व्हायरल फीवर ( भाग २)  

विवेक मराठी    10-Mar-2018
Total Views |

आता आपण याचा विचार आयुर्वेदाच्या दृष्टितून करुया.

    सगळेच संसर्गजन्य आजार हे श्वास, स्पर्श, एकशय्या, एकवस्त्र, एक पादत्राण, सहभोजन (एका ताटात/ एकमेकांचं उष्टं अन्न खाणं किंवा उष्टं पेय पिणं) यातूनच पसरतात. म्हणून सदासर्वकाळ अशा गोष्टी टाळाव्या असं आयुर्वेदच नव्हे तर आधुनिक वैद्यक शास्त्र सुद्धा सांगतं. व्हायरल फीवरसाठी हा उत्तम प्रतिबंधक उपाय आहे.

   आपण आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे व्हायरल फीवर सामन्यत: ऋतुसंधी काळात डोकं वर काढतात. म्हणून या काळात ऋतू बदलला असं वाटत असलं, तरी खानपानातील बदल सावकाश करावे. उदा. थंडी संपून उन्हाळा सुरू होताना, आधीच्या ऋतूतील गरम पाण्याचं स्नान बंद करून लगेच गार पाण्यावर येऊ नये. उन्हाळा स्थिर होईपर्यंत, ‘कोमट पाणी’ हा मध्यम मार्ग अवलंबावा.

    खरं तर व्हायरल फीवरसाठी व्हायरस हा ‘निमित्तमात्र’ असतो. ते काही त्या तापाचं मुख्य कारण नव्हे. आपल्या चुकीच्या आहार-विहारांनी आपण शरीरात आजाराला अनुकूल अशी केलेली वातावरणनिर्मिती हे त्याचं महत्वाचं कारण असतं. मग असे काय बदल झालेले असतात शरीरात? तर आयुर्वेदाच्या मते अग्नी मंद होऊन पचन कमी झालेलं असतं. त्यातून तयार झालेला अर्धपाचित आहाररस (आमविष) शरीरात तसाच शोषला जाऊन सर्वत्र पसरलेला असतो. तो आहाररस स्वतःबरोबर जठरातल्या उष्म्यालादेखील वाहून नेतो. शिवाय जिथे जातो त्या त्या स्रोतसात मार्गावरोध (रस्ता रोको) निर्माण करून शरीराचा बाह्य उष्मा वाढवतो. म्हणून शास्त्र सांगतं की कुठल्याही तापात सुरवातीला लंघन किंवा अत्यंत हलका आहार हाच खरा उपचार आहे. तापात आपल्याला भूक लागत नाही. याचा अर्थ शरीर स्वतः देखील लंघनाचाच उपाय सुचवत असतं. परंतु आजकाल, एक वेळदेखील उपाशी राहणं म्हणजे जणूकाही साक्षात मृत्यूच्या तोंडी जाणं असा सगळ्यांचा गैरसमज आहे. त्यात पाश्चात्त्य औषधं घ्यायची असतील तर ती ‘खाऊन घ्या’ अशीच सूचना मिळालेली असते. म्हणजे मुळात ताप निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जेवून आधी भर घालायची आणि मग ताप कमी करणारं औषध घ्यायचं- असा हा द्राविडी प्राणायाम नित्य आणि सर्वत्र चालू असतो. लहान मुलांची अवस्था तर फारच वाईट असते. त्यांना भूक नसल्यानं, ते आकांडतांडव करून निसर्गाच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न करतात. तितक्याच हट्टानं त्यांच्या माता त्यांना अन्न (जे न पचल्यानं मुलांच्या शरीरात आमरूपी विषामध्ये रुपांतरीत होणार असतं) भरवत असतात. वर पुन्हा, “तापाच्या औषधापूर्वी खायला नको का?” असा प्रश्न विचारतात. वास्तविक ताप जर १०२ F च्या आत असेल, तर शरीराच्या प्रतिकारयंत्रणेला तिचं तिचं काम करू द्यावं. त्यावेळी लंघन, गरम पाणी, विश्रांती असे उपाय करण्याच्या सूचना शरीर देत असतं. ते समजून, अमलात आणून त्या यंत्रणेला मदत करावी. वैद्यांकडून औषधं घ्यावी. (आयुर्वेदात याला खूप औषधं आहेत. उलट प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार औषध निवडता येईल इतका निवडीला वाव आहे.) प्रतिजैविकांचा वापर शक्यतो टाळावा. (शालेय मुलांमध्ये आढळणारा अवाजवी संताप आणि अस्वस्थपणा हे प्रतिजैविकांच्या अति वापराचे दुष्परिणाम असू शकतात असं आता काही बालरोगतज्ज्ञ सांगतात.)

     कडू चवीची औषधं, पांघरूण घेऊन पडून राहणं, औषधी सिद्ध पेज (शास्त्रात याला यवागू म्हणतात) यांचा वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वापर करावा. दिवसा झोपू नये. स्नान करू नये.

    ताप असताना विष्णूसहस्रनामाचा पाठ करावा (किंवा ऐकावा) असं चरक संहितेत सांगितलं आहे. उपयोग होतो.

    गंभीर लक्षणं नसतील (उदा. श्वास, १०२ F च्या पुढे ताप, ग्लानि, बडबड, थंडी वाजून येणं इ.) तर पहिल्या तीन दिवसात तपासण्या करायची घाई करू नये. त्यात बदल झालेले असतातच असं नाही. 

     ताप उतरला तरी अशक्तपणा कमी होऊन पूर्वीचं बल पुन्हा प्राप्त होईपर्यंत स्नान, अन्नपान, दिवसा झोप, मैथुन, व्यायाम, श्रम या गोष्टी वर्ज्य कराव्यात असं शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे. थोडक्यात स्वतःला पूर्ण बरं करून घ्यावं. हे बल परत मिळवलं नाही तर पुढच्या जास्त गंभीर आजारांना शरीरात प्रवेश करायला सोपं जातं. आजकाल शाळा/ शिकवणी बुडाली तर जगबुडी होईल या थाटात, लहान मुलांना देखील या आवश्यक विश्रांतीला वंचित राहावं लागतं हे दुर्दैव आहे. म्हणूनच ती वारंवार आजारी पडतात. कारण शरीर कायम दुर्बलच असतं.

    अशा साध्या तापावर आयुर्वेदाचे उपचार एकदा केलेली व्यक्ती, पुन्हा दुसऱ्या कुठल्या औषधाचा विचार करतच नाही. कारण आयुर्वेदाच्या औषधांनी भूक लागणं, अंग हलकं होणं, प्रसन्नता आणि बल यांची प्राप्ती तुलनेनं लवकर होते असा बऱ्याच रुग्णांचा अनुभव आहे.