॥ देव तेथेचि जाणावा ॥

विवेक मराठी    05-Feb-2018
Total Views |

 प्रत्येक जीव हा शिवच आहे. त्याची सेवा हीच खरी भक्ती. सज्जनांचं चित्त - मन अंतर्बाह्य लोण्यासारखं असतं. लोणी वितळायला वेळ लागत नाही, तसं कुठेही अडचणीतला जीव पाहिला की मन विरघळून जातं. अर्थातच त्यापाठोपाठ त्या जीवाला आपलं म्हणणं आलंच. ज्याला कोणी नाही, तथाकथित अर्थाने जो पोरका आहे, त्याला आपल्या हृदयाशी धरणं ही देवपूजा.

तुकारामांचे अभंग म्हटले की प्रकर्षाने आठवतो तो हा अभंग –

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले॥१॥

तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा ॥ध्रु.॥

मॄदु सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥२॥

ज्यासी आपंगिता नाही। त्यासी धरी जो हॄदयी॥३॥

दया करणे जे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी॥४॥

तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ती॥५॥

 खरेच, समाजात वावरताना, माणूस म्हणून दुसऱ्या जीवांप्रती आपली भावना व्यक्त करताना आपण कसं असलं पाहिजे? इथे साधू म्हणजे भगवी वस्त्रं घातलेला माणूस अजिबात अपेक्षित नाहीये. आपल्या रोजच्या जगण्यात आपण अनेक भूमिका वठवत असतो. आपले वडील हे जसे आपले पिता असतात, तसे ते कुणाचे तरी भाऊ, मुलगा, नवरा, मालक, नोकर असतात. त्या त्या भूमिकेत ते न्याय्य वागत असतात, तसंच आपल्या जीवनात समाजाप्रती आपले वेगवेगळे भाव आणि भूमिका अपेक्षित आहेत. साधू होणं म्हणजे राख फासून बैरागी होणं नव्हेच. काय असतो साधू? आपपरभाव त्याच्यातून निघून गेलेला असतो, त्याला ना कशाची अपेक्षा असते, हे भगवंताचं काम ह्या दृष्टीने तो प्रत्येक कामाकडे पाहत असतो. बस, हेच ते, ज्या वेळी परिस्थितीने गांजलेले, अन्य कोणत्या कारणाने त्रस्त लोक आपण पाहतो, तेव्हा आपल्यातला साधुभाव जागृत व्हायला हवा. वारकरी पंथाचं हेच वैशिष्ट्य आहे. प्रपंचात राहून परमार्थ करता येतो, त्यासाठी सगळं सोडून जाण्याची अजिबात गरज नाही, हे प्रामुख्याने सांगितलं आहे. बऱ्याच ठिकाणी तर ‘संसार जर मांडला असेल, तर ते कर्तव्य आहे आणि कर्तव्यात कसूर करणं भगवंताला कदापि मान्य नाही’ अशी शिकवण सांगितली आहे. ‘देव तेथेचि जाणावा’ – म्हणजे वेगळी पूजा-कर्मकांड अजिबात आवश्यक नाही. प्रत्येक जीव हा शिवच आहे. त्याची सेवा हीच खरी भक्ती. सज्जनांचं चित्त - मन अंतर्बाह्य लोण्यासारखं असतं. लोणी वितळायला वेळ लागत नाही, तसं कुठेही अडचणीतला जीव पाहिला की मन विरघळून जातं. अर्थातच त्यापाठोपाठ त्या जीवाला आपलं म्हणणं आलंच. ज्याला कोणी नाही, तथाकथित अर्थाने जो पोरका आहे, त्याला आपल्या हृदयाशी धरणं ही देवपूजा. दयार्द्र भाव आपल्या मनी जागता राहिला की झालं, तेच साधूपण आहे. दयाभावाबद्दल अधिक काय बोलू? असं तुकाराम महाराज म्हणतात - अरे, दया करणे पुत्रासी – कोणाविषयी तुम्ही सह-अनुभूती बाळगली की समजा भगवंताच्या मूर्तीची तुम्ही भक्ती केली, पूजा केली. तुकारामांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी एकांगी विचार कधीच केला नाही. दया करा सांगताना दुसरीकडे ते हेही सांगतात –

दया तिचे नाव भुतांचे पालन! आणिक निर्दालन कंटकाचे!!

दया करणे म्हणजे भूतांचे - जीवांचे रक्षण करणे हे जरी असले, तरी जोडीला कंटकांचे निर्दालनही तेवढेच आवश्यक आहे. कारण, समाज चालतो तो समतोल असण्यावर. हा तोल सांभाळायचा तर दुष्टांना धडा शिकवलाच पाहिजे. अन्यायग्रस्तांना मदत, पीडितांना मायेची - दयेची ऊब देत असताना, ज्यांच्यामुळे हे घडलं त्या समाजकंटकांना मोकळं सोडून कसं चालेल? अन्यथा हे सुंद-उपसुंद अशीच बंडाळी माजवत राहतील. उन्माद करणाऱ्यांचा संहार तर प्रसंगी परमेश्वरानेही केला आहे. बरेचदा त्याला वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. क्वचित प्रसंगी नीती वापरून त्या त्या वेळी दुर्जनांचा संहार केला आहे. तेव्हा त्यात पाप असं कुठलंच नाही. एकदा आपल्यातला आपपरभाव मिटला की जागृत होणारी दया किंवा क्रोध यांना ‘मोहाचं’ कवच नसतं. आणि मोहाचं कवच नसेल तर ‘न्याय्य’ वागण्यात ती व्यक्ती चुकूच शकत नाही.

अतिशय सुरेख दाखले देत तुकारामांनी मोह-मायेच्या पलीकडे संसारात राहून ‘साधू’ होण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/