कारण त्यांचा मतलब 'सबसे तेज' राहण्यात आणि सगळयात जास्त टी.आर.पी. मिळवण्यात आहे. म्हणूनच समाजावर जे भलेबुरे परिणाम होत आहेत, त्याचं त्यांना सोयरसुतक नाही.

सनसनाटी बातमी मिळाली तर 'सोन्याहून पिवळं', पण तशी बातमी नसेल तर तिला हवी त्या पध्दतीने वाकवून-वळवून सनसनाटी बनवणं म्हणजेच पत्रकारिता, असा त्यांचा समज आहे आणि तोच समज ते दर्शकांच्या गळी उतरवू पाहत आहेत.

एखादी घटना... मग ती राजकारणासह कोणत्याही क्षेत्रातली असो... विश्वासार्ह स्रोताकडून त्या घटनेची शहानिशा करून घेण्याची, त्यामागची तथ्यं जाणून घेण्याची त्यांना जरूर भासत नाही. त्यांना जी बाजू अयोग्य वाटते त्यावर अधिकारवाणीने तोंडसुख घेणं, रामशास्त्री झाल्यागत निवाडा करणं चालू करतात. वृत्तवाहिन्यांचं हे बेजबाबदार वर्तन पत्रकारितेच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारं तर आहेच, तसंच समाजस्वास्थ्याचीही घडी विसकटून टाकणारं आहे, म्हणून अधिक गंभीर आहे.

समाजमाध्यमं - 'मुक्तपीठ' म्हणून ज्यांचं कौतुक होत आहे, तिथल्या अनेकांना 'आज-आत्ता-ताबडतोब'ची जडलेली व्याधीही समाजस्वास्थ्यावर विपरीत परिणाम करत आहे. श्रीदेवीच्या मृत्यूसंदर्भात व्यक्त होताना या समाजमाध्यमांचा लंबकही दोन टोकांमध्ये हेलकावे खाताना दिसला. त्यावरून होणाऱ्या विनोदांनी तर सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादाच ओलांडल्या होत्या. कोणाचाही अपमृत्यू हा थट्टामस्करीचं निमित्त होतो, तेव्हा समाजाचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय याची ती पूर्वसूचना असते. फेसबुक असो वा व्हॉट्स ऍप वा टि्वटर - ही थेट संवादाची प्रभावी माध्यमं आहेत. माणसांमधला विसंवाद वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ नये आणि वितंडवाद घालण्यासाठीही होऊ नये. दोन्ही प्रकारच्या माध्यमांतल्या लोकांना हे भान जितक्या लवकर येईल, तितकं समाजासाठी ते हितावह ठरेल.