पैशाची जावक

विवेक मराठी    01-Mar-2018
Total Views |

 पैसा ही जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणजे अगदी साधी राहणी असेल, ‘ठेविले अनंते तैसेचि’ राहायचं असेल तरी जगण्यासाठी पैसा लागतो, जरा बरं आरामदायी आयुष्य जगायचं असेल तरी पैसा लागतो आणि ऐश्वर्यात लोळत अत्यंत सुखासीन आयुष्य जगायचं असेल तर खूपच जास्त पैसा लागतो. एकुणात पैसे कमावणं-खर्च करणं, आपल्याकडे येणं-आपल्याकडून जाणं किंवा त्याची आवक-जावक यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे त्याचं सविस्तर विश्लेषण करता येणं अत्यंत गरजेचं असतं. पैशाचं येणं किंवा आवक यांचं विश्लेषण आपण गेल्या लेखामध्ये बघितलं. जाणाऱ्या पैशाचं विश्लेषण या भागामध्ये बघू या.

 जाणाऱ्यापैशाचे प्रकार

खिशातून पैसा बाहेर जाण्याची अनंत कारणं असतात. पैशाच्या जावकीचं खूप वेगवेगळ्या पद्धतींनी विश्लेषण करता येऊ शकतं. आपल्याला समजायला आणि वापरायला सोपे पडतील असे दोन मुख्य प्रकार बघू या.

 . खर्च - जगण्यासाठी करायला लागणारे सर्व नियमित आणि अ-नियमित खर्च हा जावकीचा पहिला प्रकार. अन्न, वस्त्र, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, फोन, इंटरनेट, औषधोपचार हे सध्याच्या काळात जीवनावश्यक असलेले खर्च आपल्याला नियमितपणे करावे लागतात. ह्याशिवाय आपापल्या जीवनशैलीनुसार मुलांचं शिक्षण, घरातल्या नोकरांचे किंवा मोलकरणींचे पगार, राहत्या घराचा किंवा सोसायटीचा मेंटेनन्स, हॉटेलमध्ये खाण्याचे खर्च, मनोरंजनासाठी केलेले खर्च (TV, सिनेमा, नाटक इत्यादी), सुट्टीतल्या सहलींचे आणि प्रवासांचे खर्च, आपल्या छंदांसाठी आणि आवडींसाठी केलेले खर्च हेही सारे खर्च आपण करत असतो.

 खर्चांचं वैशिष्ट्‌य म्हणजे आपण पैसे देतो, त्याबदल्यात जीवनावश्यक किंवा जीवनशैलीला पूरक वस्तू किंवा सेवा विकत घेतो. जी वस्तू किंवा सेवा विकत घेतो त्याचा लगेच उपभोग घेतो. पैसेही लागलीच खिशातून जातात आणि उपभोगही तात्कालिक असतो. विषय संपतो.

 यातले अन्न, वस्त्र इत्यादी जीवनावश्यक खर्च - अगदी किमान पातळीला का होईना, पण करावेच लागतात. जीवनशैलीसंबंधीचे खर्च किती आणि कसे करावेत हे मात्र आपण जाणीवपूर्वक ठरवून कमी-जास्त करू शकतो.

 . हप्ते उर्फ EMI: हल्ली कर्जं मिळणं खूप सोपं झालंय. घर आणि गाडी यासारख्या आपली स्वप्नं असलेल्या गोष्टींपासून ते TV, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी घरगुती वापराच्या वस्तूंपर्यंत आणि उच्च शिक्षणाच्या खर्चापासून ते परदेशप्रवासापर्यंत कोणत्याही गोष्टी ह्या ‘सुलभ’ हप्त्यांवर मिळतात. हे सारे हप्ते किंवा EMI हा पैशांच्या जावकीचा दुसरा मोठा प्रकार.

 हप्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एखादी मोठी गोष्ट विकत घेतो, पण त्याची संपूर्ण किंमत मात्र आपण लगेचच देत नाही. त्या गोष्टीचा फायदा किंवा उपभोग आपण अनेक वर्षं घेणार असतो आणि त्याच्या किमतीची परतफेडही आपण काही महिन्यांत किंवा वर्षांमध्ये करत राहतो.

 हप्त्यावर घेतल्या गेलेल्या बहुसंख्य गोष्टी जीवनावश्यक वाटत असल्या, तरी त्या जीवनशैलीशी संबंधित असतात. उदा., घर जीवनावश्यक आहे, पण ते किती मोठं असावं, कोणत्या ठिकाणी असावं, कोणत्या प्रकारचं असावं हा जीवनशैलीचा प्रश्न असतो. घराचा हप्ता किती कमी किंवा जास्त असणार, हे आपल्या जीवनशैलीसंबंधी निर्णयातून ठरतं. जे घराचं, तेच TV, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या सगळ्याच वस्तूंचं. त्या जीवनावश्यक वाटतात, पण त्या किती महागड्या घ्याव्यात आणि त्यांचे हप्ते किती वाढवून ठेवावेत हे आपल्या जीवनशैलीविषयीच्या निर्णयावर अवलंबून असतं.

 एकुणात खर्च आणि हप्ते ह्या पद्धतीने झालेल्या पैशाच्या जावकीमुळे आपण आपल्या मूलभूत गरजा भागवू शकतो आणि आपल्याला हवी तशी जीवनशैली विकत घेऊ शकतो. आपल्या खर्चांची आणि हप्त्यांची नोंद ठेवत राहून त्याचं सतत विश्लेषण करत राहावं. त्यातला कोणता खर्च जीवनावश्यक आहे आणि कोणता जीवनशैलीचा खर्च आहे याची स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे नोंद घेत राहावं.

 गेल्या लेखामध्ये सांगितलेलं आवकीचं विश्लेषण आणि ह्या लेखातलं जावकीचं विश्लेषण हे दोन्ही कशासाठी करायचं, त्यांचा  खऱ्या आयुष्यात वापर कसा करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हीच्या फरकामधून येणाऱ्या बचतीची गुंतवणूक कशी करायची, याविषयी पुढच्या लेखामध्ये.

 प्रसाद शिरगावकर

prasad.shir